यास्मिन शेख : गेल्या शतकाचा दीपस्तंभ (Yasmin Shaikh- Marathi Grammarian is One Hundred Year Old)

1
391

मराठी व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचा शंभरावा वाढदिवस पुण्यात साजरा झाला. भानू काळे, दिलीप फलटणकर आणि एम. के. सी. एल.चे विवेक सावंत यांच्या पुढाकाराने तो आयोजित करण्यात आला होता. गौरवसमारंभ देखणा झाला. अध्यक्ष होते मिलिंद जोशी. यास्मिन शेख यांच्या कन्या रुमा बावीकर याही उपस्थित होत्या. गेल्या वर्षी त्यांचा नव्याण्णावा वाढदिवस असाच थाटामाटात साजरा झाला होता. दोन्ही वेळी यास्मिन शेख स्वच्छ, स्पष्ट व नि:संदिग्ध बोलल्या.

त्या सहज आणि दिलखुलास बोलत होत्या. त्यांच्याजवळ बसलेले फलटणकर आणि रुमा बावीकर (रुक्साना) अधूनमधून त्यांनी भाषणासाठी लिहून आणलेल्या मुद्द्यांकडे यास्मिन शेख यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या त्यांच्या गोड आठवणींत हरवून गेल्या होत्या आणि प्रेक्षकही त्या आठवणींमध्ये गुंतून गेले होते. यास्मिन शेख यांनी त्यांच्या जीवनातील यशामागे असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची कृतज्ञतेने आठवण केली.

मी यास्मिन शेख यांना पाच-सहा महिन्यांपूर्वी भेटलो होतो. दिलीप फलटणकर, मी त्यांच्यासोबत तब्बल तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मराठी व्याकरणात दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यास्मिन शेख यांची भेट होणार म्हणून माझ्या मनावर थोडे दडपण होते. पण त्यांच्या साध्या, तरीही प्रभावी व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेलो. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अनुभवांचा आणि आठवणींचा जीवनपटच समोर उभा राहिला. त्यांचा प्रमाणभाषेचा आग्रह ठाम होता, पण दुराग्रह मात्र नव्हता.

यास्मिन शेख यांच्या कृतज्ञतेच्या यादीतील पहिले नाव होते – त्यांचे वडील. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा जॉन रूबेन. त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्या सात भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या होत्या आणि त्यांची सर्वात लहान बहीण तेव्हा अवघ्या काही महिन्यांची होती. तशा कठीण परिस्थितीत वडिलांनी मुलांचे संगोपन एकहाती केले. काही जणांनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला, पण वडिलांनी मुलांच्या भवितव्यासाठी तो नाकारला. त्यांच्या त्या निःस्वार्थ त्यागाला यास्मिन शेख यांनी मन:पूर्वक अभिवादन केले. त्यांना मराठी भाषेची पहिली ओळखही त्यांच्या वडिलांनी करून दिली. त्यांचे कुटुंब मूळचे ज्यू धर्मीय असले, तरी घरातील संभाषण मराठीतच होई. वडिलांना मराठी वाचनाची आवड होती. त्यांच्या घरी अनेक मराठी पुस्तकांचा संग्रह होता. त्यातूनच यास्मिन शेख यांच्या मनात मराठी भाषेचे प्रेम रुजले. त्यांनी एक गमतीशीर आठवण सांगितली – लहानपणी ‘सीता हरण’ हे पुस्तक पाहून त्यांनी वडिलांना विचारले, “मला हरणाचं पुस्तक वाचायचंय.” त्यावर वडील हसून म्हणाले, “हरण आणि हरीण यांत फरक असतो. तुला हरिणाचं पुस्तक आणून देतो.” शब्दांमधील सूक्ष्म अर्थभेद समजण्याची संवेदनशीलता त्यांना अशा अनुभवांतून मिळत गेली.

त्या काळी मुलींनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले तरी ते पुरेसे मानले जात होते. पण त्यांच्या वडिलांनी यास्मिन यांच्या शिकण्याच्या आग्रहाला मान देत, त्यांच्यासाठी पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्या संधीमुळे त्या मराठी विषयात बी ए, एम ए सारख्या पदवी मिळवू शकल्या. त्यांनी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी विषयात पहिल्या क्रमांकाचे सातत्य राखले. त्या काळी मुलींसाठी ते मोठे यश मानले जात असे. वडिलांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांची दूरदृष्टी यांमुळेच यास्मिन यांची शैक्षणिक व व्यावसायिक वाटचाल भक्कम पायावर उभी राहिली.

त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण होते – त्यांचा विवाह. त्यांनी एका मुस्लिम कुटुंबात विवाह करण्याचा निर्णय घेतला. ते त्यांच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यांनी वडिलांचा विरोध न जुमानता, घर सोडून लग्न केले. वडील फारच नाराज झाले. पण त्या लग्नानंतर पहिल्यांदा वडिलांना भेटण्यास गेल्या, तेव्हा त्यांनी सरळ जाऊन वडिलांना मिठी मारली. त्या एका मिठीत वडिलांचा सारा राग विरघळला आणि बाप-लेकीचे नाते पुन्हा स्नेहाने भरून आले !

यास्मिन शेख यांनी त्यांच्या यशासाठी अजून एक नाव कृतज्ञतेने घेतले – ते म्हणजे श्री.म. माटे. त्यांनी त्यांचे मराठी भाषेप्रती प्रेम माटेसर यांच्या प्रभावामुळे वाढल्याचे आवर्जून सांगितले. माटेसरांनी त्यांना केवळ शिकवले नाही, तर त्यांच्या मुलीप्रमाणे वागवले. त्यांच्या कुटुंबानेही यास्मिन यांना त्यांच्या घराचा अविभाज्य भाग मानले. यास्मिन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील एस. आय. ई. एस. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. तेथे त्यांना व्याकरणासारखा त्यांचा आवडता विषय शिकवण्याची संधी मिळाली. त्या वेळी श्री.पु. भागवत तेथे मराठी विभागप्रमुख होते, तर विंदा करंदीकर इंग्रजी विषय शिकवत होते. श्री.पु. भागवत यांची आठवण सांगताना, त्या म्हणाल्या, की भावनांचे उगीच प्रदर्शन न करणारे भागवत आवश्यक तेव्हा सहकाऱ्यांच्या मदतीस तत्पर असत. यास्मिन शेख तब्बल पंचवीस वर्षे अध्यापन केल्यानंतर मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. त्या पुण्यात स्थायिक झाल्या. त्यांनी भानू काळे चालवत असलेल्या ‘अंतर्नाद’ या मासिकात व्याकरणतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. त्यांना ‘अंतर्नाद’मुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही प्रसिद्धी मिळाली.

यास्मिन शेख यांच्या दोन्ही मुलींनी हिंदू घरांत आंतरधर्मीय विवाह केले. त्यांनी स्वतःही आंतरधर्मीय विवाह केलेला असल्यामुळे मुलींच्या त्या निर्णयांना त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी कौटुंबिक जिव्हाळा आणि पारंपरिक मूल्ये यांसोबतच आधुनिक विचारांचीही जाणीवपूर्वक जोपासना केली.

यास्मिन शेख गौरवसमारंभात मराठी व्याकरणाविषयी म्हणाल्या, “व्याकरण या विषयाला भाषाशास्त्राची जोड दिल्याशिवाय ते परिपूर्ण होत नाही.” त्यांनी मराठी व्याकरण आणि भाषाविज्ञान या क्षेत्रात आयुष्यभर केलेली सेवा, ही मराठी साहित्यविश्वाला लाभलेली मौल्यवान देणगी होय. विसाव्या शतकातील मराठी भाषेचा सुवर्णकाळ आणि एकविसाव्या शतकातील तिच्यासमोरची आव्हाने यांमधील महत्त्वाचा दुवा व मराठीच्या पुढील वाटचालीसाठी यास्मिन शेख दीपस्तंभ आहेत.

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

About Post Author

Previous articleचोपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-fourth Marathi Literary Meet – 1980)
Next articleविद्यानिकेतन – चांगल्या मूल्यांचा आग्रह (Dombivali’s Vidyaniketan – insistence for values)
गिरीश घाटे हे ठाण्याचे रहिवासी. ते धातुशास्त्रातील पदवीधर असून त्यांच्या डॅकोट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आयजेन इंजिनीयर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या आहेत. घाटे यांना इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज (नवी दिल्ली) या संस्थेने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित (2015) केले आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील यावली गावी ‘प्रभाकर फाउंडेशन’च्या वतीने माध्यमिक शाळा दहा वर्षे चालवत आहेत. घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्त्वांचा मोठा प्रभाव आहे. घाटे यांची ‘सांग ना समजेल का?’ (कविता संग्रह) आणि ‘रावसाहेब’ ही (चरित्रात्मक कादंबरी) पुस्तके प्रकाशित आहेत. ते 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे संचालक आहेत.

1 COMMENT

  1. मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचा शतकमहोत्सवी वाढदिवस 21जून 2025 ला साजरा झाला. त्यासंबंधी दिलीप फलटणकरांचा लेख रविवार सकाळमधे वाचला होता.
    आज गिरीश घाटे सरांकडून पण त्यांच्याविषयी बरीच माहिती वाचायला मिळाली.
    या वयातही त्या स्वावलंबी आहेत, स्मृती चांगली आहे , त्यांची जीवनशैली, मराठी भाषेची सेवा इत्यादी वाचून खूप नवल वाटले आणि अभिमानही. त्यांना अधिक आयुष्य मिळो, ही प्रार्थना.
    घाटे सरांनी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    संजीवनी साव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here