उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जकेकूर गावातील मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे! जकेकूरमध्ये सदुसष्ट वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली आहे. पाटील यांनी राज्यभर पायपीट करत पंचवीस लाख रुपयांची वर्गणीसाठी तीन वर्षांत जमा केली. विठ्ठल पाटील यांनी गावच्या मुस्लिम बांधवांसाठी उभारलेली मशीद हे राष्ट्रीय एकात्मतेचे चालतेबोलते उदाहरण ठरले आहे.
उमरगा तालुका हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या सीमेवर आहे. जकेकूर हे गाव छोटेखानी आहे. जेमतेम सहाशे उंबरा; आणि गावाची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या घरात आहे. गावात जुनी मशीद मातीची छोटी होती. मात्र, तिची पडझड झाल्याने प्रार्थनेसाठी तेथे गेलेल्या काही मुस्लिम बांधवांना एकदा दुखापत झाली. त्यामुळे ती मशीद पाडून टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. नवीन मशीद बांधण्याबाबत निर्माण झालेला आर्थिक गुंता विठ्ठल पाटील यांनी पुढाकार घेऊन सोडवला. पाटील स्वत:च्या खर्चाने गावोगाव फिरले. त्यांनी मुंबई, उमरगा, गुलबर्गा, तळोजा, पनवेल, मुंब्रा, भिवंडी, लातूर, नांदेड, हैदराबाद अशा अनेक शहरांना भेटी दिल्या. त्यांचा तो खटाटोप तीन वर्षे चालू होता. गावातील मशिदीच्या बांधकामासाठी तळमळीने वर्गणी मागणाऱ्या हिंदू व्यक्तीच्या हाकेला प्रतिसाद अनेकांनी दिला आणि तब्बल पंचवीस लाख रुपये देणगी गोळा झाली. त्यातून गावात आकर्षक मशीद उभारली गेली आहे. गावच्या मंदिरातून उमटणाऱ्या घंटांचा निनाद आणि मशिदीच्या मिनारावरून येणारा अजानचा प्रतिध्वनी गावातील एकोपा स्पष्ट करतो. विठ्ठल पाटील त्यांचा प्रवास मोठ्या आनंदाने सांगतात. ते म्हणाले, “मी मुंबईला वेगवेगळ्या व्यक्तींकडून देणगी मिळण्यासाठी अकरा वेळा गेलो. गावात मशीद व्हावी, यासाठी मुस्लिम बांधवांबरोबरच अनेक हिंदूंनी भरभरून मदत केली.”
जकेकूर गावात मोहरम, ईद, दिवाळी, नवरात्र असे सगळे उत्सव एकत्रित रीत्या साजरे केले जातात. गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आषाढीच्या वारीत सहभागी होतात. गावातील अब्दुल तांबोळी गेल्या सोळा वर्षांपासून पंढरीची वारी न चुकता करत असल्याचे शहाजी पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मी त्यांच्या प्रार्थनास्थळासाठी एक पाऊल पुढे टाकले असे पाटील म्हणाले. मुस्लिम बांधवांना विठ्ठल पाटील यांच्या प्रयत्नांचे अप्रूप वाटत आहे. जुनी मशीद बारा फूट उंचीची होती. नवीन मशीद भव्य उभी आहे, अशी कृतज्ञतेची भावना ख्वाजामियाँ इनामदार यांनी व्यक्त केली. गावच्या एकोप्यामुळे धार्मिक वा जातीय तणाव गावात कधी निर्माण झाला नाही, अशी प्रतिक्रिया मनुद्दीन पठाण यांनी व्यक्त केली. मुस्लिमांनीही गावातील मंदिरासाठी मदत केली आहे. मुस्लिम बांधव हरिनाम सप्ताहाला उत्स्फूर्त देणगी देतात.
– रवींद्र केसकर 94046 19287
osdsamachar@gmail.com