मुंबई-पुणे प्रवास करत असताना खंडाळा घाटातील सौंदर्य कोठल्याही ऋतूत नेहमीच भुरळ घालते. विशेष करून रेल्वेने प्रवास करत असताना घाटात सामोऱ्या येणाऱ्या सह्याद्रीच्या भव्यतेच्या जाणिवेने मन हरखून जाते. मी हा प्रवास खूपदा केला आहे. त्या प्रवासात ठाकूरवाडी, मंकी हिल, नागनाथ, जामरुंग अशी रेल्वेची लहानशी उपस्थानके किंवा तांत्रिक थांबे आहेत. दुर्गम घाटात, जंगलात त्या स्थानकांचे प्रयोजन काय हा प्रश्न पडत असे. तेथे एखाद-दोन अधिकारी रेल्वेला झेंडा दाखवत, ते एवढ्या जंगलात एकटे कसे काय राहतात असेही वाटत राही; काही मजूरदेखील घाट मार्गावरील बोगद्यात कार्यस्थ असत. ते मजूर ह्या दुर्गम भागात कसे काय व कोठून येत असतील असा प्रश्न पडे.
घाटात बोगद्याच्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेत नागनाथाचे छोटेसे देऊळ आहे, तेथे एक-दोनदा जाऊन आलो आणि मग लहानपणीच्या माझ्या सर्व प्रश्नांची उकल आपसूक झाली. खंडाळा घाटाबाबतीत हे जे आकलन झाले, त्यातून घाटात अधिकाधिक भटकंती करण्याची ओढ लागली. घाट परिसरातील दुर्गवैभव म्हणता येईल अशा राजमाची किल्ला, ढाक किल्ला, नागफणी डोंगर या सर्वश्रुत ठिकाणी तर गेलो; तसेच, त्या परिसरातील आडवाटा जिज्ञासेपोटी पालथ्या घातल्या.
नागनाथ / गंभीरनाथ : खंडाळा घाटातून रेल्वेने मुंबईकडे जात असताना नागनाथ नावाचे एक रेल्वेचे उपकेंद्र लागते. तेथे रेल्वे तांत्रिक कारणासाठी दोन मिनिटे थांबते. तेथे डाव्या बाजूला दरीतून खाली पठारावर पंचवीस-तीस घरांचा आदिवासी पाडा आहे. त्यास ठाकूरवाडी म्हणतात. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांशी रेल्वेगाड्या त्या ठिकाणी थांबतात. सकाळची पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस त्या ठिकाणी पावणेआठच्या सुमारास येते. तेथे उतरून रेल्वे रुळाने पुण्याच्या दिशेने थोडे चालत गेलो की बोगद्याच्या वरील डोंगरात खालूनच एक गुहा दिसते. ती नागनाथाची गुहा. गंभीरनाथ गुहा असेदेखील ह्या गुहेस म्हणतात. अर्धा-पाऊण तासात तेथपर्यंत जाता येते. नागनाथ गुहा ज्या बोगद्यांच्या डोंगरावर आहे, त्या बोगद्यांना रेल्वेने 28 आणि 29 असे क्रमांक दिले आहेत.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना, ठाकूरवाडी उपकेंद्र लागते, तेथेही काही ट्रेनसाठी तीस-चाळीस सेकंदांचा थांबा देण्यात आलेला आहे. मुंबईकडून नागनाथला येणे असेल तर येथे उतरावे. तेथून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे लाईनमध्ये एक डोंगर आहे, तेथे येण्यास एक छोटासा बोगदा (स्थानिक वाहतुकीसाठी बांधलेला लहानसा सर्व्हिस टनेल) पायी चालून पार केला की ठाकूरवाडीच्या आदिवासी पाड्यावर येता येते, तेथून मग नागनाथाच्या गुहेत जाण्यासाठी चढाई करता येते. वास्तविक नागनाथ आणि ठाकूरवाडी हे दोन्ही तांत्रिक थांबे एकाच ठिकाणी समांतर आहेत, मध्ये फक्त एक डोंगर आहे. त्या डोंगरामुळे मुंबईकडून पुण्याला येणारी आणि पुण्याहून मुंबईला जाणारी रेल्वे लाईन दोन भागांत विभागली गेली आहे.
रेल्वेतून घाटात उतरलो आणि रेल्वे निघून गेली की घाट परिसर निर्मनुष्य असल्याने अत्यंत शांत वाटतो. थंड वारा सतत वाहत असतो, त्यात पक्ष्यांचे आवाज येत असतात, मन मस्त प्रफुल्लित होऊन जाते. रेल्वे लाईनने नागनाथाच्या डोंगराकडे मार्गक्रमण करताना बोगदे पार करून जावे लागतात आणि त्यावेळी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण एखादी रेल्वे त्याचवेळी त्या बोगद्यात शिरली की प्रचंड आवाज येतो आणि सवय नसल्याने त्या आवाजामुळे नकळत काळजात धडकी भरते. त्या आवाजामुळे माणूस गांगरून जाण्याची शक्यता असते. बोगद्याच्या बाजूला जागा अत्यंत कमी असते, बोगद्यात डागडुजी करणारे रेल्वेचे मजूर कर्मचारीदेखील दिसतात. एखादी रेल्वे आली, की त्यांच्या प्रमाणेच एका बाजूला उभे राहवे.
नागनाथ गुहेचा डोंगर चढत वर गेल्यावर कातळ कोरीव पायऱ्या दिसतात. पावसाळ्यात ती वाट निसरडी होते. वर पोचताच कमान लागते, लगोलग एक चौथरा दिसतो, त्यालगत पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या मागे नंदी आणि शिवलिंग आहे, तेथून पुढे नागनाथाच्या गुहेत जाता येते. गुहेला बाहेरच्या बाजूने लोखंडी जाळी लावून बंदिस्त केले आहे. जाळीतून आत जावे. मग एक चौकोनी लहान खिडकी दिसते. त्यातून आत जावे. तेथून गुहेच्या गर्भात प्रवेश होतो. दहा-वीस माणसे बसतील एवढी जागा तेथे आत आहे आणि तेथेच कोपऱ्यात गंभीरनाथांची मूर्ती आहे. तेथे कमालीची शांतता आणि पाषाणात जाणवणारा अनोखा थंडावा अनुभवण्यास मिळतो. चित्त नकळत स्थिर होऊन तेथील एकांतात विरून जाते. ती जागा मनाला शांत करण्यासाठी, ध्यानासाठी उत्तम अशी आहे.
गुहेतून खाली खंडाळा घाटाचा नजारा विलोभनीय दिसतो. नागमोडी वळणे घेत असलेले रूळ दिसतात. घटकाभर थांबून तेथील मनोहारी दृश्य मनात साठवून ठेवण्याची इच्छा होणारच ! नागनाथ डोंगरावर जाण्यासाठीची ती आडवाट भटकंती करणाऱ्या दर्दी आणि हौशी पर्यटकांनी एकदा तरी तुडवावी अशी आहे. तेथे जाण्यासाठी दऱ्याखोऱ्यांतील भटकंतीचा थोडासा अनुभव गाठीशी असेल तर तो उपयुक्त ठरेल.
ठाकूरवाडी, नागनाथ हे रेल्वेचे तांत्रिक थांबे ठाकूरवाडीतील आदिवासी लोकांसाठी वरदान ठरले आहेत. वाडीत पंचवीस-तीस घरांची वस्ती आहे. ट्रेन तेथे थांबल्या की परकरचोळी घातलेल्या आदिवासी बायका, मुली पानात गुंडाळलेली करवंदे, जांभळे हा रानमेवा विकताना दिसतात. तसेच, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये आदिवासी पुरुष चढतात, दरवाज्यांना आणि खिडक्यांना लाकडाची तोडलेली ओंडकी अडकावतात, ते ती ओंडकी सरपण म्हणून खंडाळा–लोणावळा येथील हॉटेल व्यावसायिकांना विकून पुन्हा ठाकूरवाडीला परततात. त्यांचे ते उपजीविकेचे साधन आहे. ते थांबे रेल्वेच्या उपकेंद्रात येणारे कर्मचारी; तसेच, रेल्वे लाईनची बोगद्यात व इतरत्र डागडुजी करणारे रेल्वेचे कर्मचारी यांना चढण्या-उतरण्यासाठी उपयुक्त आहेत. किंबहुना त्यासाठीच ते घेतले जातात.
कुरवंडा घाट: नागफणी (Duke’s nose) डोंगर खंडाळा परिसरात रेल्वेने पुण्याहून मुंबईकडे जाताना डाव्या बाजूला दिसतो. तो डोंगर म्हणजे गिर्यारोहण करणाऱ्या हौशी पर्यटकांचे आणि प्रस्तरारोहण करणाऱ्या कुशल पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तेथून डाव्या बाजूने खाली थोडेसे उतरले की कुरवंडा घाट लागतो. त्या घाटातूनही खाली उतरून खोपोली–कर्जत परिसरात जाता येते, पण तो मार्ग दुर्गम आहे. तो शिवरायांच्या काळात वापरला जाई. शिवरायांनी अवघ्या पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन त्याच घाटात तर शाहिस्तेखानाचा सरदार कारतलबखान ह्याच्या तीस हजार सैन्यावर गनिमी काव्याने हल्ला केला (1661). कारतलबखानास अचानक झालेल्या त्या प्रखर हल्ल्यामुळे सपशेल माघार घ्यावी लागली होती. अत्यंत कमी सैन्याच्या सहाय्याने बलाढ्य फौज असलेल्या शत्रूस नामोहरम केलेल्या त्या लढाईचे स्थान युद्धशास्त्राच्या इतिहासात अजरामर झाले आहे. शिवराय स्वत: ज्या सत्तावीस लढायांत सहभागी होते, त्यांतील ती एक. त्या लढाईच्या विजयाचे स्मारक कुरवंडा घाटाच्या पायथ्याच्या चावणी गावात, नदी पात्रात उभारलेले आहे.
मृगगड: कुरवंडा घाटातून उंबरखिंड स्मारकाकडे उतरण्याचा तीन-चार तासांचा रस्ता घाटातून, जंगलातून मार्गक्रमण करणारा आहे. तेथून उतरताना शिवरायांच्या गनिमी काव्याची चुणूक जाणवल्याशिवाय राहत नाही. घाट उतरत असताना, डावीकडे लागूनच एका स्वतंत्र डोंगराचे तीन छोटेखानी कातळ रूपी सुळके दिसतात. त्यावर दिमाखात फडकत असलेला केशरी ध्वजदेखील आहे. तो आहे मृगगड. त्या किल्ल्याच्या सर्वोच्च जागेवरून नागफणी डोंगर, कुरवंडा घाट तसेच उंबरखिंड परिसर संपूर्ण पाहता येतो. ती खंडाळा घाटाची मागील बाजू आहे. तेथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. निसर्गाची मुक्त उधळण तेथे पाहण्यास मिळते. खंडाळा घाट परिसरात सतत काहीतरी नवनवे बांधकाम चालू असते. घाटाच्या मागील हा भाग अजून तरी शाबूत आहे !
मृगगडाकडे स्वतंत्रपणे येण्यासाठी खोपोली-पाली रस्त्यावरून मार्ग आहे. त्या रस्त्यावरील परळे-जांभूळपाडा वाटेने माणगाव, भेलीवसावे ही गावे लागतात. तेथून मृगगडाला रस्ता आहे. मृगगड किल्ल्याची चढाई तासाभराची आहे, शेवटचा टप्पा कातळातील घळीतून आणि पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या तुडवून जाणारा आहे. त्या मार्गात लोखंडाचे दोरखंड असल्याने चढता येणे शक्य होते.
मृगगड किल्ल्यावर पाण्याची दोन-तीन टाकी आहेत. वाड्याचे भग्न अवशेष आहेत. किल्ल्याला फारसा इतिहास नाही, कुरवंडा घाटातील हालचालींवर आणि वाहतुकीवर टेहळणी करण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा.
सोनगिरी : मुंबईकडून पुण्याला रेल्वेने जात असताना खंडाळा घाटाच्या सुरुवातीस उजवीकडे दिसणारे एक शिखर म्हणजेच सोनगिरी हा किल्ला होय. महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे नाशिक, धुळे आणि कर्जत जवळ असे तीन किल्ले आहेत. मुंबई-पुणे मार्गावरील सोनगिरीस ‘पळसदरीचा किल्ला’ आणि ‘आवळसचा किल्ला’ असेही म्हटले जाते. पुण्याकडून जाताना घाट उतरले की कर्जतच्या तीन-चार किलोमीटर अलिकडे पळसदरी नावाचे स्थानक आहे, तेथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत. कर्जत-खोपोली लोकलवर ते पहिलेच स्थानक आहे. तेथे खोपोली-कर्जत रस्त्यानेदेखील येता येते. आवळस गाव पळसदरीपासून जवळच आहे. तेथूनही किल्ल्यावर जाता येते. तिसरी वाट खंडाळा घाटातून जामरुंगमधून आहे, पळसदरी स्थानकातून वाट अधिक सोयीस्कर व सोपी आहे.
पळसदरी स्थानकावर एका बाजूला पाण्याचा एक बंधारा आहे, त्या धरण भिंतीने उतरून पळसदरी गावात जाता येते. किल्ल्यावर पळसदरी गावात न शिरता स्थानकावरून थेट जाता येते. पुण्याच्या दिशेने रेल्वे लाईनने एखाद किलोमीटर चालत गेल्यास, येणाऱ्या पहिल्या बोगद्याच्या अलिकडे डाव्या बाजूला पळसदरी किल्ल्यावर चढण्यासाठी पाऊलवाट आहे. तेथे किल्ले सोनगिरी असा फलकही आहे. तेथून दीड-दोन तासांची चढाई केली की सोनगिरीचे शिखर !
तेथे तटबंदीचे तुरळक अवशेष फक्त आहेत. टेहळणीव्यतिरिक्त त्या किल्ल्याचा वापर झाला नसावा. गडमाथा चिंचोळा आहे, वर पाण्याची एकदोन टाकी आहेत, शिखरावर झेंडा आहे आणि शिवरायांची प्रतिमा आहे. तेथून खंडाळा घाटातील रेल्वेमार्ग सुंदर दिसतो, कर्जत परिसर दिसतो; कर्जत परिसरातील प्रबळगड, घाट परिसरातील राजमाची किल्ल्यांची शिखरे दिसतात.
खंडाळा घाटातील ह्या आडवाटा निसर्गाच्या समृद्धतेचे, सह्याद्रीच्या कातळ आणि खड्या पहाडाचे यथोचित दर्शन घडवतात! ह्या आडवाटा तुडवताना खंडाळा घाटासारख्या दुर्गम ठिकाणी ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या लोहमार्गानिमित्ताने मानवी कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची प्रचिती घडवून आणतात.
– संदीप चव्हाण 9890123787 drsandeep85@gmail.com
खूपच माहितीपूर्ण लेख! धन्यवाद! शुभेच्छा!
धन्यवाद.
मस्त जमून आलाय लेख. बरीच माहिती नव्याने कळली.
धन्यवाद.
सुंदरच… माझा मुलगा पुण्याला राहतो. ट्रेकिंग ची आवड आहे त्याला. त्याच्या माहितीत भर असावी म्हणून त्याला पाठवलाय, ला लेख.
ट्रेकिंगची आवड असणाऱ्यास ह्या आडवाटा म्हणजे पर्वणीच!