अलिबाग नावाचा शोध !

0
508

अलिबाग ह्या शहराच्या नावाची व्युत्पत्ती बायबलमध्ये सापडते ! पण इतिहासाचा प्रवास अनेकदा असा अनाकलनीय असतो. ‘उत्पत्ती’ (Genesis) नावाचे बायबलचे पहिले पुस्तक आहे. आदाम आणि एवा ह्यांची गोष्ट त्यात आहे. आदाम हा आदिपुरुष आणि एवा ही आदिमाता. त्यांचे दोन मुलगे म्हणजे काईन आणि आबेल. काइनने (थोरला) रागाच्या भरात आबेलचा (धाकटा) खून केला ! बंधुप्रेम आदी मूल्ये अस्तित्वात येण्याआधीची ही गोष्ट आहे. तेव्हा राज्य द्वेषाचे होते. नंतर आदामाला अनेक अपत्ये झाली, त्यांतील सेथ हा ज्येष्ठ.

नोहाचा जन्म सेथच्या वंशात आठ पिढ्यांनंतर झाला. नोहाच्याच उमेदीत पृथ्वीवर जलप्रलय झाला ! त्याने बांधलेल्या मोठ्या तारवामुळे पृथ्वीवरील जीवन शाबूत राहिले ! जलप्रलयाची कथा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आहे. भारतीय पुराणात मनूची कथा आहे. नोहाची तीन मुले- शेम, हाम आणि याफेथ. त्यांचे तीन वंश झाले. त्यांनी पृथ्वी पुन्हा वसवली. त्यांपैकी शेम हा मध्यपूर्वेतील (अरबस्तान) लोकांचा आजा. (त्याचे काही वंशज अमेरिकेतदेखील पसरले). हामचा वंश आफ्रिकेत वाढला, तर याफेथचा वंश युरोप व आशिया या खंडांत पसरला.

अब्राहम याला यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम या तिन्ही धर्मांतील श्रद्धावंत कुलपिता मानतात. त्याचा जन्म शेमच्या वंशात आठ पिढ्यांनंतर झाला. त्याचे मूळ नाव अब्राम, म्हणजे पितामह (आमच्या वाडवळी भाषेत वाडगो!). देवाने त्याचे नाव बदलून अब्राहम (म्हणजे अनेक राष्ट्रांचा पिता) असे केले. त्याची दोन मुले. पत्नी सारापासून झालेला इशाक (ह्यापासून यहुदी वंश उपजला) आणि इजिप्तमधील दासीपासून झालेला इस्माइल (त्याच्यापासून अरब वंश निपजला). इशाकचा मुलगा याकोब (अरबीत याकोब आणि इंग्रजीत जेकब). याकोब कारस्थानी स्वभावाचा होता. तो त्याला हवे ते कोणत्याही मार्गाने मिळवत असे. पण तरीही त्याच्यावर देवाचा वरदहस्त होता. सासऱ्याची वीस वर्षे चाकरी करून तो त्याच्या गावी परतत होता. बरोबर त्याच्या बायका व बारा मुले होती. त्याची वाटेत देवदूताशी झटापट झाली, पण त्या झटापटीत याकोब हरला नाही. तेव्हा देवदूताने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला आणि तू त्या दिवसापासून याकोब नाहीस तर ‘इस्रायल’ म्हणून ओळखला जाशील असे म्हटले. ते त्याला नवीन नाव होते. तो इस्रायली समाजाचा आदिपिता. इस्रायलच्या बारा मुलांच्या बारा वंशांतून साऱ्या जगभर विखुरला गेला. तेव्हापासून तो समाज गेली अडतीस शतके जनमानसात रूजून मुळावत राहिला. तो अखेरीस, 1948 मध्ये एका आधुनिक राष्ट्ररूपात उभा ठाकला. तो इस्रायल ! आपल्या अस्तित्वाच्या मुळावर उठलेल्या लोकांशी, मग ते हमास असोत, हिजबुला असोत, की नाझी असोत, त्यांच्याशी दोन हात करून त्यांना सळो की पळो करणारा, कधीही हार न पत्करलेला आणि स्वतःचे नाव सार्थ करणारा असा इस्रायल… देवदूताने त्याचे इस्रायल असे पुनर्नामकरण करताना ‘देवाशी आणि माणसांशी झगडून अपराजित राहणारा’ म्हणून तुझे नाव ‘इस्त्रायल’ असेच म्हटले होते ! (God Prevails असाही इस्रायलचा अर्थ होतो). तेव्हा आदमपासून सेथ, नोहा, शेम, अब्राहम, इशाक आणि त्यानंतर इस्रायल असा ह्या राष्ट्रपुरुषांच्या नावाचा इतिहास आहे.

या इस्त्रायलचे बारा वंशज जगभर विखुरले. त्यांपैकी दहा शाखांचा खात्रीलायक थांगपत्ता नाही, म्हणून त्यांना ‘इस्रायलच्या हरवलेल्या दहा शाखा’ असे म्हणतात. त्यांच्यापैकी काही भारतात आले. ते बेने इस्रायली (म्हणजे इस्रायलची मुले). सुमारे बावीस शतकापूर्वी तत्कालीन रोमन शास्त्यांच्या छळाला कंटाळून नवीन देशाच्या शोधात निघालेल्या त्या मंडळींचे तारू कोकण किनाऱ्यावर फुटले. त्यांनी त्या किनारी आसरा घेतला. ते तेथील समाजजीवनात एकरूप झाले. त्यांनी आडनावेदेखील बदलून ती चौलकर, नवगावकर, राजापूरकर अशी मराठी करून घेतली. सुरुवातीला, ते तेलाचा व्यापार करत. ज्यू धर्माच्या प्रथेप्रमाणे ते शनिवार हा संपूर्ण विश्रांतीचा दिवस मानत. त्यामुळे जरी ते स्वतःला बेने इस्रायली असे म्हणत असले तरी त्यांची ओळख ‘शनिवार तेली’ ह्या टोपणनावाने जास्त प्रचलित राहिली.

आता, सतराव्या शतकात फास्ट फॉरवर्ड ! कान्होजी आंग्रे यांना मराठेशाहीने ‘सरखेल’ (म्हणजे नौदलाचे अॅडमिरल) नेमले होते, तो काळ. आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्यात मुक्काम देत पश्चिम सागरपट्टीवर वर्चस्व स्थापित केले आणि अष्टागार परिसराचा (म्हणजे रेवदंडा, चौल, थळ, नवगाव, किहीम आदी आठ आगरे किंवा गावे) विकास केला, कुलाबा किल्ल्यावरून त्या भागाला कुलाबा म्हणून ओळखले जात असे. आंग्रे यांनी त्या ठिकाणी खजिन्याच्या सुरक्षिततेसाठी हिराकोट किल्ला बांधला. आरमार तळ उभारले. त्यांचा राजवाडादेखील तेथे आहे. तसेच, त्यांनी टाकसाळ बांधून स्वतःचे चलन (कुलाबा रुपया, अलिबागी रुपया) देखील सुरू केले होते.

आंग्रे यांच्या काळात बेने इस्त्रायली समाजाची उन्नती झाली असण्याची शक्यता आहे. गोष्ट अशी, की त्या काळी, ‘एली’ नावाचा एक सधन बेने इस्रायली होता. त्याने अष्टागार भागात अनेक विहिरी खोदल्या, नारळांच्या व आंब्यांच्या मोठ्या बागा लावल्या. त्या बागांना ‘एलीची बाग’ म्हणून ओळख मिळाली. कालांतराने ती एलीची बाग एलीबाग आणि नंतर अलिबाग झाली. एली (Eli) हा मूळ हिब्रू शब्द. त्याचा अर्थ ‘महान’ किंवा ‘उंचावलेला’. (अरबीमध्ये ‘अली’ हा समानार्थी शब्द आहे). एली हा एलीशा, एलिझा / एलिजा ह्या हिब्रू नावाचे लघुरूप म्हणूनही वापरात आहे. इम्पिरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया (खंड 5, 1908 सालचा) ह्या दस्तऐवजात एली हा अली या नावाचा मुस्लिम गृहस्थ होता असा (चुकीचा) उल्लेख आहे.

मुंबईतील पारशी समाजासारखा बेने इस्रायली समाज हा अलिबागच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आंग्रे यांच्या नौदलात आरोन चुर्रीकर हा बेने इस्रायली इसम नौदलाच्या ताफ्याचा कमांडर म्हणून कार्यरत होता. त्यानंतरच्या काळात सॅम्युअल (सामजी) आणि अब्राहम (आबाजी) हे मराठा नौदलात कमांडर असल्याचा उल्लेख सापडतो. अलिबाग शहरात इस्राएल आळी भागात 1848 साली बांधलेले एक सिनेगॉग म्हणजे यहुदी मंदिर आहे. तेथे एका खडकाला ‘एलियाचा खडक’ असे म्हटले जाते. एलिया हा यहुदी प्रेषित. त्याचा पदस्पर्श त्या खडकाला झाला आहे ही तेथील बेने इस्रायलींची श्रद्धा.

सुंदर किनारा आणि भुरळ घालणारा निसर्ग, जलदुर्ग, पुरातन वास्तू आणि मंदिरे, यामुळे पर्यटक आणि इतिहासप्रेमी मंडळी यांना अलिबागचे मोठे आकर्षण आहे. मध्यंतरी अलिबागचे नाव बदलावे अशी टूम निघाली होती. अलिबागच्या नामांतराचा प्रस्ताव राहुल नार्वेकर यांनी मांडला होता- अलिबागचे नाव मायनाक नगरी करण्यात यावे आणि मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्याचे तीव्र पडसाद अलिबाग येथे उमटले. नामांतराच्या त्या मागणीला अलिबागमधून विरोध झाला. सरखेल कान्‍होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांनी नार्वेकर यांच्‍या भूमिकेचा निषेध केला. निवडणुकीच्‍या तोंडावर विशिष्‍ट समाजाचे लांगुनचालन करणारी भूमिका घेणे निषेधार्ह असल्याचे म्हणत सरखेल कान्‍होजीराजे आंग्रे यांचे अलिबागच्या जडणघडणीतील योगदान पाहता नामांतर केले जाणार असेल तर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार केला जावा असे रघुजीराजे आंग्रे यांचे म्हणणे आहे.

मायनाक भंडारी हे दर्यासारंग शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सुभेदार होते. मुंबई बंदरावरील खांदेरी-उंदेरी हा भूभाग कह्यात घेण्यासाठी इंग्रजांनी सैन्य पाठवले. त्या वेळी इंग्रजांच्या आरमाराला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मायनाक भंडारी यांना 1679 मध्ये पाठवले. मायनाक भंडारी यांनी चिकाटीने लढा देऊन इंग्रजांना पराभूत केले. हिंदवी स्वराज्यासाठी मायनाक भंडारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्ग जिंकला. रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे मायनाक भंडारी यांची समाधी आहे.

– रिचर्ड नुनीस, ऑस्ट्रेलिया rfnunes87@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here