अनुश्री भिडे यांची हृदयाची भाषा ! (Anushree Bhide’s Language of Heart )

9
1170

ठाणे येथील अनुश्री भिडे यांच्याकडे दातृत्व हा गुण भरभरून आहे. त्यांचे गरजूंना मदत करण्याचे किस्से अद्भुत आणि अचाट आहेत. अनुश्री आणि त्यांचे पती आनंद भिडे ही दोघे कोणताही गाजावाजा न करता, विवेकी बुद्धीने अडीअडचणीच्या वेळी आपलेपणाने धावून जातात. त्यांच्या कार्यातून दातेपणाची व्याख्याच जणू स्पष्ट होते. गंमत म्हणजे त्या हे काम सहजपणे करून जातात. त्यांच्या दातृत्व कार्यातून त्यांच्या स्वभावातील मोठेपणा लखलखीतपणे जाणवतो. देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनातील निर्मळ आनंद हा न आटणारा सद्भावनेचा झरा असतो. संपदा वागळे यांनी त्यांच्याशी गप्पा मारत, अनेक गोष्टी या लेखातून सांगितल्या आहेत. ज्योतीने ज्योत लागावी तशी वाचकांमध्ये दातृत्व आणि निस्वार्थता प्रकटेल अशी खात्री वाटते.

– अपर्णा महाजन
—————————————————————————————-

अनुश्री भिडे यांची हृदयाची भाषा ! (Anushree Bhide’s Language of Heart’)

खूप वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट. एक श्रीमंत बाई तिच्या मुलाच्या लग्नासाठी साड्या खरेदी करण्याकरता एका झकपक दुकानात गेली. तिने ‘एक से एक’ भारी साड्या घेतल्यावर, दुकानदाराला साधी दोनशे-अडीचशे रुपयांपर्यंतची एक साडी दाखवण्यास सांगितले. बाईने त्याच्या नजरेतील प्रश्नचिन्ह पाहून खुलासा केला- ‘आमच्या कामवालीला देण्यासाठी.’ त्याच दिवशी संध्याकाळी एक गरीब स्त्री घाबरत घाबरत त्या सुसज्ज दुकानात शिरली आणि म्हणाली, “एक चांगली साडी दाखवा. माझ्याकडे हजार रुपये आहेत. आमच्या मालकीणबाईंच्या मुलाचे लग्न आहे, त्यांना द्यायची आहे.” दुकानदार अवाक् ! त्या गोष्टीचे नाव होते, ‘श्रीमंत कोण?’

कोणत्याही कृतीपेक्षा त्यापाठीचा विचार, ती व्यक्ती नर आहे की नारायण (अथवा राक्षस) ते ठरवतो. गोष्टीतील श्रीमंत बाईसारखे अनेक लोक आजूबाजूला असतात. स्वतःसाठी लक्षावधी रुपयांची उधळण करणारे, पण दुसऱ्याला शंभर रुपये देतानाही हात मागे घेणारे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या वेदनेने दुःखी होणारे, स्वतः उपाशी राहून स्वत:चा घास भुकेल्या जीवांना देऊन तृप्त करणारे पुण्यात्मेही याच जगात दिसतात ! अशा ‘देवमाणसां’तील विठ्ठल-रखुमाईचा एक जोडा म्हणजे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे.

त्या दोघांचा विवाह हीच एक जगावेगळी कहाणी आहे. त्याचे कारण अनुश्रीची (पूर्वाश्रमीचे नाव – कला महाजन) मुलखावेगळी अट – ‘मी जे मिळवते त्यातील एक घास स्वतःसाठी ठेवून, बाकीचे गरजवंताना वाटून टाकणार. हे ज्याला मान्य आहे तोच माझा नवरा.’ तिला त्या अटीसह स्वीकारणारा कोणी हरीचा लाल भेटेल, याची तिच्या आईवडिलांना आशा नव्हती. पण तिला हवा तसा जोडीदार ईश्वराने आधीच ठरवून ठेवला होता. ती ज्या बँकेत टायपिस्ट म्हणून काम करत होती, तेथे म्हणजे रिझर्व्ह बँकेत जनरल मॅनेजर (टेक्निकल) या पदावर काम करणारे आनंद भिडे हे तिच्या जीवनात आले. जणू तिची ध्येयपूर्ती होण्यासाठी तिच्या मदतीला लक्ष्मी धावून आली. आनंद भिडे हे व्हीजेटीआयमधून इंजिनीयरिंगची पदवी घेऊन स्वकर्तृत्वावर उच्च पदावर पोचले होते. त्यांनी पत्नीचा ‘देण्याचा धर्म’ त्यांचा मानला. त्यांनी तिच्या सुखात त्यांचे सुख शोधले. त्यांची सर्व कमाई ते तिच्या हाती सोपवत गेले. त्यातून अनेक वंचितांचे भाग्य उजळले, निराधारांना आधार मिळाला, कित्येक गरीब विद्यार्थी शिकून त्यांच्या पायांवर उभे राहिले.

अनुश्री यांचे माहेर पैशाने गरीब, पण तिच्याकडे संस्कारांची श्रीमंती होती. वडील रेल्वेत, आई गृहिणी. अनुश्री लहान असताना 50-51 साली वडिलांचा पगार होता दीडशे रुपये. त्या मिळकतीत वडिलांच्या पाठची पाच भावंडे आणि अनुश्रीसह चार मुले, इतक्या मोठ्या कुटुंबाचा संसार कसाबसा चाले. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा मीठपोळी खाण्याची वेळ येई. त्या परिस्थितीतही त्यांच्या दारी आलेला याचक कधी विन्मुख गेला नाही. वडील म्हणत, ‘नशिबाने एक घास मिळतोय. आपण तो पूर्ण देण्याइतके संत नाही. पण अर्धा देण्याइतके माणूस नक्कीच आहोत.’ या शिकवणीमुळे अनुश्री व तिच्या भावंडांनी गरिबीचे दुःख कधी केले नाही. उलट, लहानपणीच गरिबी समजल्याने, पुढे त्यांचा हात कायम देता राहिला.

अनुश्री चार-पाच वर्षांची असतानाची एक आठवण. त्यांचे कुटुंब तेव्हा वडिलांच्या नोकरीमुळे नागपुरात स्थायिक होते. एकदा, गोळवलकर गुरुजी त्यांच्या घरी आले. वडिलांनी लाडक्या लेकीला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तिला मोठ्या प्रेमाने त्यांच्या मांडीवर बसवले. पण लहानगीने त्यांची दाढी बघून गळा काढला. तेव्हा ते म्हणाले, “आज ही रडतेय, पण मोठेपणी हीच अनेकांचे अश्रू पुसेल.” त्यांच्या मुखातून जणू आकाशवाणी झाली. ते शब्द तंतोतंत खरे ठरले.

आनंद भिडे यांचे बालपण अजूनच हलाखीत गेले होते. वडील गेले तेव्हा ते फक्त दोन वर्षांचे होते. मोठ्या दोघी बहिणी चार-पाच वर्षांच्या तर धाकटी केवळ सहा महिन्यांची. आईने त्या चार लहानग्यांना कष्टाने वाढवले. त्यांचे वास्तव्य गिरगावातील एका खोलीत होते. स्वत: आनंद त्या परिस्थितीशी झगडत इंजिनीयर झाले. त्यांना रिझर्व्ह बँकेत नोकरी लागली आणि ते त्यांच्या हुशारीने वर वर चढत गेले. ते निवृत्त 1997 मध्ये झाले. त्यानंतर, 2017 पर्यंत ते विविध बँकाना सल्ला देण्याचे काम करत होते. लाखोंनी कमावणाऱ्या त्या माणसाच्या गरजा एकदम कमी. राहणी अत्यंत साधी. अनुश्री या तर तीन साड्यांच्यावर एकही साडी ठेवत नाहीत. चौथी आली की आधीच्यातील एक, कोणा गरजूच्या अंगावर गेलीच ! घर चारचौघांच्या घरापेक्षाही साधे. रंग कधी काळी काढलेला. घरातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे गरजू संस्थांनी पाठवलेल्या त्यांच्या कामाच्या फाईल्स.

एकदा अनुश्री यांच्या मनात इच्छापत्र करावे असे आले. तेव्हा आनंद भिडे त्यांना म्हणाले, ‘तू किंवा मी गेल्यानंतर कोणाला काय द्यावे ते लिहिण्यापेक्षा जिवंतपणीच तुझ्या हाताने वाटून टाक ना !’ पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्या त्याच दिवशी बँकेत पोचल्या. त्यांनी सर्व ठेवी मोडून आलेले दोन कोटी रुपये गरजू संस्थांच्या पदरात टाकले !

त्या दाम्पत्याचा महिन्याचा खर्च दहा हजार रुपयेही नसेल. कारण खाण्यापिण्याचे चोचले नाहीत. त्यांचे पोट दही-साखर आणि एक पोळी एवढ्यावर भरते. त्यांनी सर्व दागिने विकून ते पैसे दान केल्याने, चोरांचे भय नाही. प्रवास सार्वजनिक वाहनातून चाले. मात्र काही वर्षांपासून लेक व जावई यांनी ताकीद देऊन स्वतःची गाडी दिमतीला दिली आहे.

घरच्या आघाडीवर भिडे दाम्पत्य समाधानी आहे. लेक अश्विनी आणि जावई अभय मराठे, दोघेही बालरोगतज्ज्ञ आहेत. नातू अर्चित आयआयटीमधून इंजिनीयर होऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आहे, तर नात अदिती विशेष प्रशिक्षण घेऊन उम्मीद या दिव्यांग मुलांच्या संस्थेत काम करते. दोन्ही पुढील पिढ्या घरची दातृत्वाची परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत.

शंभरच्यावर संस्था अनुश्री यांना त्यांची आई मानतात आणि अडीअडचणीला हक्काने हाक मारतात. भिकाऱ्यांचा तारणहार बनलेल्या ‘सोहम ट्रस्ट’ या पुण्यातील संस्थेला अनुश्री यांनी कोरोना काळात भिक्षेकऱ्यांच्या लसीकरणासाठी पाच लाख रुपये दिले होते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जगाने नाकारलेल्या त्या माणसांत देव पाहून त्या जोडप्याने गेल्या गुरुपौर्णिमेला त्यांची मनोभावे पाद्यपूजा केली. गरीब मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी ‘सेवा सहयोग’, शेतकऱ्यांना हरप्रकारे मदत करणारी आणि आदिवासी मुलांचे बालमृत्यू रोखणारी ‘शबरी सेवा समिती’, सैनिकांसाठी प्राणपणाने काम करणारी ‘सिर्फ’, निराधार वृद्धांना आधार देणारी ‘यशोधन’ अशा काही सेवाभावी संस्थांना अनुश्री यांनी लाखो रुपयांची मदत दिली आहे.

‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीत जुलै 2022 मध्ये बेलवंडीत (जिल्हा- अहमदनगर, तालुका- श्रीगोंदा) एकोणीस वर्षांपासून एकदिवसीय ग्रामीण साहित्यसंमेलन भरवणाऱ्या एका पानटपरीवाल्याची कथा प्रसिद्ध झाली. त्यात त्याच्या पडक्या घराचा उल्लेख होता. बाईंचे हृदय पाझरले. सहा लाख रुपये त्याच्या झोळीत पडले. ते पाहून आणखी काही दानशूर पुढे सरसावले आणि जुलै 2023 मध्ये त्याच्या झोपडीच्या जागी दोन खोल्यांचे सर्व सुखसोयींनी युक्त असे भक्कम घर उभे राहिले आहे. या पानटपरीवाल्याप्रमाणे, कधीही न बघितलेल्या अन्य दुःखितांच्या कथा आणि व्यथाही त्यांच्या काळजापर्यंत अलगद पोचतात. त्यामुळेच कोरोना काळात त्या घासभर अन्नाच्या वर कधीही जेवल्या नाहीत. तसेच, महाराष्ट्रात 2013 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा पाण्यासाठी चाललेली दुष्काळग्रस्त भागातील बायकांची वणवण पाहून, त्या दिवसभरात फक्त अर्धा ग्लास पाणी पीत असत.

अनुश्री यांच्या हृदयाला कोणाचेही दुःख ऐकले की पाझर फुटतो. एकदा त्या रिक्षाने जात असताना चालकाला कोणाचा तरी फोन आला. अनुश्री यांना त्यांच्या संभाषणातून कळले, की त्या रिक्षावाल्याची आई आजारी असून हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. रिक्षातून उतरल्यावर अनुश्री यांनी त्यांची पर्स उलटी करून होते-नव्हते ते पैसे (अंदाजे दोन हजार रुपये) रिक्षावाल्याच्या हातावर ठेवले ! तो गदगदून रडू लागला.

अनुश्री यांना हृदयाची भाषा कळते. नोकरी करताना ट्रेनच्या प्रवासात त्यांचे डोळे व कान सतर्क असत. त्यांनी कोणा पिचलेल्या स्त्रीला तिच्या मैत्रिणीशी मन मोकळे करताना ऐकले, की त्या ती कोठे उतरते याकडे लक्ष ठेवत आणि उतरल्या उतरल्या तिला गाठून तिच्या हाती पर्समधील हजार-दोन हजार रुपये ठेवत, ती कृती त्यांच्याकडून प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे सहज होत असे. त्या औषधांच्या दुकानात गेल्यावर, कोणी औषधांचे बिल देण्यासाठी पाकिट उलटेपालटे करताना दिसला की त्याची गरज भागली जाणार हे नक्की. अधिक मासात तेहेतीस मुलांची फी भरण्याचा त्यांचा नेम. पण ती दोन आकडी संख्या कधी तीन आकडी होते ते समजतही नाही.

रंजल्यागांजल्यांसाठी वात्सल्यसिंधू असलेल्या अनुश्री, अन्याय होताना दिसला की मात्र दुर्गेचे रूप घेतात. एकदा एक भिकारी त्याच्या बायकोला रस्त्यात बडवत होता. तेव्हा अनुश्री यांनी त्याचा हात पकडला आणि सरळ त्याच्या श्रीमुखात लगावल्या. आवश्यकता असेल तर शत्रूला मारावे, पण ते त्याच्या भल्यासाठी, हे अध्यात्मातील सूत्र त्यांच्या अशा वागण्यापाठी दिसते.

साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही शिकवण जगण्यात उतारवणाऱ्या भिडे जोडप्याची दखल सरकार दरबारीही घेण्यात आली आहे. त्यांचा सत्कार 18 मार्च 2022 रोजी माटुंग्याच्या वेलिंगकर कॉलेजात भरलेल्या G-20 परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आला.

अनुश्री भिडे 8928872826 anushreebhide30@gmail.com

– संपदा वागळे  9930687512 waglesampada@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

9 COMMENTS

    • उत्तराला उशीर झाल्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करते. अनुश्री आणि आनंद भिडे ही देवमाणसं आहेत. त्यांची माझी ओळख आणि त्यातून झालेली मैत्री हे माझं भाग्य आहे. तुम्ही त्यांना अवश्य फोन करा. त्यांचा नंबर – 8928872826

  1. अनुश्रीताई विषयीचा लेख वाचून त्यांच्याविषयी खूप आदर वाटला. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम…! त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.

    • अशा व्यक्ती क्वाचितच भेटतात. देवाने त्यांना घडवताना पोटातील सारी माया ओतलीय.

  2. अनुश्री ताई माझ्या बँकेतील मैत्रिणीच्या जाउबाई… माझ्या आईने स्थापन केलेल्या प्रबोधिनी ट्रस्ट ह्या मतीमंदांसाठी नाशिक येथे काम करणाऱ्या ट्रस्टच्या कार्यावर केलेली छोटीशी फिल्म बघून त्यांचा मला फोन आला. त्यांनी ट्रस्टचे पूर्ण नाव आणि बँक डीटेल्स मागितले आणि चक्क ५०,००० रुपये पाठवून पण दिले… नाशिकला त्या खास संस्थेच्या स्नेह संमेलनाला श्री भिडे ह्यांच्यासह आल्या आणि शाबासकीची थाप संस्थेला देऊन गेल्या. त्यांच्या दातृत्वाला आणि साध्या राहणीला माझा सलाम. अशा व्यक्ती विरळ्याच…

    • अनुश्रीताईंनी असेच पेपरातील बातम्या वाचून कोणाकोणाला लगेचच मदत पाठवलीय. त्यांचा विश्वास आहे की माझे पैसे योग्य ठिकाणीच जातील आणि तसेच घडताना दिसतंय.

  3. अनुश्री ताईंच्या कार्याला सलाम ! श्री भिडे साहेब ही तितकेच आदरणीय ठरतात, दोघांचेही समाज कार्य आदरणीय आणी अनुकरणीयही!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here