फलटणच्या शिंदेवाडीचे सचिन भगत कसतात शेती. पण त्यांची एक बारीक नजर असते ती त्यांच्या नाणेसंग्रहावर ! त्यांच्या संग्रही मगध-देवगिरी-यादव-मोगल अशी, विविध साम्राज्यांची आणि विविध काळांची नाणी आहेत. त्यातील एक विभाग अर्थातच शिवराई नाण्यांचा-त्याबद्दल बोलताना सचिन भावुक होतात आणि क्षणात त्यांचे बोलणे मराठेशाहीबद्दलच्या अभिमानाने भरले जाते.
शिंदेवाडी फलटणपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव समृद्ध आणि प्रगतिशील आहे. सचिन, त्यांचे वडील, चुलते आणि दोन भाऊ असे पाचजण मिळून अठरा एकर शेती कसतात. त्याशिवाय त्यांची पंधरा मैलांवर, पंढरपूर रोडला पिंप्रज येथे अकरा एकर शेती आहे, पण तिकडे पाणी नसते. त्यांच्या शेतीत ऊस आणि गहू ही मुख्य पिके येतात. सचिन म्हणाले, की आता पुन्हा कपाशीकडे वळण्याचे आखत आहोत.
सचिन हे पक्के शेतकरी आहेत. त्यांचा जन्म 1982 सालचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडीत झाले. माध्यमिक शिक्षण फलटणमध्ये आणि पुढे इतिहास विषय घेऊन मुधोजी कॉलेजमधून बी ए असे शिक्षण झाले. इतिहास या विषयाला विशेष अर्थ होता. कारण सचिन यांना त्या विषयात लहानपणापासून विशेष गती होती. ते म्हणाले, की आमच्या घरात इतिहासाचे वेड थोडे जास्तच आहे. ते वेगवेगळ्या खुणांमध्ये आढळते. घरासमोर शेतीला पाणी खेचण्याचा पंप आहे किर्लोस्करांचा पण त्याचे इंजिन ब्रिटिशकालीन पीटर इंग्लंड कंपनीचे आहे. ते 1972 सालच्या दुष्काळात घेतले व जपून ठेवले आहे. सचिन सांगतात, की दिवाळीत लक्ष्मीपूजनाला आमच्याकडे चांदीची नाणी असायची. ती पैशा दोन पैशांचा ढब्बू वगैरे. ती व्यवहारातून बाद झाली होती तरी आम्ही ती घेऊन खेळायचो – इतिहासकाळच्या गोष्टी रंगवायचो. माझा जन्म झाला तेव्हा आजोबा, तीन चुलते असा आणखी मोठा कुटुंबकबिला होता. त्यामुळे घरातील मुलांबरोबर खेळायला मजा येई.
सचिन म्हणाले, की मी शाळेत असतानाच मजजवळ नाणी जमा करू लागलो. पण तो हौसेचा मामला होता. आम्ही मुले कोयना बॅकवॉटर भागामध्ये 2002 साली फिरण्यास गेलो होतो. तेथे मला शिवशाहीचे जुने नाणे मिळाले. आम्ही कोणीच तसे नाणे पाहिले नव्हते. शिक्षकांना विचारले, तर ते म्हणाले की हे दुर्मीळ नाणे आहे. जपून ठेव. तो क्षण सचिन यांच्या मनात नाणेसंग्रहाच्या ‘वेडा’ची ठिणगी पडल्याचा होता, बहुधा. कारण त्यानंतर सचिन सांगतात, की मी जुने वाडे, जुनी घरे, जुन्या विहिरी, नद्यांचे-दूरदूरचे काठ असा फिरू लागलो. कधी कधी मला नाणी मिळत गेलीही !
त्यांनी पुढे, मोठे झाल्यावर नाण्यांच्या शोधात नाशिक, पंढरपूर, हम्पी (विजयनगर), संभाजीनगर, इंदूर, उज्जैन, जयपूर, उदयपूर, जोधपूर, ग्वाल्हेर, म्हैसूर, तंजावर, कोईमतूर अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास केला. तेथून बरीच नाणी जमा केली. त्यांचे वेड पाहून नातेवाईक-मित्र त्यांच्याकडील नाणी सचिन यांना देऊ लागले. त्यात काही फार पुरातन नाणी असत. मग सचिन हर्षून जात. त्यांच्या त्या वेडाला शिस्त लागली ती त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य रवींद्र येवले त्यांच्या घरी आले तेव्हा. त्यांनी नाणी नुसती जमा करायची नाही- त्यांचे वर्गीकरण करायचे- त्यांच्याबद्दलची माहिती जमा करायची- ती प्रेक्षकांना सांगायची अशी शिस्त लावली. शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन त्यांचे प्रदर्शन करण्यास सुचवले आणि सचिन तसे करू लागले. सचिन म्हणाले, मी नाण्यांची माहिती देतो – परंतु व्याख्यानाचा भाग शिक्षक सांभाळतात. ती भीड अजून चेपली नाही.
सचिन म्हणाले, की मला मराठीखेरीज अन्य भाषा – विशेषतः हिंदी, इंग्रजी नीट बोलता येत नाही. त्याचा परिणाम इतर प्रांतांत गेलो की विशेषतः दक्षिणेत होई. परंतु शेवटी माणसाचे ‘वेड’ त्याला तारुण नेते, तसे झाले. मी दडपून हिंदीत बोलू लागलो. नाण्याचा विषय निघाला की माझी भीड चेपते. मी बोलू लागतो.
सचिन म्हणाले, की माझे नाणीसंग्रहाचे वेड अभ्यासात कसे रूपांतरीत होत गेले ते कळलेच नाही. पण त्यांना शिवशाही नाण्यांबद्दल विशेष माहिती सांगावीशी वाटते. ते म्हणतात, की शिवाजीराजांनी ती देवनागरीत व संस्कृतचा आधार असलेल्या मराठीत पाडली हे विशेष. त्या बाबतीत त्यांनी ब्रिटिश वकील हेन्री ऑक्झेंडन’ (Henry Oxenden) यांचे म्हणणे मानले नाही. त्यांनी इस्ट इंडिया कंपनीतर्फे जे पत्र आणले होते त्यात एक कलम इंग्रजांचे चलन मराठ्यांच्या राज्यातही चालावे असे होते, ते शिवाजीराजांनी बाजूला ठेवले. तो मराठी बाणा प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवला पाहिजे. त्याच ओघात सचिन शिवशाही नाणी संभाजी-राजाराम-शाहू महाराज व पुढे पेशवाईत कशी कायम राहिली व त्यात सूक्ष्म बदल कसे होत गेले ते सांगतात. सचिन म्हणाले, की पेशवाईत दुदांडी शिवशाही नाणी म्हणत कारण त्यावर दोन रेषा आखल्या गेल्या. प्रत्येक राजा नाण्यावर बिल्वपत्र, शिवपिंडी असे चिन्ह त्याच्या आवडीनुसार चितारत गेला.
सचिन यांच्या घरी अजूनही सतरा-अठरा जण एकत्र राहतात. एक भाऊ पुण्याला कमिन्समध्ये नोकरीला आहे. सचिन यांना पत्नी रोहिणी व राजवर्धन असा संसार आहे. राजवर्धन तिसरीत आहे. सर्व भावंडांची मिळून घरात पाच मुले आणि दोन मुली आहेत. त्यांना विचारले, शेतकऱ्यांना अनेकविध दुःखांना सामोरे जावे लागते ना ! तर सचिन म्हणाले, की तो निसर्गाबरोबर जगण्याचा भाग आहे. तिकडे विदर्भात निसर्ग फार रागावलेला आणि बेभरवशाचा झालेला दिसतो. आमच्याकडे गव्हाचे पीक चांगले आले आहे. गव्हाला भावपण चांगला मिळेल असे दिसते. त्यांच्या बोलण्यातून शेतीतील चतुराईच्या गोष्टी कळतात. बराचसा शेतकरी आता सुशिक्षित आहे. तो स्वतःची जीवनशैली ठरवतो आणि त्यानुसार जगतो. चोखंदळ शेतकरी घरचे धान्य आणि बाजारात विकण्याचे धान्य यांतील फरक जाणतो. त्यानुसार शेतीची रचना करतो.
सचिन यांचे घर पाहण्यासारखे आहे. घरासमोरच उभ्या ठाकलेल्या पंपामुळे ब्रिटिशकालीन वैभवाने मिरवतो; पण आजूबाजूला निसर्ग संपदा मोहरून आली आहे. बाजूलाच वडाच्या झाडाचे अप्रतिम बोनसाय आहे, परिसरात पिंपळाचे उंबराचे बोनसाय आहेत – तशी कागदी फुलांचीही सजावट आहे. त्यातच छानसे दगडी बांधकामातील तुळशी वृंदावन! एकत्र कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या आवडीनिवडीच्या खुणा देखील एकत्र नांदतात.
सचिन सुभाष भगत 9922011123 sachainbhagat1982@gmail.com
– नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com