पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शक्य आहे? (Eco-Friendly Ganesh Idol – An Illusion)

1
370

महाराष्ट्रात काही चर्चाविषय कधीच संपत नाहीत, कारण त्यावर रास्त निर्णय केला जात नाही. गणपतीच्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मधील मूर्ती व पर्यावरण हा तसाच एक विषय. या संबंधातील गेल्या वीस वर्षांतील घटनांचा आढावा घेऊन वस्तुस्थिती काय आहे ते पेणचे गणेश मूर्तिकार श्रीकांत देवधर यांनी या लेखात मांडले आहे. पर्यावरणप्रेमी लोकांनी लेखातील मुद्दे जाणून घेऊन त्यांची निरीक्षणे वेगळी असतील तर जरूर मांडावी. मात्र त्यास वास्तवाचा आधार असावा…

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्तींवर बंदी घालावी, कारण त्या मातीसारख्या लगेच विरघळत नाहीत व प्रदूषण करतात असा विषय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये 2005 साली आल्याचे आठवते. ‘अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे’मार्फत तशी याचिका नरेंद्र दाभोळकर आणि त्यांचे सहकारी यांनी दाखल केली होती. नदी, समुद्र यांचे प्रदूषण होऊ नये- वाढू नये याची दखल घ्यावी यासाठी अनेक गोष्टींचा याचिकेत उल्लेख होता.

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चे गणपती नको, मातीचे हवेत अशा बातम्या कोठे कोठे साधारण 2007 पासून पर्यावरण संतुलनाविषयी जागरूक असणाऱ्या लोकांकडून प्रसिद्ध  होऊ लागल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, गणपती हा मातीचाच हवा, पूर्णपणे इको-फ्रेंडली हवा. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ हे पाणी प्रदूषित करते.

त्या काळात, शुभा राऊळ या मुंबईत महापौर होत्या. त्यांनी त्यांच्या महापौर बंगल्यासमोर शिवाजी पार्कला विसर्जनासाठी एक कृत्रिम हौद तयार करून, त्यात विसर्जन करण्याचे गणेशभक्तांना आवाहन केले होते. पुढे ते टिकले नाही. ठाण्याला म्युनिसिपालिटीने वेगळ्या अशा विशिष्ट पद्धतीने गणपती विसर्जनाची सोय केली, जेणेकरून तळ्यामध्ये विसर्जन होणार नाही. त्याच्या बातम्या दोन-तीन वर्षी येत राहिल्या, इतकेच. गोवा सरकारने ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर अधिकृत बंदी प्रथम 2009 साली आणली. गोव्याला फक्त मातीच्या गणेश मूर्ती जाऊ शकतात अशी चर्चा त्यांच्यात व गणपतीवाले यांच्यात झाली. त्याच सुमारास पुण्याच्या ‘इको एक्झिस्ट संस्थे’ने खरोखरीचा इको फ्रेंडली गणपती बनवण्याची ऑर्डर पेणमध्ये दिली. म्हणजे  छोटे गणपती मातीचे करणे व त्याला फक्त मुलतानी माती, हळद, गेरू इत्यादींनी रंगवणे असे अभिप्रेत होते. कोठल्याही प्रकारचे ऑइल कलर वापरणे नको होते. तो सर्वार्थाने इको फ्रेंडली गणपती होता, पण तो दीड फूटांपर्यंतचा घरगुती आकाराचा होता. पुढे, कोठली ना कोठली संस्था असाच प्रचार करत राहिली, की गोवा या राज्याप्रमाणे, गुजरातमधील सुरत शहर, महाराष्ट्रातील नागपूर हे उपराजधानी असलेले शहर यांना ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती चालत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र, ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्ती करणारे कारखाने वाढत गेले आणि त्या प्रकारच्या गणेशमूर्तींची विक्रीही वाढत गेली.

जानेवारी 2011 मध्ये प्रमुख वर्तमानपत्रांत (लोकसत्ता, मटा वगैरे) ठळक अक्षरांत बातमी आली, की “कोर्टाचा आदेश- ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चे गणपती करण्यास मनाई; गणपती फक्त मातीचेच हवे !”. कोर्टाचा आदेश म्हटल्यावर गंभीर चर्चा सुरू झाली. खरे कळले ते असे, की कोर्टाने ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणपती मूर्ती बंद करा असे म्हटलेले नव्हते, तर फक्त पाणी प्रदूषित होणार नाही असे बघा असा तो आदेश होता. कोर्टाचे ते म्हणणे ‘अंनिस’च्या 2005 च्या याचिकेवर होते, पण ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्ती करण्यावर बंदी असा संदेश सर्वत्र पसरला. त्याचा धसका मूर्तिकार आणि व्यावसायिक यांनी घेतला.

महाराष्ट्रातील ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ मूर्ती बनवणारे सर्व मूर्तिकार-कारखानदार 26 फेब्रुवारी 2019 रोजी पेण तालुक्यातील जोहा या गावी एकत्र जमले. त्यांनी त्या निर्णयाविरूद्ध कोर्टात जाण्याचे ठरवले; तसेच, पेणचे स्थानिक तेव्हाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी तो मुद्दा मंत्रिमंडळासमोर मांडला. त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहिर केले, की सर्व संबंधितांना एकत्र बसवल्याशिवाय ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बंद करणार नाही. सर्वसंमतीनेच काय तो निर्णय होईल.

पुढे त्या संबंधात उलटसुलट बातम्या येत राहिल्या. मीटिंग्ज झाल्या, पण ठोस निर्णय कधी झाला नाही. गणपती मूर्ती ‘माती’ आणि ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ या दोन्ही माध्यमांत बनत राहिल्या. त्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिली. पुढे, ‘कोरोना’ने जगातील सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला. त्यातून बाहेर पडल्यावर मात्र दिल्लीच्या ‘सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डा’ने ‘महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डा’ला आदेश देऊन, ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या विरूद्ध मोठी मोहीम पुन्हा उघडली. त्यावर कोर्ट-कचेऱ्या चालू आहेत. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर सध्या तरी सरकारकडून बंदी नाही.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती म्हणजे नेमकी कशी मूर्ती? कारण ते समजण्यातच घोटाळा होत आहे. प्रत्येक गोष्टीत काळाप्रमाणे बदल होत जातो. तो निसर्गनियम आहे. महाराष्ट्रातील गणेशमूर्ती बनवण्याच्या, त्याचे उत्पादन करण्याच्या पद्धतीतही गेल्या तीस वर्षांत अनेक बदल होत आलेले आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात आणून स्थापन करण्याची प्रथा महाराष्ट्रात फार जुनी आहे. अंगणातील माती काढून, ती चाळून, तिचा गोळा करून, हाताच्या पंजाइतका म्हणजे वीतभर गणपती जमेल तसा साकारावा आणि तो पाटावर ठेवून, त्याची विधिवत स्थापना करावी. दीड दिवसांनी त्याचे विसर्जन करावे अशी पूर्वापार पद्धत महाराष्ट्रात होती. समाजात प्रगती झाली. शिक्षण वाढले. कोणी इंजिनीयर तर कोणी डॉक्टर; तसेच, मूर्तिकारही तयार झाले. मूर्तिकाराने बनवलेली मूर्ती ही सर्वसामान्य माणसापेक्षा सुबक असणारच. प्रत्येक घरी स्वतः हाताने मूर्ती दरवर्षी करण्यापेक्षा मूर्तिकाराला मूर्तीची ऑर्डर देणे सोपे वाटू लागले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच गुजरातमधून कौले किंवा इतर वस्तू मुंबई–महाराष्ट्रात येत. बोटीत खाली बोटीचा तोल साभाळण्याकरता टाकलेल्या मातीच्या गोणी मुंबईत आणि पेणच्या अंतोरा बंदरात येत. मूर्तिकारांनी ती माती मूर्तींसाठी वापरून पाहिली. ती पांढरी ग्रे रंगाची माती ही चांगली पावडरसारखी स्वच्छ मऊ होती, चिकनमाती होती. ती माती मूर्ती करण्याकरता महाराष्ट्राच्या लाल मातीपेक्षा उत्कृष्ट अशी होती. ती ‘शाडू’ची माती मूर्ती करण्यासाठी सर्वमान्य झाली. गुजरातमधूनच मग मुद्दाम माती मागवणे सुरू झाले. मातीचे मूळ एकदा मूर्तिकाराने केले, की त्याच्यावर ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चा साचा पाडण्याचे तंत्र अवगत झाले. म्हणजे कलाकाराने एकदा मास्टर मॉडेल केले, की झाले. त्याच्या साच्यातून तशा अनेक मूर्ती तयार करता येऊ लागल्या. मातीच्या गणपती मूर्तींचे ‘प्रॉडक्शन’ होऊ लागले. मूर्तिकार मातीची मूळ मूर्ती कलात्मक रीत्या बनवतो, मग ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या साच्यातून अनेक मूर्ती निर्माण केल्या जातात. हे कित्येक काळापासून चालत आले होते. त्यानंतर ‘स्वस्तिक रबर कंपनी’ने रबरी साचे बनवणे सुरू केले. ते लोण पेणला 1955 च्या आसपास पोचले. मूळ कलाकाराच्या मॉडेलवर रबरी साचा पाडावा व त्याला ‘कव्हर’ म्हणून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चा साचा असतोच. त्या रबरी साच्यातून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती बनवण्याची सुरुवात झाली. रबरी साच्यातून मूर्ती दागिन्यांसकट मूळ कलावंतांनी केलेल्या मॉडेलप्रमाणे जशाच्या तशा निघू लागल्या. शिवाय, त्या मोठ्या प्रमाणात. सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींची उंची दरवर्षी वाढतच गेली. दोनतीन फूटांच्या वरील गणपतीमूर्ती मातीत करून ठेवणे शक्य होत नाही. त्याऐवजी ते ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मध्ये करणे सोपे पडते. कारण ते वजनाला हलके असते आणि फुटण्याची भीती नाही. अशा कारणांनी ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणपतीमूर्तींची निर्मिती आणि खरेदी-विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढली.

गणेशमूर्तीचे विसर्जन करतो तेव्हा मातीच्या गणेशमूर्ती थोड्या वेळात विरघळून तिचा गाळ होतो. मात्र ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ची गणपती मूर्ती पाण्यात लगेच विरघळत नाही. त्यामुळे काही दिवसांनी त्या मूर्तींचे हात-पाय-चेहरा वेगवेगळे होऊन समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी दिसतात. देवाची विटंबना होते व भावना दुखावल्या जातात. पण मातीच्या गणपती विसर्जनानेही पर्यावरणाची हानी होऊ शकते. कारण ती माती येथील नसून गुजरातची वेगळी अशी माती आहे. शिवाय, त्यामध्ये रंग असतात. त्यामुळे तेही पर्यावरणपूरक होत नाही. यावर एक उपाय म्हणजे प्रत्येक गावाने-शहराने तेथील म्युनिसिपालटीने विसर्जनासाठी पाण्याच्या वेगळ्या टाक्यांची व्यवस्था करणे आणि कोणालाही समुद्रात वा नदीत मूर्तींचे विसर्जन करू न देणे हा आहे.

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ (पीओपी) म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया. मी गेली वीस वर्षे युरोपातील अनेक देशांच्या वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये मूर्तिकलेच्या कार्यशाळा करत आलो आहे. तेथे माझ्याबरोबर युरोपीयन लोक मूर्ती करण्यास शिकतात. मी स्वित्झर्लंडच्या झुरीच या शहरामधील रीट्बर्ग म्युझियममध्ये मूर्तिकलेची कार्यशाळा प्रथम 2003 साली योजली होती. तेथे मार्केटमध्ये विविध तऱ्हांच्या मातीकामासाठी माती मिळते (मॉडेलिंग क्ले). मी एका दुकानात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ची मागणी केली. तेव्हा दुकानातील मुलगी म्हणाली, ‘पॅरिसचा काय संबंध? तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहात !’ अरे बापरे, मला तर अनेक वर्षे माती व ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मध्ये काम करूनही त्यासाठी दुसरा शब्द माहीत नव्हता. आपण ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ म्हणतो (पीओपी). मग कळले ते असे, की ब्रिटिश काळात गलबत प्लास्टर भरून मुंबईच्या किनाऱ्याला लागले. ते पॅरिसहून आले. म्हणून ब्रिटिशांनी त्या द्रव्याला म्हटले, ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’. आपल्याकडे तेच नाव रूढ झाले. इंग्रजीत त्याला फक्त प्लास्टर म्हणतात. वास्तवात ते आहे जिप्सम. त्यामुळे युरोपीयन प्रदेशात त्याला जीप्स किंवा गिब्ज म्हणतात आणि जिप्सम पाणी प्रदूषित करत नाही. उलट, शुद्धच करते ! मात्र ते मातीसारखे लगेच विरघळत नाही. त्याचे विघटन कालांतराने रेतीसारखे होते. माती काय किंवा प्लास्टर काय, ते वाहत्या पाण्यात गाळ बनून अडथळा होऊ शकते. ‘नॅशनल केमिकल लॅबोरोटरी’(एनसीएल)चा शास्त्रीय रिपोर्ट प्लास्टर हे पाण्याची हानी करत नाही, ते जिप्सम आहे आणि ते पाण्याला हानीकारक नाही असाच आहे. ते पोल्युशन कंट्रोल बोर्डालाही माहीत आहे. तरीही त्यांनी कोर्टाकडून आदेश आणणे चालू ठेवले आहे आणि त्याच्या विरूद्ध गणपती मूर्तिकार आणि व्यावसायिक यांच्याही कोर्ट केसेस चालू आहेत. त्या सर्व गदारोळात गणपतीची लोकप्रियता वाढत आहे आणि माती व प्लास्टर या दोन्ही माध्यमांतील मूर्तींची खरेदी-विक्रीही जोरात चालू आहे. त्यांचे प्रमाण प्लास्टरमधील मूर्ती ऐंशी टक्के तर मातीच्या मूर्ती वीस टक्के असे आहे.

पाण्याचे प्रदूषण करू नये हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. कोणत्याही केमिकल फॅक्टरीचे एक महिन्याचे वेस्टेज घेतले तर तितक्या प्रदूषणात गणपती विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणाची पंचवीसएक वर्षे जातील. कारण विसर्जन वर्षातून फक्त एकदा तीन-पाच दिवस होते. तेसुद्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. शिवाय, प्लास्टरचा फॉल्स सीलिंग किंवा इतर अनेक उद्योग यांत वापर होतच असतो आणि त्याचे वेस्टेज तयार होतच असते. परंतु गणपती मूर्ती हा महाराष्ट्राचा भावनिक आणि सांस्कृतिक विषय असल्यामुळे, दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये त्याला वर्तमानपत्रांतून (प्रिंट मीडिया) प्रसिद्धी मिळते व तो विषय त्यामुळे खूप मोठा भासवला जातो.

गणेशमूर्ती बनवण्यामुळे महाराष्ट्रात गेल्या काही दशकांत मोठा रोजगार तयार झाला आहे. फक्त पेण तालुक्यात दोन लाखांच्यावर तरुण बारा महिने गणपती मूर्ती बनवण्यावर त्यांची उपजीविका करत असतात. ते समृद्ध झाले आहेत. वाढत्या मार्केटने त्यांची भरभराट होत आहे. रंगवाले, टेम्पोवाले, फुलवाले, डेकोरेटर असे आणि ढोल-ताशे-नगारे-डीजेवाले (हे खरे ध्वनिप्रदूषणवाले) असे इतर उद्योगसुद्धा गणेशोत्सवामुळे भरभराटीला आले आहेत. फक्त पेण तालुक्यात या उद्योगासाठी या सीझनमध्ये मुख्य नॅशनल बँकांतून जवळजवळ चारशे कोटी रुपये ‘लोन’ म्हणून उचलले जातात आणि गणपती व्यवसायाची वार्षिक उलाढाल सहाशे कोटींच्या वर आहे. काहीजण प्लास्टरला पर्याय म्हणून ‘पेपर पल्प’चे गणपती करावे असे म्हणतात. ते तर बिलकूल योग्य ठरणार नाही. एक तर रद्दीपेपर पाण्यात टाकल्याने तो कुजतो. शिवाय, त्यातील गोंद वगैरे पदार्थ पाणी जास्त प्रदूषित करू शकतात.

काहीजण घरातील चांदीच्या गणपतीची पूजा करतात व सुपारी किंवा नारळ गणपती म्हणून विसर्जन करतात. काही तांबड्या मातीतच गणपतीचा आकार देऊन त्यात झाडाचे बीज टाकून कुंडीत विसर्जन करून त्याचे झाड करतात. काही मातीचे गणपती ठेवतात तर काही प्लास्टरचे. या सर्व प्रश्नांचे मूळ एकच आहे आणि त्याचे उत्तरही एकच आहे- ज्याला जशी आवडेल तशी व तशा माध्यमात गणपती मूर्ती करू द्यावी. कोणीही वाहणाऱ्या पाण्यात नदीत-समुद्रात किंवा विहिरीतही मूर्तींचे विसर्जन करू नये. प्रत्येक गावातील महानगरपालिकेने वर्षातून एकच दिवस कराव्या लागणाऱ्या या विसर्जनासाठी स्वतंत्र टाकीची व्यवस्था करावी आणि त्यात सर्व भक्तांकडून विसर्जन करून घ्यावे.

श्रीकांत देवधर 9423093202, deodharshri@gmail.com
कल्पना कला मंदिर, पेण, जिल्हा रायगड.
———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. वेगळी माहिती वाचायला मिळाली. प्लास्टर आणि पॅरिस खूप छान. ज्ञानात भर पडली…
    सगळ्यात जास्त आवडलं ते हे, की ज्याला जशी आवडेल तशी व तशा माध्यमात गणपती मूर्ती करू द्यावी. कोणीही वाहणाऱ्या पाण्यात नदीत-समुद्रात किंवा विहिरीतही मूर्तींचे विसर्जन करू नये. प्रत्येक गावातील महानगरपालिकेने वर्षातून एकच दिवस कराव्या लागणाऱ्या या विसर्जनासाठी स्वतंत्र टाकीची व्यवस्था करावी आणि त्यात सर्व भक्तांकडून विसर्जन करून घ्यावे. मी कलाकार नाही. पण तुमच्या कार्यशाळेत सहभागी व्हायला आवडेल किंवा आपली तयारी असेल तर सांगली परिसरात छान आयोजन करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here