तांबवे गावची वज्रेश्वरी देवी

3
95
carasole

तांबवे हे नीरा नदीकाठी वसलेले तीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाचा पाण्याचा मुख्‍य स्रोत म्हणजे नीरा नदी व प्रमुख पीक म्हणजे ऊस! सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यात अकलूजपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर ते गाव स्थित आहे. वज्रेश्वरी देवी हे त्‍या गावाचे ग्रामदैवत. सुमारे सात हेक्टरच्‍या निसर्गरम्य परिसरात हेमाडपंथी शैलीतील ते पुरातन दगडी मंदिर उभे आहे. त्‍या मंदिराचे वैशिष्‍ट असे, की ते वज्रेश्‍वरी देवीचे भारतातील दुसरे ज्ञात मंदिर आहे. वज्रेश्वरी देवीची मंदिरे देशभरात फक्त दोन ठिकाणी आढळतात. एक मुंबईजवळच्‍या वसई येथे तर दुसरे सोलापूरच्‍या तांबवे गावात.

ते मंदिर नीरा नदीपात्रापासून उंच टेकडीवर आहे. तेथे माघ पौर्णिमेला दोन दिवसांची यात्रा भरते. यात्रेदिवशी आजुबाजूच्या गावांतील आराध्यी मंडळी देवीसमोर जागर घालतात. देवीच्‍या मूर्तीसमोर गोल आकाराचे दगडी ताट आहे. यात्रेदिवशी त्या ताटामध्ये सुवासिनी एकत्रित जेवण करतात. यात्रेत कुस्त्यांचा कार्यक्रम होतो. त्याजोडीला आराध्यांचा मेणा, देवीला पुरणपोळीचा नैवेद्य असे कार्यक्रम होतात. यात्रेतील शेवटची कुस्ती सत्तर ते ऐंशी हजार रुपयांच्या पारितोषिकाची असते.

देवीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभा-याच्‍या पुढे जमिनीत बसवलेले दगडी ताट दृष्‍टीस पडते. तिथून पुढे आले की नदीकडे जाणा-या दगडी चि-यांच्‍या पाय-या आहेत. पाय-या संपल्‍यावर छोटीशी कमान आहे. त्‍यानंतर काही पाय-या उतरताच समोर दगडी दीपमाळ आहे. डाव्‍या हाताने निरा नदी वाहते.

वज्रेश्वरीदेवीच्‍या मंदिरालगत नदीच्‍या काठालाच मोठे कुंड आहे. त्याला ‘वज्रेश्वरी कुंड’ असे म्हणतात. त्‍या कुंडाच्या खोलीचा थांगपत्ता लागलेला नाही. त्याशेजारी असलेल्‍या खडक्‍यांवर काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. देवीने त्‍या कुंडात आंघोळ केली आणि त्‍यानंतर तिने तिचे ओले केस झाडले. त्‍यामुळे उडालेले पाणी पडून नदीपात्रातील पाषाणांवर काळे डाग पडल्याची आख्‍यायिका प्रसिद्ध आहे. ते कुंड वैशिष्ट्यपूर्ण आहे. नदीपात्रावरील दगडांवर गाय, हत्ती, मासा, घोडा, उंट अशा प्राण्यांच्या पाऊलखुणा दिसतात. फार पूर्वी कुंडात हत्तीच्या आकाराचा मासा तर उंटाच्या आकाराचा झिंगा होता आणि त्याच्या नाकात बैलगाडीच्या चाकाएवढी सोन्याची नथ होती, अशा कहाण्‍या गावात प्रसिद्ध आहेत. वज्रेश्‍वरी देवी तांबवे गावात बैलाच्या पावलातून आली आहे, अशी मान्‍यता आहे.

नदीकाठच्‍या खडकांवरील पाऊलखुणांबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक आख्यायिका अशी की, एकदा एक वाणी (व्यापारी) प्रवास करत असताना तांबवे गावात आला. त्याने तिथे मुक्काम केला. त्याच्याजवळ असलेल्या बैलाच्या नखात दगडाचा एक तुकडा घुसला. त्यामुळे बैलाचा पाय सुजला. तो दगडाचा तुकडा काढून त्याने तिथे मांडला आणि त्याला वज्राई असे नाव दिले. दुसरी आख्यायिका अशी की, देवीच्‍या मूर्तीसमोर सोन्याचे ताट होते. देवीला नवस बोललेल्या सुवासिनी त्‍या ताटात एकत्र जेवत असत. एकदा एका सुवासिनीने त्‍या ताटाचा तुकडा मोडला, पण मोडलेल्या त्या तुकड्याचा पुन्हा पाषाण झाला. त्‍याचबरोबर जमिनीत बसवलेले सोन्‍याचे ताटही दगडात रुपांतरीत झाले. आणखी एक आख्यायिका अशी की, देवीची एक गाय होती. ती दररोज एका शेतक-याच्या शेतात चरायला जात असे. त्यामुळे शेतक-याचे नुकसान होत असे. शेतकरी एकदा त्या गायीमागून कुंडापर्यंत आला. गाय कुंडात गायब झाली. शेतकरी त्या गायीमागोमाग कुंडात उतरला. तिथे देवी प्रकट झाली. तिने शेतक-याला येण्याचे प्रयोजन विचारले. त्याने गायीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे सांगितले. देवीने त्याला त्या गायीचे शेण घेऊन जायला सांगितले. शेतकरी शेण घेऊन निघाला. पण त्याच्या हातातील काही शेण खाली पडले. कुंडाच्या बाहेर येताना त्याच्याजवळ जितके शेण शिल्लक उरले होते त्या शेणाचे सोने झाले होते. वज्रेश्‍वरीचे मंदिर एका राक्षसाने रात्रीत बांधले असल्‍याचीही कहाणी गावात ऐकण्‍यास मिळते. नदी आणि कुंड परस्‍परांच्‍या शेजारी आहेत. मात्र नदीतील पाणी कमी झाले तरी त्‍या कुंडातील पाणी कधीच कमी होत नाही, असे गावकरी सांगतात.

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तेथील इनामदारांना तांबवे गावाचे वतन मिळाले. देवीच्या नवरात्रात नदीपलिकडच्‍या इंदापूर तालुक्यातील सराटे गावास देवीला नैवेद्य दाखवण्‍याचा मान आहे. माघ पौर्णिमेच्‍या यात्रेवेळी गावातील इनामदारांना नैवेद्याचा मान तर शेजारच्‍या सापटणे गावाचा देवीची पालखी बनवण्याचा मान असतो. यात्रेत नवसाचा मुलगा झाल्यावर त्याला वरून खाली टाकण्याची प्रथा आहे. (ही प्रथा उस्‍मानाबादच्‍या लोहारा तालुक्‍यात, साता-यातील नाडोली गावात आणि महाराष्‍ट्राच्‍या इतर अनेक ठिकाणी अस्तित्‍वात आहे. काही ठिकाणी ती प्रथा बंद करण्‍यात आली आहे.) मंदिराच्या बाहेर शंकराची पिंडी आहे. तिथे कौल लावण्याची प्रथा आहे. प्रत्येक आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या दिवशी लोक भक्तिभावाने देवीच्‍या दर्शनासाठी येतात. यात्रेत मंदिराबाहेर बकरे कापण्याची प्रथा आहे. वज्रेश्‍वरी देवीचा उल्लेख रामायण व नवनाथ या ग्रंथात आढळतो.

गावापासून नीरा नदीच्या काठाने पंधरा किलोमीटर पुढे गेल्‍यास नरसिंहपूर हे मोठे देवस्थान दृष्‍टीस पडते.

– गणेश पोळ

(माहितीसंकलन साह्य तात्यासाहेब लांडगे)

Last Updated On – 19th May 2016

About Post Author

3 COMMENTS

  1. अभ्यासपुर्ण लेख.धन्यवाद
    अभ्यासपुर्ण लेख. धन्यवाद गणेशजी.

  2. अकलुज पासुन 8 किलोमीटर वर आहे
    अकलूज गावापासुन 8 किलोमीटर वर आहे. नैैवेद्याचा मान हा तांबवे गावच्या इनामदार यांचा असतो.

  3. या मंदिराला “वजराईचे मंदिर”
    या मंदिराला ‘वजराईचे मंदिर’ म्हणून ओळखतात. जवळच वाहणा-या नीरा नदी पात्रात तयार झालेल्या कुंडाभोवतीच्या जवळपास एक कि.मी. नदी पात्रात पाषाणात ‘रांजण खळगे’ नैसर्गिक रित्या तयार झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील रांजण खळगे सारखेच हे खळगे आहेत. कुंडाच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या वरच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी दरवर्षी पाकोळी हे पक्षी पोयटा माती व लाळ वापरून शेणाच्या गोव-या सारखे घरटे लिंपतात. मी त्‍या पक्ष्यांच्‍या घरट्यांचे गेल्या वीस वर्षापासून अवलोकन करत आलो आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आले की ती घरटी वाहून जातात. फेब्रुवारी/ मार्च महिन्यात पाणी कमी झाल्यावर पाकोळी पक्षी पुन्हा घरटे लिंपतात.

Comments are closed.