कोल्हापूरजवळच्या सामानगड या किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व, दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो वल्लभगड, महिपालगड, भुदरगड, रांगणा अशा लढाऊ किल्ल्यांच्या बेचक्यात, अगदी मधोमध आहे. त्यामुळे त्या किल्ल्याचे महत्त्व रसद पुरवठ्यासाठी फार जाणवून गेले. त्यावरूनच कदाचित किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे !
अवघा महाराष्ट्र शिवराज्याभिषेकात 1674 मध्ये न्हाऊन निघाला होता. तेव्हा त्या किल्ल्याच्या परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांना मात्र त्या शिवराज्याभिषेक समारंभापासून वंचित राहवे लागले. ते बहलोलखानाचा बंदोबस्त करण्यात अडकून पडले होते. खरे तर, बहलोल खान प्रतापरावांच्या हाती गवसला होता, परंतु त्यांनी त्याला जतजवळ उमराणी येथे दयाबुद्धीने सोडून दिले. उलट, शिवाजी महाराजांचे धोरण होते, की हाती आलेला शत्रू, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तिन्ही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करणे नाही ! पण सेनापती गुजर यांच्याकडून त्या धोरणाकडे दुर्लक्ष झाले ! महाराजांची अटकळ होती, की मुक्त केलेला बहलोलखान स्वराज्यावर चालून येईल. त्यामुळे त्यांनी प्रतापरावांना बजावले, की त्याचे पारिपत्य होत नाही तोपर्यंत रायगडावर तोंड दाखवणे नाही. आणि खरोखरीच, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अटकळीनुसार घडले. बहलोलखान गडहिंग्लजमार्गे कोल्हापूर प्रांतात शिरण्याची तयारी करू लागला. प्रतापरावांना त्याची छावणी नेसरीजवळ आहे ही खबर लागली. ते लगोलग घोड्यावर मांड ठोकून वार्याच्या वेगाने बहलोलखानावर चाल करण्यास निघाले. त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी आणि सिद्धी हिलाल हे सहा सरदार निघाले. त्यांच्याकडे फौज फक्त बाराशेची होती. पण त्यांच्या डोक्यात बहलोलखानाने केलेल्या विश्वासघाताचा सूड थैमान घालत होता. प्रतापराव यांना योग्य संधीची वाट पाहवी व खानाला कापून काढावे इतकेही भान राहिले नाही. ते सात घोडेस्वार सरदार पंधरा हजार हशमांच्या गर्दीत तुफान वेगाने शिरले आणि बघता बघता, नाहीसे झाले ! तो प्रसंग 24 फेब्रुवारी 1674 या महाशिवरात्रीच्या दिवशी घडला. अजून एक खिंड रक्ताने न्हाऊन निघाली ! ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ हा मराठी वाक्प्रयोग त्या वेड्या साहसातून तयार झाला.
सामानगडाचा इतिहास त्या आधीपासूनचा आहे. सामानगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. शिवरायांनी तो गड 1667 मध्ये जिंकून घेतला. त्या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये भूमिका महत्त्वाची बजावली आहे. सामानगड मोगलांनी 29 सप्टेंबर 1688 ला जिंकून घेतला. तो गड 1701 पूर्वी पुन्हा मराठ्यांकडे आला. पण शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास लगेच वेढा घातला व तो जिंकला. त्याने शहामीर यास किल्लेदार म्हणून 8 मार्च 1702 रोजी नेमले. तोपर्यंत साबाजी क्षीरसागर हे गडाचे किल्लेदार होते. मराठ्यांनी त्यांच्या ताब्यात तो पुन्हा दोन वर्षांनी, जुलै-ऑगस्ट 1704 मध्ये घेतला. नंतर त्या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. सामानगडाने इंग्रजांविरूद्ध बंडाचे निशाण प्रथम 1844 मध्ये फडकावले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतर यांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी साथ दिली. त्या बंडात तीनशेपन्नास गडकरी, दहा तोफा, शंभर बंदूकबारदार व दोनशे सैनिक होते. त्या शिबंदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात 13 ऑक्टोबर 1844 रोजी गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. बेळगाववरून हलकर्णी या गावी संकेश्वरच्या आधी जावे. तेथून बसमार्गे रस्त्याला लागून नंदनवाड मार्गे नौकुडला जावे. नौकुड हे गाव गडाच्या दक्षिण उतारावर वसलेले आहे. तेथून थेट डांबरी सडक गडमाथ्यावर जाते. कोल्हापूर बाजूने जाणे असेल तर संकेश्वर-गडहिंग्लज-चिंचेवाडी-सामानगड असा मार्ग आहे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठ्या विहिरीच्या बाजूला असलेल्या दोन फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. गडहिंग्लजवरून नौकुडला जाण्यासाठी थेट एस टी बस आहेत. किल्ल्यात पाहण्याची ठिकाणे बरीच आहेत – अंबाबाई मंदिर, कमानबाद, अंधारकोठडी, सोंड्या बुरूज, निशाण बुरूज, चोरखिंड, तीन विहिरी, मारुती मंदिर, मंदिरासमोरील जांभ्या दगडात कोरलेली लेणी … असा सारा गडपरिसर पाहून नेसरीचे स्मारक बघणे सोयीचे असते.
गडहिंग्लजवरून भडगाव चिंचेवाडी मार्गे गडाच्या पठारावर जाता येते. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. किल्ल्याच्या उतारावर वृक्षारोपण केले असल्याने झाडी दाट दिसते. पक्ष्यांचा वास तेथे पाहण्यास मिळतो. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने गडावर प्रवेश करता येतो. त्या ठिकाणी दरवाजा होता. तो काळाच्या ओघात नामशेष झाला आहे. सामानगडाचा कातळ सर्व बाजूंनी तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे. गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने गडाच्या तटावर जावे व तटावरून निशाण बुरुजाकडे जावे. तेथून उजव्या हाताने पुढे गेल्यास जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोचता येते. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. विहीर चौकोनी आकाराची आहे. विहिरीजवळून पूर्व दिशेला गेल्यास अंबाबाईचे कौलारू मंदिर लागते. मंदिराला लागून पाण्याची बुजलेली टाकी व काही चौथरे आहेत. कमान बाव ही विहीर अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर लागते. त्या विहिरीत उतरण्यासाठी पायर्या असून, पायर्यांवर सुंदर कमानी आहेत. पायर्या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. त्या ठिकाणी सात कमानी आहेत. त्यापुढे जाता येत नाही. तेथे कैद्यांना ठेवले जात असे. तशा आणखी तीन विहिरी सामानगडावर आहेत. कमान बाव पाहून मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जाता येते. तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब दिसतात. त्यांचे प्रयोजन कळत नाही. पुढे चोर दरवाजा लागतो. तेथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडया बुरुज लागतो. सोंड्या बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली अशी आख्यायिका स्थानिक लोकांत आहे.
गडावरून सरळ जाणार्या सडकेने पंधरा मिनिटांत मारुती मंदिर लागते. मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहेत. त्या लेण्यांच्या आत महादेव मंदिर आहे. आत जाण्यास पायऱ्या आहेत. मंदिरात मोठे शिवलिंग व कमानीदार देवळ्या आहेत. तेथून उतरणार्या डांबरी सडकेने पुढे भीमशाप्पांची समाधी आहे. तेथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. भीमशाप्पा यांनी इंग्रजांविरुद्धच्या लढाईत पराक्रम गाजवला होता.
अग्निज्वालेप्रमाणे शत्रूवर तुटून पडणार्या सात शूर मराठ्यांची गाथा या गिरिदुर्गाने याची देही याची डोळा पाहिली आहे. तसा तो जिल्ह्यात बाजूला पडलेला गड आहे. पायथ्याजवळील गावातील तरुण मंडळींनी किल्ल्यावर सूचना फलक लावून पर्यटनासाठी येणाऱ्यांना मार्गदर्शन होईल असे केले आहे. किल्ल्याचा परिसर स्वच्छ आहे.
– मानसी चिटणीस 9881132407 manasichitnis1978@gmail.com
———————————————————————————————-