पारधी व डोंबारी समाजाच्या मुलामुलींना शिक्षण व निवास या सोयी उपलब्ध करून देणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे समाजकार्याच्या भावनेने झपाटलेले आहेत. त्यांनी तरुणपणी गावचे रस्ते झाडून– स्वच्छ करून आदर्श प्रस्थापित केला, तर सरकारी सहाय्याचा विचार न करता वंचित मुलांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली !
अनंत झेंडे यांनी त्यांच्या तरुण वयातच ‘महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थे’ची स्थापना (2008) नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे केली. संस्था आदिवासी भटक्या विमुक्त मुलांसाठी निवासाची, शिक्षणाची आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेऊन काम करते. अनंत स्वतः स्थानिक श्री भानेश्वर भानगाव विद्यालयात शिपाई म्हणून काम करतात. शाळा ‘ज्ञानदीप ग्रामीण विकास सेवा संस्थे’ची आहे. अनंत यांची घरची शेतीवाडी व आर्थिक स्थिती चांगली असूनही ते शाळेत नोकरी करतात. कारण त्यांना वडिलोपार्जित इस्टेटीपेक्षा स्वतः कमावून स्वतःचा चरितार्थ चालवणे महत्त्वाचे वाटते. संस्थेला शासनाचे अनुदान नाही.
अनंत यांच्या घराण्याला सामाजिक वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा पर्वतराव झेंडे-पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला होता. ते जिल्हा लोकल बोर्डात सदस्य म्हणून (1952 ते 56) कार्यरत होते. त्यांचे दुसरे आजोबा हरिश्चंद्र झेंडे-पाटील यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला होता. त्यांनी ‘जनता जनार्दन शिक्षण संस्थे’ची स्थापना कोरगावपार्क येथे 1956 साली केली. ते विद्यालय गाडगेबाबांच्या नावाने आहे. अनंत यांच्या घरात जनहिताचा विचार करण्याचे वातावरण होते. अनंत यांचा जन्म झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे मातृत्व हरपले. त्यांना त्यांची आजी व मथुराआत्या यांनी वाढवले.
अनंत यांचे मूळ गाव चिखली. त्यांना गावात काही तरी करावे या ध्यासाने पछाडले. पोपटराव पवार, अण्णा हजारे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते चिखली गावात सरकारी योजना समजून घेणे, त्यांची अंमलबजावणी गावात करणे यात सहभागी होऊ लागले. ‘हागणदारीमुक्ती योजना’, ‘गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ या सरकारी योजना त्यांना त्यांच्या वाटत. अनंत एकटेच हातात खराटा घेऊन गावातील गल्लीन् गल्ली झाडत असत. लोक त्यांची चेष्टा करत, हसत. पण नंतर लोकांच्या लक्षात आले, की अनंत गावासाठी इतके करतात, तर मग त्यांना मदत करण्यास हवी. सारे गाव त्यांच्या ‘स्वच्छता अभियाना‘त सहभागी झाले.
अनंत यांचा स्वभाव लाघवी आहे. त्यामुळे अनेक माणसे त्यांच्या मोहिमांना जोडली गेली. स्वित्झर्लंडमधील ‘डॉ. ऑस्कर’ हे अनंत यांचे पहिले परदेशी संपर्क. ऑस्कर यांना मराठी कळत नाही तर अनंत यांना इंग्रजी समजत नाही. तरी त्यांच्या मैत्रीला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑस्कर अनंत यांच्याकडे येतात, राहतात आणि मुलांना शिकवतात. ऑस्कर यांच्या आर्थिक सहयोगामधून गावात बोअरवेल व पाण्याची टाकी आली. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्याची सोय झाली.
गावातील कल्याण कदमसर यांनी अनंत यांना नगरच्या ‘स्नेहालय’ या संस्थेची वाट दाखवली. कदमसर स्वत: बाबा आमटे यांच्यासोबत ‘जोडो भारत सायकल यात्रे’त सहभागी होते; असा त्यांचा पिंड. अनंत यांची ‘स्नेहालय’चे गिरीश कुलकर्णी यांच्याशी घट्ट ओळख झाली. अनंत ‘स्नेहालय’चे ‘वारकरी’च होऊन गेले. अनंत दर शनिवार-रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी ‘स्नेहालया’त जात असत. त्यांनी त्यांच्या आजोबांचा अठ्ठ्याण्णववा वाढदिवस ‘स्नेहालय’ संस्थेत साजरा केला. गिरीश कुलकर्णी यांनी अनंत यांच्यामधील जिद्द, चिकाटी हे गुण हेरले. अनंत यांना संस्थेचे काम कशा प्रकारे चालते, याचे धडे ‘स्नेहालय’मध्येच मिळाले. अनंत ‘आनंदवन’मधील ‘श्रमसंस्कार छावणी’ शिबिरातही गेले होते. अनंत बाबांचे कुष्ठरोग्यांबद्दलचे काम पाहून भारावून गेले. तेथेच त्यांनी बाबांसारखे काम करावे व संस्थेचे नाव महामानव ‘बाबा आमटे’ यांच्या स्मृत्यर्थ ठेवावे असे ठरवून टाकले.
अनंत यांनी आनंदवनातून परतल्यानंतर झपाटल्यासारखी अनेक कामे चिखली गावात केली. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी ‘महामानव बाबा आमटे संस्थे’ची स्थापना झाली. त्याच बेताला त्यांना मोठा लाभ झाला. मूळ श्रीगोंद्याच्या, मुंबईत स्थायिक असलेल्या गिरीश निळकंठ कुलकर्णी यांनी श्रीगोंद्याचा त्यांचा ‘कुलकर्णी वाडा’ अनंत यांच्याकडे सोपवला. अनंत यांनी तो वाडा श्रीगोंद्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना राहण्या-जेवण्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. त्यांनी त्या कार्याची प्रेरणा पुण्याच्या ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’च्या अच्युतराव आपटे यांच्याकडून घेतली. ‘महामानव बाबा आमटे संस्थे’च्या ‘विद्यार्थी सहाय्यक समिती प्रकल्पा’चे लोकार्पण 1 मे 2009 रोजी, महाराष्ट्र दिनी कुलकर्णी वाड्यात झाले ! महाविद्यालयीन गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह शंभर रुपये नाममात्र शुल्कात कुलकर्णी वाड्यात सुरू झाले. अनंत यांचे भाऊ अमोल झेंडे स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. तीस मुले वाड्यात राहू लागली.
त्याच दरम्यान, जवळच्या आदिवासी भागातील फासेपारधींच्या चाळीस मुलांचे वसतिगृह बंद झाले. त्या मुलांचेही पालक अनंत हे झाले. सहा ते दहा वयोगटातील ती फासेपारधी समाजाची मुले-मुली… त्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते. त्या मुलांना बघताच कॉलेजच्या वसतिगृहात राहणारी तीसपैकी सत्तावीस मुले घाबरली आणि वसतिगृह सोडून निघून गेली. अनंत यांना पालात राहणाऱ्या फासेपारधी मुलांच्या सवयी बदलण्यासाठी संघर्ष करावा लागला. ती कोठेही घाण करत, कशीही राहत, पळून जात, अनंत त्यांना शोधून परत घेऊन येत. त्या मुलांची नावेही विचित्र होती – ‘कैदी’, ‘सतुऱ्या’, ‘पिस्तुल्या’ इत्यादी. अनंत यांनी गुन्हेगारीचा शिक्का असलेली त्यांची नावे बदलली. त्यांना अर्जुन, रणवीर, मानसी अशी नावे दिली. अनंत यांनी त्या मुलांचे कायदेशीर पालकत्व घेतले. काही मुलांची जन्माची नोंद नव्हती. पारधी महिला मुलांना संस्थेत घेऊन येत व म्हणत, “भाऊ, शाळेत घाल पोराला, त्याचा बाप जेलात आहे. पोरगं फिरतं गावभर !” त्या मातांचे समुपदेशन करून, त्यांच्या मुलांना संस्थेत प्रवेश दिला जाऊ लागला. मुलांची नावे संस्थेने ठेवली. त्यांना नव्याने ओळख मिळाली…!
अनंत यांनी श्रीगोंदा शहरात प्रबोधनपर व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्या व्याख्यानमालेला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत.
अनंत यांचे लग्न 2013 साली झाले. त्यांची पत्नी शुभांगी यादेखील त्यांच्या बरोबरीने संस्थेचे काम करतात. त्यांनी लग्नसुद्धा वेगळ्या पद्धतीने केले. त्यांनी लग्नात अहेर, मानपान व इतर मानभावी गोष्टींना फाटा दिला. अनंत यांनी पारधी समाजाच्या चाळीस महिलांना पालावर जाऊन आमंत्रण दिले. ज्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले आहे अशा महिला मोठ्या थाटात लग्नाला उपस्थित होत्या. त्या महिलांचा लग्नात सत्कार ‘गीताई’, साडी-चोळी देऊन केला. संस्थेतील चाळीस आदिवासी-पारधी मुले नवीन कपडे घालून लग्न मंडपात वावरताना पाहून व त्यांच्यात झालेला बदल बघून त्या महिलांचे आणि आलेल्या वऱ्हाडी मंडळींचे डोळे पाणावले. संस्थेत दाखल झालेली मुले पदवीधर होऊन बाहेर पडत आहेत. उदाहरणार्थ सध्या असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अभिषेक निसर्गोपचार पद्धतीवर अभ्यास करतो, तर परशुराम ‘एम पी एस सी’ची तयारी करत आहे.
‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमात संस्थेची माहिती प्रसिद्ध झाली व त्याचा लाभ संस्थेला अपार झाला ! महाराष्ट्रातील अनेक दात्यांनी संस्थेला देणगी दिली. त्या सहयोगातून कुलकर्णी वाड्यात सुरू झालेली संस्था साडेचार एकराच्या जागेत गेली. त्या जागेचे भूमिपूजन विकास आमटे, पोलिस उपायुक्त कृष्णप्रकाश, अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे नाव ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्र’ असे ठेवण्यात आले. संस्थेच्या त्या वसतिगृहात एकशेचाळीस पारधी, भटक्या व विमुक्त मुलांच्या राहण्याची व जेवणाची सोय झाली आहे. आदिवासी मुलींच्या निवासासाठी संस्थेच्या स्वतंत्र वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. तेथे शंभर आदिवासी मुलींच्या निवासाची व्यवस्था होणार आहे. संस्थेच्या भोजनालयात जेवण बनवण्याचे काम गरजू महिलांना दिले आहे.
संस्था पुण्याच्या ‘देणे समाजाचे’ या सामाजिक उपक्रमाशी जोडली गेली आहे. संस्थेला आर्थिक पाठबळ तेथूनही मिळाले. त्यामुळे संस्थेचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला व मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण करता आली. वसतिगृहास लागणारा भाजीपाला संस्थेच्या आवारात पिकवला जातो. ‘कौशल्य विकासा’चे उपक्रम संस्थेत सुरू आहेत. संस्थेतील तीन फासेपारधी विद्यार्थी ‘स्नेहालय’तर्फे आयोजित केलेल्या ‘भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा, 2022’मध्ये सहभागी झाले होते. अनंत स्वतःही सायकलवरून बांगलादेशातील नौखालीपर्यंत सद्भावना सायकल यात्रेत गेले होते.
संस्थेतील उपक्रमांनिमित्त सिंधुताई सपकाळ, प्रकाश व मंदा आमटे, मेधा पाटकर वगैरे मान्यवरांनी संस्थेला भेटी दिल्या आहेत. एक ध्येयवेडा तरुण विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन केवढे मोठे काम उभे करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनंत झेंडे यांचे हे कार्य आहे !
अनंत झेंडे 9404976833
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@
Please mention Anant Zende’s contact number in your report on his sanstha