व्यवसायनिष्ठ बोली – मराठीवर आघात?

2
52
-vyavsaynishthboli

विशिष्ट शब्दांचे उपयोजन जुगार, पानटपरी, गिर्यारोहण, लग्न, दूरदर्शन मालिका अशा नव्याजुन्या व्यवसायांत होताना दिसते. जुगारी लोकांच्या तोंडी झन्नामन्ना, तीनपत्ती, मांगपत्ती हे शब्द येतात. तीनपत्ती या पत्त्याच्या खेळात तीन पत्ते वाटले जातात. त्यांचा योग्य असा वरचढ ठरणारा क्रम लावावा लागतो. त्यात ‘ट्रिपल’ म्हणजे तिन्ही पत्ते सारखे- तीन राण्या, तीन राजे वगैरे. त्यानंतर ‘सीटी’ म्हणजे तिन्ही पत्ते एका प्रकारे व लागोपाठच्या क्रमाने असावे लागतात. म्हणजे बदामचे लागोपाठ क्रमाचे 4, 5, 6 हे पत्ते. सीटीनंतर ‘दादरा’चा क्रम लागतो. दादरा म्हणजे कोणत्याही प्रकारचे पत्ते. मात्र चढता/उतरता असा पत्त्यांचा क्रम हवा असतो. ‘दादरा’नंतर ‘कलर’चा क्रम असतो. तिन्ही पत्ते एका प्रकारचे असावे लागतात. ‘कलर’नंतर ‘डबल’चा नंबर लागतो. त्यांत तीनपैकी कोणतेही दोन पत्ते सारखे असावे लागतात- उदाहरणार्थ, दोन राजे, दोन राण्या.

‘मांगपत्ती’ या खेळात समोरचा भिडू कोठल्याही पत्त्याचे नाव सांगून पत्ते टाकण्यास सांगतो. तो हवा तो पत्ता मागतो. म्हणून खेळाचे नाव ‘मांगपत्ती’. एक पत्ता स्वत:ला व दुसरा पत्ता समोरच्या भिडूला असे पत्ते वाटले जातात. हवा तो पत्ता वाट्याला आला की समोरचा भिडू जिंकतो.

पत्त्यांच्या खेळात/जुगारात ‘डबा’ हा खेळ असतो. त्यास ‘रमी’ असेही म्हणतात – त्यात प्रत्येकी तेरा पत्ते वाटले जातात. त्यात पत्त्यांचा ४-३- ३-३ असा क्रम लावावा लागतो. त्यातील पहिल्या चार पत्त्यांच्या जोडास ‘पक्की’ म्हणतात. त्यात एकाच प्रकारचे, लागोपाठ क्रमाचे चार पत्ते जुळवावे लागतात.

‘गिर्यारोहण’ आणि ‘पाणीखेळ’ हेही व्यवसायरूप घेऊ लागले आहेत. त्यांचे व्यावसायिक प्रशिक्षक उदयास आले आहेत. पण ते लोक त्यांच्या व्यवसायात इंग्रजी शब्द सर्रास वापरतात.

‘पाणीखेळ’ या क्रीडा-व्यवसायात पुढील शब्द उपयोजले जातात –

खेळ           संज्ञा
समुद्रतळाशी जाणे             स्कुबा डायव्हिंग
तराफ्यावरून नदी ओलांडेणे       रिव्हर राफ्टिंग
बर्फावरून (स्कीवरून) घसरणे            स्किइंग

 

साहसी क्रीडा-प्रकारांत पुढील शब्द उपयोजले जात आहेत –

 

स्वरूप             संज्ञा
तंबूत राहणे        कॅम्पिंग
हवाई छत्रीने उंचावरून झेपावणे          पॅराग्लायडिंग
लांब, लवचीक दोर कंबरेला बांधून उंचावरून उडी घेणे       बंजी जंपिग
अयांत्रिक त्रिकोणाकृती पतंगाच्या साहाय्याने हवेत भरारी घेणे          हँग ग्लायडिंग
गरम हवेच्या साहाय्याने विहार करणे               हॉट एअर बलूनिंग
अरण्यवास, वनप्रवास         जंगल सफारी 

 

लग्न उद्योगाने करिझ्मा आल्बम, डीजे, लॉन, व्हिडिओ शूटिंग हे शब्द आणले आहेत.
फूडस्टायलिंग या नव्या व्यवसाय-क्षेत्रात पुढील शब्द उपयोजले जात आहेत –

 

 

बल्लवाचार्य        शेफ
मोठे स्वयंपाक गृह (मुदपाकखाना)           बल्क किचन     
मांसाहारी जिन्नस साफ करण्याची जागा     बुचरी
भाज्यांची पूर्वतयारी             व्हेज प्रेप
थंड पदार्थ बनवण्याची जागा             गार्द माँजेर

 

पिणाऱ्यांच्या तोंडी सिग्नेचर, ऑफिसर्स चॉईस, बिअर, व्होडका, ब्रँडी, व्हिस्की, पाइंट, क्वार्टर, रम, वाइन इत्यादी शब्द रुळले आहेत. नोटबंदीने अर्थव्यवसायात नव्याच शब्दांची भर घातली आहे – निमौद्रीकरण, चलनजाच, निश्चलनीकरण, चलन आकांत, चलन कल्लोळ.

यांपैकी निमौद्रीकरण, निश्चलनीकरण हे शब्द प्रक्रियासुसंगत आहेत. मात्र चलनकल्लोळ-चलनजाच-चलनआकांत हे शब्द जनतेच्या त्रासदायक अनुभवाची उत्स्फूर्त शब्द-अपत्ये आहेत.

मालिका-व्यावसायिकांनीही इंग्रजी शब्दांना रसिकांच्या मानगुटीवर बसवले आहे. यात सेलिब्रेटी, सेल्फी, अँकर, रिअॅलिटी शो, प्राइम टाइम, फूल टू कडक, कॉमेडीची बुलेट ट्रेन, बिग बॉस इत्यादी शब्द येतात.

हा ही लेख वाचा- शब्दनिधी

सांकेतिक बोलीतील शब्द इंग्रजी वळणाचे नाहीत. नव्या व्यवसाय-क्षेत्रातील व्यवसायनिष्ठ भाषेतील शब्द मात्र पूर्णपणे इंग्रजीच आहेत. प्लंबिंग क्षेत्र, माध्यमक्षेत्र, ब्युटीपार्लर, आरोग्यक्षेत्र, विज्ञानतंत्रज्ञानाचे क्षेत्र, सेवाक्षेत्र आदी क्षेत्रांतील व्यवसायनिष्ठ शब्दसंग्रह पूर्णपणे इंग्रजी असण्याचे तोटे संभवतात. आधीच इंग्रजी माध्यमाकडे झालेला कल, मराठी माध्यमाच्या शाळांची दुरवस्था यांसारख्या अनेकविध कारणांनी मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत. तशातच या नव्या क्षेत्रांनी आणलेल्या इंग्रजी पारिभाषिक शब्दांचा वाढणारा राबता पाहता मराठी भाषा-प्रेमींना चिंता वाटणे साहजिक आहे.

(‘भाषा आणि जीवन’ वरून उदृत, संपादित-संस्कारित)  

फुला बागूल 9420605208
dr.fulabagul@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.