शक्तिदेवतेचे जगदंबा हे नामांकन महाराष्ट्राने केले आहे. पराक्रमाची जोपासना करणार्या अन्य शक्तिदेवता महाराष्ट्रात आहेत. तथापी शक्ती ही या जगाची सूत्रचालक आहे, ती चराचराला जन्म देणारी जगत्माता आहे, म्हणून महाराष्ट्र तिला जगदंबा असे संबोधतो. मराठी मनाच्या गाभाऱ्यात तिचाच वास आहे. तिने जशी महाराष्ट्राच्या पराक्रमाची शर्थ पाहिलेली आहे, तसा महाराष्ट्र तिच्या क्षात्रतेजाने अवघा धन्य झालेला आहे ! त्या जगदंबेच्या भक्तीचे वेड महाराष्ट्राच्या रोमरोमात भिनले आहे. रणांगणावर बेफाम तलवारबाजी करणारा हातदेखील तलवार बाजूला ठेवून, या आदिमायेची स्तोत्रे रचण्यासाठी लेखणी धरतो असे उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये तो चमत्कार अठराव्या शतकात घडला. एक सरदार आदिमायेच्या भक्तीने वेडा होऊन, चक्क कवी बनला ! त्या सरदाराचे नाव आहे रंभाजीराव ऊर्फ रावरंभा निंबाळकर.
रावरंभा हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचा सरदार. तो मराठ्यांकडून मोगलाविरूद्ध लढला. त्याने औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज व ताराबाई यांच्या झगड्यात काही वेळा ताराबाईचा पक्ष घेतला, तर काही वेळा दोघांनाही न जुमानता बंडखोर वर्तन केले. त्यामुळे त्याचा उल्लेख ‘रंभा बंडवाला’ असा केला जाई. त्याने पेशव्यांचा अंमल पुण्यावर बसण्यापूर्वी पुण्याची केलेली लूट प्रसिद्ध आहे. अखेर, तो हैदराबादेच्या निजामाकडे चाकरीस गेला. त्या निजामुल्मुकानेच रंभाजीरावास ‘रावरंभा’ अशी पदवी देऊन सन्मानित केले. त्यानंतर रावरंभाचे घराणे निजामाचे आधारस्तंभ बनले. निजामाने त्यांस पुण्याच्या बदल्यात करमाळे, माढे व परांडा यांची जहागिरी दिली.
रावरंभाच्या व्यक्तिमत्त्वात भक्ती आणि शक्ती यांचे अनोखे मिश्रण झालेले होते. त्याच्या मनात भक्तीची ज्योतदेखील बंडखोर वृत्तीच्या प्रखरतेने तेवत होती. विशेष म्हणजे रावरंभाच्या मनातील भक्ती ही शक्तीचीच होती. रावरंभा हा आदिशक्तीचा परमभक्त होता. आदिमाया तुळजापूरची तुकाई रावरंभाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याच्या मागे पायी चालत करमाळ्याच्या शिवेपर्यंत आली आणि तेथेच थांबून करमाळा नगरीला पावनकर्ती झाली अशी दंतकथा आहे. रावरंभाने करमाळ्याच्या पूर्वेला एका माळावर त्या देवीसाठी प्रचंड मंदिर उभे केलेले आहे. बंडखोर म्हणून इतिहास गाजवणाऱ्या रावरंभाची दुसरी बाजू तेवढीच भावूक आहे.
रावरंभाने रचलेली कमलादेवीची जी आरती आहे ती पाहिल्यावर, त्याच्या अंगी काही साहित्यिकाचे गुणदेखील होते याची खात्री पटते. रावरंभा हा एक रांगडा लढवय्या होता. त्याच्या उत्कट भक्तीतून साकारलेला आविष्कार म्हणजे ती आरती होय. ती रावरंभासाख्या समशेरीच्या फर्जंदाने रचलेली आहे म्हणूनच तिचे मोल आगळेवेगळे आहे. ती आरती अशी आहे-
ब्रह्मादिकास कारण होईल तूं आई ।
म्हणुनी तुजला सर्वही म्हणती माई
सर्वांमध्ये असुनी सर्वांमध्ये नाही ।
अंबे माझ्या हृदयी येउन तू राही ॥१॥
जय देवी जय देवी जय जय आनंदी ।
आरती ओवाळू तव चरणारविंदी ॥धृ.॥
आदी मूळ माया तू आदिरूप शक्ती ।
शक्ति भक्ती ह्यात सर्व विरक्ती
योगी तू, ज्ञान तू सर्व माया विरक्ती
सर्व तूच होशिल माया तू ब्रह्मादिक मूर्ती ॥२॥
जय देवी जय देवी …
साधन करता करता योगी हे थकले ।
त्याला तुझे रूप नाही सापडले ।
या लागी माझे मन बहुत कळवळले
लावूनि तुझे चरणी कर हो आपुले ॥३॥
जय देवी जय देवी…
शक्ति त्रयलोकी तू कमलालयवासी ।
काळी कमला वाणी नमि त्रय घेशी ।
जगद्उद्धार कराया माझे कुलवंशी ।
आली सुख देणारी अगम्य सुखराशी ॥४॥
जय देवी जय देवी…
जप तपादिक नलगे काही साधन ।
तुझ्या चरणी चित्त अर्पुनिया सुमन ।
तुझा म्हणवितो मी निश्चय जाणून ।
रावरंभा दासा करितो पावन ॥५॥
जय देवी जय देवी….
रावरंभारचित या आरतीमध्ये देवीला उद्देशून काही नावे आणि विशेषणे आलेली आहेत. रावरंभा आनंदी, काली, कमला अशी नावे देवीला देतो. ती सर्व निरनिराळ्या संदर्भात पार्वतीस उद्देशून आलेली आहेत. रावरंभाच्या आरतीत येणारी ही देवी श्रीलक्ष्मी असावी असे निर्देशित करणारे काही अंतरे आहेत. ब्रह्मादिकांना जन्म देणारी सर्वजण जिला माई (मा) म्हणतात; अशी सर्वांमध्ये असून सर्वांत नसणारी ती देवी आहे.
दुसऱ्या अंतऱ्यात ते वर्णन पार्वतीच्या स्वरूपाशी निगडित वाटते. ती आदिमाया आहे, आदिरूप शक्ती आहे. ती भक्ती आणि ज्ञान याने विरक्त आहे. ती योगी, ज्ञानी आणि माया विरक्त आहे. पार्वतीलाच आदिशक्ती मानतात. तिच्या रूपाचा थांग प्रत्यक्ष कैलासपती शंकरालाही लागलेला नव्हता. ती प्राक्तन विद्येने संस्कारित होती. म्हणून ती ज्ञानी होती आणि तिने जीवनभक्तीत योगसाधना स्वीकारली होती. साधकांनाही जिचा थांग लागला नाही, अशी ती अनादि, अनंत आहे.
चौथ्या अंतऱ्यामध्ये आलेले वर्णन हे श्रीलक्ष्मीला जवळचे आहे. ती कमला आहे. ती कमलालयवासी आहे. म्हणूनच त्या देवीला कमलादेवी म्हणतात. रावरंभाच्या मनात (बंगाल्यांतील) कालीमाता चंडीचेही रूप असावे असे वाटते. कारण तो तिला काळी (काली) या नावाने संबोधतो. तो ती काली जगाचा उद्धार करण्यासाठी त्याच्या कुलवंशी आलेली आहे असे म्हणतो. तीच त्याची कुलस्वामिनी झालेली आहे.
रावरंभाला देवी ही सुंदरता, संपन्नता आणि शक्ती यांचे प्रतीक भासलेली आहे आणि म्हणूनच त्याने पार्वती व श्रीलक्ष्मी यांचा समन्वय तिच्यात पाहिलेला आहे. पार्वती ही आदिशक्ती व आदिरूप आदिमाया प्रतीत करते. तिच्या जोडीला, रावरंभाने लक्ष्मीला बसवले आहे. तिच्यात त्याने धनसमृद्धीचाही विचार आणलेला आहे. ही आरती म्हणजे रावरंभाच्या मनाचे स्पष्ट प्रतीक आहे.
करमाळ्याच्या कमलादेवीच्या मंदिरात ही आरती नित्याच्या ‘दुर्गे दुर्घट भारी’ या पारंपरिक आरतीबरोबर म्हटली जाते.
– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com
———————————————————————————-