अंबरनाथचे ‘गुरुकुल’ केवळ शिक्षण देत नाही, ते विद्यार्थ्याला समजून घेते, घडवते आणि आयुष्यातील प्रत्येक वळणासाठी तयार करते. असे म्हणता येईल की ‘गुरुकुला’त आयुष्य शिकायला मिळते ! गुरुकुल हा भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. तेथे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि अर्थातच पालकांच्या संमतीने प्रवेश घेतात. ‘गुरुकुला’त शाळा बारा तासांची होते ! नित्याचे वर्ग पाच तासांचे आणि गुरुकुलातील विशेष संस्कार शिक्षण सात तासांचे.
पण गंमत अशी की तेथे शिकणाऱ्या मुलांना शिक्षणाचा तो जादा वेळ म्हणजे ओझे वाटत नाही. त्यांच्यासाठी तो एक प्रवास असतो – ज्ञान, अनुभव आणि आनंद यांनी भरलेला. गुरुकुल शाळेतील वातावरण आणि शिक्षण हे ज्ञानाच्या पलीकडे जाणारे असते.

गुरुकुलात दिवसाची सुरुवात प्रातःस्मरण, सूर्यनमस्कार, योगासने, उपासना, चिंतानिका आणि श्लोकपठण यांनी होते. त्यातून विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होते आणि दिवसभराच्या कार्यक्रमासाठी अभिमुख होते. नंतर विषयांवर आधारित शैक्षणिक सत्रे घेतली जातात, पण ती सत्रे पारंपरिक ‘वर्गशिक्षण’ अशा धर्तीची नसतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवादाचा पूल असतो. शंका विचारल्या जातात, उदाहरणे दिली जातात, अनुभव चर्चिले जातात. ते शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्याला वास्तव अनुभवाची जोड दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये ‘हे असे का आहे’, ‘हे व्यवहारात कसे वापरता येईल’ आणि ‘हे आयुष्यात कोठे उपयोगी पडेल’ असे प्रश्न पडावेत या प्रकारचे ज्ञान दिले जाते. म्हणूनच, त्या शाळेत शिकलेली मुले स्मरणशक्तीवर न विसंबता वेगवेगळे विचार करतात, शोध घेतात आणि ते विचार कृतीत आणतात.
गुरुकुल शाळा म्हणते, की त्यांचे शिक्षण पंचकोशाधारित आहे. पंचकोश म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या पाच पैलूंचा समतोल विकास. ती संकल्पना ‘पंचकोश’ या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित आहे. त्यात पाच कोश – अन्नमय कोश – शारीरिक विकास, प्राणमय कोश -प्राणशक्तीचा विकास, मनोमय कोश -मानसिक विकास, विज्ञानमय कोश -बौद्धिक विकास आणि आनंदमय कोश -आत्मिक विकास. शरीरधारणेचे हे पाच कोश भारतीय परंपरेत मानले गेले आहेत. त्या प्रत्येक कोशानुसार माणसाची वाढ व विकास होत जातात.

गुरुकुल शाळेच्या शिक्षिका अश्विनी करजगी या वीस वर्षांपासून गुरुकुलाचे काम पाहत आहेत. त्या म्हणाल्या, की कै. भाऊ अभ्यंकर हे पंचकोशाधारीत गुरुकुलचे संस्थापक आहेत. त्यांनी अभ्यास करून पंचकोशाआधारित शिक्षण पद्धत विकसित केली आहे. ‘गुरुकुला’त या प्रत्येक कोशाचा समतोल विकास व्हावा म्हणून विविध कार्यक्रम राबवले जातात- योग, खेळ, ध्यान, अभिव्यक्ती कला, गटचर्चा, सामाजिक उपक्रम आणि मूल्यशिक्षण या सर्वांमधून शरीर, मन आणि आत्मा यांचे पूर्ण पोषण व्हावे असे अभिप्रेत आहे. शिबिरे आणि क्षेत्रभेटी हे गुरुकुल शाळेचे अनोखे अंग आहे. वर्षभरात मुलांना शाळेबाहेर अनेकदा नेले जाते. कधी एखाद्या गावात, कधी निसर्गाच्या सान्निध्यात, कधी शेतातील कामे समजून घेण्यास. अशा क्षेत्रभेटींमधून मुलांना जीवनातील विविधता अनुभवण्यास मिळते –प्रत्ययास येते. त्यांना समाजाचे आणि वास्तवाचे दर्शन होते. त्या अनुभवांनी संवेदनशीलता, सहवेदना आणि आत्मनिर्भरता यांची बीजे त्यांच्या मनात रोवली जातात. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांनुसार नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभव घेण्याची संधी मिळते. शिबिर एक आठवड्याचे असो किंवा दोन दिवसांची क्षेत्रभेट, प्रत्येक क्षण हा व्यावहारिक शिक्षणाचा असतो. तेथे सैद्धांतिक ज्ञान अनुभवाच्या वाटेने आत्मसात केले जाते.

गुरुकुल शाळेत विद्यार्थी स्वतः दिवाळी बॉक्सपासून राख्यांची पाकिटे असे सर्व साहित्य बनवतात आणि विकतातदेखील. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळते. लोकांशी थेट संवाद साधताना त्यांचे संवादकौशल्य वाढते आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना जवळपासच्या परिसरातील घरोघरी जाऊन वस्तू विकताना अर्थशास्त्र आणि विक्रीतंत्र शिकण्यास मिळते. उदाहरणार्थ, दिवाळी गिफ्ट बॉक्स आणि रक्षाबंधनातील राख्यांची पाकिटे यांचे नियोजन विद्यार्थी स्वतः करतात. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करणे -तयार करणे -पॅकिंग करणे… हे सर्व विद्यार्थीच करतात. त्यामुळे त्यांना टीमवर्क, नियोजन आणि प्रत्यक्ष विक्रीचे शास्त्र अशा गोष्टी शिकता येतात.

गुरुकुल शाळेच्या सुरुवातीला वर्षारंभ कार्यक्रम असतो. त्यात नवीन विद्यार्थ्यांसाठी यज्ञाग्नीच्या साक्षीने शैक्षणिक वर्षाचा आरंभ होतो. त्या पूजनाने विद्यार्थ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. शाळा एप्रिल महिन्यातही चालू असते. ती इतर शाळांप्रमाणे सुट्टी देत नाही. पण एप्रिलमध्ये पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाधारित शिक्षणाला अधिक महत्त्व असते. विद्यार्थी विविध कार्यशाळेत जातात, स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि वर्षभरातील विविध कार्यक्रमांची तयारी करतात.

शाळेचा वर्षांत प्रमुख उपक्रम असतो, तो म्हणजे एक नाट्यप्रयोगमूलक कार्यक्रम. त्यात अभिनय, गायन, नृत्य, योगासने आणि इतर कला सादर केल्या जातात. तो फक्त स्टेज शो नसतो, तर विद्यार्थ्यांनी वर्षभर छंदवर्ग पद्धतीने जे काही शिक्षण घेतले त्याचे ते सर्जनशील प्रदर्शन असते. वर्षभर विद्यार्थी छंदवर्गात तबला, पेटी (संवादिनी) वादन, नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला शिकतात आणि ते सगळे गुण व कला अशा वार्षिक कार्यक्रमातून सादर करतात. त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण अनुभवण्यास आणि आत्मसात करण्यास संधी मिळते.
शाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, कलाकार, संशोधक, लेखक, डॉक्टर, शेतकरी, पत्रकार, उद्योगपती हे नियमित निमंत्रित केले जातात. विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संवाद होत असतो. त्या मुलाखती, चर्चासत्रे आणि ओपन टॉक्स यांमधून विद्यार्थ्यांच्या विचारांना नवे दुवे मिळतात. तशा सत्रांत विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतात आणि ते स्वतःच त्यांची मुलाखतदेखील घेतात. शाळेत विज्ञान दिन, मराठी भाषा गौरव दिन असे विशिष्ट दिवस साजरे केले जातात. त्यामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी उमगतात, करिअरविषयी स्पष्टता मिळते आणि विद्यार्थी स्वप्ने पाहू लागतात. केवळ मोठी स्वप्ने नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी मेहनत, मूल्ये आणि कृती या गोष्टीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवल्या जातात.

गुरुकुल शाळा मराठी माध्यमातून चालवली जाते. विद्यार्थ्यांना मातृभाषा समजली पाहिजे, तीमधून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे यासाठी शाळा प्रयत्नशील आहे. विद्यार्थी मातृभाषेत शिकल्यामुळे त्याच्या विचार करण्यात सहजता येते आणि अभिव्यक्तीची ताकदही वाढते, असा अनुभव येतो. सर्व विषय मराठीतून शिकवले जातात. फक्त इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजीतून असतात. विद्यार्थ्यांना संस्कृत आणि हिंदीसुद्धा शिकण्यास मिळते. अनेक शाळा इंग्रजीकडे वळत आहेत, त्या काळात ही शाळा भारतीय मूल्यांना, संस्कृतीला आणि भाषेला धरून आहे. तेच शिक्षणाचे खरे बळ आहे.
‘गुरुकुल’ शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते, की तेथे त्याचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्याच्या भावना, त्याची मते, त्याचे प्रश्न आणि त्याची स्वप्ने यांना मान दिला जातो. त्यामुळे मुले आत्मविश्वासाने वाढतात, स्वतःच्या चुका स्वीकारण्यास शिकतात आणि काहीतरी नव्याने शिकण्याची जिज्ञासा बाळगतात. शाळेचे वातावरण हे शिस्तीचे, प्रेमाचे आणि प्रोत्साहनाचे आहे. शिक्षक केवळ शिकवणारे नसून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व मित्रसुद्धा असतात. म्हणूनच तेथे शिक्षकांना आर्य आणि शिक्षिकांना ताई असे संबोधले जाते.

शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही हे तेथे खरे करून दाखवले गेले आहे. पंचकोशाधारित गुरुकुल हे शिक्षणाच्या परंपरेला नवा आयाम देणारे स्थान आहे. तेथे विद्यार्थी फक्त गुणांसाठी शिकत नाहीत, तर माणूस बनण्यासाठी शिकतात. तेथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या ज्ञानामुळे नाही, तर मूल्यांमुळे आणि अनुभवांमुळे ओळखला जातो -ती एक जीवनशाळा आहे. तेथे मुलांचे आयुष्य आकार घेते, स्वप्ने उंच भरारी घेतात.
गुरुकुल शाळा ‘दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ’ या संस्थेमार्फत चालवली जाते. सोसायटीचे अध्यक्ष अजित गोडबोले आहेत. सध्या त्या उपक्रमात एकशेसत्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुकुल भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचा भाग आहे. पंचकोशाधारित गुरुकुल हा प्रकल्प गेली पंचवीस वर्षे चालू आहे. मूळ प्रकल्प निगडी (पुणे) येथे वा.ना. तथा भाऊ अभ्यंकर यांच्या प्रेरणेने चालू झाला.

गुरुकुल शाळेच्या प्रमुख माधुरी पुराणिक आहेत. त्यांनी सांगितले, की भाऊसाहेब परांजपे विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुकुलात सहभागी होणे अनिवार्य नाही. ज्या पालकांना त्यांच्या पाल्यांना पुस्तकी शिक्षण न देता जीवनोपयोगी शिक्षण देणे महत्त्वाचे वाटते ते त्यांच्या मुलांना गुरुकुलात पाठवतात. गुरूकुलात प्रत्येक उपक्रम त्यामागील उद्देश समजावून विद्यार्थ्यांना शिकवला जातो. विद्यार्थी गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पारायण एकमेकांच्या, शिक्षकांच्या घरी जाऊन व गणपती मंडळांत करत असतात. गुरुकुलासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. गुरुकुल शाळा महाराष्ट्रभरात डोंबिवली, बदलापूर, बारामती, चिखली, निगडी, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी सुरू आहेत.
– इंद्रायणी लेले 77960 46703 indrayanilele@gmail.com
गुरुकुल सारख्या शाळा ही आजची गरज आहे. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन!
कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे!
हार्दिक शुभेच्छा!