संतनगरी आकोट (Akot- City of Saints from Vidarbha)

2
324

आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. आकोट हे अकोल्यापासून उत्तरेकडे पंचेचाळीस किलोमीटरवर आहे. आकोटची लोकसंख्या सव्वा लाख आहे. आकोटच्या आसपास लाडेगाव, अंबोडा, मोहाळा, बोर्डी, उपरा (उमरा) अशी खेडी आहेत; जवळच रामदासस्वामी यांनी स्थापन केलेली हनुमान मूर्ती आहे. ते ठिकाण वारी हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. ते आकोटपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथेच बान नदीवर हनुमान सागर नावाचे धरण आहे. ते बुलढाणा व अकोला जिल्ह्यांतील लोकांची पाण्याची तहान भागवते. शेगाव हे आकोटपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. जवळपास असणारी अन्य शहरे म्हणजे अचलपूर, मूर्तिजापूर ही होत. आकोट हे रेल्वे स्टेशन आहे. आकोट गाव हे एनएच 53 ई, एनएच 753 सी या हमरस्त्यांना जोडलेले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि चिखलदरा-अमरावती-बुऱ्हानपूर-वाशीम ही प्रेक्षणीय व पर्यटनयोग्य स्थळे आकोटच्या नजीक आहेत. आकोटला दोन नद्या आहेत- एक खाई नदी. तिला अजिबात पाणी नव्हते. म्हणून तिला खाई नदी असे म्हणतात. दुसरी मोहाडी/मोहाळी नदी.

नरसिंग महाराज हे आकोटचे ग्रामदैवत मानले जाते. त्यांचा गावावर प्रभाव आहे. त्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अष्टसिद्धी समाधी घेण्यापूर्वी गजानन महाराजांना प्रदान केल्या अशी आख्यायिका आहे. आकोटचे नरसिंग महाराज आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या नात्याविषयी विविध हकिगती सांगितल्या जातात. परंतु त्या दोघांमध्ये नाते नव्हते; स्नेहबंध मात्र घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. भाविक भक्त त्यांच्या सोयीप्रमाणे दोघांपैकी एकाचे नाव घेऊन त्यांना हवी ती कहाणी प्रसृत करत असतात.

नरसिंग महाराज यांच्याबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाते, की गजानन महाराज जेव्हा त्यांना भेटण्यास आले, तेव्हा नरसिंग महाराज एका विहिरीच्या काठावर बसले होते. गजानन महाराजांनी विहिरीत डोकावले तर काय आश्चर्य, की त्या पाण्याला झरे फुटले आणि पाणी उकळ्या फुटल्यासारखे नाचू लागले ! जणू गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम तेथे झाला आहे आणि गजानन महाराजांवर अभिषेक होत आहे ! महाराजांनी त्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला आणि जमलेल्या सर्व लोकांनासुद्धा आंघोळीचा आग्रह केला. तो सुखद, रम्य सोहळा हजारो लोकांनी पाहिला, म्हणे. गजानन महाराजांनी त्या विहिरीला ‘मनकर्णिका’ असे नाव दिले. ती विहीर भरपूर पाण्यासह गावात अस्तित्वात आहे.

गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे. घडले असे, की आकोट परिसरात अवर्षण झाले. बराच काळ पाऊस पडलाच नाही. त्यामुळे आकोट परिसरातील लोक घाबरून गेले. ते नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना पाऊस पडण्यासाठी काय करावे असे विचारते झाले. तेव्हा नरसिंग महाराजांनी सांगितले, की “आपल्या गावात श्री केशवराज महाराजांचे जागृत मंदिर आहे, त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा व तो नेहमीसाठी सुरू ठेवावा.” त्याप्रमाणे लोकांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला असता तिसऱ्याच दिवसापासून पावसाला सुरुवात झाली व लोक आनंदित होऊन गेले. महाराजांचा जयजयकार करू लागले. आषाढ महिन्यात पाण्यासाठी सुरू झालेला तो सप्ताह आजतागायत दरवर्षी सुरू आहे. सतत सात दिवस अखंड वाद्यवादन-भजन-कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम चालू असतात. हे स्थान अमृत शांतिवन तीर्थ (आकोली) म्हणून ओळखले जाते. सतीश आसरकर हे सद्यकाळातील नरसिंग मंदिरातील धर्मकार्याचे कर्ते आहेत.

आकोलखेड रोडवरील विहीर आकोली जहागीर येथे आहे. ते ठिकाण बस स्टॅण्डपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. विहीर खूपच मोठी आहे. त्यात मोठमोठी कासवे आहेत. तेथे गजानन महाराजांचे मंदिर बांधून त्यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. तो परिसर रम्य असा आहे. त्या विहिरीवर गर्दी असते. विहिरीतील पाणी खूप जवळ म्हणजे अवघ्या दोन फूटांवर आहे. तेथे सतत भंडारा-महाप्रसाद चालू असतो. भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात, पण प्रसाद कधीच कमी पडत नाही ! त्या विहिरीचा जीर्णोद्धार भारतीय स्टेट बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी नारायण इंगळे यांनी केला. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन त्या विहीर संस्थानाला अर्पण केले आहे. आकोली जहागीर येथून पोपटखेड धरण जवळच आहे. ते धरण पाहण्यासाठीही लोक मोठ्या प्रमाणावर येतात.

आकोट गावात जुनीनवी मंदिरे बरीच आहेत. आकोट गावच्या वातावरणात धर्मप्रभाव जाणवतो. छोटेमोठे सण-उत्सव गणपती, नवरात्र, गोकुळ अष्टमी, शिवरात्र, श्रावणी सोमवार या निमित्तांनी साजरे केले जातात. अन्य अनेकविध उत्सव-उपक्रम सतत चालू असतात. त्यामुळे गावात लोक जास्त भाविक आहेत. त्या कारणे गावात शांतता व सुबत्ता नांदते अशी लोकांची श्रद्धा आहे. गजानन महाराजांचे मंदिर हे आकोटचे वैशिष्ट्य आहे. तेथे पहाटे ‘उठा उठा हो गजानना’ या काकड आरतीने दिवस सुरू होतो. लगेच नऊ वाजता ‘जय जय सच्चिदानंद स्वरूपा स्वामी गणराया’ या आरतीचे… असे दोन्हींचे स्वर वातावरण भारून टाकतात. दुपारी भागवत कीर्तन, गजाननविजय ग्रंथाचे सामूहिक पारायण होते. सायंकाळी भजन, भक्तिसंगीत, महाआरती आणि प्रसाद वितरण असा कार्यक्रम असतो. नामजप व हरिपाठही चालू असतोच. गजानन महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे येतो. गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी काल्याचे कीर्तन, महाआरती व महाप्रसाद आटोपल्यावर रात्री पालखी मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी मंदिर परिसर पानाफुलांनी व विद्युत रोषणाईने सुशोभित केला जातो.

दुसरे महत्त्वाचे असे महादेव सिद्धेश्वरचे मंदिर जुने आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. महादेव व पार्वती यांच्या विवाहाचा सोहळा तेथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहान लहान मुलेसुद्धा महादेवाला लोटाभर पाणी-‘जल’- अर्पण करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात येत असतात. आकोटच्या रावसाहेब देशमुखांकडे या मंदिराची सेवा आहे. ती कृष्णराव दुर्गे यांच्याकडून त्यांच्याकडे आली. कारण दुर्गे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. देशमुखांचा मुलगा अरुण व सून नयना ही दोघे त्या मंदिरातील सेवाकार्य पाहतात. मंदिरात मोठा नंदी आहे. त्या नंदीच्या कानात भक्ताने त्याला हवी असलेली गोष्ट सांगितली, की ती पूर्ण होते असा समज पसरला गेला आहे. म्हणून भक्तभाविकांनाही नंदीच्या कानात बोलण्याचा नाद लागला आहे. तेथे महाशिवरात्रीचा तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असतो- रात्री बारा वाजता शेजआरती, दिवसभर बायका-माणसांचे भजन, दुसऱ्या दिवशी भंडारा. खूप लोक प्रसादाला येतात. दुसऱ्या दिवशी प्रक्षालपूजन विधी व मग शिऱ्याचा प्रसाद असतो. महादेवाला ऊसाच्या रसाचा अभिषेक केला जातो. सिद्धेश्वर मंदिरात गणपती व मारुती यांच्या मूर्ती आहेत. त्या संगमरवरात करून घेण्यात आल्या आहेत.

माझे आजोबा अमृतराव देशमुख हे आकोटला वतनदारी देशमुख होते. आमच्याकडे शेती मोठ्या प्रमाणावर होती. रावसाहेब देशमुख हे स्वतः तहसीलदार होते. मी लहान असताना वातावरण अगदी वेगळे होते. आम्ही सर्व भावंडे बैलगाडीतून शेतात जात असू. आमराईत दोन झाडांना झुला बांधत असू आणि कच्च्या कैऱ्यांचा; तसेच, आंब्यांचा मनमुराद आनंद लुटत असू.

सिद्धेश्वर मंदिराला लागून केशवराज मंदिरही आहे. केशवराजाची मूर्ती प्राचीन आहे. आकोटला तीन मूर्ती तीनशे वर्षांपूर्वी एका तलावामध्ये सापडल्या. त्यांपैकी केशवराजाची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली. ते मंदिर नागपूरकर भोसले यांनी बांधून दिले. तेव्हा हैदराबादच्या निजामाचे सरकार विदर्भात होते. त्या निजाम बादशहाची सनदसुद्धा केशवराज मंदिरात उपलब्ध आहे. मंदिराचा सभामंडप लाकडी खांबामध्ये उभारलेला आहे. त्यात विष्णूची मूर्ती आहे. ते देऊळ जुने आहे. त्याचे व्यवस्थापक मुकुंद व मिलिंद देवळे बंधू आहेत. तो भाग केशवराज वेटाळ म्हणून ओळखला जातो. जशा ठिकठिकाणी कॉलनी असतात तसे आकोटला केशवराज वेटाळ, वणे वेटाळ, धवडगाव वेटाळ असे भाग ओळखले जातात.

जुन्या आकोट शहरातील केशवराज वेटाळ परिसरात असलेल्या तहसील कार्यालय परिसराला कोट म्हणून संबोधतात. त्याचा किल्ला म्हणून उल्लेख ब्रिटिश काळातील कागदपत्रांत काही ठिकाणी येतो. ती वास्तू जुन्या आकोट शहरातील एका टेकाडावर इंग्रजी काळात बांधली गेली. तेथे तहसील कार्यालय आहे. ती वास्तू म्हणजे आकोट शहरात येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांचे विश्रामगृह होते. त्या वास्तूच्या खालील बाजूस दगडी तटबंदी आहे. त्या तटबंदीत साधारण पंचवीस फूट उंचीचा, नक्षीदार कमान असलेला विटांचा दरवाजा आहे. त्या दरवाज्याने आत येण्यासाठी पंधरा-वीस पायऱ्या चढाव्या लागतात. तेथून जुने आकोट शहर व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. आकोट शहर हे तीन गावांचे बनले असून कधी काळी त्या शहराला मातीची तटबंदी व या तटबंदीत सहा दरवाजे असल्याचे सांगण्यात येते. भोसलेकालीन श्रीविनायक गणपती मंदिराचा इतिहासही मोठा आहे. श्रीकृष्णाचे मंदिर दर्यापूर रोडवरील शिवाजी कॉलेजजवळ आहे. आकोट गावात हनुमान, दुर्गा ही अन्य मंदिरे; तसेच, मशिदी आहेत. नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. तेथे नंदीची मोठी मूर्ती आहे. ते ज्या रस्त्यावर आहे तो भाग नंदी पेठ म्हणून ओळखला जातो. तेथे एक पायविहीर होती. विहिरीच्या आत तीन मजले होते. त्या विहिरीत जुन्या काळी क्रांतिकारक राहायचे अशी समजूत आहे.

शनिवार वेस येथील राम मंदिर बरेच जुने आहे. श्रीराम भारतीय जनजीवनात कसा मुरून गेला आहे त्याचा प्रत्यय आकोटच्या त्या मंदिरात येतो. ते मंदिर आकोट शहरात जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. मंदिराची देखभाल श्रीराम मंदिर संस्थान (शनिवार पुरा) पाहत असते. संस्थानाकडे स्थावर मालमत्ता किंवा उत्पन्नाचे साधन नाही. संस्थानाचे सर्व उत्सव भक्तांच्या सहकार्याने साजरे होत असतात. त्याचे व्यवस्थापन नंदू जोशी व त्यांच्या पत्नी विद्या पाहतात. आकोटच्या श्रीराम मंदिर संस्थानाच्या रामजन्मोत्सवाची पंरपरा दीर्घ आहे. मंदिरात पहिला उत्सव 1870 मध्ये झाला. म्हणजे दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. मंदिरात विराजमान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. आकोट शहरात 1959 मध्ये महापूर आला होता. त्यावेळी मंदिराचे काम केले होते, ते नाजूक होऊन गेल्याने मंदिराच्या विश्वस्त मंडळाने 2006 पासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या कळसाच्या कार्यक्रमासाठी (2018) करवीर पिठाचे शंकराचार्य व अन्य काही विद्वान ऋषी-महर्षी आले होते.

मंदिरात दरवर्षी श्रीराम नवमी ते हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये सुधीर महाजन यांनी एकावन्न वर्षापासून सुरू केलेले गीतरामायण असते. ती परंपरा कायम सुरू आहे. अयोध्येच्या रामलल्ला मंदिरोत्सवानंतर (2024) रामाला नवे उत्थापन मिळाले आहे. श्रीराम नवमी उत्सवाचा उत्साह और आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे फेसबुक लाईव्ह प्रसारण होत आहे. यात कल्याणी अतुल साने (पुणे), शशांक वामनराव भावे (गीतरामायणाची गीते), वैष्णव महाराज ऋत्विज यांचे भक्तिसंगीत अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे. भक्तजन श्रीराम उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आकोटला तांड्याचा मारूती मंदिर आहे. तांडा म्हणजे पानाचा मळा.

आकोटमध्ये विविध जातिधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. तेथे मराठी, हिंदी, उर्दू या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. आकोट हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथे आधुनिक सोयीसुविधा आहेत- जशा की आरोग्य सेवा, पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे शिक्षण, प्रवासासाठी स्थानिक बस, बँका, सिनेमागृहे, हॉटेल्स-रेस्टॉरंट्स, बागा, इलेक्ट्रॉनिक्स सामानाची दुकाने, सुपर मार्केट्स वगैरे. आकोट येथे मोठमोठी कॉलेजेसही आहेत.

आम्हा मैत्रिणींचा सात जणींचा ग्रूप होता. हिंदी शिकवण्यास लोखंडेसर होते. ते सतत हिंदीत बोलायचे. आम्ही त्यांना मराठीतून उत्तरे देत असू. मग सर आम्हाला रागावत, ‘हिंदी मे बोलो’ असे म्हणत. लोखंडेसर एका तासाला मला म्हणाले, “देशमुख, हिंदी बोलने का प्रयास करो | शादी होगी तुम्हारी अगर मध्यप्रदेश में, मध्यप्रदेश का लडका आपको मिला, तो? वहा तो पुरा हिंदी है|” तेव्हा सर्वजण हसायचे. मी म्हणत असे, “सर, इतना बडा महाराष्ट्र है और मुझे शादी के लिये यहाँ एक भी लडका नही मिलेगा, क्या?” गंमत म्हणजे माझे लग्न ठरले ते इंदूरचे डॉक्टर विजय पोफळी यांच्याशी ! मी लग्नाची पत्रिका घेऊन सरांकडे गेले. सरांना पत्रिका दिली आणि नमस्कार केला. सरांनी माझे अभिनंदन केले आणि पत्रिका वाचली. तसे ते मोठ्याने हसले, म्हणाले, “आखिर, देशमुख, आप इंदूर मे गयी | तो हिंदी पक्का करो|”

आकोटला नरनाळा नावाचा किल्ला आहे. तो आकोटच्या उत्तरेला चोवीस किलोमीटरवर, सातपुड्याच्या उंच डोंगरावर आहे. शहानूर हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे. तेथे व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे गडावर जातायेता वनविभागाच्या चौकीवर नोंद करावी लागते. त्या गडाला राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून 7 जून 1916 रोजी घोषित करण्यात आले आहे. गडावर सहा दरवाजे आहेत. त्या दरवाज्यांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. गडाच्या माथ्यावर सक्कर तलाव आहे. तो नेहमी पाण्याने भरलेला असतो. तो औषधी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. तो गड गोंड राजांनी बांधला असे म्हणतात. गडावर भोसलेकालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडाच्या बाजूने फिरत गेल्यास नऊगजी तोफ दिसते. ती तोफ अष्टधातूंची आहे. तोफेवर पर्शियन भाषेत लेख कोरलेला आहे. गडावर राणी महाल वगैरे वास्तू आहेत. महालात सभामंडप शिल्लक नाही, पण त्याचे स्तंभ महालाच्या विस्ताराचे भान आणून देतात. गडावर खोल टाक्या आहेत. त्यांचा उपयोग युद्धकाळात तेलतूप साठवण्यासाठी केला जाई. तेलीयागड व जाफराबाद असे दोन उपदुर्ग अनुक्रमे गडाच्या नैऋत्येस-आग्नेयेस आहेत. गडावरून चंदन खोरे दिसते. त्याच्या नावाप्रमाणे त्या खोऱ्यात चंदनाची झाडे होती असे म्हणतात. तो गड बघण्यासाठी पर्यटक दूरदूरून येत असतात. आकोटला दोन मोठ्या हवेली आहेत. त्या फार जुन्या आहेत. त्याला मामाभाच्यांची हवेली म्हणून ओळखतात. त्यात मामा व भाचे राहत होते असे म्हणतात.

आम्ही वऱ्हाडी लोक आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आत्मियतने करतो. लोक थोड्या वेळासाठी आले तर त्यांना चहापोहे खाण्यासाठी देतो. पाहुणे थोडा अधिक वेळ आले तर भाजीपुरी-चपाती-मसालेभात खाऊ घालतो. अशी सुखसमृद्धी असलेले माझे माहेर व माझे गाव. तेथील आठवणी रम्य आहेत. सुधाकर गणगणे हे आकोटचे आमदार होते. त्यांनी आकोटकरांकरता सूतगिरणी सुरू केली. त्या गिरणीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला. आकोटला स्टेडियम आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी मंडळी खूश झाली. आकोटला ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग दोनदा झाले आहेत.

– विशाखा पोफळी 9422158522/9422855256

(सतीश आसरकर, सुभाष टेमझरे, मिलिंद देवळे, नंदू जोशी, मोहन आसरकर, मुकुंद देवळे, नयना देशमुख, बटू जकाते, सुधीर महाजन यांची लेखातील माहिती सकलनासाठी मदत झाली)

About Post Author

2 COMMENTS

  1. अकोटची खुप छान माहिती मिळाली,श्री संत नरसिंह महाराजांबद्दलही छान कळले.

  2. वाह व्वा रजूताई खूपच छान, अगदी अप्रतिम लिहिलेस. आकोट चे सगळे बारकावे लक्षात घेऊन एक उत्तम लिखाण.
    तू इतके छान लिहू शकतेस ह्याची अजिबात कल्पना नव्हती.
    तुझे मनःपूर्वक कौतुक अन् हार्दिक आभिनंदन!👏👍
    आजोबा आजींचे आकोटला बरेच वर्ष वास्तव्य असल्यामुळे आक्माट्सही माझ्याही बऱ्याच आठवणी निगडित आहे. त्यातल्या दोन आठवणी तर फारच गोड आहेत…
    आजोबा आजी काही वर्ष नरसिंग महाराजांच्या देवळातच राहत असल्यामुळे मी लहान असताना तिथल्या आजींशी (नरसिंग महाराजांच्या स्नुषेशी) माझी छान गट्टी होती. आजी आपल्या मांडीवर मला बसवून रोज न चुकता एक पेढा देत असत…
    दुसरी आठवण म्हणजे माझी मौंज, तिथे मोठ्या थाटामाटाने व हौशेनी झाली अन् तेंव्हा पायघड्या घालत मला संपूर्ण अकोटात फिरवले होते जो माझ्यासाठी त्या लहान वयातला एक रोमहर्षक प्रसंग होता…
    हा लेख लिहून अकोटच्या लहानपणच्या आठवणी जागवल्या बद्दल तुझे मनःपूर्वक आभार 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here