दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा, मनात काहूर, कितीतरी दिवसांनी होणारी भेट… कदाचित परतभेटीची शक्यता मावळलेली असताना! मायलेकरांच्या त्या भेटीने उपस्थितांचे डोळेही पाणावले. ही मायलेकरे होती बिहारची आणि त्यांची भेट घडवून आणणारी व्यक्ती होती मुंबईची; ‘समतोल’ ह्या संस्थेसाठी काम करणारा कार्यकर्ता होता तो!
‘स’ म्हणजे समता, ‘म’ म्हणजे ममता, ‘तो’ म्हणजे तोहफा आणि ‘ल’ म्हणजे लक्ष्य. घरदार सोडून मुंबईच्या महासागरात आपणहून दाखल व्हायला आलेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्यांकडे परत नेऊन सोडणे हे ‘समतोल फाउंडेशन’चे लक्ष्य आहे.
आपण कल्पनाही करू शकणार नाही असे उपक्रम समाजात कुणीकुणी अपार कष्ट घेऊन सद्भावनेने राबवत असतात! ‘समतोल’ हा असाच एक आगळावेगळा प्रयत्न. २००६ आणि २००८ या दरम्यान घेण्यात आलेल्या पाहणीनुसार मुंबईच्या फक्त सी.एस.टी.रेल्वे स्टेशनात रोज दहा ते पंधरा घर सोडून आलेली मुले येतात. सी.एस.टी., कल्याण, कुर्ला आणि दादर ह्या स्टेशनांवर मिळून रोज शंभर ते दीडशे मुले मुंबईत दाखल होतात. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर अशी एक लाख ‘बेपत्ता’ मुले वर्षाला सापडतात. भारतात दहा लाख तरी ती असावीत.
आजची मुले भारताची भावी पिढी, भावी नागरिक आहेत ह्या गोंडस वाक्यातल्या भावी पिढीत मोठ्या प्रमाणात उद्याची गुन्हेगार (संभाव्य) पिढीही अंतर्भूत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे!
समाजाचा तोल बिघडलेला, बिघडत चाललेला आहे आणि वेळीच सावध व्हावे म्हणून विजय जाधव आपल्या परीने एकटेच ह्या समस्येवर काम करू लागले. विजय जाधव आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करून ‘गोदरेज’मध्ये काम करत होते. पण नंतर त्यांनी एम.एस.डब्ल्यू.पर्यंतचे शिक्षण घेऊन पूर्णवेळ ‘सामाजिक कार्यकर्ता’ बनण्याचे ठरवले.
त्यांनी रेल्वे स्टेशनच्या मुलांवर लक्ष ठेवून, त्यांच्यासाठी काम २००४ साली सुरू केले. कामाचा पसारा वाढत गेला. त्यात त्यांना समाजातल्या चांगल्या लोकांचा पाठिंबा मिळाला. प्रथम रेल्वे स्टेशन हेच ऑफिस होते. नंतर संस्थेचे एक विश्वस्त माधव जोशी (ठाणे) ह्यांचे घर हे संस्थेचे ऑफिस केले गेले. आणि आता, संस्थेचे दादर येथे ऑफिस आहे. संस्थेत वेतन घेऊन काम करणारे सोळा कार्यकर्ते आहेत.
‘मी आई-बाप खूप मारायचे म्हणून इकडे आलो. मग भंगार गोळा करणे आणि काही इतर सटर-फटर कामे करून रोज शंभर रुपयांच्या आसपास माझी कमाई होत असे. त्यांतले निम्मे मी जुगारावर खर्च करायचो. तीस-चाळीस रुपये व्यसनात आणि उरलेले खाण्या-पिण्यासाठी खर्च होत. अशा प्रकारे मी जगत होतो. मग ह्या संस्थेचा ‘दादा’ मला इकडे घेऊन आला आणि आता, मी खूष आहे. घरी परत जात आहे.’ दहा वर्षांच्या गोपाळचे हे प्रातिनिधीक बोल! मुलांचा संस्थेत येण्यापूर्वीचा भयावह जीवनक्रम थोड्याफार फरकाने सांगणारे. विनाशाच्या टोकाकडे झपाट्याने जाणार्याव मुलांचा तोल सांभाळण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते कष्ट घेत असतात.
मुंबईच्या बॉलिवूडचे, चकचकाटाचे आकर्षण, पालकांचे दुर्लक्ष, शैक्षणिक आबाळ, कधी अतिदारिद्र्य… आणि कधी प्रलोभन दाखवून पळण्यास प्रवृत्त करणाऱ्या वाईट लोकांच्या तावडीत सापडलेली मुले… कुठून-कुठून आणि कशा कशा कारणाने रेल्वेचा प्रवास करत मुंबईत दाखल होतात आणि रेल्वेचे फलाट हे त्यांचे घर बनते. ‘समतोल’ कार्यकर्ते सीएसटी, कल्याण, कुर्ला आणि दादर ह्या स्टेशनांवर आढळणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्याशी संवाद साधतात व त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतात. त्यांना ह्या कामात रेल्वे-कर्मचारी, पोलिस, स्टॉलधारक, अन्य सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, हमाल आणि अॅक्सिडेंट हमाल ह्यांची मदत होते. अपघातग्रस्तांना आणि अपघातांत मृत्यू पावलेल्या व्यक्तींना उचलणारे, मदत करणारे ते अॅक्सिडेंट हमाल! त्यांची मानसिकता वेगळीच, त्यांची मदत चोवीस तास उपलब्ध असते असा कार्यकर्त्यांचा अनुभव.
मुले राजी झाली की संस्था पोलिसांकडे जाऊन मुलांची नोंदणी करते आणि त्यांना ठाणे येथील ‘शेल्टर’मध्ये आणले जाते. ‘शेल्टर’ ही तात्पुरती राहण्याची सोय आहे, तेथूनच मुलांच्या पुनर्वसनाला सुरुवात होते. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी होते. व्यसनाधीनतेचे प्रमाण शोधण्यात येते. त्यांना वाईट सवयींपासून परावृत्त करायला सुरुवात होते. ‘शेल्टर’ची जागा ठाणे महापालिकेने ‘समतोल’ला भाड्याने दिली आहे.
क्षुल्लक भांडणे किंवा अन्य कोणत्यातरी कारणाने घरून पळून आलेली पण अजूनही न बिघडलेली व घराचा पत्ता लगेच सांगणारी मुलेही आढळतात. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन, त्यांना ‘शेल्टर’मध्ये बोलावून घेऊन, परत पोलिसांकडेच जाऊन त्या मुलांना आईबाबांच्या ताब्यात देण्यात येते. अशा मुलांची संख्यापण खूप आहे.
बाकीच्या मुलांसाठी चार टप्प्यांत चार ते सहा आठवड्यांचे ‘मनपरिवर्तन शिबिर’ मुरबाडजवळ मामणोली येथे घेण्यात येते. पहिला टप्पा असतो, तो जीवनातले शिस्तीचे महत्त्व पटवून देण्याचा, अनेक दिवस उघड्या जगात वास्तवतेचे चटके खाऊन हीनदीन आणि असुरक्षित जीवन जगलेल्या मुलांना, ह्या वास्तव्यात एकत्र, सुरक्षित वातावरणात राहण्याचा अनुभव मिळतो. त्यांच्या मनात त्यांच्या घराची आठवण जागृत होऊन त्यांनी घरी परतावे हा प्रयत्न शिबिरात होतो. दुसरा टप्पा असतो तो मुलांना चांगले आणि वाईट ह्यांतला फरक समजावण्याचा. आपल्या कल्पनेतले जग शोधण्यासाठी घराबाहेर पडलेली ही मुले, लहान वयात आईबाबांशिवाय उघडी पडलेली असतात. त्यांना समाजातल्या वाईटपणाचे दर्शन घडलेले असते ती उपेक्षेची धनी असतात. म्हणून मुलांना नीतिमूल्ये, चांगुलपणा वगैरेची ओळख करून देत त्यांच्यातून चांगली व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न होतो.
तिसरा टप्पा असतो तो नात्यांचे महत्त्व पटवून देण्याचा. विशेषत: मुलांना त्यांच्या वाढत्या वयात त्यांच्या आई-वडिलांची भूमिका काय असते आणि काय असावी व मुलांनीही कसे वागायला पाहिजे ह्याचे मार्गदर्शन केले जाते. वेगवेगळ्या साधनांनी कौटुंबिक जीवनाची महती आणि महत्त्व मुलांना सांगण्यात येते. मुलांनापण पपेट-शो वगैरे करून जीवनातले प्रसंग सादर करायला लावतात. त्यामुळे त्यांना अंतर्मुखता लाभू शकते.
चौथा टप्पा असतो जीवनाचे महत्त्व विशद करण्याचा. जगण्यासाठी ध्येय असावे, दिशा असावी हा विचार पक्का करण्याचा. यशस्वी लोकांना बोलावून त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या जीवनाची वाटचाल मुलांना त्यांच्याबरोबरच्या संवादातून दाखवून त्यांच्या मनात जीवनाबद्दल सकारात्मक, दृष्टी निर्मांण करण्याचा प्रयत्न असतो.
शिबिराच्या शेवटी ‘मनपरिवर्तन’ झालेली मुले समारंभानंतर घरी जाण्यासाठी निघतात. स्थानिक नेते, व्यक्ती, पोलिस, देणगीदार आणि मुलांचे आईवडील समारंभाला हजर असतात. आईवडिलांना मुलांची ‘परतभेट’ हा तोहफा पोलिसांच्या उपस्थितीत कायदेशीरपणे दिला जातो. कार्यकर्त्यांच्या कष्टांची पूर्तता त्या दिवशी होते. साधारणपणे, पंचवीस मुले एका शिबिरात असतात. वर्षाकाठी चार ते पाच शिबिरे होतात व तेवढी मुले आपापल्या घराकडे परततात.
बालहक्क सांगतो की मुलांनी आई-बाबांकडे राहणे हा त्यांचा हक्क आहे आणि ते आईवडिलांचे कर्तव्य आहे. मुलांच्या कल्याणासाठी अशा मुलांच्या आई-वडिलांचे समुपदेशन करण्याचे काम ‘समतोल’ संस्था करते. मुलांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोचवल्यावर त्यांनाही चांगल्या प्रकारे समजावण्यात येते. संस्थेतर्फे पोलिसांसाठीही कार्यशाळा घेण्यात येतात. पोलिस जेवढ्या संवेदनशीलपणे अशा मुलांकडे पाहतील तेवढी ही समस्या दूर होण्यास हातभार लागेल. असे संस्थेतील कार्यकर्त्यांना वाटते.
सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात बालसुधारगृह असते आणि तिथे पळून घराबाहेर पडलेल्या मुलांना नेण्यात येते. त्या मुलांनी परत घरी जावे किंवा काही करावे हे पोलिसांच्या कक्षेत नाही आणि अपु-या संख्याबळामुळे व कमजोर इच्छाशक्तीने त्यांना ते शक्यही होत नाही. तर ‘समतोल’ आपल्या ताब्यात तिथल्या मुलांना घेऊन त्यांना स्वेच्छेने त्यांच्या आई-बापापर्यंत पोचवण्याचे काम करते. आईवडिलांना जर येथे येणे शक्य नसेल तर कार्यकर्ते मुलांना घेऊन त्या गावापर्यंत जातात. स्थानिक पोलिसांच्या आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत मुलांना आई-वडिलांकडे सुपूर्द करतात.
संस्थेचे अध्यक्ष आणि कामाच्या मूळ कल्पनेचे प्रणेते विजय जाधव सांगतात, की संस्थेच्या प्रयत्नांतून २००४ ते २०११ पर्यंत पंधराशे मुले आपापल्या घरी गेली आहेत. या कामासाठी पैसे तर लागतातच, ते समाजाकडून मिळतातही, काही मोठ्या संस्थापण प्रायोजक होतात, पण खरी गरज आहे ती प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची. त्यांचे सध्याचे साथीदार आहेत नितीन, उर्मिला, लता, अमित वगैरे.
त्यांनी सांगितले की घरच नसलेली किंवा कोणत्याही परिस्थितीत घरी जाणारच नाही असे म्हणणा-या मुलांना आश्रमशाळेत ठेवण्यात येते. ‘प्लॅटफार्म ज्ञानमंदिर’ ही शाळा विश्व हिंदू परिषदेतर्फे नागपूर येथे चालवण्यात येते, तिथेही ह्या मुलांना पाठवण्यात येते. आतापर्यंत अडसष्ट मुले तिथे गेली आहेत. विजय जाधव ह्यांची इच्छा अशी शाळा मुंबईतही सुरू करण्याची आहे.
विजय जाधव व त्यांचे साथीदार कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्या कार्याची माहिती ऐकताना मला विवेकानंदांचे वाक्य आठवले, ते असे: स्वामी विवेकानंद म्हणतात, समाजात दुर्गुणी, वाईट माणसे मोठ्या प्रमाणात एकत्र येतात आणि चांगली माणसे एकत्र येत नाहीत. म्हणून कुमार्गाने जाणा-या मुलांची संख्या जास्त आहे.
ज्योती शेट्ये ९८२०७३७३०१ jyotishalaka@gmail.com
समतोल फाउंडेशन
१/४, अहमद उमर बिल्डिंग,
डॉ. डिसिल्वा रोड, दरबार हॉटेल समोर,
दादर (प), मुं.- ४०००२८
(०२२) २४३७४३१६
samatolfoundation@gmail.com
www.samatol.in
Aapl kam kharokharach Ya
Aapl kam kharokharach Ya Deshala Pragatipathavar nenare aahe.
yasathichya Aaplya Tyagala Rashtra Kadapihi Visru Shaknar nahi.