गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)

2
483

आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या  लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत.

दिवाळीच्या अगोदरची घर स्वच्छता करण्यासाठीची घरातली लुडबूड करून झाली की गल्लीतल्या किल्ल्याची तयारी सुरू होई. त्यासाठी अगोदर जागा निश्चित करायची. खडूने नीट बाऊंड्री आखून घ्यायची.‌ तिथले दगड, गोटे आणि गवत काढून जागा स्वच्छ करायची. प्रत्यक्ष किल्ला बांधण्यासाठी विशिष्ट प्रकारची चिकणमाती आणि दगड गोळा करावे लागायचे. तसली माती कोणत्याही खणीच्या (Quarry) आसपास भरपूर मिळे. तेव्हा राजारामपुरीच्या आसपास तीनचार खणी होत्या. कोणत्याही खणीजवळ गंपा खेळणारी रिकामटेकडी मुले असतच. गंपा म्हणजे खणीतल्या पाण्यात खडे मारून भाकऱ्या मोजणे ! आमच्यासारख्या पोरांना ती मुलं, ‘असली माती नको तसली माती घ्या’ असे मार्गदर्शन करत. त्या पोरांना किल्ला बांधण्याचा दांडगा अनुभव असायचा. आम्ही घमेली भरभरून तसली माती घराजवळ आणून टाकत असू. आमची मातीभरली तोंडे आणि पाय पाहून भाजणी आदी दळपं किंवा फराळ करणाऱ्या आयाबाया आरडाओरडा करत रागवत. त्यांचे हात गुंतलेले असल्याने मारत मात्र नसत.

त्यामुळे आम्ही नेटाने किल्ला बांधून पूर्ण होईपर्यंत जास्तीत जास्त वेळ तिथेच घालवायचो.‌ किल्ल्यातल्या शेतात पेरायला, गल्लीतला किराणा दुकानदार, गणा मांडवकर भरपूर हाळीव आणि मोहरी मोफत देत असे. इतर कोणत्याही गल्लीतल्या किल्ल्यांपेक्षा आमचा किल्ला हिरवागार परिसराने समृध्द दिसे. टेंबलाबाईच्या जत्रेतून  आणलेली चित्रे आणि किल्ल्याच्या टोकावर भगवा झेंडा उभा राहिला की किल्ला प्रकरणातून आम्ही मुक्त होत असू.

किल्ला तयार होईपर्यंत नवे कपडे, फराळ, फटाके याचे भान कोणालाही नसायचे. त्यावेळी गल्लीतच राहाणाऱ्या खटावकरांची पोरे, त्यांच्या शेतातून ज्वारीचे धांडे घेऊन येत. मग किल्ल्यातल्या रस्त्यावर भेंडांच्या बैलगाड्या उतरत. खटावकर पोरे फारच सर्जनशील होती. त्यातला थोरला तर उरलेल्या मातीच्या काडेपेटीतून विटा पाडून किल्ल्यावर चिमुकली घरे आणि विहीरीही बांधे. आमचा किल्ला खरोखरीच जगातला द बेस्ट किल्ला आहे, असे आम्हाला तेव्हा वाटायचे. शिवाजी महाराज असते तर कोणत्याही तहात प्रथम आमचाच किल्ला द्यावा लागला असता, असली बडबडही आम्ही करत असू. त्यावर मोठी पोरे दणके घालत. पण त्याचे कोणालाच काही वाटत नसे.

दिवाळीच्या आदल्या दिवशी किल्ल्यावर पणत्या लागल्या की सगळी गल्ली किल्ला पाहण्यास येई. सगळे कौतुक खटावकर पोरांच्या वाट्याला येई. माती आणणाऱ्या पोरांचे कसले कौतुक ! त्यांनी किल्ल्याच्या समोर नाचायचे. महाराजांच्या आणि भारतमातेच्या घोषणा द्यायच्या, हे आम्ही आनंदाने करत असू.

दुपारच्या वेळी किल्ल्याची कामे आणि रात्रीची जेवणे झाल्यावर आकाशदिवा करायचा असे. आमच्या गल्लीतली मुले एकापेक्षा एक सुंदर आकाशदिवे बनवत.  स्कॉलर पोरे त्यांच्या हस्तव्यवसायाच्या सरांनी शिकवल्याप्रमाणे पट्टीने शिस्तीत आखून चांदण्या बनवत. त्या चांदण्यांना आतून जिलेटीन पेपर लावत. मला बांबूचाच झिरमिळ्या लावलेला पारंपरिक आकाशकंदील आवडत असे. त्यासाठी मी दहाव्या गल्लीतल्या बुरूडाकडून बांबूच्या एकसारख्या आकाराच्या बारीक कामट्या काढून आणायचे. दादू गुरवांकडून त्या षट्कोनी आकारात बांधून आकाशदिव्याचा सांगाडा तयार होई. मी त्याला जिलेटीन किंवा चिरमुरे कागद आणि बेगड चिकटवायचे काम तेवढे करी. लांबच्या लांब झिरमिळ्या लावल्या की आकाशकंदील एकदम देखणाच दिसायला लागायचा.

दिवाळीचे दिवस तसे धामधुमीतच जात. कोणाच्या घरी पाहुणे येत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरभर झेंडूच्या माळा लावण्यात आणि नाना तऱ्हेची तोरणे करण्यात अख्खा दिवस जाई. दिवाळीच्या वेळी काही मुलांच्या हौशी आया मुलांसाठी म्हणून चिमुकले लाडू, चिमुकल्या चकल्या, करंज्या, शंकरपाळी, चिवडा असा डबा करत. ती पोरे प्रसन्न असली तर आमच्यासारख्या पोरांना तो त्यांचा फराळ खायला मिळे. आकारभिन्नता सोडली तर त्या फराळाची चव आमच्या घरच्या फराळासारखीच असायची.

भाऊबीजेला दिवाळी संपली की रात्री झोपताना बहुतेक आईलाच शाळेने दिलेल्या घरच्या अभ्यासाची आठवण येई. त्यावेळी दिवाळीनंतरची सुट्टी किंचित कडू झाल्यासारखी वाटायची. दिवाळी सुट्टीचा प्रत्येक विषयाचा काहीतरी अभ्यास असायचा. तो अभ्यास सुट्या कागदांवर करायचा असायचा. मग ते सगळे कागद एकत्र जोडून त्यावर ‘दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास’ असे स्केचपेनने लपेटदार अक्षरात लिहावे लागे‌. त्यातला ‘भाषेचा अभ्यास’ म्हणजे अमुकतमुक कविता पाठ करा. (त्या पाठ असायच्याच.) धड्यातले अवघड शब्द पाठ करा आणि लिहा. रोजचे शुध्दलेखनही लिहावे लागे. विज्ञानाच्या तर धड्याखालचेच प्रश्न किंवा प्रयोग सांगत. इतिहासात कुठल्या तरी धड्याचे नाट्यरूपांतर करून सादर करा. तर भूगोलात तुमच्या गावातील नदीचा उगम आणि नदीचे खोरे जाणून घ्या. असे काही काही असायचे. चित्रकला, हस्तव्यवसाय आणि पॉट कल्चर असल्या विषयांचेही अभ्यास असत. त्याचबरोबर  रोज काहीतरी समाजसेवा करणेही अपेक्षित असायचे. ‘म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली’; ‘आंधळ्याची पडलेली काठी उचलून दिली’; ‘कुणाचे तरी रस्त्यावर पडलेले पाकीट उचलून दिले.’ असली वाक्ये आम्ही खुशाल लिहित असू. त्याबद्दल कोणीही शिक्षक कधी काही विचारत नसत. तो सुट्टीतला अभ्यास म्हणजे खरे तर आईबापांची किंवा मोठ्या भावंडाची डोकेदुखी असायची. काहीतरी करुन सुट्टीच्या शेवटच्या दिवसांपूर्वी तो अभ्यास पार पाडला की तेच नि:श्वास टाकत. परत त्या अभ्यासाचे महत्त्व वर्गशिक्षकांनाच फार असे, कारण त्या सुट्टीत केलेल्या अभ्यासाच्या फायली शाळेच्या इन्स्पेक्शनच्या वेळी दाखवायच्या असत. बाकी कोणत्याही, विषयाचे शिक्षक सुट्टीतला अभ्यास तपासण्याबाबत तसे निरिच्छ असत. अशा पध्दतीने सकाळचा आणि संध्याकाळचा थोडासा वेळ त्या सुट्टीतल्या अभ्यासावर खर्च पडला तरीही इतर वेळी आम्ही खूप मजा करायचो.

त्यातला एक म्हणजे ‘मुलांचा स्वैंपाक.’ गल्लीतली मुले चूल पेटवून भात आणि भाज्या टाकून तिखटजाळ आमटी करत. कोणत्याही एकमेकांशी संबंध नसलेल्या भाज्याही आमटीत बेस्ट लागत. ज्वारी आणि गव्हाच्या मिश्र पीठाच्या जाड जाड रोट्या करत. आपल्यापुरते तांदूळ, पीठ, तेल, मसाले, भाज्या आपापल्या घरातून आणत असू. तात्या केटरर भांडी देत असत. आमच्या जेवणावळीचे पक्वान्न म्हणून जाधवांच्या घरातून त्यांच्या दिवाळीच्या फराळातून उरलेले बुंदीचे लाडू देत. कधी कधी त्या लाडवांना शिळा वास येई, पांढरा बुरा लागल्यासारखे दिसे. पण ते लाडू खाऊन कधी कोणाला काही आजारपण आले नाही. आमच्या भिंग्यादादाला नोकरी लागली. त्यावर्षी मात्र त्याने त्या जाधवांच्या बुंदीच्या लाडवांना बाणेदारपणे नाकारून माळकरांच्यातली गरमागरम जिलबी आणली होती.

आमच्या घरासमोरील मोकळ्या मैदानावर एका घराच्या आडोशाला चूल मांडून स्वैपाक होई. आमच्यासारखी लिंबू टिंबू तथा पंटर पोरे हरकाम्या म्हणून इकडून तिकडे अशा सतत येरझाऱ्या घालत असत. जेवणे झाल्यावर गल्लीतल्या ‘तरण्या पोरी’ बोअरच्या हापशा नळावर भांडी घासून देत. (‘तरण्या पोरी’ हे शब्द तिथल्या दादा लोकांचे होते.)  एखादा दिवस आमची कुठेतरी जवळपास सहल जाई. बहुतेक नदीकाठी, कात्यायनीचा डोंगर, मसाई पठार, पळसंबा रामलिंग, कोणाचा तरी मळा अशा कोणत्या तरी ठिकाणी सकाळी सकाळी घरातले डबे घेऊन जात असू. कोल्हापूरच्या बाहेर जायचे असल्यास कोणत्या तरी ट्रकवाल्याला थांबवून तो जिथपर्यंत पोचवू शकत असेल तिथपर्यंत आम्ही जात असू. तिथून पुढे मग चालत जायचे. पुढे जायला कोणी भेटलेच नाही तर तिथेच एखाद्या झाडाखाली डबे खाऊन दुपार ओसरल्यावर घरी परतत असू. बाराव्या गल्लीतल्या पोरांना आडी, निपाणी रामलिंग, पाटगाव जंगल, राधानगरी, गगनबावडा असल्या लांबच्या ठिकाणी जायची हौस असायची. एकदा आम्हीही त्यांच्याबरोबर पाटगाव धरणावर गेलो होतो. त्या तसल्या सहलींना पैसे पडत नसत.‌ तिथे जाणारे, रिकाम्या ट्रॉल्या असलेले ट्रकवाले इच्छित ठिकाणी सोडून देत. परत यायलाही ट्रक, टेम्पो काहीही मिळायचे. बससाठी कुणाकडेच पैसे नसत पण त्यामुळे काहीच अडत नसे. रस्त्याच्या कडेने हिरव्या चिंचा लगडलेली झाडे असत. आम्ही कोणत्याही शेतातली मक्याची कणसे, ऊस, भूईमुगाच्या आणि मूगाच्या शेंगा उपटून खात असू. आज आमच्या अंगणातील फुलांना कुणी हात जरी लावला तरी माझे ह्रदय झरझरते. त्यावेळी मात्र लोकांच्या शेतात जाऊन खाताना काहीच वाटायचे नाही.

दिवाळीच्या सुट्टीत सहल आणि मुलांचे जेवण तसे मोठ्ठे प्रसंग म्हणायचे. इतर वेळी भाड्याने सायकल आणून सायकलीच्या शर्यती, दगड पाहिजे का माती, विटी दांडू, गोटया, भोवरे, लपंडाव, लगोऱ्या, जोड साखळ्या असे खेळ खेळायचे. मी काचाकवड्या, भूत्या-रड्या, सापशिडी, शून्य-फुली असल्या घरच्या घरी खेळता येणाऱ्या खेळांना पोरीबाळींचे खेळ म्हणून नाक मुरडायचे. ’मर्द मराठ्यांचे बच्चे असले खेळ खेळत नाहीत’ असे मी छाती फुगवून सांगत असे. तरीही अंबाबाईच्या देवळातल्या कासाराच्या दुकानाबाहेर पडलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करून, मेणबत्तीवर वाकवून मी त्यांच्या भल्यामोठ्या माळा करायचे. गावड्यांची रंजू त्या बांगड्यांच्या माळांना घुंगरू लावून कुणाच्या तरी रूखवतासाठी पडदा करायची. एकंदर, सुट्टीची खूप मजा असायची. त्या सगळ्या खेळांतून वेळ उरलाच तर आमच्या घरी वाचायला किशोर, बालवाडी, कुमार, चंपक असले चिक्कार दिवाळी अंक आणि भरपूर पुस्तकेही असायची. आम्ही भाजलेल्या भूईमुगाच्या शेंगा खात खात त्या पुस्तकांचा फडशा पाडत असू.

हळुहळू गल्लीतली दादा पोरे मोठी झाली -नोकरीला लागली, कुणाकुणाची तर लग्नेही झाली. सुट्टीची मजा वेगळी झाली. आम्हीही गल्लीतून प्रतिभानगरमध्ये राहायला गेलो. कॉलनीत असतानाही दिवाळीची सुट्टी दोन भागांतच विभागली जायची. दिवाळीनंतरच्या सुट्टीत, अभ्यासाबरोबर काहीतरी घरातले कौशल्य शिकावे असा आईचा आग्रह असायचा. कधी कधी घरी पाहुणे यायचे आणि घरातले सगळे मिळून कुठेतरी पिकनिकला जात असू. पण गल्लीतल्या सहलीची आणि सुट्टीतल्या मजेची सर कॉलनीत कशी यावी? शक्यच नाही. परवा, फार दिवसांनी गल्लीत गेले होते. त्यावेळचे दादा लोक आता पाक म्हातारे दिसायला लागलेत. पण सुट्टीतल्या आठवणींनी त्यांचे डोळे अजूनही लकाकतात. परत एकदा आपण असंच कुठंतरी जाऊ या काय… असले वायदे केले जातात. आम्ही सगळी माना डोलावतो आणि त्या काळात, त्या सुट्टीत परत मनाने फिरून येतो.

‘भूतकाळ कधीच भविष्यकाळ होऊ शकत नाही’ हे जी.ए.कुलकर्णीं यांच्या ‘काजळमाये’तल्या ‘गुलाम’ कथेतले सत्य माहीत असतेच. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच… आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी… सोयीची आहे… कालसुसंगत आहे… हे जाणवत राहतं.

– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com
——————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. जुन्या आठवणी,आणि बालपण समृध्द होते,होत गेले आहे.सण, संस्कार,आणि जीवनाशी समरस होऊन राहण्याची कला होती,आज हे वाचताना नाती अंतर आणि आधुनिक तंत्र बाळगत जी प्रगती/की अधोगती म्हणायची?

  2. ‘ बचपनके दिन भुला न देना , आज हंसे कल रुला न देना ‘
    हे खरे असले तरी पापण्या ओलावतातच. मंजुषा, पुन्हा लहानपणातच घेऊन गेलीस !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here