अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…
अचलपूरला नाटकांची समृद्ध परंपरा आहे. अमरावती-नागपूरला नव्हती तेवढी, म्हणजे पाच नाट्यगृहे अचलपूर या तालुक्याच्या गावी होती! त्यांची नावे अशी- 1. पंढरीनाथ संस्थान, यादवराव मठ, 2. बावनएक्का, 3. बावीशी संस्थान, 4. व्यंकटेश (बालाजी) नाट्यमंदिर आणि 5. छत्तीशी. तेथील खासीयत ही की त्या प्रत्येक नाट्यगृहासमोर एक देऊळ होते. गणपतीचे मंदिर ‘बावनएक्का’ व ‘बावीशी’ नाट्यगृहांसमोर होते. ‘बालाजी’चे देऊळ व्यंकटेश (बालाजी) नाट्यमंदिरासमोर होते. विठ्ठलाचे मंदिर पंढरीनाथ संस्थानासमोर होते, तर ‘राममंदिर’ छत्तीशी नाट्यगृहासमोर होते. ती नाट्यगृहे नाहीशी झाली, मंदिरे जोरात चालू आहेत!
त्या काळात नाटके गॅसबत्तीवर चालत. ‘लाईट्स’ नव्हते व ‘लाईट इफेक्टस्’ही नव्हते. त्यामुळे कलाकारांनी भडक मेकअप करावा अशी प्रथा तयार झाली, कारण अगदी शेवटच्या ओळीतील प्रेक्षकाला त्यांचे हावभाव दिसावे, म्हणून! त्यावेळी माईकही नव्हते, म्हणून कलाकारांना बेंबीच्या देठापासून ओरडून बोलावे लागे. शेवटच्या ओळीतील प्रेक्षकाला ऐकू येण्यास हवे, याकरता. संगीत ‘लाईव्ह’ असे, म्हणजे साजिंदे (सहकारी) प्रत्यक्ष वाद्ये वाजवत, पण ते अशा रीतीने बसत की प्रेक्षकांना दिसू नयेत. त्यांच्या जवळ वाद्ये असत ती प्रामुख्याने पेटी, तबला, ढोलकी व बुलबुलतरंग.
रंगमंचासमोर खोल खड्डा असे, म्हणजे खोलगट भाग. तेथून प्रेक्षक बसण्यास सुरुवात करत असत. प्रेक्षकांसाठी कधी सतरंज्या असत, तर कधी गाद्या. नाटके फुकट दाखवली जात. स्त्रीभूमिका पुरूषच करत. कालांतराने, तसे काम करणाऱ्या नटांना बाहेरगावाहून बोलावले जाऊ लागले. त्यांना मानधन द्यावे लागे… मग हळुहळू नाटकांना प्रवेशासाठी तिकिटदर लावून संस्था नाटक सादर करू लागल्या.
- पंढरीनाथ संस्थान, यादवराव मठ -‘पंढरीनाथ संस्थान, यादवराव मठ’ हे सरमसपुरा येथे आहे. ते अचलपूरच्या नाट्यक्षेत्रातील सगळ्यात जुने संस्थान आहे. तेथे आधी यादवराव मठ होता. त्या संस्थेने मंडळाची सुरुवात दंडमार, भारूड, वासुदेव, भजने इत्यादी लोककलांतून केली होती. त्यांची परंपरा1835 सालापासूनची. ती परंपरा दर कार्तिक शुद्ध दशमीला एक नाटक सादर करावे अशी आहे. त्यांनी त्यांच्या त्या परंपरेत ओळीने एकशेछप्पन्न नाटके सादर केली आहेत. ती परंपरा 2000 सालापर्यंत चालू होती; नंतर खंडित झाली.
त्यांनी प्रथम मंदिरासमोरच्या खुल्या जागेत 50×40 चौरस फूटांचा ओटा लोकांच्या वर्गणीतून बांधला. पुढे तोच ‘खुला रंगमंच’ म्हणून वापरण्यात आला. नाटकाच्या रंगमंचासाठी ‘स्तंभटिपण’ भाऊबीजेच्या दिवशी केले जाई. म्हणजे स्टेजवर मंडप टाकण्यासाठी खांबाची पूजा विधिवत करून, नारळ फोडून नाटकाचा मंडप उभारण्यास सुरुवात होई. ती पूजा कार्तिक शुद्ध पंचमीला होई. त्या मंडळात दिग्दर्शक असा कोणी नसे. सर्व जण त्यांच्या त्यांच्या भूमिका स्वतःच्या कुवतीप्रमाणे वठवत. नाटकाच्या संहिता सुलतानपुरा येथे राहणारे साहित्यिक वि.रा. हंबर्डे हे पुरवत. त्यांनी जवळजवळ शंभर नाटके लिहिली आहेत.
मंडळाच्या नाट्यपरंपरेत किसनसिंग बघेल व विष्णुसिंग बघेल या दोन भावांची कामगिरी मोलाची आहे. आणखीही अनेक कलाकारांनी त्या नाट्यपरंपरेत कामे केली. त्यांची नावे – काशीनाथ गलांडे, भुजंगराव चौधरी, मधुकरराव पाचपोर, बापुरावजी काळे, धुळधर गुरूजी. त्या लोकांनी ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘कणसा कणसा दाणा दे’, ‘दिव्याखाली अंधार’, ‘बायको उडाली भुर्र’, ‘मी उभा आहे’, ‘बाईला सुचलं कारस्थान’ अशी नाटके सादर केली आहेत.
सांगलीकर मंडळींनी विष्णुदास भावे यांचे ‘सीता-स्वयंवर’ हे नाटक 1843 साली केले, पण त्याही आधी नाटके पंढरीनाथ संस्थान नाट्यगृहात होत होती. त्या संस्थेत नाटकाच्या नोंदणीचे दस्तऐवज सापडल्यास पहिले नाटक करण्याचा मान अचलपूर रंगभूमीला मिळू शकतो. त्या दृष्टीने तेथील लेखक अशोक बोंडे व त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.
- बावनएक्का हे नाट्यगृह बिलनपुरा येथे होते. ते नाट्यगृह सव्वाशे वर्षांपूर्वीचे म्हणजे1890 सालचे आहे. त्यांची परंपरा दरवर्षी भाद्रपद शुद्ध षष्ठीला गणपती उत्सवात नाटक करावे अशी आहे. तात्यासाहेब देशपांडे यांनी त्यांचे वडील अण्णासाहेब देशपांडे यांच्या इच्छेखातर ते नाट्यगृह त्यांच्याच मालकीच्या जागेत बांधले. अण्णासाहेब देशपांडे यांना नाटकांची खूप आवड होती. ते नाटकांत कामेही करत. देशपांडे यांचे घर तेथेच आहे.
अचलपुरात बावन्न पुरे म्हणजे मोहल्ले आहेत. नाट्यगृह देशपांडे यांच्या मालकीचे म्हणजे एक्का. म्हणून त्या नाट्यगृहाचे नाव ‘बावनएक्का’ पडले असावे. त्या नाट्यगृहाची रचना अशी होती, की प्रेक्षक कोठेही बसला तरी त्याला नाटक दिसे आणि पात्रांचे संवादही स्पष्टपणे ऐकू येत असत. ‘बावनएक्का’ची मागील भिंत खचली तेव्हा त्या भिंतीत भरलेला कापूस लोकांनी पाहिला व त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते, की भिंतीत कापूस का टाकला असावा? पण चौकशीअंती त्यांना कळले, की नटांचे संभाषण स्पष्ट ऐकू यावे व ‘इको’ वा प्रतिध्वनी येऊ नये म्हणून ती क्लृप्ती केली होती.
बावनएक्का स्टेजच्या खाली दोन मेकअप रूम असत. कारण ‘सीता-स्वयंवर’सारख्या नाटकात सीता धरती दुभंगून धरणीत जाते असा सीन करताना स्टेजवरील दोन फलट्या सरकावून सीता अलगद स्टेजखालील रूममध्ये जात असे. समजा, ‘संत तुकाराम’ हे नाटक असेल आणि तुकाराम सदेह वैकुंठाला जाण्याचे दृश्य असेल, तर तुकारामांचे विमान वरून खाली येत असे व तुकाराम त्यात बसून खिराड्याच्या सहाय्याने ते विमान वर जाताना दिसत असे. स्त्रीपात्रांसाठी त्या मेकअप रूममध्ये आरसेही असत, खाली दोन बाथरूमही होती. बगिच्याचा सीन असो, राजवाड्याचे दृश्य असो वा रस्त्याचे वा अजून काही दृश्य असो, त्या त्या दृश्यासाठी पडदे वर बांधून ठेवलेले. ते खिराडीने वर-खाली होत असत. त्यांचा उपयोग ऐतिहासिक व पौराणिक नाटकांत जास्तीत जास्त होत असे. ‘बावनएक्का’ बांधले गेले ते भरतमुनींनी नाट्यशास्त्रात लिहिलेल्या मापदंडानुसार. ते मापदंड जवळजवळ दोन हजार सातशे वर्षांपूर्वीचे. त्यात त्यांनी प्रेक्षागृह कसे असावे? रंगमंच कसा असावा? अभिनय कसा करावा? हे सर्व लिहिलेले आहे. पुण्याचे ‘बालगंधर्व नाट्यगृह’सुद्धा त्याच मापदंडानुसार बांधले गेले आहे.
बालगंधर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली, की ते अचलपूरच्या ‘बावनएक्का’ या नाट्यगृहात नाटके करत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारत असे. अचलपूरचे प्रेक्षक रसिक होते व धनवानही होते. बालगंधर्वांची कंपनी, कमलताई मोगे यांची कंपनी तेथे येई. कंपनीचा मुक्काम एकेक महिना असे. अर्थात, तेवढी नाटके होत. रसिक प्रेक्षकही खूप दाद देत.
‘पागे गुरूजी’ हे बावनएक्क्याच्या नाटकांत काम करत असत. ते पुढे पुढे दिग्दर्शनही करू लागले. केशवराव मुनशी हे तात्यासाहेबांच्या वाड्यात पूजाअर्चा करणारे, तेही नाटकात काम करत. रघुनाथ भुजबळ हे स्त्रीभूमिका हुबेहूब वठवत. त्यांना ‘अचलपूरचे बालगंधर्व’ असेही म्हटले जाई. बावनएक्क्याची नांदीसुद्धा परंपरेने ठरलेली होती- नटवी हरी अखिल जगा, भरूनी विविध रूपरंग । अक्रिय सुत तूज विनवित ।
बावनएक्का नाट्यपरंपरेने ‘अंमलदार’, ‘बेबी’, ‘पंतांची सून’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘एकच प्याला’ इत्यादी आधुनिक नाटके सादर केली.
- बावीशी संस्थान हे नाट्यगृहदेखील बिलनपुरातच आहे. तो बावीस सदस्यांचा ट्रस्ट आहे. त्यामुळे त्याला ‘बावीशी संस्थान’ असे म्हटले जाई. पण थिएटरची मालकी मात्र नानासाहेब पांगारकर यांची होती. दर भाद्रपद शुद्ध दशमीला नाटक करावे अशी त्यांची परंपरा. ती परंपरा 1903 साली सुरू झाली, ती 1980 पर्यंत सुरू होती. दशमीला होणाऱ्या नाटकाच्या मुहूर्ताचा नारळ नागपंचमीला फोडण्याची पद्धत होती. त्या दिवशी नाटकाचे पुस्तक व नटेश्वराची मूर्ती मध्यभागी ठेवून त्यांची पूजा होई. रंगमंचावरील सर्व कलाकार जयघोष करत- ‘मंगलमूर्ती मोरया, मार्कोनाथ स्वामी महाराज की जय ।’ नाथ परंपरेतील ‘मार्को’ हे या गावी राहणारे ‘स्वामी’, ते ‘बावनएक्का’मध्ये होणाऱ्या संगीत नाटकांची ‘कवने’ लिहून देत असत.
दिग्दर्शनाची जबाबदारी आरंभी पागे गुरूजींकडे होती. पण नंतर ती पी.डी. बहादुरे व तद्नंतर रमेश बाळापुरे ह्यांच्याकडे सोपवण्यात आली. बावीशीची नांदीसुद्धा ठरलेली असे – श्री शैलजा सुत होत सुखकर, हरीत भवभय दुःख हारिसी… श्रीऽऽ शै ।
त्या नाट्यपरंपरेत काही विनामूल्य सेवाही देण्यात आल्या होत्या. त्या म्हणजे नाटकाच्या दिवशी बरोबर दुपारी चार वाजता धोबी येत असे. तो त्याची सेवा विनामूल्य देई. कलाकार त्यांचे नाटकातील पोषाख तर इस्त्री करून घ्यायचेच, पण कधी कधी ते त्यांच्या घरचे कपडेही इस्त्री करून घेत. पण त्या परंपरेतील तो धोबी मात्र हसतमुखाने त्याची सेवा देत असे. ‘धीरज’ नावाचा न्हावी नाटकाच्या दिवशी ठीक पाच वाजता येई आणि सगळ्या कलाकारांची दाढी विनामूल्य करून देत असे. मेकअप उठून दिसावा म्हणून ती सोय. धीरज सांगे, की आम्ही ती गणपतीचीच सेवा समजतो! मेकअप दादाही विनामूल्य सेवा करत. त्यांचे नाव शुक्ला गुरूजी. व्हॅसलीनमध्ये खाकी पावडर टाकून ती चांगली चारपाच तास मळत बसावी लागत असे. तेव्हा कोठे तो थर चेहऱ्यावर बसत असे. चेहऱ्याला लालीसाठी लाल हिंगूळ व पिवळा हिंगूळ यांचा वापर होई. मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेल वापरले जाई.
अशोक बोंडे यांनी त्या परंपरेत शंभर नाटकांमधून कामे केली आहेत. त्यांचा तो यज्ञ जवळजवळ वीस वर्षे चालू होता. त्यांच्या ‘अचलपूरच्या नाट्यपरंपरा’ या पुस्तकाचे प्रकाशन 5 नोव्हेंबर 2021 रोजी सतीश पतडे यांच्या हस्ते व नानासाहेब देशमुख आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत झाले. त्यात त्यांनी अचलपूरच्या नाट्यपरंपरेचा आढावा घेतला आहे. बावीशी परंपरेत सादर झालेली नाटके – ‘संत तुकाराम’, ‘सीता स्वयंवर’, ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘विच्छा माझी पुरी करा’… वगैरे.
4. व्यंकटेश (बालाजी) संस्थान हे नाट्यगृह 1905 साली सुलतानपुरा येथे राहणारे नथ्थुसा पातुसा कळंबकर यांच्या मालकीच्या जागेत धर्मादाय फंडातून बांधले गेले. त्यांची परंपरा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नाटक करण्याची होती. तेथे सुलतानपुरा येथील कलाकारांना काम करण्याची संधी मिळत नव्हती आणि पावसाळ्यात सुलतानपुऱ्यातून बिलनपुरा येथे जाणेही शक्य नव्हते. म्हणून ते नाट्यगृह बांधले गेले. नाट्यगृह म्हणजे बावीशी नाट्यगृहाचीच प्रतिकृती आहे.
साहित्यिक वि.रा. हंबर्डे सुलतानपुऱ्यात राहत असत. ते जसे पंढरीनाथ संस्थानला संहिता पुरवत, तशाच व्यंकटेश संस्थानालाही पुरवत. त्यांची ‘बाजीराव मस्तानी’ व ‘संगीत होमकुंड’ ही नाटके गाजली. नंतर आचार्य अत्रे ह्यांनी त्यांना पुण्याला बोलावून घेतले. व्यंकटेश रंगमंचाची परंपरा जुनी आहे. त्यामध्ये 1905 सालापासून 1970 सालापर्यंत दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नाटक करण्याची पद्धत होती. त्या परंपरेची सांगता ‘मुंबईची माणसं’ ह्या नाटकाने झाली. पण ‘त्राटिकावध’ हे नाटक आणि लोटांगण घालणे ही परंपरा मात्र आजतागायत चालू आहे. नाटक संपल्यावर पहाटे ही लोटांगणे मंदिरापासून नदीच्या पात्रांपर्यंत घातली जात. लोटांगणाची परंपरा जीवनपुरा येथील बालाजी मंदिरातही जपली गेली आहे. नाटकातील स्त्रीपात्र करणारे शेखरचंद्र पेंढारी, वामनराव ढवळे, मनिरामजी अविनाशी यांना तेथील लोक विसरलेले नाहीत; ते स्त्रीपात्र बेमालूमपणे उभी करत. त्या परंपरेतील ‘चिलिया बाळ’ आणि ‘त्राटिकावध’ ही नाटके लोकांना खूप आवडली होती.
- छत्तीशी हे नाट्यगृह बेगमपुरा येथे आहे. गिरी-गोसावी लोकांचा जथ्था अचलपुरात वर्षातून एकदा येई. त्यांची संख्या छत्तीस असायची. म्हणून त्या नाट्यगृहाला ‘छत्तीशी’ असे नाव पडले असावे. ते महिनाभर तेथे राहत व दंडमार, दशावतार, रामलीला यांसारखे नाट्यप्रकार सादर करत. ते समोरील राममंदिराच्या ओट्यावर टिनाचे स्टेज उभारत – तसे ते जत्रेतील टुरिंग टॉकीजमध्ये असते. ती नाट्यसंस्था फिरती होती. त्यांचा जथ्था येथे महिनाभर कार्यक्रम सादर केल्यानंतर पुढील मुक्कामी जात असे. दरवर्षी छत्तीशी नाट्यगृहात दहा दिवस खेळ करावे ही त्यांची परंपरा.
बावीशीच्या नाटकांच्या तालमींचा मुहूर्त हा नेहमी नागपंचमीला होई. तो ठरलेला दिवसच असे. ती प्रथा उतरणीला लागत लागत 1980 पर्यंत कशीबशी चालली. नंतर, बावीशी संस्थेचे नाटक संपले.
या नाट्यगृहांची पडझड झाली आहे. दोन ठिकाणी 2005 सालापासून मंगल कार्यालये बांधण्यात आली आहेत.
(संदर्भ- लेखक, अभिनेते अशोक बोंडे)
– ज्योती निसळ 9820387838
—————————————————————————————————————————————–
फार छान लेख आहे.
सुंदर लेख