खेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय (Siddhagiri Museum)

1
88
_SidhagiriMath_2.jpg

‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे कोल्हापुरातील कणेरी मठ. तेथे ग्रामजीवनाचे हुबेहूब दर्शन मॉडेल्समधून घडते. कणेरी हे गावाचे नाव आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर, राष्ट्रीय महामार्गाला लागून साडेतेराशे वर्षांहून जुने असे सिद्धगिरी महासंस्थान मठ नावाचे क्षेत्र आहे. त्याची ओळख जगद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचा मठ अशी आहे. कणेरी हे गाव त्या मठाच्या कुशीत, वनराईत वसलेले आहे. ‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालया’ची स्थापना सिद्धगिरी मठाचे सत्ताविसावे मठाधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते झाली. त्याची पायभरणी जुलै 2007 मध्ये करण्यात आली. संग्रहालय एकूण तेरा एकर जागेत विस्तारलेले आहे. या ठिकाणी महत्त्वाची नोंद अशी, की सिद्धगिरी मठाचे अठ्ठेचाळिसावे मठाधिपती ब्रम्हलीन श्री काडसिद्धेश्वर महाराज यांची सर्वसामान्य लोकांना परवडेल असे अद्यावत हॉस्पिटल उभारावे अशी इच्छा होती. त्यांच्या मागे त्यांची ही इच्छा श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी पूर्ण करण्याचे योजले. भक्तगणांच्या देणगीतून हॉस्पिटल उभारणीचे काम सुरूही झाले. पण आर्थिक अडचणी मिटेनात. त्यांतून मठाला स्वावलंबी करण्यासाठी उपाय म्हणून ग्रामजीवन संग्रहालयाची कल्पना राबवण्यात आली. कामाला सुरूवात 2007 मध्ये झाली. संग्रहालयाच्या उभारणीचे काम 2012 पर्यंत पूर्ण केले गेले. तो ग्रामीण संस्कृतीवर आधारित असा आगळावेगळा देखावा झाला आहे. तो त्या प्रकारचा देशातील पहिला उपक्रम असावा. ते संग्रहालय आशिया खंडातील दोन नंबरचे मानले जाते. ‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालया’स एका पाहणीनुसार जागतिक स्तरावरील अग्रगणित पंचवीस संग्रहालयांमध्ये मानांकन मिळाले आहे!

सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय म्हणजे स्वावलंबी, जिवंत खेडेच आहे जणू. सर्व मूर्ती ह्या सिमेंटच्या असल्या तरी प्रतिकृती हुबेहूब दिसतात. ग्रामीण संस्कृती दर्शवणारी ती शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ चालू असतो. संग्रहालय तीन भागांमध्ये विभागलेले आहे – 1. प्राचीन प्रतिभावंत, 2. ग्रामजीवन आणि 3. उत्सव.

_SidhagiriMath_3.jpgसंग्रहालयाचा पहिला टप्पा गुहेचा बनवलेला आहे. प्राचीन प्रतिभावंतांमध्ये  कपिलमुनी, पतंजली, वेदव्यास, महर्षी कणाद, नारद, चिरकारिक, भगीरथ, विष्णूशर्मा, गार्गी, अक्षपाद गौतम, जेमिनी, चरक, सुश्रुत, जीवक, आर्यभट्ट, नागार्जुन, वाल्मिकी ऋषी, चक्रवती सम्राट हर्षवर्धन, विद्यावाचस्पती, भरत-शंकुतला, भरतमुनी, पाणिनी, एकलव्य, शबरी, वराहमिहीर, सुरपाल, यशोदा, चाणक्य यांचा समावेश आहे. महर्षी पराशर आणि काश्यप यांच्यासारख्या बत्तीस महान ऋषींच्या सिमेंट क्राँकिटमध्ये तयार केलेल्या मूर्ती आकर्षक वाटतात. इतिहासाचा एक पटच नजरेसमोर उभा राहतो. मूर्तींसोबत त्यांनी त्यांच्या कालखंडांत केलेल्या कार्याचा आढावा लेखी स्वरूपात थोडक्यात नमूद केला आहे. प्रत्येक मूर्तीच्या बाजूला भिंतीवर निरनिराळी योगासने वेगवेगळ्या भागांत शिल्पस्वरूपात कोरलेली आहेत.

गुहाजगतामधून बाहेर आल्यावर, गावच्या पाणवठ्यावर रहाटाने विहिरीतून पाणी काढणाऱ्या बायका, गावाबाहेरील गायरानात विटीदांडू खेळणारी मुले, गाई-म्हशी राखणारा गुराखी, मेंढपाळ, काठी अन् घोंगडे घेऊन शेळ्या राखणारा धनगर, वट्यांचा खेळ, विश्रांती घेणारे यात्रिक- त्यांच्या बैलगाड्या, पेरणी- कुळवट- मळणी- धान्याला वारा देणे (पाखडणी)-कोळपणी- नांगरणी अशी शेतीविषयक कामे व अवजारे असे ग्रामीण जीवनाचे चित्रमय दर्शन घडते. औताला जुपलेली बैलगाडी, जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, मोटेचे पाणी, पाणी भरणाऱ्या गृहिणी, पाण्याची कावड घेतलेला गावकरी हेही त्या ठिकाणी पाहण्यास मिळते. गावामध्ये पारकट्ट्यावर बसून न्यायनिवाडा करणारी पंचायत समिती, शाळेत जाणारी मुले आणि संपूर्ण गावात उठून दिसणारा पाटलाचा वाडा यांसारखी दृश्ये खेड्यात पाहण्यास मिळतात. विशेष म्हणजे, त्यांनी ग्रामीण संस्कृतीचे सर्व बारकावे त्यामध्ये टिपले आहेत.

मॉडेलगावात प्रवेश करत असतानाच लमाणांचे घर, कसरत करणारे पैलवान, हनुमान मंदिरातील प्रवचन, माकडवाला (मदारी), वासुदेव, सोमवार कट्टा, अस्वलांचा खेळ (दरवेशी), धर्मशाळा, चुनाभट्टी, विठ्ठलमंदिर, शिंग फुंकणारा, पावश्या, गावचावडी, गारुडी, माळी, कोंडवाडा, सुतार, लोहार, गोट्यांचा खेळ, तांबट, पिंजाऱ्याचे घर, धनगरांचे घर, आंधळी कोशिंबीरीचा खेळ, लक्ष्मी मंदिर, शिंपी, कासार, बाजारकट्टा, बाईस्कोपवाला, मुलींचा जिबलीचा खेळ, मंदिरातील शाळा, धार लावणारा, नाभिक,  परीट, शेवया करणाऱ्या स्त्रिया, नारळसोलणी, तालीम, जाते दळणे, कोकणातील चिऱ्यांचे घर, पंचायतकट्टा, गोंधळी, चर्मकार (चांभार), बुरुड, गुरव, कोरवी, मुलींचा खड्यांचा खेळ, कातडी कमावणारा, मातंग (दोरखंड बनवणे), पाथरवट, कोळ्यांचे घर, कुंभाराचे घर, लगोरीचा खेळ, कोष्ट्याचे घर, पिंगळा जोशी, तेल्याचे घर, वाणी दुकान, पाठवणी, वृद्धसेवा, सोनारांचे घर, अत्ताराचे घर, वैद्याचे घर, जोशीचे घर, वंशावळ सांगणारा हेळवी हे ग्रामीण व्यवसायाचे चित्र आहे. त्यामधून परंपरेने चालत आलेली कामे प्रेक्षकांसमोर उभी केली गेली आहेत. लाकूड फोडणारा, वतनदारांचा वाडा, गवंडी, डोंबाऱ्यांचा खेळ अशी वास्तुशिल्पे आहेत.

_SidhagiriMath_1.jpgउत्सव विभाग स्वतंत्र आहे. त्यामध्ये सर्व सण-उत्सव साजरे केले जातात, त्याचे हुबेहूब दर्शन होते. वर्षभर तयार केलेले उत्पादन, यात्रेच्या निमित्ताने दुकाने उभारून विक्री व त्यातील वस्तू अगदी खरेखुरे वाटतात. यात्रेमधील रथ व तो ओढणारे सर्वधर्मीय लोक हे दृश्य त्या वेळच्या सामाजिक बांधिलकीच्या जीवनाचे व एकोप्याचे दर्शन घडवतात, पूर्वीच्या काळच्या समाजाच्या स्वावलंबी व आदर्श जीवनपद्धतीचे सादरीकरण ‘संग्रहालया’च्या माध्यमातून केले गेले आहे. प्राचीन खेडी समृद्ध होती, स्वावलंबी होती. लोकांमध्ये प्रेम, आस्था, जिव्हाळा होता. त्याच्या मुळाशी तत्कालीन जीवनपद्धत होती. संपूर्ण भारत मोगलांच्या, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता तरी प्रत्येक गाव हे स्वतंत्र होते. लोकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांचे स्वत:चे गाव सोडून इतरत्र जाण्याची गरज भासत नव्हती.

प्राचीन खेड्यांमध्ये बलुतेदार, आलुतेदार यांच्याभोवती लोकजीवन फिरत असे. शेती हा केंद्रबिंदू ठेवून, ते लोक संपन्न, समाधानी जीवन जगत होते. त्याचे प्रत्ययकारी दर्शन तेथील चित्र-शिल्पाकृती घडवतात, त्यातील जिवंतपणा भावतो. ऋषिमुनींच्या शिकवणीचे योगदान, गुरुशिष्यांतील संबंध, वैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक महत्त्व; तसेच, प्राचीन प्रतिभावंतांचे दर्शनही गुहेमधून घडवले आहे. एवढा मोठा परिसर पाहताना त्यामध्ये हरवून जाण्यास होते.

संग्रहालयातून बाहेर पडल्यानंतर मागे उताराच्या दिशेने गेले तर डाव्या बाजूला राशी उद्यान पाहण्यास मिळते. उद्यानात बारा राशी छायाचित्रणाच्या स्वरूपात व्यक्त केल्या आहेत. या राशी मठाच्या मुख्य कमानीतून प्रवेश केल्यावर संग्रहालयाकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या मधोमध बसवण्यात आल्या आहेत.

– नितेश शिंदे

info@thinkmaharashtra.com

(कोल्हापूरचे पर्यटन वरून उद्धृत, संपादित-संस्कारित-विस्तारित)

Last Update On – 28 July 2018

About Post Author

1 COMMENT

  1. अप्रतिम व हुबेहुब ग्रामजीवन…
    अप्रतिम व हुबेहुब ग्रामजीवन संग्रहालयाचे अप्रतिम वर्णन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here