महाराष्ट्राच्या सीमेवरील होट्टलची बुट्टीजत्रा (Hottal fair brings Lingayats from three states together)

5
726

होट्टल गावाची ख्याती शिवमंदिरांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. तेथे चार भव्यदिव्य शिवमंदिरे आढळतात- सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर अशी त्यांची नावे. शिवमंदिरांची उभारणी अकराव्या शतकात झाली. नितांतसुंदर अशा शिल्पकलेने नटलेली अशी ती शिवमंदिरे आहेत. होट्टल ही कल्याणीच्या चालुक्यांची उपराजधानी होती. बदामी ही मुख्य राजधानी होती.

होट्टलची बुट्टीजत्रा ही आगळीवेगळी आहे. मराठी, तेलगू, कन्नड या तीन भाषा आणि संस्कृती यांचा मिलाप त्या बुट्टीजत्रेत आढळतो. होट्टल हे क्षेत्रच कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्र या तीन प्रांतांच्या सीमेवरील देगलूर तालुक्यात आहे. ‘बुट्टी’ हा शब्द मूळ कन्नड भाषेतील असून त्याचा अर्थ वेळूच्या बडदीपासून बनवलेली टोपली असा आहे. होट्टल यात्रेसाठी लिंगायत समाज टोपलीमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येत असतो. म्हणून त्या यात्रेला बुट्टीजत्रा असे म्हणतात. तो समाज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण या तीन प्रांतांत विशेष आहे. होट्टल हे लिंगायतांचे उपासना केंद्र आहे.

होट्टल गावाच्या दक्षिणेस काही अंतरावर असलेल्या मंदिरात सिद्ध आसनातील ध्यानस्थ मूर्ती आहे. ती सिद्धेश्वराची असल्याचे अभ्यासक सांगतात. काही लोकांना ती मूर्ती महावीरांची वाटते; पण त्या परिसरातील लोक मात्र त्या देवतेला परमेश्वर या नावाने संबोधतात. होट्टल येथे उभ्या असलेल्या चार मंदिरांपैकीच सिद्धेश्वराचे ते मंदिर आहे. या परिसरात त्या देवतेमुळे सिद्धेश्वर आणि परमेश नावाची माणसे मोठ्या प्रमाणात आढळतात. ती देवता सीमावर्ती भागातील अनेकविध जातींतील कुटुंबांचे कुलदैवत आहे. बसवेश्वर यांनी त्या लगतच्या बिदर जिल्ह्यातील कल्याण येथे बाराव्या शतकात ‘कल्याण क्रांती’ करून लिंगायत परंपरेचा पाया रचला.

बसवेश्वर हे पुढे कल्याणचे प्रधानमंत्री झाले, त्यामुळे साहजिकच, त्या परिसरात बसवेश्वर यांचा वावर होता. म्हणूनच बसवेश्वर प्रणीत लिंगायत संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात त्या परिसरात आहे.

लिंगायतांची बुट्टीजत्रा होट्टल येथील परमेश्वर मंदिर परिसरात पौष महिन्यातील  शेवटच्या सोमवारी होत असते. ती जत्रा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण या तीन प्रांतांच्या सीमावर्ती भागातील लिंगायतांचे वार्षिक स्नेहमीलनच असते, जणू. महाराष्ट्रातील नांदेड व लातूर, कर्नाटकातील बिदर आणि तेलंगणातील हैदराबाद, निजामाबाद, संगारेड्डी व कामारेड्डी अशा जिल्ह्यांतून लिंगायत समाज यात्रेनिमित्त एकत्रित येतो. भाविक तेथील कुंडाच्या पाण्याने परमेश्वर मूर्तीला स्नान घालतात आणि मूर्तीस पंधरा ठिकाणी विभूती लावून बेलफूल वाहतात. तिन्ही प्रांतांतील लोक सामूहिकपणे आरती करून आणलेला पुरणपोळीचा नैवेद्य मूर्तीसमोर अर्पण करतात. नंतर तेथील पाच जंगमांसह आलेल्या यात्रेकरूंना पुरणपोळीचे जेवण आग्रहपूर्वक जेवू घालतात. सर्व कुटुंबीय आणि यात्रेस आलेले पाहुणेरावळे मंदिर परिसरातील मोकळ्या रानात एकत्र बसून पुरणपोळीच्या जेवणाचा आनंद घेतात. लोक त्यांचे कुटुंबीय आणि आलेले पाहुणे यांच्यासह जेवणानंतर यात्रेत फिरून सौंदर्यप्रसाधने आणि मुलांसाठी खेळणी विकत घेतात. यात्रेत आलेल्या सर्व लोकांना पिण्यासाठी पाण्याचे एकच कुंड आहे. टोपलीमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन यात्रेस एकत्रित येणे ही बाब कर्नाटकातील महात्मा बसवेश्वरप्रणीत लिंगायत संस्कृतीचा भाग आहे. अन्नदान करणे, इतरांना जेवण देणे म्हणजेच महात्मा बसवेश्वरांचा ‘दासोह’ विचार असून त्या ‘दासोहा’चे दर्शन होट्टल यात्रेत सहजपणे घडते.

मात्र लोकांचे जीवनमान झपाट्याने बदलले असल्यामुळे मागील पंचवीस वर्षांत त्या यात्रेला उतरती कळा लागली आहे. यात्रेला तिचे पूर्वीचे वैभव राहिलेले नाही. संपर्काची साधने नव्हती, कोणतीही वाहने नव्हती, मनोरंजनाची माध्यमे नव्हती, त्या काळात होट्टल यात्रेबद्दल त्या पंचक्रोशीतील लोकांना प्रचंड आकर्षण होते. घरातील लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण यात्रेची आतुरतेने वाट पाहत असत. गुराख्यापासून ते जमीनदारापर्यंत सर्व लोकांना यात्रेबद्दल विलक्षण ओढ असे. अत्यंत कमी पैशांत म्हणजे पाच रुपयांत होणारी यात्रा अशीच होट्टल यात्रेची ख्याती होती. म्हणून प्रत्येकाला ती यात्रा त्याची स्वत:ची वाटत असे. होट्टल यात्रेला जायचे आहे म्हणून गुराखी दिवाळीपासून एक-एक पैसा गोळा करत असत. घरातील महिला आणि लहान मुले पैशाला पैसा जोडत असत. लोक होट्टल यात्रेसाठी ठेवणीतील कपडे परिधान करून, बैलगाडीत बसून सहकुटुंब येत असत. काही लोक घोडा आणि उंट यांवर बसून त्या यात्रेला पोचत. ज्यांच्याकडे कोणते वाहन नव्हते असे लोक पायी येत; पण कोणी यात्रा चुकवत नसत.

सर्व पाहुण्यांना एकत्रित भेटण्याची पर्वणी असे ती ! यात्रेनिमित्त एकत्र येऊन, एकत्रित जेवण करून सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगून मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे होट्टलची बुट्टीजत्रा वाटे. घराच्या बाहेर कधी पडता येत नव्हते अशा स्त्रियांना होट्टलच्या यात्रेत सहभागी होता येत असे. लोक दिवसभर मौजमजा करून दिवस मावळतीला समाधान व तृप्ती घेऊन त्यांच्या गावाकडे परतत असत. वर्षभर काबाडकष्ट करून थकल्याभागल्या जीवाला नवीन ऊर्जा, मनाला नवी उभारी देण्याच्या दृष्टीने होट्टलच्या बुट्टीजत्रेचे लोकजीवनात विलक्षण महत्त्व होते.

(टीप – बदामी हे पट्टदकल किंवा वातापी या नावानेही ओळखले जाई. चालुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्र येथील प्राचीन मराठा राज्यकर्ते होते. पट्टदकलच्या चोहीकडे लाल दगडांच्या डोंगराच्या रांगा होत्या. त्यामुळे ते रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणूनही ओळखले जाई. त्या शहराचा व्यापारउदीम रोमन साम्राज्याशी होता असा इतिहासात उल्लेख आहे.)

रवींद्र बेम्बरे 9420813185 rvbembare@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

5 COMMENTS

  1. महत्वपूर्ण आणि तेवढ्याच प्रभावीपणे आपण मांडणी केलात बेंबरे सर… अशा लेखांना उजाळा मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.

  2. होट्टल येथील जत्रेचा खूप छान आढावा घेतला आहे. होट्टल बद्दल ऐकून आहे. पण हा लेख वाचून आता होट्टलला भेट द्यावी असे वाटते आहे.

  3. Very informative article. It refreshed my memories about visit to this place. Some of the social activitists including you are doing the best possible to maintain this religious and archeological site.
    Attention from Archeological department is needed to revive it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here