अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला.

त्या किल्ल्यात जणू प्रत्यक्ष निवांतपणे फिरत असावे अशा रीतीने तो किल्ला वाचकांना दाखवत आहेत अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. त्यांच्याबरोबर त्या किल्ल्यात फिरणे आणि आणि त्याचा इतिहास, भूगोल जाणून घेणे आनंदाचे आहे.

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

“इतिहास सांगण्यासाठी हा किल्ला आतूर झाला आहे, पण त्याला बोलण्याची संधी देणाराच अजून कुणी भेटत नाही. मी तयार आहे…’ असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अहमदनगर किल्ल्याला भेट दिली, त्यावेळी अभिप्रायाच्या वहीत लिहिले आहे. तो दिवस होता श्रीशिवराज्य शके 318, फाल्गुन वद्य बारा. शिवशाहिरांनी त्या दिवशी आमच्यासमोर किल्ल्याचा इतिहास उलगडला. असे वाटत होते, की किल्ल्याचे बुरूज, तटबंदी आणि महालच नव्हे, तर इथला प्रत्येक दगड त्याची कहाणी सांगतो आहे…

अहमदनगर हे मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या निजामशाहीच्या (सन 1490 – 1636) राजधानीचे शहर. बहामनी राजवटीची शकले उडाल्यानंतर स्वातंत्र्याच्या ऊर्मीतून निजामशाहीची स्थापना झाली. मलिक अहमद निजाम-उल-मुल्क बहिरी हा निजामशाहीचा संस्थापक. हा कुणी परकीय आक्रमक नव्हता. तो मूळचा परभणीजवळच्या पाथरीचा कुलकर्णी. चरितार्थासाठी त्याचे वडील विजयनगरला निघाले असताना त्यांना पकडून बाटवण्यात आले होते. बहामनी सैन्याशी झालेल्या लढाईत मलिक अहमदाला निर्णायक विजय 28 मे 1490 रोजी मिळाला. ही ‘जंग-ए-बाग’ लढाई झालेल्या भूमीवर ‘कोट-बाग-निजाम’ नावाचा महाल राजाने बांधला. ती अहमदनगर शहराच्या स्थापनेची मुहूर्तमेढ ठरली. अहमदशाहने ‘कोट-बाग-निजाम’ भोवती दगडमातीचा कोट 1494 मध्ये उभा केला. तटाभोवती खंदक 1499 मध्ये तयार करण्यात आला. अहमदाचा नातू हुसेन राज्य करत असताना 1558-59 मध्ये विजापूरचा आदिलशहा, विजयनगरचा रामराजा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांनी मिळून अहमदनगरवर आक्रमण केले. किल्ल्याची मातीची तटबंदी शत्रूच्या तोफांच्या माऱ्यापुढे टिकाव धरणार नाही, हे हुसेनच्या लक्षात आले. त्याने किल्ल्याचे मजबुतीकरण करायचे ठरवले. किल्ल्याची सध्या दिसणारी दगडी तटबंदी त्याने 1559 ते 1562 या दरम्यान बांधली. त्यासाठी पोर्तुगीज वास्तुविशारदांची मदत झाली होती.

अहमदनगरचा किल्ला दूरगामी नियोजन करून बांधण्यात आला आहे. या किल्ल्यासाठी निवडलेली जागा लष्करी सिद्धता, संरक्षण आणि राज्य कारभाराच्या दृष्टीने अतिशय योग्य अशी आहे. जुन्नर आणि दौलताबाद यांच्या अगदी मधोमध असलेले ठिकाण किल्ल्यासाठी आणि नंतर राजधानीसाठी निवडण्यात आले. निजामशहाने दूरदृष्टीने पूर्वेकडच्या गर्भगिरी डोंगररांगेत पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून, साठवून ते किल्ल्यात आणि शहरातील वेगवेगळ्या मोहल्ल्यात आणले आहे. किल्ला बांधतानाच तलावातून आणलेले खापरी नळ जमिनीखालून फिरवण्यात आले. किल्ला जमिनीवरचा, पण सहजासहजी तो दृष्टीस पडणार नाही अशी त्याची रचना आहे. बशीसारखी खोलगट जागा तयार करून किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचा आकार काहीसा लंब वर्तुळाकार आहे. सध्या 22 भक्कम अर्धवर्तुळाकार बुरूज असलेल्या दगडी तटबंदीच्या बाहेरील बाजूस 35 ते 45 मीटर रूंदीचा, पूर्णपणे दगडात बांधलेला विस्तीर्ण खंदक आहे. खंदकाच्या बाहेरील बाजूस सुमारे 12 फूट उंचीचा मातीचा भराव होता. या भरावामुळे बरीचशी तटबंदी झाकली जात असे. शिवाय शत्रूने तोफांचा मारा केला, तर तोफगोळे अडवण्याचे काम हा मातीचा भराव करे. रेवणीचा  उपयोग शत्रूवर हल्लाबोल करण्यासाठी होत असे. अशा प्रकारची रचना फार थोड्या किल्ल्यांमध्ये पाहायला मिळते.

अहमदनगरच्या किल्ल्याचा तट इतका उंच आहे, की आतील एकही महाल किंवा अन्य कोणतीही इमारत बाहेरून दिसत नाही. त्यामुळे तोफांचा मारा कुठे करायचा याचा अंदाज शत्रूला येत नसे. तटबंदीवरील कोणतीही हालचाल बाहेरून लक्षात येत नाही. सुमारे दोन किलोमीटर लांबीची व सुमारे 30 ते 40 फूट उंच तटबंदी आहे. आतील बाजूने तटाची उंची 16 ते 22 फूट असून दारूगोळा ठेवण्यासाठी भिंतीत कोनाडे आहेत. काही ठिकाणी चोरवाटाही दिसतात. किल्ल्याच्या 22 बुरूजांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.

किल्ल्याचा मुख्य दरवाजा, ‘हत्ती दरवाजा’ पश्चिमेला असलेल्या मोठ्या बुरूजातच तयार करण्यात आला आहे. इथे अरबी सैन्याचा पहारा असे. म्हणून या बुरूजाला ‘अरबी’ किंवा ‘इलाही’ बुरूज म्हणतात. आतील दरवाजावर हबशी सैन्याचा पहारा असे. ही जागा ‘हबशीखाना’ म्हणून ओळखली जात असे. हत्ती दरवाजा व त्यावरील 8 ते 12 इंच लांबीचे 87 पोलादी लंगरी खिळे सुस्थितीत आहेत. हे खिळे तळाशी अडीच इंच रूंद आहेत. दोन खिळ्यांत सुमारे दोन फूट अंतर आहे. धडक देऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, तर हत्तीच्या गंडस्थळात हे अणकुचीदार खिळे शिरून तो मरून पडावा, अशी त्याची रचना. शिवाय हत्तीला पळण्यासाठी ‘रन-वे’ मिळू नये, म्हणून रस्ता सरळ न ठेवता अर्धवर्तुळाकार बनवलेला आहे. हत्ती दरवाजासमोर आणखी एक भिंत बांधण्यात आलेली आहे. तिला ‘जीभी’ म्हणतात. या भिंतीमुळे खंदकाबाहेरून थेट दरवाजावर तोफांचा मारा करणे अशक्य होते. मात्र या भिंतीआडून शत्रूवर मारा करता येतो. दरवाजाच्या आतील बाजूने फूटभर जाडीचा लांबलचक अगळ आहे. तो आडवा सारला, की दरवाजा तसूभर मागे ढकलला जात नसे. हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूंला वाघ आणि हत्ती यांचे शिल्प (गज-व्याल) पाहायला मिळतात. दरवाजाशेजारी व आतील बाजूस निजामशाहीतील राजचिन्ह कोरलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पंधराव्या शतकात होऊन गेलेले हजरत पीर बाग निजाम (रहे) यांचा दर्गा आहे. हत्ती दरवाजा असलेल्या प्रवेशद्वाराचा छताचा आतील भाग आयताकृती वक्राकार व थोडा बसका आहे. इलाही बुरूजाच्या आतील भागात, सज्जावर जाणार्‍या जिन्यावर परमेश्वराची स्तुती करणारा पर्शियन भाषेतील शिलालेख पाहायला मिळतो. हा शिलालेख निजामशाही काळातील नसून मुघलांच्या काळात 1672-73 मध्ये अन्य मशिदीवरून काढून आणून इथे बसवण्यात आला असावा.

हत्ती दरवाजापर्यंत पोचण्यासाठी खंदक ओलांडावा लागत असे. पूर्वी खंदकात काढता येण्याजोगा लोखंडी साखळदंड असलेला पूल (ड्रॉ ब्रिज) होता. खंदकात दोन कमानी दिसतात. त्यातील मोठ्या कमानीतून हा पूल तयार केलेला असावा. खंदकात उतरण्यासाठी दुसऱ्या लहान कमानीतून जिना आहे. हत्ती दरवाजाच्या बरोबर विरुद्ध दिशेला पूर्वेकडे बुरूज क्रमांक 11 जवळ झुलत्या पुलाचा दरवाजा आहे. हा दरवाजा दौलताबाद दरवाजा या नावाने ओळखला जात असावा. हे दोन्ही दरवाजे सध्या बंद आहेत. लष्कराच्या वापरात असलेला दरवाजा, ब्रिटिशांनी वाहनांसाठी सोयीचा म्हणून खंदक बुजवून तयार केला आहे. हा मार्ग दुसऱ्या महायुद्धात रणगाडे व मोठ्या वाहनांची ये-जा वाढल्याने 1940 च्या सुमारास तयार करण्यात आला.

किल्ल्यातल्या बुरूजांपैकी फक्त इलाही बुरूजाच्या आत जाता येते. अन्य सर्व बुरूज भरीव आहेत. काहींमध्ये चोरवाटा तेवढ्या आहेत. उत्तराभिमुख हत्ती दरवाजातून आत आल्यानंतर पश्चिमेकडे तोंड केलेला दुसरा मोठा दरवाजा आहे. इलाही बुरूजाचे खालचे बांधकाम दगडांत तर वरचे विटांमध्ये आहे. वरच्या बाजूस, शत्रूवर मारा करण्यासाठी सैनिकांना उभे राहण्यासाठी लाकडी सज्जा तयार केलेला होता. ह्या बुरूजाच्या तळमजल्यावर कैदखाना आहे. तिथे अंधार कोठड्याही होत्या. कैदखान्याला खंदकाच्या बाजूने दोन खिडक्या आहेत, पण खंदकातील मगरी, सुसरी पाहून तिथून पळून जाण्याचा विचार एकाही कैद्याच्या मनात आला नसावा. जाड भिंती, दगड व उत्तम चुन्याचा वापर, शेजारी खंदक यामुळे या तुरूंगात भर उन्हातही थंड वातावरण असते. कैदखान्याचे गज असलेले दरवाजे सुस्थितीत आहेत. सुरक्षा सैनिकांसाठी बाहेर वाढवलेला 14 खणांचा भाग मात्र बराचसा ढासळला आहे.

इलाही बुरूजाच्या मधल्या मजल्यावर सैनिकांसाठी शस्त्र व दारूगोळा ठेवण्यासाठी देवळ्या असलेली गॅलरी आहे. तिथे जाण्यासाठी आतल्या बाजूने जिने आहेत. त्यांतील काही ढासळले आहेत. एके ठिकाणी शिलालेख आहे. तो शिलालेख निजामशाही कालखंडातला नसून नंतर लावण्यात आला असावा. ह्याच बुरूजातून महालाकडे जाणाऱ्या दरवाजांवर बुरूजाच्या आतील दोन्ही बाजूंना हत्तींवर आरूढ झालेल्या सिंहाचे अप्रतिम शिल्प (शरभ) आहे. माझे शत्रू हत्तीसारखे बलवान असले तरी मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे दाखवणारी शक्तीचे प्रतीक असलेली ही शिल्पे आहेत. दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला शरीर सिंहाचे आणि डोके हत्तीचे अशी दोन शिल्पे आहेत. त्यांच्यापुढे हरीण दाखवण्यात आले आहे. दरवाजाच्या वर दुसरा मजला तयार करण्यात आला होता. त्याला बादशाही हवेली म्हणत.

किल्ल्याची पुनर्बांधणी करणार्‍या हुसेन निजामशहाचे नाव नवव्या क्रमांकाच्या तिहेरी बुरूजाला देण्यात आले आहे. या बुरूजाच्या मध्यभागी मोठा बुरूज असून दोन्ही बाजूंना छोटे बुरूज आहेत. मधल्या बुरूजात भुयारी मार्ग असून त्यातून शत्रूवर बंदुकीच्या गोळ्यांचा आणि तोफगोळ्यांचा मारा करता येत असे. या भुयारी मार्गाच्या वरील बाजूस सज्जा असून तिथूनही शत्रूवर मारा करता येई. या बुरूजावर टेहळणीसाठी लाकडी मनोरा असून त्यावर झेंडा फडकावला जात असे. म्हणून या बुरूजाला ‘निशाण बुरूज’ किंवा ‘फत्ते बुरूज’ असेही म्हणत.

औरंगजेबाने अहमदनगरचा किल्ला, विशेषतः त्यातील दोन दरवाजांची रचना असलेला अरबी (इलाही) बुरूज पाहिल्यानंतर, दिल्लीच्या लाल किल्ल्यात संरक्षणाच्या दृष्टीने असलेली त्रुटी त्याच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणखी एक तट बांधत नव्या दरवाजाची रचना केली (ही माहिती दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील तज्ज्ञांनी दिली).

किल्ल्याच्या आतल्या बाजूने बुरूजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या वरील बाजूस ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेली चौकी आहे. किल्ल्याच्या काही बुरूजांवर हत्तीची व वाघाची शिल्पे पाहायला मिळतात, तर काही बुरूजांवर शिलालेख आहेत. बुरूज क्रमांक 17 च्या शेजारी तटबंदीवर नक्षीकाम केलेले दगड लावलेले आहेत.

अहमदनगरच्या किल्ल्यात सोनमहाल, गगनमहाल, रूपमहाल, नगीनामहाल, मीनामहाल, बगदादमहाल, मुल्क आबाद व दिलकशाद या नावांचे महाल होते. चाऊसखाना म्हणजे सैन्याच्या जमादाराची जागा, ती किल्ल्यात होती. सर्वात आधी बांधलेला ‘कोट बाग निजाम’ आणि त्याभोवती तयार केलेली उद्याने, कारंजांचे अवशेषही दिसतात. हाच सोनमहाल असावा. या सगळ्यात जुन्या महालाचा दर्शनी भाग शाबूत आहे. गगनमहाल आणि बगदादमहाल बुऱ्हाण निजामशहाच्या काळात (1508-1553) बांधण्यात आला. स्वप्नात महंमद पैगंबरांनी बादशहाला दर्शन दिले; त्याची आठवण म्हणून त्याने बगदादमहाल बांधला अशी आख्यायिका आहे. हा महाल मूळ दोन मजली असावा. सध्या एकच मजला अस्तित्वात असून तेथेच 1942 च्या लढ्यातील पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आदी बारा राजबंद्यांना ठेवण्यात आले होते. या इमारतीचे जोते पाहता खाली एक मजला असावा. किल्ल्यातील अष्टकोनी वास्तू म्हणजे दिलकशाद महाल असावा.

निजामशाहीतल्या बादशहांनी आपापल्या काळात काही महाल नव्याने बांधले असावेत. त्यातील बरेचसे एकमेकांना जोडल्यामुळे एकच महाल वाटतो. या दोन मजली महालाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दिवाणखान्यासमोर दोन्ही बाजूंनी पायर्‍या आहेत. तळमजल्यात लहान कक्ष आणि भुयारी मार्ग आहेत. ब्रिटिशांनी नंतर या महालाचा वापर मुख्य अधिकार्‍याचे कार्यालय म्हणून केला. त्याच्यासमोर विशाल वटवृक्ष आहे. या महालांपासून काही अंतरावर घोड्यांच्या पागा होत्या. या महालांखेरीज नाणी पाडण्यासाठी टांकसाळ, धान्याची गोदामे म्हणजे अंबरखाना व शस्त्रास्त्रांची गोदामे किल्ल्यात होती. किल्ल्यात अश्वशाळा, गजशाळा, अनेक महत्त्वाची हस्तलिखिते असलेले ग्रंथालय आणि मदरसा होता.

निजामशहा जिथे दरबार भरवत असे तो ‘दिवाणे आम’ आणि त्याच्या मागील बाजूस ‘दिवाणे खास’ आहे. ‘दिवाणे आम’ एक्याण्णव फूट लांब, बावीस फूट रूंद व अठरा फूट उंच आहे. या दगडी इमारतीवर बाहेरून नक्षीकाम नसले, तरी आतील छताच्या घुमटांमध्ये चुन्याच्या गिलाव्यात केलेली सुंदर अशी नक्षी दिसते. विशेष म्हणजे ती सुस्थितीत आहे. सौंदर्यनिर्मितीबरोबर प्रकाश व ध्वनी परिवर्तनासाठी या नक्षीचा उपयोग होत असे. कमळाची फुले, कळी, पाने आणि सूर्यकिरणांची नक्षी वैशिष्ट्यपूर्ण आहे. निजामशाहीत इथे झुंबरे लटकावत असावेत.

‘दिवाणे आम’च्या मागील बाजूस असलेल्या ‘दिवाणे खास’मध्ये भुयारी मार्ग आहे. दगडांवर पाय ठेवून त्यात खाली उतरता येते. मात्र, पुढील मार्ग बंद करण्यात आला आहे. ‘दिवाणे आम’मध्ये पूर्वी सिंहासन होते असे सांगतात. निजामशाहीचा पाडाव झाल्यानंतर सर्व किंमती वस्तू चोरीला गेल्या. हिरे-माणके जडवलेली झुंबरे, चित्रे, ग्रंथसंपदा, शस्त्रे नाहीशी झाली.

‘दिवाणे आम’पासून काही अंतरावर बारूदखाना आहे. गोवा किंवा वसईतील एखाद्या पोर्तुगीज चर्चसारखे त्याचे बांधकाम आहे. हा बारूदखाना (आर्मरी) ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धाआधी तयार केला असावा. सध्या ‘दिवाणे आम’, ‘दिवाणे खास’ व बारूदखान्याचा उपयोग धान्य, तेल, तूप ठेवण्याचे कोठार म्हणून केला जातो.

किल्ल्यात गंगा, जमना, मच्छलीबाई व शक्करबाई अशा चार विहिरी होत्या. शिवाय खापरी नळाने बाहेरच्या तलावातून पाणी आणलेले होते. महालाजवळ असलेल्या उद्यानात खापरी नळाचे अवशेष पाहायला मिळतात. दगडी कुंड तिथे होते. चिरेबंदी दगडांत बांधलेली मच्छलीबाई ही पायऱ्या असलेल्या बारवेसारखी विहीर होती. चांदबिबीने ती बांधली. चांद तिच्या सख्यांसमवेत या बारवेत स्नानासाठी येत असे. बादशाही महालांजवळ असलेली ही बारव ढासळली आहे. मात्र, बारवेत उतरण्यासाठी दोन्ही बाजूंनी असलेल्या पायऱ्या व दगडी कमान अजून शाबूत आहे.

किल्ल्याच्या पूर्वेस दौलताबाद दरवाजासमोर सध्या असलेला झुलता पूल 1832 मध्ये ब्रिटिश इंजिनियर कर्नल जेकब याने तयार केला. त्याआधी तिथे असलेला ड्रॉ ब्रिज ब्रिटिश सत्ता येईपर्यंत नामशेष झाला असावा. किल्ल्यात असलेल्या बॉम्बे आर्टिलरी अँड लॅबोरेटरीमधील अनेक कामगार भिंगार व किल्ल्याच्या परिसरातील खेडेगावांमध्ये राहात. त्यांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे व्हावे या हेतूने झुलत्या पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल दोन मजबूत लोखंडी साखळदंडांनी तोललेला आहे. या साखळदंडांना लावलेल्या 36 सळयांच्या खाली असलेल्या रिकिबीत लाकडी फळ्या अडकावून हा पूल तयार करण्यात आला होता. भारतातील अशा प्रकारचा हा पहिला ‘आयर्न सस्पेन्शन ब्रिज’ असावा. बऱ्या अवस्थेत असलेला हा पूल लाकडी तुळया चोरीस गेल्याने 1970 पर्यंत निकामी झाला. या दरवाजाला आगळ लावण्याची व्यवस्था जमिनीलगत असावी. दोन्ही बाजूला चोरवाटा आहेत. खंदकापलीकडील दरवाजा थोडा कलला आहे. त्याच्या बाहेरील बाजूस उत्कृष्ट कोरीव काम पाहायला मिळते.

किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंला तोफा ठेवलेल्या आहेत. त्या तोफा इंग्रजांनी आणलेल्या आहेत. तोफांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या जगप्रसिद्ध हॉवित्झर कंपनीच्या आहेत. त्या तोफांच्या दर्शनी भागात कंपनीच्या नावाची पुसट झालेली प्लेट आहे. एका तोफेवर 1847 आणि दुसऱ्या तोफेवर 1829 हे वर्ष कोरण्यात आले आहे. 1803 मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिश सेनापती, आर्थर वेलस्ली याने किल्ल्यात जाण्यापूर्वी खंदकाशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाखाली ब्रेकफास्ट घेतला होता. विजयाची आठवण म्हणून काही वर्षांनंतर तिथे चार तोफा जमिनीत खुपसून, खाली तोंड करून ठेवण्यात आल्या. सोळाव्या शतकातील जगातील सगळ्यात वजनदार, 55 टन वजनाची ‘मलिक ए मैदान’ तोफ अहमदनगरमध्ये तयार झाली होती. ही तोफ आता विजापूरच्या किल्ल्यावर आहे. या तोफेचा निर्माता रूमीखान याने तयार केलेली बांगडी तोफ इथे मध्यभागी ठेवण्यात आली आहे.

अहमदनगरचा किल्ला मुघलांच्या हाती सन 1600 मध्ये गेला आणि त्याचे दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. निजामशाहीची राजधानी नंतर परांडा, असा, धारूर, दौलताबाद अशा विविध ठिकाणी हलवावी लागली. अहमदनगरच्या किल्ल्याचे वैभव लोप पावले. या किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन मुघलांनी आपले दक्षिणेतले लष्करी ठाणे म्हणून त्याचा वापर सुरू केला. मुघलांचे आधिपत्य आले, तरी निजामशाही संपलेली नव्हती. याच काळात मलिक अंबरनं शहाजीराजांसह निजामशाहीतील सगळ्या सरदारांना एकत्र आणून मुघलांविरुद्ध झुंज सुरूच ठेवली. त्याने अहमदनगरचा किल्ला मुघलांकडून 1610 मध्ये पुन्हा जिंकून घेतला. पुढे काही वर्षे तो निजामशहाच्या ताब्यात होता, पण पुन्हा मुघलांकडे गेला.

पेशवाईत हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असलेला नगरचा किल्ला युक्तीने मराठा साम्राज्यात सामील करण्यात आला. कवीजंग हा अहमदनगरचा किल्लेदार होता. कवीजंगाचे घराणे मूळचे मध्य आशियातील. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांनी हैदराबादच्या निजामाची ताबेदारी पत्करली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात, लढाई न करता हा किल्ला मिळवण्याची जबाबदारी सदाशिवरावभाऊंनी, विसाजीपंत बिनीवाले यांच्यावर सोपवली होती. बिनीवाले यांनी कवीजंगाशी गुप्तपणे वाटाघाटी करून 9 नोव्हेंबर 1759 रोजी अहमदनगरचा किल्ला मराठ्यांना मिळवून दिला. या किल्ल्याच्या मोबदल्यात पेशव्यांनी कवीजंगाला वंशपरंपरने चालत राहील अशी जहागिरी दिली. बंदुकीतून एकही गोळी न झाडता आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता अहमदनगरचा किल्ला पेशव्यांना मिळाला. पेशव्यांनी अहमदनगरचा किल्ला दौलतराव शिंद्यांना 1797 मध्ये दिला.

याआधी 1681-82 मध्ये दिलेरखानाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीला पकडून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले होते. संभाजी महाराजांनी त्यांची सुटका केली असा उल्लेख काही कागदपत्रांत आढळतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर येसूबाई यांनी सहा-सात महिने हिंमतीने रायगड लढवला. रायगड मुघलांच्या ताब्यात 19 ऑक्टोबर 1689 रोजी गेला. महाराणी येसूबाई, अल्पवयीन शाहू व त्यांची बहीण भवानीबाई यांना औरंगजेबाची छावणी आणि अहमदनगरच्या किल्ल्यात बंदिवान म्हणून दिवस काढावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी सकवारबाईही येसूबाईंसमवेत होत्या. त्यांचा मृत्यू अहमदनगरमध्ये झाला.

अहमदनगरचा किल्ला 12 ऑगस्ट 1803 रोजी ब्रिटिशांच्या ताब्यात आला. किल्ला घेतल्यानंतर वेलस्लीनं अडथळे नकोत म्हणून आतील काही लहान इमारती पाडून त्या दगडांचा उपयोग करत बाहेर पूर्वेस वेलस्ली बरॅक्स बांधल्या. किल्ला ब्रिटिशांनी जिंकला, तरी वसई करारानुसार तो पेशव्यांकडे देण्यात आला. पुढे, 4 जून 1817 रोजी किल्ल्यावर इंग्रजांचा युनियन जॅक लागला. एक क्रमांकाच्या इलाही बुरूजावर लोखंडी प्लेटच्या साहाय्याने बनवलेला सुमारे एकवीस फूट लांब आणि दहा फूट उंच असलेला हा झेंडा ब्रिटिश इंडियातील सर्वात मोठ्या आकाराचा झेंडा असावा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो खाली आला. तथापि, ज्या दोन खांबांमध्ये तो बसवलेला होता, ते शिल्लक आहेत. त्या काळी अहमदनगरमध्ये चर्च नसल्याने ख्रिस्ती धर्मियांचे धार्मिक विधी किल्ल्यातच होत. किल्ल्यातील सोनमहालाच्या वरच्या मजल्यावर ब्रिटिशांची ‘स्टेशन लायब्ररी’ होती.

अहमदनगरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला, तरी त्यांच्या विरोधात जिल्ह्यात बंडाळी सुरूच होती. मूळचे संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील त्रिंबकजी डेंगळे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. काही आदिवासी क्रांतिकारकांना अहमदनगरच्या किल्ल्यात कैदी म्हणून आणून ठेवले होते. बंडखोरांनी छळाला कंटाळून पहारेकर्‍यांची हत्यारे हिसकावून तुरूंगाचा दरवाजा तोडला. त्यांनी किल्ल्यात त्यांचे राज्य आल्याचे घोषित केले. किल्ल्यातील बंडाळीची हकीकत समजताच कलेक्टर पॉटिंजरने सैन्य पाठवले. त्यांनी कैद्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. 80 आदिवासी त्यात मारले गेले, अनेक जायबंदी झाले. तो दिवस होता 19 ऑगस्ट 1821. क्रांतिकारकांचा नेता राम किरवा याला खुनी बंडखोर ठरवून न्यायाचा फार्स करत 1830 मध्ये सर्वांसमोर उघड्यावर फाशी देण्यात आले. 1857 च्या बंडापर्यंत इंग्रजांनी अनेकांना या किल्ल्यात बंदिवासात ठेवले होते. त्यांतील काहींना किल्ल्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आले, तर काहींना बुरूडगाव रस्त्यावरील एका वडाच्या फांदीला लटकावून फाशी देण्यात आले. क्रांतिकारकांनी वापरलेल्या तोड्याच्या बंदुका अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे छत्रपती, चौथे शिवाजी महाराज यांना ब्रिटिशांविरूद्ध संघर्ष करताना 25 डिसेंबर 1883 रोजी अहमदनगरच्या किल्ल्यातच हौतात्म्य प्राप्त झाले.

15 ऑगस्ट 1947…चले जाव आंदोलनात अहमदनगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध असलेले आचार्य नरेंद्र देव यांना ध्वजारोहणासाठी अहमदनगरला निमंत्रित करण्यात आले होते. निशाण बुरूजावर त्यांच्या हस्ते आणि रावसाहेब पटवर्धन, सरोष बाँबस्फोटाचे सूत्रधार बाळासाहेब सप्तर्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात तिरंगा फडकावला गेला होता.

किल्ल्याचा ताबा भारतीय लष्कराकडे 23 एप्रिल 1948 रोजी आला. लष्कराची महत्त्वाची कार्यालये आणि दारूगोळ्याचा साठा किल्ल्यात असल्याने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी वगळता अन्य दिवशी नागरिकांना किल्ल्यात प्रवेश नव्हता. मात्र, हल्ली किल्ला सर्वांसाठी खुला झाला आहे. तो वर्षभर कधीही पाहता येतो. तथापि, तो पाहण्यासाठी पावसाळ्यानंतरचा काळ उत्तम. किल्ला पाहण्यासाठी किमान तीन ते चार तास हवेत. खंदकाभोवती तीन किलोमीटरची भ्रमंती करता येते. जास्त वेळ नसेल, तर वाहनातून, हत्ती दरवाजा, फत्तेबुरूज, वेलस्ली पॉईंट, झुलता पूल पाहता येतात. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर पहिल्या म्हणजे अरबी बुरूजातील तुरूंग, दर्गा, हत्ती दरवाजा पाहिल्यानंतर किल्ल्याच्या तटबंदीवरून 22 बुरूजांची सैर करता येते. बुरूज क्रमांक दोनवरील तोफा चढवण्याचा रॅम्प, त्याच्या जंग्यांमधून दिसणारी हत्ती दरवाजाची बाहेरील बाजू, जिभी, खंदकातील कमान बघून सध्या झेंडा फडकावला जात असलेल्या बुरूजावर (क्रमांक तीन) येता येते. या बुरूजावरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 मध्ये भाषण केले होते. बुरूज क्रमांक पाच व सहाच्या दरम्यान तटबंदीतील भेग बुजवल्याच्या खुणा दिसतात. मुघलांनी सुरूंग पेरून किल्ल्याची तटबंदी व बुरूज उडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पडलेले खिंडार चांदबिबीने किल्ल्यातील सगळ्यांना एकत्र आणून बुजवले.

नऊ क्रमांकाचा फत्ते बुरूज हा तीन बुरूज एकत्र करून बांधलेला आहे. त्याच्या मध्यभागी बंदुकीतून शत्रूवर मारा करण्यासाठी भुयार आणि त्यावर गॅलरी आहे. तेथून खंदकापलीकडे असलेल्या वेलस्ली पाँईटवरील तीन तोफा दिसतात. स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या ध्वजारोहणाची साक्षीदार असलेली डोलकाठी या बुरूजावर उभी आहे. या बुरूजावरून जाणार्‍या मार्गावर शिलालेख असून तेथून खाली उतरण्यासाठी जिना आहे. जिन्याच्या खालच्या दरवाजावर काही शिल्पे आहेत. हत्तीवर बसून बंदूकीने केलेल्या शिकारीचे दृश्य इथे पाहायला मिळते. किल्ल्याला पूर्ण फेरी मारण्यासाठी वेळ नसेल, तर इथून उतरून ‘नेता कक्ष’ बघायला जाता येते.

किल्ल्याच्या पूर्वेकडे खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटिशांनी तयार केलेल्या झुलत्या पूलाचे बळकट साखळदंड अकरा क्रमांकाच्या बुरूजावरून पाहता येतात. सोळा क्रमांकाच्या बुरूजावर आतील बाजूने शिलालेख आहेत. सतरा क्रमाकांचा बुरूज किल्ल्याच्या लंब वर्तुळाकाराच्या कोपर्‍यावर आहे. किल्ल्याच्या खंदकात पाणी असेल, तर अनेक पाणपक्षी या भागात पाहायला मिळतात. सुमारे दोन किलोमीटरच्या तटबंदीवर फेरफटका मारून बुरूज क्रमांक एकवरून खाली उतरून ‘नेता कक्षा’कडे जाता येते. एसी (आर्मर्ड कॉर्प्स) डेपोच्या कमानीतून आत जाण्यास पर्यटकांना मज्जाव आहे. तथापि, तेथून जाताना बारूदखाना, नंतर उजवीकडे ‘दिवाणे आम’ची लांबलचक दगडी इमारत दिसते. पुढे, सरळ रस्ता झुलत्या पुलाच्या आतील दरवाजाकडे जातो. त्याच्या अलीकडे उजव्या बाजूला ‘नेता कक्ष’ आहे. स्वातंत्र्य चळवळीत 1942 च्या चले जाव आंदोलनात पंडित नेहरूंसह बारा राष्ट्रीय नेत्यांना येथील कोठड्यांमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. इथेच पंडितजींनी ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

– भूषण देशमुख 9881337775 bhushandeshmukh07@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. अहमदनगरच्या किल्ल्याचा इतिहास किल्ल्याची माहिती अतिशय बारीक सारीक अनेक गोष्टी अनेक बाबी आम्हाला आमच्या निदर्शनात आणून आमच्या ज्ञानात खूप मोठी भर पडली यासाठी लेखकाचे खूप खूप आभार

  2. भूषण देशमुख ह्यांनी अहमदनगरच्या किल्ल्याची लिहिलेली सविस्तर माहिती वाचून खूप वर्षांनी किल्ल्यावर फेरफटका मारल्यासारखं वाटलं.

    शाळकरी वयात दरवर्षी २६जाने/१५ ऑगस्टला झेंडावंदनानंतर खाऊ खाऊन झाल्यावर आमचं सेंट सेव्हिअर्स हायस्कूल आम्हाला किल्ला दाखवायला नेत असे. दोन दोनच्या जोडीची रांग करून आम्ही चालत जात असू. सगळे बुरुज, चांदबिबीने केलेलं बांधकाम, झुलता पूल, नेत्यांच्या खोल्या, पंडित नेहरूंनी लावलेलं डाळिंबाचं झाड ….आमचे शिक्षक आवर्जून दाखवत. किल्ला बघायचा म्हणजे खूप चालावं लागायचं. ह्या लेखाने सगळ्या आठवणींना उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here