मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत… गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे. ते लेण्याचे ठिकाण आहे. म्हणजे प्राचीन काळी तो व्यापारी मार्गाचा महत्त्वाचा भाग असावा. ती लेणी जांभ्या दगडात कोरलेली आहेत. लेणी ओढ्याच्या पात्राच्या वरील बाजूस असावीत, पण पात्राशेजारील दगडांचे स्खलन होऊन पात्रात आली असावीत. लेण्यांमध्ये अर्धउठावातील स्तूप दिसून येतात. प्रवाहाच्या वरील बाजूस छोटे चैत्यगृह व विहार दिसतात. विहारातील प्रकाशयोजना नेटकी आहे- चारी बाजूंला दरवाजे आहेत. स्वच्छ व शांत सूर्यप्रकाश तेथे नियमित असतो. लेण्याचे छत गज पृष्ठाकार असल्याने पाण्याचा प्रवाह बोथट होऊन वास्तूची हानी कमी प्रमाणात होते. वास्तुशास्त्र संकेताचा तो उत्तम नमुना होय. तेथे लेण्याच्या जवळपास अनेक छोटीमोठी पोडी (पाण्याचे कुंड) दिसतात. ती कुंडे लेणी कोरत असताना, खडकातील पाण्याची पातळी समतल ठेवून स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी निर्माण केली असावीत.
जवळचे पळसंबे गाव हे इतिहासाच्या पाऊलखुणा जपते. बौद्ध भिखूंनी तेथील स्थानिक आदिवासी लोकांना हाताशी धरून, पळस आणि आंब्यापासून रेशमी कापडाकरता रंग बनवण्याचे केंद्र तेथे इसवी सनपूर्व दुसर्या शतकात विकसित केले असावे. त्या अनुषंगाने, पळसंबे हे व्यापाराचे व पुढील बोरबेट हे चिंतनाचे ठिकाण असावे असे मानले जाते.
खरा रोमांचकारक प्रवास आहे, तो बोरबेटाच्या मागील डोंगरावर असलेल्या मोरजाई पठाराचा. सह्याद्रीच्या डोंगररांगांत निसर्गसौंदर्याने नटलेले अनेक ‘स्पॉट’ आहेत, की जेथे पावसात छान फिरता येते. मोरजाई पठार- तेथील हजार वर्षांपूर्वीचे जुने मोरजाईचे मंदिर, नितांतसुंदर निसर्ग, समोर दिसणाऱ्या डोंगररांगा, दुर्मीळ वनस्पती असे सगळे एकाच ठिकाणी अनुभवता येते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत असलेल्या देखण्या पठारांच्या सौंदर्यातील सर्वोच्च बिंदू म्हणजे मोरजाई म्हणता येईल.
मोरजाईचे पठार डोंगर बोरबेटपासून चाळीस मिनिटे चढून गेल्यानंतर लागते. त्या पठाराला मोरजाईचे पठार असेच नाव मिळाले आहे. मंदिर ही एक गुहा आहे. मंदिर पठारावरील एकमेव शिलाखंडावर उभारले आहे. मंदिर बांधण्याची तशा पद्धतीची शैली इसवी सन 430 नंतर लुप्त होत गेली. मंदिराचे बांधकाम प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या मध्यावर झाले असावे. मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाटेवर असणाऱ्या दगडी कमानी होत. मंदिर रस्त्यावर ठरावीक अंतरावर दगडी कमानी लागतात. मंदिराकडे जाताना वाट चुकू नये म्हणून ती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांतील काही कमानी अर्धवट पडलेल्या आहेत. भारतात/महाराष्ट्रात तशा प्रकारची व्यवस्था अन्यत्र कोठेही पाहण्यास मिळत नाही. कोकणात दीपमाळा दिसतात तशा पद्धतीची एक दीपमाळही मंदिराबाहेर आहे. मोरजाईची यात्रा, रथसप्तमीला असते. परंतु पठारावर कशाचीच सोय नाही. त्यामुळे भाविक-भक्तजन यात्रेकरूंस; तसेच, गिर्यारोहक-कम-पर्यटकांस तहानलाडू, भूकलाडू सोबत ठेवावे लागतात.
राधानगरी आणि गगनबावडा यांचा परिसर पठारावरून खुलून दिसतो. तो परिसर पावसांत पूर्ण धुक्याच्या दुलईत; तसेच, हिरवाईने नटलेला असतो. त्यामुळे पावसात मोरजाईला भेट देणे ही पर्वणी होय. तेथील परिसरात ‘जळवांचे पाणी’ म्हणून ठिकाण आहे. तेथे बारा महिने जळू पाहण्यास मिळतात. जळू या पावसात अॅक्टिव्ह असतात, तर त्या अन्य ‘सीझन’मध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे जळवांचे पाणी हे आश्चर्य मानले जाते. परिसर दाजीपूर अभयारण्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे कधी कधी गवे, चितळ आदि प्राण्यांचे दर्शन तेथे होऊ शकते. पठारावरील वनस्पतिसंपदा दुर्मीळ प्रकारात मोडते. पावसाळ्यानंतर कंदील, अग्निशिखा, रानतेरडा, सोनकी आदि दुर्मीळ फुलांनी पठार भरून जाते. तेथील वनराईमध्ये दुर्मीळ मॉस, वेत, अर्जुन अशी वृक्षराजी आहे. उंचावर असल्याने तेथून सूर्योदय आणि सूर्यास्त मोहक असतात. वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतात. पठारावरून दिसणारा लखमापूर धरणाचा नितांत रमणीय परिसर मनाला भुरळ घालतो.
मोरजाईच्या गुहा मंदिरात कायम अंधार असतो. त्यामुळे टॉर्च जवळ ठेवावा लागतो. गुहेच्या बाहेरच्या परिसरात अनेक वीरगळ व सतिशीळा बघण्यास मिळतात. परिसरात विखुरलेले दगड हे तेथील प्राचीन नागरी वस्ती व तटबंदी यांच्या खुणा वाटतात. सातवाहन काळात तेथे बौद्ध भिख्खू चिंतनासाठी येऊन राहत असे मानले जाते.
मोरजाई देवीला कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण मानले जाते. पाचव्या शतकातील चालुक्यकालीन राजा मंगलेश यांची पठारावर राजधानी होती असेही सांगितले जाते. पठारावर पाण्याचे टाके आहे, पण त्यातील पाणी वापरले जात नाही. मंदिराचा सभामंडप साधारण शंभर माणसे झोपू शकतील इतका मोठा आहे. पूर्ण बांधकाम जांभ्या दगडात केलेले आहे. शांत आणि दुर्गम अशा जागी जपला गेलेला निसर्गाचा मौल्यवान असा हा ठेवा आहे. मोरजाई परिसरात पळसंबे गावापाशी ओढ्याच्या परिघात प्राचीन एकपाषाणीय मंदिरे आहेत. त्या मंदिरांत अनेक शिवपिंडी आहेत. चालुक्य राजा मंगलेश याने इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये त्याची प्रिय पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ लिहिलेला सांगशी शिलालेख म्हणजे पंधराशे वर्षांपूर्वी त्याच्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ केलेले जगातील पहिले स्मारक आहे. ते शिल्प अतिशय रेखीव असून शेवाळी काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेले आहे. शिलालेखाच्या वरील बाजूस पेटीका शीर्षक (Box-Headed) पद्धतीचा लेख कोरलेला आहे. लेखाची भाषा संस्कृत असून ती ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेली आहे. ती स्मारकशिला गावामध्ये सती सांगसाई म्हणून ओळखली जाते. तसेच, ती गावाची रक्षणकर्ती आहे अशी गावकर्यांची श्रद्धा आहे. त्याबरोबरच रामचंद्रपंत अमात्यांचा गगनबावडा येथील वाडा ही ठिकाणे देखील प्रेक्षणीय आहेत.
– मानसी चिटणीस 9881132407 manasichitnis1978@gmail.com
———————————————————————————————————