चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी

0
274

झोलाईदेवीचे प्रसिद्ध मंदिर दापोली तालुक्याच्या माटवण या गावी आहे. झोलाईदेवीला दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील चौऱ्याऐंशी गावांची मालकीण म्हणून संबोधले जाते. झोलाईदेवीचा उत्सव होळी पौर्णिमेला धुमधडाक्यात साजरा केला जातो.

कोकणात पहिली होळी फाल्गुन शुक्ल पंचमीला पेटवली जाते. झोलाईदेवीची पालखी त्यानंतर सहाव्या दिवशी माटवणमधील मंदिरातून निघते. एक गावठे, एक गुरव, तीन-चार खेळी आणि पाच वाजेकरी अशा दहा जणांचा ताफा पालखीबरोबर असतो. पालखी पुढील पाच दिवस फिरत राहते- सतरा गावांना भेट देते. त्यामध्ये पुढील गावांचा समावेश असतो – वडवली, हातीप, टांगर, कुडावळे, कादिवली, वेळवी, पीचडोली, देहेण, चांदिवणे, सुकोंडी, चाचवली, मुरडी, कोंगला, ताडील, बाणतीवरे, साकुर्डा आणि भानघर. त्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या वाड्या आहेत, पण तेथे मात्र पालखी काही मानकऱ्यांच्या घरीच भेट देते. गावातील सर्व महिला त्या ठिकाणी जाऊन देवीची ओटी भरतात.

पालखीच्या प्रवासादरम्यान, झोलाईदेवी तिचा भाऊ भैरवनाथ यांची भेट ताडील या गावी घेते. पाच दिवसांचा प्रवास करून पालखी होळी पौर्णिमेच्या रात्री भानघरला पोचते. तिकडे झोलाईदेवी तिच्या दोन बहिणी- करजाईदेवी आणि काळकाईदेवी यांची भेट घेते. त्यावेळीही ओट्या भरल्या जातात.

झोलाईदेवी दोन बहिणींचा निरोप घेऊन मग पुन्हा माटवणच्या दिशेने पालखीतून निघते. झोलाईदेवी मंदिराजवळ मोठा होम होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पेटवला जातो. होम पेटवण्याचा मान असतो. पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दुपारी साणा भरल्या जातात.

त्याच संध्याकाळी, झोलाईदेवी आणि तिचा भाऊ म्हणजे खेमदेव यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. त्या वेळी दोन्ही पालख्या एकाच वेळी नाचवल्या जातात. मग भाऊ खेमदेव बहिणीची म्हणजेच झोलाईदेवीची पालखी घेऊन वडवली या गावात जातो अशी प्रथा आहे. वडवली गावात ओट्या भरल्या जातात आणि मग, झोलाईदेवीची पालखी वाजतगाजत परत माटवण गावी येते. त्यानंतर झोलाईदेवीची पालखी नवानगर, कोंथळकोंड, माटवण गावठाण आणि मोरेवाडी या वाड्यांमध्ये दोन दिवसपर्यंत घराघरामध्ये जाते. पालखी होळी पौर्णिमेनंतरच्या चौथ्या दिवशी सकाळी पाचवली या गावात भैरीदेवी या तिच्या बहिणीला भेटण्यास जाते. तेथे पालखी पाच मानकऱ्यांच्या घरी जाते, त्यावेळी तेथेही ओट्या भरल्या जातात. झोलाईदेवी, चौंडाईदेवी, मानाईदेवी, वाघजाईदेवी आणि वरदायिनीदेवी या पाच बहिणी आहेत. त्या पाचही जणींची मंदिरे माटवणमध्ये आहेत. पालखीत झोलाईदेवी, चौंडाईदेवी, मानाईदेवी आणि वरदायिनीदेवी या चार देवींच्या चांदीच्या मूर्ती असतात. त्या प्रत्येक मूर्तीचे वजन जवळ जवळ एक किलो आहे. चांदीच्या चार मूर्ती 2009 साली नवीन बनवण्यात आल्या. पालखीत तांब्याची शंकराची पिंडदेखील असते. पालखी सागाची बनवलेली आहे. ती 1994 साली नवी करण्यात आली. त्यापूर्वीची पालखी जवळ जवळ शंभर वर्षे जुनी होती. ती झोलाईदेवीच्या मंदिरात पाहण्यास मिळते.

मोरेवाडीचे दत्ताराम रूमाजी मोरे हे गावठे म्हणून मंदिराचे काम 1992 पासून पाहत होते. ते 2022 साली निधन पावले. रोजची पूजा करण्याचा मान गुरवांचा असतो. मोरेवाडीमधील आबा मोरे यांनी पहिले गावठे म्हणून काम पाहण्यास दोनशे वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्यानंतर गोविंद मोरे, भवाना मोरे, दाजी मोरे, महादेव मोरे (माटवण गावठाण), दत्ताराम दाजी मोरे, सहदेव मोरे या सर्वांनी गावठे म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

झोलाईदेवीचे मंदिर हे दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत गवतारू अर्थात गवताचे होते. मातीच्या भिंती असलेले कौलारू मंदिर 1960 साली बांधले गेले. मदिराचे चिऱ्यांचे बांधकाम माटवण पंचक्रोशीतील गावांनी मिळून 1974 साली केले. होळीची तयारी दोन महिने आधीपासून होते. पालखी गावागावात फिरत असताना झोलाईदेवीच्या मंदिरात गावचे कार्यक्रम सुरू असतात. देवीचे खेळे चौऱ्याऐंशी गावांत जाऊन देवीचा महिमा शिमग्यात लोकांना सांगतात. त्यामुळे देवीचे मुंबई, पुणे व चौऱ्याऐंशी गावांतील भक्त गर्दी करतात.

झोलाईदेवी मंदिराच्या आवारात प्राचीन शिळा पाहण्यास मिळतात. त्या शिळा साधारण शिळा नसून त्या ‘गद्धेगळ’, ‘सती शिळा’ आणि ‘वीरगळ म्हणून ओळखल्या जातात.

प्रसाद संभाजी महाडिक (नवानगर) 9869655717 prasadrajemahadik@gmail.com

———————————————————————————————————————————–

या लेखात झोलाईदेवी आणि खेमदेवाची कहाणी अपेक्षित आहे. तसेच, झोलाईदेवीचे भाऊ आणि बहिणी किती असा खुलासा आवश्यक आहे. वाचकांकडे यासंबंधी माहिती असल्यास जरूर पाठवावी.

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here