कीर्तन परंपरा आणि अपेक्षा (Art Of Keertan – Maharashtra’s Rich Tradition)

1
124
कीर्तनपरंपरा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव होय. कीर्तन परंपरा म्हणजे रंजन आणि शिक्षण यांचा अपूर्व समन्वय आहे. महाराष्ट्रात नारदीय आणि वारकरी अशा दोन कीर्तन परंपरा आहेत. मात्र अलिकडे नारदीय कीर्तन परंपरा दुर्बल झाली आहे. वारकरी कीर्तन परंपरा मात्र जोमात आहे. त्या कीर्तनांना टीव्ही वाहिन्यांचा मोठा आश्रय असतो. गावोगावी होणारे कीर्तन महोत्सव टीव्हीच्या पडद्यावरून साऱ्या महाराष्ट्रभर; नव्हे, जगभरच्या मराठी समुदायापर्यंत पोचवले जातात. नारदीय कीर्तनाची मांडणी पूर्वरंग आणि उत्तररंग अशी असते. ती मांडणी पूर्वरंगात संतांचा अभंग आणि उत्तरंरगात त्या अभंगाचा आशय प्रत्यक्ष ज्याने आचरून दाखवला त्या महात्म्याचे चरित्र अशी असते. तर वारकरी कीर्तनाची मांडणी विवेचनाला घेतलेल्या अभंगातील प्रत्येक पदाचा उलगडा करण्याची असते. वारकरी कीर्तनात पूर्वरंग किंवा उत्तररंग असा प्रकार नसतो. कीर्तनकाराचा प्रयत्न अद्वैताची मांडणी दृष्टांताच्या रूपाने सुलभ करून त्याचा अनुभव श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी असते. सगुण म्हणजे कीर्तन | अद्वैत म्हणजे निरूपण हे समर्थ रामदासांचे वचन सार्थ आहे.
नारदीय कीर्तन संगीताच्या दृष्टीने एकट्या कीर्तनकाराला रंगवावे लागते. उलट, वारकरीनिरूपणात अनेक साथीदारांच्यामुळे कीर्तनकाराला काही काळ विश्रांती मिळते. वारकरी कीर्तनात चाली ठरलेल्या असतात. नारदीय कीर्तनाप्रमाणे त्यात साकी, कटाव, दिंडी, कामदा, गीती, आर्या असे विविध काव्यप्रकार येत नाहीत.
कीर्तनाच्यात्या दोन्ही परंपरा महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. त्यांपैकी नारदीय कीर्तनपरंपरा प्राचीन आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या कालखंडापासून कीर्तनाची ती श्रेष्ठ परंपरा महाराष्ट्रात अक्षुण्ण राहिली आहे. ज्ञानेश्वर कीर्तनाची थोरवी सांगताना म्हणतात, ‘तरी कीर्तनाचेनि नटनाचे | नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे | जे नामचि नाही पापाचे | ऐसे केले ||’ (ज्ञानेश्वरी 9-197) नामदेव महाराजांनी ती परंपरा अधिक संपन्न केली. नामदेवांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला कीर्तनाची गोडी असल्याचा निर्वाळा दिला आहे. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव |’ या नामदेवांच्या वचनात देवालाही तृप्त करण्याचे कीर्तनाचे सामर्थ्य प्रगट झाले आहे. स्वत: जनाबार्इंनी नामदेव कीर्तन करी | पुढे नाचे पांडुरंग |’ असे नामदेवांच्या कीर्तनाचे महात्म्य वर्णले आहे. ज्ञानदेव-नामदेवांची कीर्तनपरंपरा नाथांनी पुढे चालवली. एकनाथ म्हणतात, कलीयुगी सुगम साधन | न लगे योग याग त्याग दान | करितां निर्लज्ज हरिकीर्तन | चारी मुक्ति चरण वंदिती ||’ (भागवत 7646). कीर्तनभक्तीचे आणि कीर्तनभक्तीमुळे सामान्यजनांच्या मनात होणाऱ्या परिवर्तनाचे सुंदर चित्र एकनाथी भागवतात दुसऱ्या आणि अकराव्या अध्यायात आले आहे.
नाथां सगुण चरित्रे… या अभंगात कीर्तनाचा विषय, व्याप्ती, मर्यादानी स्पष्ट केल्या आहेत. तुकोबा तर कीर्तनाला लालचावलेच होते. त्यांची प्रतिज्ञा, पांडुरंगाच्या कीर्तनाशिवाय अन्य काहीही करणार नाही अशी होती. तुकारामांच्या कीर्तनाची गोडी |देव निवडी आपण ||’, कीर्तनाचा रंग | कैसा उभा पांडुरंग ||’, ‘कलियुगामाजी करावें कीर्तन | तेणे नारायण देईल भेटी |’ या वचनांत प्रत्यक्ष पांडुरंगालाही भुलवण्याची शक्ती कीर्तनात कशी आहे त्याचेच प्रमाण दर्शवते.
कीर्तनामध्ये दहा कलांचा संगम असतो. कीर्तन काव्य, वादन, नृत्य, नाट्य, गायन, ताल, पाठांतर, वक्तृत्व, भाषाज्ञान आणि शिष्टाचार या दशकलांच्या समन्वयातून सिद्ध होत असते. त्याशिवाय कीर्तनात परब्रह्माची अनुभूती देणारे ज्ञान, व्यवहारात उपयोगी पडणारे विज्ञान, साहित्य, संगीत इत्यादी कला आणि समाजाचे संघटन व त्याद्वारे राष्ट्रनिर्मिती म्हणजे लोकसंग्रह अशा चतुरंगाचा समन्वय असतो.
ब्रिटिश कालखंडात लोकमान्य टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय कीर्तनकार निर्माण झाले. त्यांनी राष्ट्रभक्तीची ज्योत अनेक लोकांच्या मनात पेटवली. गोविंदबुवा होशिंग, त्र्यंबककर यांनी नारदीय कीर्तनाची चौकट एकोणिसाव्या शतकात पक्की केली. पुढे दांडेकर, परांजपे, तांबेशास्त्री, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. पटवर्धन, गोविंदबुवा देव, शाहीर काडीलकर, गौतमबुवा पाठक, निजामपूरकरबुवा, गोविंदबुवा आफळे यांनी नारदीय कीर्तनाची श्रीमंती वाढवली. वारकरी निरूपणात सोनुमामा दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर इत्यादींनी संतांची शिकवण जनसामान्यांत रूजवली. यांपैकी बऱ्याच बुवांचा हरीभक्तपरायण या उपाधीने गौरव केला जातो. सदाचाराकडे नेणारी श्रेष्ठ दासगणू महाराज आणि त्यांचे पट्टशिष्य परमपूज्य अनंतराव आठवले यांची नारदीय कीर्तनाचीच, परंतु काहीशी वेगळी परंपरा महाराष्ट्र संस्कृतीला समृद्ध करून गेली.
नारदीय कीर्तनाला परकीय आक्रमणामुळे जबरदस्त तडाखा बसला. त्या तुलनेत वारकरी निरूपणाची परंपरा समृद्ध आणि व्यापक होत गेली. नामसप्ताहात दहा-पंधरा हजारांपर्यंत वारकरी उपस्थित असतात. नारदीय कीर्तनाची पिछेहाट का व्हावी? वारकरी निरूपणाप्रमाणे नारदीय कीर्तनाला लोकमान्यता का मिळू नये? वारकरी निरूपणकार आणि नारदीय कीर्तनकार यांच्या गुणवत्तेत फरक नाही. किंबहुना वारकरी निरूपणकार संत वाङ्मयाच्या गीता आणि भागवत यांच्या पलीकडे जात नाहीत. नारदीय कीर्तनकार तुलनेने थोडे अधिक अध्ययन करतात. नारदीय कीर्तनकार अधिक सुरेल गातातही. नारदीय कीर्तनातील संगीत वैविध्यपूर्ण असते. कथानकालाही कोणती मर्यादा नसते. असे असून नारदीय कीर्तनाची मात्र पिछेहाट झालेली दिसते.
कीर्तनाच्या जोडीने प्रवचन येते. प्रवचनात तत्त्वचर्चा गद्य रूपात असते. प्रवचनांचा काळ चातुर्मास हा मानला जातो. कीर्तन सगुणप्रधान असते. प्रवचन निर्गुणप्रधान असते. सगुण व निर्गुण यांचे आपापसातील नाते स्पष्टपणे समजावून देऊनच नवविधा भक्तीच्या प्रांतात श्रोत्यांना नेणे आवश्यक आहे. कारण आत्मनिवेदन ही नववी भक्ती निर्गुणाशी निगडित आहे. अंतिम साध्य श्रोत्यांसमोर सतत ठेवले गेले पाहिजे. भक्ती सोपी खरी पण सवंग नव्हे हे पटवता आले पाहिजे. तुमचे ज्ञान नको, तुमचा योग नको, आमची आपली भक्ती बरीहा विचार बहुतांश साधकांचा असतो. भक्ती तो कठिण सुळावरील पोळी | निवडी तो बळी विरळा शूरहे तुकोबांचे वचन व सर्वाश्रयनां त्याग:’ हे नारदभक्ती सूत्र पुढे आले म्हणजे भक्तीचे खरे स्वरूप कळते. भक्तीच्या जलाशयाचा सकामता हा अलिकडील तर निष्कामता हा पलीकडील काठ आहे असे त्याचे तात्त्विक विवेचन करता येते.
कीर्तनकारांची सध्या समाजात उपेक्षा होताना दिसते. मात्र कीर्तन ही संस्था टिकून आहे. त्याचे कारण महाराष्ट्रीयांच्या मनात शेकडो वर्षें रुजलेले धार्मिक संस्कार. ते जोपासले जाऊन अधिकाधिक श्रोते कीर्तनाकडे आकर्षित होण्यासाठी काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. कीर्तन कशाकरता करावे? या प्रश्नाचे उत्तर समर्थ रामदासांनी दासबोधात दिले आहे
सगुण हरिकथा करावी | भगवत्कीर्ती वाढवावी | अखंड वैखरी वदवावी | यथायोग्य |’
कीर्तन भगवंतावरील प्रेमात दंग होऊन करावे. उत्तमोत्तम पौराणिक व ऐतिहासिक कथा आख्यानात सांगून श्रोत्यांच्या मनात सात्त्विक भाव उद्दीपित करावा जेणेकरून त्यांना नामस्मरणाची, सदाचाराची गोडी लागेल. आईवडील, गुरुजन आणि अतिथी यांच्याविषयी आदर व भक्ती वाढण्यास मदत होईल असे वर्णन कीर्तनकाराने करावे.
प्रवचनकाराला संगीत येत नसले तरी चालते. मात्र त्याला संगीताचे सामान्य ज्ञान असलेच पाहिजे. झांज वाजवणे, करताल वाजवणे हेही त्याला शिकावे लागते. थोडेफार शास्त्रीय संगीताचे ज्ञान असेल तर उत्तमच. तालाचे, सुराचे, विविध रागदारीचे प्रसंगानुरूप संगीत निरूपणाच्या व कथेच्या ओघात कीर्तनाची गोडी वाढवते. कथा रागदारी संगीताखेरीज साकी, दिंडी, ओवी, श्लोक, आर्या, पोवाडा, गोंधळ यांचाही प्रसंगोपात उपयोग केल्यामुळे अधिक रंगते. तोचतोपणा टाळता येतो. सुश्लोक वामनाचा | अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची | ओवी ज्ञानेशाची | तैसी आर्या मयूरपंताची ||’ या श्लोकात वर्णन केलेले उत्तम कीर्तनकार होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस वामन पंडितांचे श्लोक, तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरीतील काही प्रमुख ओव्या, मोरोपंतांच्या आर्या आणि गौळण वगैरेंचे पाठांतर करणे उपयुक्त ठरेल. नमनातील प्रार्थना, सुभाषिते वगैरे नीट शुद्ध म्हणता येण्यासाठी संस्कृतची निदान तोंडओळख तरी हवीच. कीर्तनकाराचे उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. आवाज फार मोठा नसला तरी सर्व श्रोत्यांपर्यंत पोचला पाहिजे.
 कीर्तन साधारणपणे दीड ते दोन तास चालते. कीर्तनकार प्रथम श्लोक, स्तोत्रे असे साधारणपणे वीस मिनिटे, नंतर एकादा अभंग निरूपणाला घेतो- निरूपण तीन-चार दिवसही चालू शकते. कीर्तनकार त्या अभंगाच्या आधारेच उत्तररंगात एखादे आख्यान लावतो. सभाधीटपणा, वक्तृत्व, गाण्याचे अंग, संगीत, नृत्य, वक्तृत्व व अभिनय ही अंगे आवश्यक आहेत. त्याशिवाय पाठांतर व स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, संस्कृत भाषेचे ज्ञान अशा अनेक गोष्टी कीर्तनकाराच्या ठायी असतात, असाव्या लागतात. तरच तो यशस्वी होतो. कीर्तनकार हा उत्कृष्ट (न) कलाकार असतो.
उत्तररंगानंतर हरदासाची कथा मूळ पदावर येते. आख्यानासाठीची कथा, एकतर भक्ताची असते वा ऐतिहासिक पुरुषाची तरी. नर्म विनोद हा कीर्तनाचा गाभा आहे. वीररस, कारुण्यरस कीर्तनकाराने जशी कथा असेल त्याप्रमाणे त्याच्या अभिनयातून अन् वक्तृत्वातून साकारण्यास हवा. कीर्तनकार उत्कृष्ट नटही असावा लागतो. कीर्तने चातुर्मास, एकादष्ण्या, रामजन्म, कृष्णाष्टमी या दिवशी ठरावीक देवळांतून होतातच. तबकात मिळणारे पैसे, फळे, तांदूळ अन् मंदिराने ठरवलेली बिदागी ही कीर्तनकाराच्या प्राप्तीची मुख्य साधने होत. तो प्रसाद समाप्तीच्या दिवशी वा गोपाळकाल्याला वाटला जातो. श्रोत्यांपैकी ज्यांना शक्य असते ते शाल, उपरणे, धोतरजोडी असे त्याला सन्माननीयरुपे दान देतात. कीर्तनकार सर्वसाधारणपणे धर्मशाळेत वा ज्या देवळात त्याची कीर्तने चालू आहेत तेथे उतरतो. तो कीर्तनाच्या वेळी जो शिधा जमतो त्याचाच स्वयंपाक करून जेवतो. कीर्तने वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस काही चालू नसतात. कीर्तनकाराला इतर दिवसांत पूजा सांगणे, लग्न लावणे अशी कार्येही करावी लागतात.
काही बुवा हातात चिपळ्या/झांजा ठेवतात. पायात घुंगरूही बांधतात. प्रसंगी नाचतातही. कीर्तनात झोपणारे, वाती वळणारे, जप करणारे श्रोतेमहाभाग कमी नसतात. म्हणून बुवा त्यांचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी युक्त्यांचा अवलंब करतात. ते कीर्तनात मध्येच सूचक प्रश्न विचारतात वा भजन करतात/करवून घेतात. त्यांचे दृष्टांत, उदाहरणे घरगुती असतात. तशी ती असली तरच त्यांना श्रोत्यांत मान्यता मिळते, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रसार अन् भक्तिमार्गाचा प्रचार ही दोन मोठी कामे कीर्तनकारांनी केली. कीर्तनकार देवाच्या मूर्तीसमोर कीर्तन सर्वसाधारणपणे करत असतात.
कीर्तन हे प्रचाराचे उत्कृष्ट माध्यम आहे कालमानाप्रमाणे प्रचलित समस्यांचा विचार व तत्संबंधात प्रबोधन कीर्तनकाराला करायचे असते. कीर्तनाचे तीन प्रतिपाद्य विषय- अहिंसा, राष्ट्रीयत्व आणि सर्वधर्मसमभाव – भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांद्वारे समर्थपणे मांडावे लागतील. त्या विषयांसाठी योग्य अभंग वा पदे सापडली नाहीत किंवा उपलब्ध झाली नाहीत तर कीर्तनकारांनी नवीन पद्यरचना करून पूर्वरंग तयार केले पाहिजेत; तसेच, पोषक आख्याने तयार केली पाहिजेत. त्याखेरीज न्याय, नीती, सत्य, सदाचार आणि संस्कृतीची ओळख व जपणूक हे अनुषंगिक विषय असू शकतात. हिंसेचा उद्रेक, राष्ट्रीयत्वाचा लोप व जाती-धर्मातील विद्वेश हा कायद्याने किंवा बंदुकीच्या वा शस्त्रास्त्रांच्या धाकाने नाहीसा होणार नाही, तर तो जनजागृतीने व हृदयपरिवर्तनानेच नष्ट होऊ शकेल. त्यासाठी तसे कार्य कीर्तनकाराला करावे लागेल. नामदेव, तुकाराम, रामदास वगैरे संतमंडळींनी सामुदायिक रीत्या भारतभर परिभ्रमण करून लोकजागृती केली व ती यशस्वी झाली. त्याची आवश्यकता आजही आहे. कीर्तनात मनोरंजन आणि प्रबोधन दोन्ही साधत असल्यामुळे कीर्तन हे त्यासाठी प्रभावी साधन ठरू शकते.
नारदीय कीर्तनकार डोक्यावर पुणेरी पगडी किंवा फेटा, गुडघ्यापर्यंत अंगरखा, धोतर व अंगावर उपरणे या पोषाखात उभे राहून कीर्तन करतो. त्याच्या एका बाजूला तबलावादक व दुसऱ्या बाजूला पेटीवादक असे साथीदार असतात. कीर्तनकाराच्या हातात झांज किंवा चिपळ्या असतात. काही कीर्तनकार त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्या साथीदारांस मागे उभे करतात.
वारकरीकीर्तनात प्रमुख कीर्तनकार फेटा बांधून, श्रोत्यांपुढे मध्यभागी उभा असतो. बाकी वेष नारदीय कीर्तनकारासारखा हातात वीणा किंवा तंबोरी असलेला. मागे पाचपासून पंचवीसपर्यंत टाळकरी उभे असतात. बहुधा ते सर्व माळकरी आणि वारकरी असतात. नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम ही त्यांची उपास्य संत मंडळी आहेत. त्या संप्रदायात अभंगांवर भर जास्त असतो. पूर्वरंग व आख्यान असे प्रकार त्यात नसतात. आख्यान नाहीच, पण काही रोचक दृष्टांत मात्र दिले जातात. बहुधा ते सर्व प्रतिपादनच असते. त्याला निरूपण असे म्हणतात. त्या कीर्तनाची सुरुवात जयजय रामकृष्ण हरीया व शेवट ज्ञानबा तुकारामया भजनांनी होतो. त्या संप्रदायात परिवर्तनाला स्थान नाही.   
कीर्तनकारांचा तिसरा रामदासी संप्रदाय असतो. तो तांत्रिकदृष्ट्या नारदीय संप्रदायात मोडतो. परंतु त्याचे वेगळेपण असे, की ते पूर्वरंगाला किंवा प्रतिपादनाला संत रामदासांचेच अभंग घेतात. आख्यानेसुद्धा रामदास (उपासना व कार्य) – त्यांचे वेगवेगळे शिष्य व त्यांचे अनेक भक्त यांवरच आधारलेली असतात. ते कीर्तनकार शक्यतो भगवी कफनी घालतात किंवा भगवा फेटा बांधतात. कफनी न घालणारे गळ्याभोवती छातीवर उपरणे रामदासी पद्धतीने घेतात. आरती रामाची किंवा रामदासांची असते. शिवाजी महाराज हे रामदासांचे शिष्य असल्यामुळे रामदासी कीर्तनकार शिवाजी महाराज व त्यांचे सहाय्यक तत्कालीन मराठा वीरयांची चरित्रेसुद्धा रंगवून सांगतात.
राष्ट्रीय कीर्तन हा संप्रदाय नसून तो कीर्तनाचा प्रकार आहे. तो नारदीय संप्रदायात अंतर्भूत असल्यामुळे त्या संप्रदायाचे सर्व नियम या कीर्तनप्रकाराला लागू आहेत. फरक इतकाच, की ते आख्याने राष्ट्रपुरुषांची, राष्ट्रनेत्यांची, लोकोत्तर पुरुषांची व स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वसुखाचा व सर्वस्वाचा त्याग करून, कष्ट सोसून प्राणार्पण केले अशा वीर पुरुषांची व झाशीच्या राणीसारख्या वीर स्त्रियांच्या चरित्रांची लावतात. त्यामुळे लोकांमध्ये व विशेषत: तरुण स्त्रीपुरुषांत स्फूर्ती/प्रेरणा निर्माण होते. त्या कारणानेच राष्ट्रीय कीर्तनात अभंगगायनापेक्षा पोवाड्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. राष्ट्रीय कीर्तनकारांचा आवाज पहाडी असल्यास उत्तम.
त्याशिवाय, नाथपंथ, वैष्णवपंथ, शैवपंथ, गाणपत्यपंथ, शाक्तपंथ, जैनपंथ वगैरे अनेक पंथोपपंथ वेगवेगळ्या कीर्तन संप्रदायांत आहेत. महाराष्ट्रात संत तुकडोजीपंथ व गाडगेमहाराज पंथ हेही आधुनिक काळात प्रचारात आहेत.
नवविधा भक्तीमध्ये कीर्तनभक्ती ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रवणानंतर कीर्तन. वास्तविक पाहता अगोदर कीर्तन व त्याद्वारे श्रवण असा क्रम असायला हवा. श्रवण सर्वात सोपे व सर्वांसाठी सहज शक्य असते. श्रोत्याने देवाने दिलेल्या दोन कानांच्यामध्ये त्याचे मन ठेवून एकाग्रतेने ऐकणे म्हणजे श्रवण, पण ज्याचे श्रवण करायचे ते अंग म्हणजे कीर्तन.
कीर्तनसेवेसाठी साधनसामुग्री फारशी लागत नाही. जसे यज्ञ करावा असे म्हटले, की पैसा, मनुष्यबळ हवे. यात्रा करायची म्हटले, की व्यक्तीच्या हातापायांत शक्ती हवी. तपश्चर्या करावी असे म्हटले, की इंद्रियनिग्रह आवश्यक आहे. तसे कीर्तनाचे नाही. नारदीय कीर्तन गळ्यात ब्रह्मवीणा व हातांत चिपळ्या यांवर सतत होत असे. हल्ली मात्र पेटी हवी, तबला हवा, स्पीकर हवा,काही काहींना तर आणखीही वाद्यसंच असेल तर उत्तम असे वाटते. त्या साऱ्या वाद्यांची कीर्तनाला आवश्यकता असते असे मात्र नाही. सांगलीला दोन संत होऊन गेले- तात्यासाहेब कोटणीस महाराज व मामासाहेब केळकर महाराज. त्यांचे कीर्तन, कीर्तनाची वेळ झाली, की ते खिशातून टाळ-झांज काढायचे व सुरू व्हायचे. एकदा मामासाहेब केळकर महाराज गणपतीला निघाले होते. वेळ सकाळी नऊ वाजताची होती; गुरुवर्य रानडे यांनी त्यांना रस्त्यावरील एका घरातून पाहिले. कोणाकडून तरी त्यांना बोलावून घेतले व सहज गुरुदेव म्हणाले, बापुराव, तुमचे कीर्तन फार दिवसांत ऐकले नाही.लगेच मामा उभे राहिले व म्हणाले, मग त्यात विलंब कशाला?’ असे म्हणून त्यांनी खिशातून टाळ काढले व कीर्तन सुरू केले. त्यांना संगीताची आयुधे लागत नसत. त्यांना श्रोते समोर किती आहेत याचीही क्षीती नसे. मामा म्हणायचे, की देवाचे कीर्तन म्हणजे आईच्या दूधाप्रमाणे आहे. बाळाच्या आईला बाळाचे फक्त स्मरण होताच दूध जसे स्तनातून पाझरू लागते तसे देवाची आठवण होताच कीर्तन सुरू व्हायला हवे!
कीर्तनकार परदेशांत पाठवण्याची योजना पुण्याच्या कीर्तन महाविद्यालयामार्फत ठरवून, 1981पासून नंतरच्या पाच-सात वर्षांच्या कालावधीत एकूण अकरा कीर्तनकारांना परदेशात म्हणजे इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका, मॉरिशस इत्यादी देशांत पाठवण्यात आले. कीर्तन परदेशात करण्याचा हेतू परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या धर्मपरंपरेचा, आचारविचारांचा, अध्यात्माचा परिचय करून द्यावा- त्या मार्गाने त्यांच्यात वैदिक धर्मपरंपरा, भारतीयत्व, भारत राष्ट्र यांच्याबाबत आपुलकी व अभिमान जागृत करावा हा होता.
परदेशात वर्षानुवर्षें किंवा पिढ्यान् पिढ्या असंख्य भारतीय राहत आहेत. त्यांना तेथील कायदेशीर नागरिकत्वही लाभले आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्या देशातील शिक्षण, भाषा, संस्कृती, पोशाख, राहणी, आचारविचार यांचे संस्कार होऊन, ते रंगाने काळे पण अंतरंगाने परकीय बनले आहेत. त्यांची मुलेमुली तर भारतीयत्वाला विसरूनच गेली आहेत. त्यांना भारतीय भाषासुद्धा बोलता येत नाही. त्यांचे विवाह परदेशीयांशीसुद्धा होतात. अशा वेळी, कीर्तनकारांना तेथे पाठवणे आवश्यक आहे. ते महत्त्व कीर्तनसंस्थांनी, कीर्तनकारांच्या संघटनांनी, कीर्तनसंमेलनांनी शासनाला पटवून देऊन, कीर्तनकार, प्रवचनकार नियमितपणाने आणि पद्धतशीर प्रचाराचे प्रशिक्षण देऊन परदेशात पाठवले जातील असा संघटित प्रयत्न करण्यास हवा. कीर्तनसंस्थांनी त्यासाठी स्वतंत्र निधी संकलित करून जाणाऱ्या कीर्तनकार-प्रवचनकारांना संपूर्ण किंवा काही प्रमाणात अर्थसाहाय्य द्यावे असा कोपरकर यांचा प्रस्ताव होता.
परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या कीर्तनकारांसाठी कीर्तन महाविद्यालयांमार्फत मुंबईत एक, पुण्यात दोन प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. त्यात वैदिक धर्म व तत्त्वज्ञान यांचे मूलभूत सिद्धांत, आचारविचार, संस्कार यांची उत्पत्ती, वैज्ञानिकता आणि शंकासमाधान यांबाबत माहिती दिली गेली. ती अभ्यासली गेली. त्या प्रशिक्षणाबरोबरच ख्रिश्चन धर्मसंस्कृती तत्त्वज्ञान- त्यांचे धर्मांतराचे कार्य इत्यादी सर्वांचा सविस्तर परिचय तपशीलासह अभ्यास करवून घेण्यात आला.
त्या प्रशिक्षण शिबिरांत तीन इंग्रजी कीर्तने पूर्वरंग व आख्यान यांसह शिकवण्यात आली. कीर्तनाचे नमन, अभंग, आर्या, साक्या, दिंडी, पदे इत्यादी सर्व पारंपरिक चालीवृत्तांवर इंग्रजीत रूपांतरित करून बनवली होती. शेवटचे हेंचि दान देगा देवा!’ आणि गणपतीची सुखकर्ता दुख:हर्ता…ही आरतीही इंग्रजीत त्याच चालीवर तयार करून देण्यात आली.
परदेशात करण्याची कीर्तने तेथील भारतीयांसाठीच करण्याची असल्यामुळे कीर्तने इंग्रजी भाषेत केली पाहिजेत असे बंधन मुळीच नव्हते. इंग्लंड,अमेरिका, आफ्रिका इत्यादी परदेशांत गुजराथी भाषी समाज फार मोठ्या संख्येत आहे आणि तेथील मंदिरे गुजराथी समाजाच्याच व्यवस्थापनांत व मालकीत आहेत. त्या गुजराथी समाजाला हिंदी उत्तम समजते. तथापी गुजराथी भाषेत कीर्तने करणे अधिक सोयीचे आहे असा सल्लाही देण्यात आला होता. कीर्तन विद्यालयांमार्फत परदेशांत जाऊन आलेल्या कीर्तनकारांची नावे सर्वश्री रा.वि. गाडगीळ, श्रीकृष्णबुवा सिन्नरकर, माधवबुवा आठल्ये, नरेंद्रबुवा हाटे, मेधा हाटे, वळामेबुवा, गोविंदस्वामी आफळे, सु.ग. शेवडे, सुधाताई धामणकर, दत्तराज देशपांडे, कोपरकरबुवा…
– (विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, डॉ. श्री.द. देशमुख, धर्मभास्कर गं.ना. कोपरकर, डॉ. सिताराम गणेश देसाई, ज्योती म. जोगळेकर, ह.भ.प. श्रीकृष्णशास्त्री महाजन, डॉ. वा.गं. धालेवाडीकर यांच्या विविध लेखनांतून संकलित)
———————————————————————————————-————————–

About Post Author

1 COMMENT

  1. किर्तन परंपरा व त्यांचे दोन प्रकार आणि महत्त्वाची अंगे या लेखातून कळाले.छान माहिती मिळाली.प्रा.पुरुषोत्तम पटेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here