जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization)

28
1176

हाताशी एक आठवडा होता. अचानक अहमदनगरला जायचे ठरवले. दोन दिवस अहमदनगरमध्ये काढायचे आणि नंतर आजूबाजूला फिरायचे असा बेत होता. नगरमध्ये फिरून झाले मग विचार केला की या फेरीत जोर्वे, नेवासे अशी दोन गावेही पाहून घ्यावी. नकाशावर पाहिले, अंतरही फार नव्हते. अनेक वर्षांपासून ती गावे पाहायचे राहून गेले होते. अगदी राहूरीपर्यंत येऊनही नेवाशाला जाणे झाले नाही. नेवाशाला जाऊन पैसाच्या खांबापाशी थोडा वेळ बसायचे होते. यज्ञाच्या राखेत लोळल्यावर, धर्मराजाच्या मुंगुसाच्या अंगाला जसे चारदोन सोन्याचे कण चिकटले होते, तसे पैसाच्या खांबापाशी सापडलेच चारदोन बावनकशी शब्द तर गोळा करायचे होते.

बरोबर चार मैत्रिणी होत्या. नगरमध्ये फिरून झाल्यावर, नेवाशाला जाऊन मुक्काम करायचे ठरले. लगेच निर्णयाची अंमलबजावणी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या महाराष्ट्राच्या माऊलीला वंदन केले. चार घटका तिथे टेकलो. आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यात वेळ गेला. नेवासे गाव म्हटले तर इतर चार गावांसारखे आहे. पण पैठणला जसा एकनाथांच्या अस्तित्वाचा गंध आहे तसा नेवाशाला ज्ञानेश्वरांच्या अस्तित्वाचा आभास आहे. तसा तो आळंदीतही आहे. ज्ञानदेवांनी इथे ज्ञानेश्वरी लिहिली हे नेवासे गावाचे महत्त्व आहेच पण त्याच बरोबर या गावात ताम्रपाषाण युगातल्या मानवाच्या वसाहतींचा पुरावा सापडला आहे, ही बाब आमच्यासाठी आकर्षणबिंदू होती.

महाराष्‍ट्रातल्या आद्य मानवी वसाहतींची संस्‍कृती ‘जोर्वे-नेवासे’ संस्‍कृती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर, प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. तिथेही ताम्रपाषाण युगातली मातीची भांडी आणि गारगोटीच्या पातळ तुकड्यांची हत्यारे सापडली आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा पुरातन कालाचा पुरावा पहिल्यांदा जोर्वे येथे सापडला. नंतर नेवासे येथे झालेल्‍या उत्‍खननात ह्या संस्‍कृतीवर अधिक प्रकाश पडला म्‍हणून या संस्कृतीचे नाव ‘जोर्वे-नेवासे’ संस्‍कृती ! ह्या संस्कृतीचा काळ साधारण ख्रिस्‍तपूर्व बाराशे ते पंधराशे वर्षे असावा. इथे सापडलेली भांडी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. ही मातीची भांडी तुलनात्‍मकदृष्‍ट्या पातळ आहेत. भट्टीमध्‍ये उत्‍तम प्रकारे भाजलेली असल्‍यामुळे त्‍यांचा धातूच्‍या भांड्यांप्रमाणे टणटण् आवाज येतो. विटकरी रंगाच्‍या त्या भांड्यांवर इतर पुरातत्त्वीय ठिकाणी आढळणाऱ्या भांड्यांप्रमाणे प्राण्‍यांची चित्रे काढलेली आहेत. क्‍वचित एखाद्या भांड्यावर स्‍वस्तिकाचे चिन्‍ह काढलेले आहे. असे स्‍वस्तिकाचे चिन्‍ह हे महाराष्‍ट्रात इतरत्र किंवा दक्षिण भारतात सापडण्याआधी येथेच प्रथम आढळून आले आहे.

दायमाबादला गावात शिरताना एका टपरीवर पुरातत्त्वीय उत्खनन झालेली जागा कुठे आहे याची चौकशी केली. त्यातल्या एकाने गावाबाहेरच्या रस्त्याच्या दिशेने हात उडवला आणि पुस्ती जोडली, ‘आता तिथे काहीच नाही, मॅडम.’ उत्खननाची जागा सापडायला काही अडचण आली नाही. पुरातत्त्व खात्याचा नेहमीप्रमाणे गंजका, निळा बोर्ड दिसला. जागेला कुंपण आणि उघडे फाटक होते. गाडी सहज आत गेली. पहारेकरी, गाईड वगैरे कोणी आजूबाजूला नव्हते. गाडी आत जातच राहिली. पण मग थोडे पुढे गेलो की नाही, तेवढ्यात एक तरूण माणूस मोटरसायकलवर मागोमाग आला आणि आम्ही कोण, कशाला आलो वगैरे चौकश्या करायला लागला. ज्या टपरीवरून आम्ही पुढे आलो होतो तिथून त्याला खबर गेली होती. पांढरी इनोव्हा गाडी असल्यामुळे सरकारी पाहुणे असावेत अशा समजुतीने तो घाईघाईने आला होता. आम्ही साधे टुरिस्ट आहोत आणि केवळ कुतूहलापोटी उत्खननाची जागा बघायला आलो आहोत असे म्हटल्यावर तो निवांत झाला आणि स्वत:हून आमच्या बरोबर फिरायला लागला. हा दायमाबादच्या उत्खननात सहभागी असलेल्या लाल हुसेन पटेल यांचा मुलगा होता. दायमाबादला 1958-59 पासून 1978-79 पर्यंत चार वेळा उत्खनन झाले आहे. आता ही ‘साईट’ (स्थळ) बंद करण्यात आली आहे.

संस्‍कृतीविषयी इंग्लिशमधून बोलताना दोन वेगवेगळे शब्‍द वापरले जातात – कल्‍चर आणि सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन हा सिव्हिल म्‍हणजे नागर होण्‍याच्‍या दिशेने झालेला प्रवास, प्रक्रिया आहे तर कल्चर हा त्‍या प्रक्रियेचा आविष्‍कार आहे. मराठीमध्‍ये सरसकट संस्कृती हा एकच शब्‍द वापरला जातो. पण ‘सिंधु संस्‍कृती’ आणि ‘मराठी संस्‍कृती’मधल्‍या ‘संस्‍कृती’ या शब्‍दांच्‍या अर्थामधला फरक संदर्भाने माहीत असतो. नागरीकरण याचाच अर्थ रानटी अवस्‍थेकडून सुसंस्‍कृत होण्‍याची प्रकिया. जीवनाच्‍या विविध अंगांवर होणारे संस्‍कार. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि त्‍याबरोबर तंत्रज्ञानामध्‍ये होणारे बदलही.

महाराष्‍ट्रापुरते बोलायचे झाले तर या नागरीकरणाच्‍या प्रवासाच्‍या दिशेने सुरुवात सुमारे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी झाली. इथल्या अतिप्राचीन मानवी वसाहतीचे तीन कालखंड पडतात. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग. इथल्‍या माणसांनी, त्‍यांना मराठी म्‍हणता येणार नाही कारण मराठी ही आपली ओळख जेमतेम बाराशे-तेराशे वर्षे जुनी आहे. आद्य अश्मयुगात म्हणजे साधारण दोन लाख वर्षांपूर्वी तयार केलेल्‍या दगडी हत्‍यारांचे अवशेष गोदावरी, प्रवरा, मुळा-मुठा, तापी, पूर्णा, वर्धा इत्‍यादी अनेक नद्यांच्‍या काठी सापडले आहेत.

ताम्रपाषाण युगात शेतीची माहिती असलेल्‍या, तांब्‍याची आणि दगडी हत्‍यारे वापरणाऱ्या टोळ्या इथे स्‍थायिक झाल्‍या होत्या. ती माणसे गवताने शाकारलेल्‍या कुडाच्‍या झोपडीत राहात होती. शिकार, शेती, पशुपालन, मासेमारी ही त्‍यांच्‍या उपजिविकेची साधने. हे आद्य शेतकरी. गहू, तांदुळ, ज्‍वारी, डाळ अशी धान्‍ये पिकवत असत. जनावरांचे मांस खारवून वाळवून ठेवत असत आणि अंगणात एक खड्डा करून त्‍यात मांस भाजत असत. धान्‍य कुटले जात असे आणि त्‍यासाठी दगडी खल वापरत असत. धान्‍य दळण्‍याचे जाते आपल्‍याकडे इजिप्‍तमधून उशीरा आले. या इजिप्शीयन जात्‍याची वरची तळी उभट असून जड असते. दोन्‍ही तळी सारख्‍या असणारे जाते हे इजिप्शीयन जात्‍याचे विकसित रूप आहे. ‘जोर्वे-नेवासे’ संस्‍कृतीमध्‍ये मृतांना रांजणात घालून पुरण्‍याची पद्धत होती. दफन करताना मोठमोठ्या दगडी शिळांचा आणि फरश्‍यांचा वापर करत असत. मृतांचे स्‍मारक म्‍हणूनही शिळावर्तुळे उभारत. महाराष्‍ट्रभर अनेक ठिकाणीही अशी शिळावर्तुळे आढळून येतात. मृतांच्‍या शेजारी त्‍यांच्‍या परिस्थितीप्रमाणे भांडीकुंडी ठेवत असत. नेवाशाला एक तांब्‍याच्‍या मण्‍यांची माळ रेशमाच्‍या आणि सुताच्‍या धाग्‍यात गुंफलेली सापडली. अशा प्रकारे रेशीम आणि सूत यांचे संमिश्र सूत भारतात प्रथमच सापडले. आद्य शेतकऱ्यांच्‍या भरभराटीला आलेल्‍या या वसाहती वातावरणातल्‍या बदलामुळे इसवी सनपूर्व पाचशेच्‍या आसपास नष्‍ट झाल्‍या असाव्‍यात.

दायमाबादची वसाहत हे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे स्थळ आहे. तेथे टेराकोटाचे तीन शिक्के (सील) सापडले आहेत, ज्यांच्यावर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले चिन्ह आहे. मातीच्या भांड्यांच्या काही तुकड्यांवरही सिंधू लिपीतली चिन्हे सापडली आहेत. दायमाबादच्या परिसरात हिंडत असताना हा सर्व इतिहास पाठीशी होता. पटेल यांचा मुलगा घरांची जोती, चपट्या विटांची विहीर, नदीच्या बाजूच्या बांधाचे अवशेष अशा सगळ्या जागा उत्साहाने दाखवत होता. त्याच्या माहितीनुसार इथे सापडलेले अवशेष अनेक ट्रक्समधे भरून पुण्याला नेले. पुण्याला ते नेमके कोणाच्या ताब्यात आहेत याविषयी त्याला माहिती नव्हती. आता ही साईट बंद करण्यात आली आहे तरी खापराचे तुकडे सगळीकडे पसरलेले होते. साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या विहिरीत डोकावून पाहताना एक सूक्ष्म थरार जाणवला खरा !

दायमाबादच्या बाबतीत एक नाट्यमय घटना घडली होती. 1974 मध्ये छबू लक्ष्मण भील नावाच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातले एक झुडूप मुळासकट काढताना, त्याच्या मुळाशी चार ब्रॉन्झच्या मूर्ती सापडल्या. त्या घेऊन तो गावातले सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या लाल हुसेन पटेल यांच्याकडे गेला. त्यांनी त्या वस्तू  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागापर्यंत पोचवल्या. त्यात एक रथ किंवा बैलगाडी म्हणता येईल असे शिल्प होते. दोन बैल जोडलेल्या या गाड्यावर एक माणूस उभा आहे आणि गंमत म्हणजे गाडी आणि बैल यांच्या मधल्या दांड्यावर एक कुत्रा आहे. याखेरीज हत्ती, म्हैस आणि गेंडा यांचेही गाडे आहेत. त्यातले रथाचे शिल्प सध्या राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे तर बाकी शिल्पे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात आहेत.

दायमाबादच्या परिसरात हिंडून झाल्यावर आम्ही पटेल यांच्या घरी गेलो. एम. एन. देशपांडे, एस. आर. राव आणि एस. ए. साळी या तिन्ही पुरातत्त्व शास्त्रज्ञांबरोबर त्यांनी दायमाबादच्या उत्खननात भाग घेतला होता. भारतीय पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आलेल्या संपूर्ण अहवालाची प्रत त्यांच्यापाशी होती. ती अपूर्वाईने पाहिली. चहापाणी झाले, घरातल्या लोकांशी गप्पा झाल्या आणि मग तिथून निघालो.

दायमाबादच्या अनुभवाने मग अतिशय उत्साहाने जोर्वे गावात पोहोचलो. तिथेही गावाबाहेर विचारल्यावर पहिली प्रतिक्रिया ‘आता इथे काही नाही’ अशीच होती. तसेच रेटून गावात गेलो. भोवती माणसे जमली, त्यांना विचारले, ‘उत्खननाची साईट कुठे आहे?’ उत्तर आलं. ‘तुम्ही उभ्या आहात तिथेच.’ काहीशा आश्चर्याने आणि काहीशा दु:खी मनाने पायाखाली पाहिले, आजुबाजुला नजर टाकली. तर भराव टाकून लोकांनी छान घरं बांधलेली होती. साईट बंद झाल्यावर तिथे सगळीकडे एकमजली, दुमजली घरांची दाटी झालेली होती. सर्व अवशेष काढून इतरत्र नेल्यावर रिकामे खड्डे ठेवून काय करायचे हा विचार कदाचित योग्यच असेल तरी काहीतरी हरवल्यासारखे वाटले. महाराष्ट्रातल्या ‘पहिल्या मानवी वसाहतींपैकी एक’ असलेल्या जागी, त्या वसाहतीचे अवशेष नाहीत. किंवा कदाचित असेही असेल की वसाहतीच्या जागी आणखी एक वसाहत उभी राहिली. कालचक्र चालू राहिले. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती!’

गंमत अशी आहे की महाराष्‍ट्राचा इतिहास म्‍हटला की इथल्या माणसांची दृष्‍टी चारएकशे वर्षांपलीकडे जात नाही. अर्थात ह्या चारशे वर्षांच्‍या इतिहासाच्‍या खाणाखुणाही फार प्रेमाने जपल्या जातात असे नाही. इतिहासामध्‍ये रस असणा-यांसुद्धा जोर्वे, नेवासे, प्रकाशे, सोनगाव, इनामगाव ही नावे अभावानेच माहीत असतात. अनेक ठिकाणी मृतांचे स्‍मारक म्‍हणून उभारलेली शिळावर्तुळे आहेत, सतींच्या शिळा आहेत, वीरगळ आहेत पण गावात रहाणा-या लोकांना त्यांचा संदर्भ माहीत नसतो. अज्ञानच नाही तर अनास्थाही असते. कोणीतरी बालबुद्धीने या शिळांना शेंदूर फासतो आणि मग पुढे पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर शेंदराचे थर चढत जातात. दगडावर चढलेले असोत की बुद्धीवर; हे चिकट थर खरवडणे तसे अवघडच.

सुनंदा भोसेकर 9619246941 sunandabhosekar@gmail.com
संदर्भ: महाराष्ट्रातील पुरातत्त्व- हसमुख धी. सांकलिया, मधुकर श्री. माटे
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई. (1976)
——————————————————————————————-

About Post Author

28 COMMENTS

  1. वरील माहिती चकित करणारी ! परदेशात अशा स्थळाची जोपासना झाली असती. रंगीत कॅटलॉग व स्मृतिचिन्ह बनवली असती v ऐतिहासिक स्थळ करून गावाची ऊर्जितावस्था झाली असती . येणाऱ्यांना ‘ इथे काही नाही ‘ म्हणून पळवून लावले नसते .

    • होय. आपल्याकडे अशी दृष्टी नाही. प्रतिक्रियेकरता धन्यवाद शुभाताई.

  2. लेख छान झालाय. थोडे वर्णन आणखी यायला हवे होते. मुख्य म्हणजे अतिप्राचीन मानवी वसाहतीचे तीन कालखंड पडतात याबाबत विस्तृत लिहिण्यास हवेय.

    • होय. सवडीने लिहिन. एकाच लेखात सर्व लिहिते. प्रतिक्रियेकरता धन्यवाद.

  3. महाराष्ट्राच्या या फारशा परिचित नसलेल्या ऐतिहासिक / सांस्कृतिक ठेव्या बद्दल सहज ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. लेखिकेची भटकंतीची आवड आणि प्राचीन संस्कृतिबद्दल असलेलं कुतुहल यामुळे हे नुसतंच माहिती सारखं होत नाही तर रसाळ झालं आहे.

    • धन्यवाद. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहीन.

  4. नवी माहिती.
    ऐतिहासिक असून ओघवती रसाळ शैली पण खूप आवडली.

  5. अगदी नवीन माहिती मिळाली हा लेख वाचून.कमाल वाटते ती आपल्या पुरातत्व खात्याची अनास्था !कारण एवढे सगळे सापडल्यावर ही ठिकाणे पुरातत्व विभागाने नीट जपायला हवी होती ना!
    सुनंदा तुझी शैली खरंच रसाळ आहे.

    • धन्यवाद नीला! जोर्सावे नेवासे संस्कृतीच्या इतर वस्तू डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयात जतन केलेले आहेत असे मला नुकतेच समजले आहे.

  6. सुनंदा, नेहमीप्रमाणेच अतिशय छान आणि माहितीपूर्ण लेख झाला आहे. जवळपास साडेतीन-चार हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास माझ्यासारख्या सर्वसामान्यांना तर अगदीच माहीत नसलेला. महाराष्ट्राविषयीच्या ह्या लेखमालेत तुझ्याकडून अशीच नवनवी माहिती मिळेल हे नक्की.

    • धन्यवाद गिरीश! लेखमाला करण्याचा प्रयत्न करते.

  7. खूप छान लेख सुनंदा. नविन माहिती मिळाली. अगदी ओघवत्या भाषेत लिहीलयं. आठवणीने मला पाठवतेस त्याबद्दल खूप आभारी आहे.

  8. अतिशय माहितीपूर्ण आणि उत्सुकता चाळवणारा लेख. अधिक सविस्तर व अशाच अभ्यासू लेखाची प्रतीक्षा आहे.

  9. सुंदर व अभ्यासपूर्ण लेख. मी ह्या संस्कृतीबद्दल पहिल्यांदाच वाचले. धन्यवाद🙏

  10. पुरातत्त्व खात्याचा नेहमीप्रमाणेच एक गंजका, नीळा बोर्ड दिसला, या वाक्यातच आपल्या ऐतिहासिक स्थळांची, त्याबद्दलच्या बेपर्वाईची, अनास्थेची,आणि कींव करावी अशा तमाम भारतीयांच्या मानसिकतेला तुम्ही खणून काढलं आहे.. फार सुंदर महितीपूर्ण लेख.. – स्मिता दामले.

  11. अतिशय सुंदर नाविन्यपूर्ण माहिती असलेला लेख. लेख वाचताना लेखिकेची ओघवती व रसाळ अशी भाषाशैली जाणवली. सुंदर ,,सोप्या भाषेतील प्राचीन संस्कृती बद्दलचे वर्णन वाचताना मनातील उत्सुकता वाढत गेली. महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीची नव्याने माहिती झाली लेखिकेच्या अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीला माझा सलाम

  12. आमचे स्नेही श्री. गिरिश दुर्वे यांनी मला हे लिखाण पाठवले. खूप छान लिहिलंय आपण. सरकारी अनास्था आणि बेपर्वाई जागोजागी दिसत असताना येवढी माहिती शोधून काढणं खरंच सोपं नाही. असं वाटतं की दूरदूर फिरायला जाण्याऐवजी आपला महाराष्ट्रच पालथा घालायला हवा.

    • प्रतिक्रियेकरता धन्यवाद. खरोखरच महाराष्ट्र डोळसपणे पालथा घालायला हवा.

  13. सुनंदा चारशे-पाचशे वर्षाच्या इतिहासात पुन्हा पुन्हा रमणाऱ्या आम्हा पामारांच्या डोळ्यात छान अंजन घालून महाराष्ट्राचा हजारो, लाखो वर्षांपूर्वीचा इतिहास, सिंधू संस्कृतीशी असलेली जवळीक हे सारे तुझ्या ओघवत्या शैलीत इतकं छान लिहिलं आहे की वाचताना मनाची उत्सुकता, कुतूहल वाढलं आहे.
    सुनंदा तुझी अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्ती आमच्या ज्ञानरंजनात अशीच भर घालत राहो, धन्यवाद आणि सलाम

  14. सुनंदाताई , लेख वाचून सगळे तपशील जणू डोळ्यासमोर उभे राहिले. एकीकडे विस्मय वाटत राहिला आणि सत्यस्थितीबाबत हळहळही !
    मात्र तुम्हाला नेवासे येथे ‘ अक्षरधन ‘ सापडले आहे बरं का ! आणि भांडार अधिकच समृद्ध झाले आहे !

  15. आमचे स्नेही श्री.गिरीश दुर्वे यांनी हे लिखाण पाठवले.
    मी काॅलेजमध्ये असताना नेवासा येथे कथाकथन स्पर्धेसाठी गेले होते त्यावेळी नेवासा पाहिला. पण येथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे यापलीकडे काहीच माहित नव्हते. महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत आपणास शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे ते स्वातंत्र्यसंग्राम इतकीच सर्वसाधााण माहिती असते. सातवाहन लिखित स्वरूपात असल्याने काहीजण तेथपर्यंत पोचतातही. पण यापूर्वीही महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास होताच ना… तर त्या वैभवशाली इतिहासाची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या लेखामुळे मिळाली. तसे पाहिले तर हा विषय फार कठीण आणि सखोल आहे. पण लेखिकेने दायमाबाद येथील उत्खनन आणि जोर्वे-नेवासे संस्कृती कमीत कमी शब्दांत वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here