अर्थांनो ! मागुते या !

शब्द आणि अर्थ ही जोडी तशी अतूट. पण कधी कधी दोघेही एकमेकांना हुलकावणी देत राहतात. मग कधीतरी कवीला शब्दांना साद घालावी लागते. म्हणून केशवसुत यांनी शब्दांना मागुते म्हणजे मागोमाग येण्याचे आवाहन केले. त्यांनी मनातल्या संवेदनांना आकार द्यावा, म्हणून शब्दांची विनवणी केली. तर विंदा करंदीकरांना मनातले अर्थ चिमटीत पकडायला, त्यांना आकार द्यायला शब्द अपुरे पडताहेत, असे जाणवले आणि ते लिहून गेले,

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले

काव्यनिर्मितीची प्रक्रिया अशी जाणीव-नेणीवेच्या पातळीवर रेंगाळणारी असते. कळत नकळत शब्द आणि अर्थांचा खेळ कवीच्या मनात सुरू असतो. साहित्याच्या व्यापारात शब्दाचे आणि अर्थाचे असलेले हे नाते व्यवहारातही अनेकदा गुंतागुंतीचेच असते. कोणत्याही भाषेत रुळलेले, रुतलेले आणि चलनात असलेले शब्द हे बाहेरून कुठून कुठून आलेले असतात. ते केवळ त्याच एका भाषेतले नसतात. असे शब्द भाषेत हळुहळू रुजतात आणि त्या भाषेचे बनून जातात. सुखाने नांदतात. मराठी भाषेचा विचार केला, तरी हे सहज पटेल. मराठीमध्ये संस्कृत, हिंदी, कन्नड, तेलुगू, गुजराती, फार्सी, उर्दू, अरबी अशा कितीतरी भाषांमधले शब्द रुजले आहेत. ते आता मराठीच बनले आहेत. तेव्हा कशाला उगीचच शब्दांच्या उगमावरून आणि त्यांच्या मराठी असण्या-नसण्यावरून भांडण करायचं? शब्दाचं मूळ शोधणं वेगळं आणि बाहेरून आलेल्या शब्दांना परकं मानणं निराळं.

अनेकदा शब्दांचे अर्थही बदलत जातात आणि त्यातल्या बारीकसारीक छटा थक्क करून सोडतात. एखादा शब्द अनेक अर्थ मिरवत वावरत राहतो आणि आपणही संदर्भानुसार हे अर्थ समजून घेतो. एका शब्दाचा एकच अर्थ कसा काय असेल? अन् अर्थांमध्ये साधर्म्य असलं, तरी त्यांच्या विविध छटा असणारच. कधी नेहमीच्याच वापरातला शब्द नवीन, वेगळा अर्थ ओंजळीत टाकून जातो. उदाहरणार्थ, ‘नवीन’ किंवा ‘नवा’ हे शब्दच बघा. नवं म्हणजे काहीतरी असं, जे आपण प्रथमच पाहतो, अनुभवतो. असं काही, जे पूर्वी अस्तित्वातच नसतं. तसंच जुन्याच्या विरुद्ध, ते नवं, अशा अर्थाने हा शब्द आपण वापरतो. पण कधी ‘वेगळं’ असा अर्थही नवं शब्दातून प्रकट होतो. म्हणजे एखादी स्त्री साडी नेसली असेल, तर तिची मैत्रीण म्हणते, ‘ही नको नेसूस, नवीन नेस एखादी.’ इथे तिला नवीन म्हणजे नवी कोरी असं म्हणायचं नसतं. तर ‘वेगळी’ असं अभिप्रेत असतं. तर कधी एखाद्या व्यक्तीने नेहमीपेक्षा तिसरंच काही केलं किंवा विचार व्यक्त केला, तर तिला आपण म्हणतो, ‘आता हे काय नवीन?’ म्हणजे ‘हे काय भलतंसलतं’, असं इथे म्हणायचं असतं. या शब्दांना ‘नवं-जुनं’ या अर्थांच्याही छटा आहेत. केवळ काळानुसार जुनं आणि नवं असाच अर्थ नाही, तर ‘मागास आणि आधुनिक’, ‘जुनाट आणि प्रगत’ असे वेगवेगळे अर्थ हे शब्द सुचवतात. इंग्रजीतही न्यू आणि ओल्ड हे शब्द अशा अर्थांनी वापरले जातात. ‘नवा विचार’ म्हणताना, ‘आधुनिक विचार’ असं अभिप्रेत असतं. उर्दू-फार्सीतही काहीसा असाच मामला आहे.

तसा तर ‘नौ’ हा शब्द फार्सीत ‘नवं’ या अर्थी वापरला जातो. तसाच नऊ या आकड्यासाठीही. फार्सीत यावरून बनलेला ‘नवीन’ असा शब्दही आहे, जो संस्कृतातही आहे, पण ‘नव’ हा शब्द संस्कृत भाषेत अधिक वापरला जातो. संस्कृत-मराठी-हिंदीतही ही ‘नवा’ची नवलाई आहेच. नवे या अर्थाने फार्सी-उर्दूत ‘जदीद’ हा अजून एक शब्द आहे. जो ‘आधुनिक’ या अर्थानेही वापरला जातो. अलिकडचा, अशा अर्थाने आपण नवा हा शब्द योजतो. उर्दू-फार्सीत तशाच अर्थाने ‘ताज़ा’ हा शब्द  वापरतात. आता ताज़ा या शब्दाला आणखीही निरनिराळे अर्थ चिकटलेले आहेत. नवीन या अर्थी बऱ्याच भाषांमधल्या शब्दांमध्ये ‘न’कार आहेच. इंग्रजीत न्यू, जर्मन भाषेत नॉयऽ, फ्रेंचमध्ये न्यू, स्पॅनिशमध्ये नॉयवो, नॉयवा वगैरे… अर्थातच याखेरीज या अर्थाचे अनेक शब्द असतीलच या आणि इतरही भाषांमधून. जसे दक्षिणेकडील मल्याळम भाषेत ‘पूदियत’, तर तामिळमध्ये ‘पुदीय’ असे शब्द आहेत नव्यासाठी. तामिळमधल्या एका लेखिकेने लिहिण्यासाठी घेतलेले नाव आहे, ‘पुदीयमाधवी’, म्हणजे ‘नवी माधवी’. नवीन असा अर्थ दाखवणारा शब्द बरेचदा ‘न’कारासहित सापडतो खरा. पण असं असलं, तरी त्याचा अर्थ अजिबातच नकारात्मक नाही. खूप आशा आणि अपेक्षा असणारा आहे, हे नक्की…

‘आशा’ आणि ‘अपेक्षा’ या शब्दांचे अर्थही असेच विविध प्रवाहांमधून वाहणारे आहेत. भविष्याविषयी एक सकारात्मकता जागवणारे हे शब्द. दोन्ही परस्परांसाठी योजले जातात बरेचदा. पण सूक्ष्म फरकही आहेच त्यांच्या अर्थांमध्ये. बोलचालीत आणि व्यवहारात शब्द आपले अर्थ विस्तारत प्रवास करत राहतात. कधी अर्थांच्या सर्वस्वी वेगळ्या दुनियेतही पसरतात. तर कधी मूळ अर्थापासून वेगळा अर्थ प्रतीत झाला, तरी काही धागे समान असल्यामुळे शब्दांमध्ये नवे अर्थ मिसळत जातात, असेही आढळते. आशा-अपेक्षांच्या दालनात शिरणारच आहोत आपण लवकरच. त्यांच्या आसपासचे आणि त्यांच्याशी जोडलेले अर्थ घेऊन. शिवाय, आपल्यामागून येण्यासाठी शब्दांप्रमाणेच अर्थांनाही आपण साद घालणारच आहोत…

– नंदिनी आत्मसिद्ध 9920479668 nandini.atma@gmail.com
———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here