रावसाहेब
न्या. केशवराव कोरटकर यांच्या समाज कार्याला हैद्राबाद संस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्व आहे. तत्कालीन निजाम राज्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण आणि त्यानंतर राज्याचे झालेले त्रिभाजन या प्रक्रियेत हैदाबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि त्यात आमूलाय योगदान असलेल्या अनेक व्यक्तींचे चरित्र काळाच्या पडद्याआड गेले आहे. न्या केशवराव कोरटकर हे असेच एक व्यक्तिमत्व आहे. नवीन पिढीपुढे न्या. केशवराव कोरटकरांचे चरित्र पुन्हा आणण्याचा हा एक प्रयत्न.
रावसाहेब
न्या. केशवराव कोरटकर यांच्या समाज कार्याला हैद्राबाद संस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्व आहे. तत्कालीन निजाम राज्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण आणि त्यानंतर राज्याचे झालेले त्रिभाजन या प्रक्रियेत हैदाबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि त्यात आमूलाय योगदान असलेल्या अनेक व्यक्तींचे चरित्र काळाच्या पडद्याआड गेले आहे. न्या केशवराव कोरटकर हे असेच एक व्यक्तिमत्व आहे. नवीन पिढीपुढे न्या. केशवराव कोरटकरांचे चरित्र पुन्हा आणण्याचा हा एक प्रयत्न.
अभिप्राय
एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रांत लोकांना कार्यप्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. ‘निजाम विजय’सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे. केशवरावांचा जीवनपट ‘रावसाहेब’ या पुस्तकामध्ये गिरीश घाटे यांनी उलगडून दाखवला आहे. गिरीश घाटे यांना अनेक शुभेच्छा.
– विद्या देवधर – अध्यक्ष, मराठी साहित्य संघ, तेलंगणा
अभिप्राय
गिरीश घाटे यांनी न्या. केशवराव कोरटकर यांच्या चरित्रावर ‘रावसाहेब’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती वाचकांच्या हाती जुलै 2023 मध्ये पडली.
औरंगाबाद व परिसरात माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या व्यक्ती अगदी जवळून बघितल्या, अनुभवल्या. किंबहुना माझ्यावर त्यांच्या आचारविचारांचा नकळत प्रभाव पडला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाबद्दल बरेच ऐकले–वाचले होते. परंतु एवढ्या खोलवर, निजाम राज्याची त्रैभाषिक व्याप्ती, मराठी व्यक्तींचे मुक्तिसंग्रामातील योगदान, केशवरावांचे न्यायमूर्तीपदापर्यंतचे दायित्व, आर्यसमाज चळवळीस सक्षम करून मराठवाडा मुक्तिसंग्रामास बळ देणे आणि परिणामी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे सशक्तीकरण करणे यांची माहिती मला, खरे तर, या पुस्तकातूनच वाचायला मिळाली.
हैदराबाद संस्थानाच्या सामाजिक चळवळीत आणि स्वातंत्र्यलढ्यात संस्थानातील मराठी नेते अग्रेसर होते. समाज परिवर्तन असो अथवा निजामाविरुद्ध लढा असो, त्यात मराठी नेत्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण 1948 मध्ये झाले आणि मराठवाडा हा संस्थानाचा मराठी भाषिक भूभाग महाराष्ट्रात विलीन झाला. दुर्दैवाने, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात जे स्थान मिळाले ते स्थान हैदराबादच्या लढ्यातील मराठी नेत्यांना मिळाले नाही. कालांतराने हैदराबाद लढ्यात समर्पण करणाऱ्या मराठी नेत्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. त्यांपैकी न्या. केशवराव कोरटकर हे एक व्यक्तिमत्त्व.
हैदराबाद लढ्यातील सुरुवातीच्या काळातील काही महत्त्वाच्या मवाळ नेत्यांपैकी न्या. केशवराव कोरटकर हे एक महत्त्वाचे नेते. स्वराज्याचा मूलभूत पाया ‘शिक्षण आणि समाज परिवर्तन’ हा आहे हा त्यांचा ठाम विश्वास. न्या. केशवराव पेशाने वकील. परंतु त्यांनी वकिलीसोबत समाजकारणात रस घेतला. त्यांनी शिक्षणप्रसार, प्रौढ शिक्षण, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, अनिष्ट जातिभेद, अस्पृश्यता यांवर अहोरात्र काम केले. केशवरावांचा हैदराबादेतील त्या काळच्या सर्व सामाजिक संस्थांशी या ना त्या कारणांनी संबंध होता. पंचवीस वर्षे वकिलीचा व्यवसाय केल्यानंतर त्यांच्या गुणांना ओळखून निजाम सरकारने त्यांना निजाम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त केले.
गिरीश घाटे यांनी ‘रावसाहेब’हे पुस्तक इतिहासावर आधारित परंतु कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेले आहे. ऐतिहासिक पुस्तकाचा रुक्षपणा टाळून आणि लेखनात रंजकता आणून गिरीश घाटे यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. परंतु त्यांनी हे करत असताना इतिहासाच्या वास्तवतेचे भान कटाक्षाने पाळले आहे. या पुस्तकाद्वारे अतिशय महत्त्वाचा विषय वाचकांसमोर प्रस्तुत झाला आहे. मी येथे असे आवर्जून म्हणेन की न्या. केशवराव यांच्या कार्यासंदर्भात इतिहास, राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयात विद्यापीठ स्तरावर संशोधन व्हायला हवे व विस्तृत माहिती संकलित व्हायला हवी.
पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, सुटसुटीत आकार आणि बांधणी पुस्तकाच्या आकर्षकतेत भर पाडते.
– विश्वास जोशी 9820643913
सुंदर माहिती मिळाली.
पुस्तकाची छान माहिती दिली आहे. ती वाचून उत्सुकता निर्माण झाल्याने पुस्तक मागवले आहे. धन्यवाद.
तुमचे पुस्तक अतिशय छान झाले आहे. वाचताना कंटाळा येत नाही आणि अर्थबोधही पटकन होतो. त्यामुळे वाचण्यास जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद…