वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर

1
275

राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व !

शेवाळकर यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी अचलपूर (जिल्हा अमरावती) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूरच्या नगरपालिका व खासगी माध्यमिक विद्यालयांत झाले. ते शालांत परीक्षा 1948 साली सिटी हायस्कूल, अचलपूरमधून उत्तीर्ण झाले. ते अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून बी ए झाले. त्यांनी एम ए (संस्कृत) व एम ए (मराठी) नागपूर विद्यापीठातून केले. ते एम ए मराठीला प्रथम श्रेणीत आले व त्यांना ना.के. बेहरे सुवर्णपदक मिळाले.

      शेवाळकर यांनी शिक्षक म्हणून शासकीय प्रशाला, (वाशिम) येथे काम केले (1954-55). त्यांनी प्राध्यापक म्हणून यवतमाळ (1955-57) व नांदेड (1957-65) येथे अध्यापन केले. ते निवृत्त प्राचार्य म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयातून (वणी) झाले (1965-88).

पांडित्य आणि काव्य यांचा वारसा शेवाळकर यांना उपजत लाभला. तो त्यांनी त्यांच्या व्यासंगाने आणि अनुभव समृद्धतेने वर्धिष्णु केला. त्यांनी प्राचीन व अर्वाचीन साहित्याची पिढीजात रूची आणि अभिरूची जोपासली. त्यांचे घराणे वेदशास्त्रसंपन्न व कीर्तन-पंडितांचे. त्यांचे पणजोबा रामशास्त्री हे व्युत्पन्न पंडित होते. पणजोबा संस्कृत व मराठी पद्यरचना करत. ‘संचित’ हे त्यांचे पद्यसाहित्य उपलब्ध आहे. शेवाळकर यांचे पिताश्री बाळकृष्णबुवा कीर्तन-आख्यानकार म्हणून प्रसिद्ध होते. स्वत: राम यांना वृत्तबद्ध काव्य करण्याचा छंद बालपणापासून होता. त्याची परिणती त्यांच्या रसास्वादी वृत्तीत होऊन त्यांचे काव्यसंग्रह – ‘असोशी’, ‘रेघा’ व ‘अंगारा’ हे – रसिकांसमोर आले. त्यांचा काव्यजोश अध्ययन-अध्यापन व शैक्षणिक प्रशासन या काळात मंदावला. तरी व्याख्याने आणि आस्वादात्मक ललित गद्य व समीक्षात्मक लेखन बहरास आले. त्यांची चतुरस्रता वाणी-लेखणीवरील हुकूमी प्रभुत्वामुळे व्यापक झाली. त्यांच्या लेखनाला त्यांच्या जीवनात आलेल्या व त्यांचे जीवन सुगंधित करणाऱ्या व्यक्तित्वांचा ठसा प्रेरक ठरला. त्यांची लेखणी जवळीक साधलेल्या महानुभावांच्या प्रकाशपूजनात कृतार्थता मानणारी आहे. ते शालीन ऋजुतेने व्यक्तीचे नेत्रदीपक पैलू लखलखीतपणे मांडत; त्याच वेळी, न भावलेले कंगोरेही निर्देशित करत. शेवाळकर यांनी व्यक्तिरेखाटन सुसंस्कृतपणे कसे शब्दबद्ध करावे याचे संकेत निर्माण केले.

त्यांच्यावर धार्मिक संस्कार व शुचिता जन्मजात. त्यांचे पाठांतर आणि समयसूचकता तल्लख. त्याची परिणती त्यांच्या आस्वाद्य विषयाशी एकनिष्ठ आणि आत्मनिष्ठ होण्यात झाली. त्यांना प्रबोधनात्मक जिव्हाळ्याने ‘या हृदयीचे त्या हृदयी’ संक्रमित करणारी, मन आणि बुद्धी उज्ज्वल करणारी वाणी लाभली. त्यांच्या लेखनाचे भाषावैशिष्ट्य साध्या, सोप्या आणि नादमय शब्दकळेने अवघड विषय सुगम, आनंदी करणे हे होय; तर त्यांच्या वक्तृत्वाचे व्यवच्छेदक लक्षण सुबोध, ओघवती, लडिवाळ आणि अर्थमधुर ओजस्वी रसाळ वाणी हे होय. त्यांनी भाषणांच्या निमित्ताने गोंदिया ते गोवा आणि नागपूर ते नांदेड असे भ्रमण केले. त्यांच्या वाणीतून बेहोश करणारे श्राव्यगद्य पाझरत असे. त्यांच्या व्याख्यानांत विषयवैविध्य होते, पण विषयांचे घराणे एकच होते -‘महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, रामायणातील राजकारण, ज्ञानेश्वरीतील चिद्विलास, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास, योगेश्वर श्रीकृष्ण’ असा त्यांचा गट करता येईल. त्यांचे विचारधन संस्कारशील भारतीय व मराठी मनास रुचणारे होते. त्यांच्या भाषणांच्या ध्वनिफिती सुमारे दोन डझन प्रकाशित आहेत. त्यांनी संस्कृत साहित्यातील रसास्वाद जसा धुंदपणे चाखला तसाच तो त्यांनी त्यांच्या वाणी-लेखणीच्या अनवट शैलीने सजीव केला व वाचक-श्रोत्यांना भरभरून दिला.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साहित्य आणि संस्कृती यांचा मनोज्ञ संगम होता. ते भारतीय संस्कृतीचे आस्वादक आणि रसिक भाष्यकार म्हणून विख्यात होते. शेवाळकर यांचे ललित लेखन वाचकाला नवी टवटवी आणि प्रफुल्लता देणारे आहे. त्यांचे चिंतन विषय, व्यक्ती, प्रसंग रोजच्या जीवनातील असून त्यातील अघटित, मृत्यूची अनिवार्यता आणि मानवी हतबलता यांवरील चिंतनगर्भ भाष्य लालित्यपूर्ण तरीही आटोपशीर असे आहे. त्यांच्या ललित गद्यात जीवनातील मांगल्य आणि शुचिता यांचा प्रत्ययकारी आस्वाद आढळतो.

शेवाळकर ठळकपणे लक्षात राहतात ते ‘ज्ञानेश्वरीचे निरूपणकार’ म्हणून. मास्टर दीनानाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या ‘अमृताचा घनु’ या सूरतालमय, देश-विदेशात विख्यात झालेल्या कार्यक्रमाला शेवाळकर यांच्या रसाळ आणि लावण्यसुंदर निरुपणाची पार्श्वभूमी होती. त्यांनी ज्ञानेश्वरांचा अभंगाविष्कार चकोर वृत्तीने रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या निरुपणात साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र व अध्यात्म यांचे अपार्थिव दर्शन घडते.

शेवाळकर यांनी संपादन आणि समीक्षा या साहित्य प्रांतात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी तमाम मराठी रसिकांना विदर्भातील दुर्लक्षित लेखक व संशोधक यांचे वाङ्मयीन कार्य व लेखन संपादनाच्या निमित्ताने सादर केले. शेवाळकर यांनी संपादित केलेले विशेष ग्रंथ म्हणजे ‘विदर्भ केसरी लोकनायक बॅरिस्टर मा. श्री. तथा बापूजी अणे यांचे वाङ्मयीन लेखन, डॉ. य.खु. देशपांडे यांचे संशोधन लेखन, आचार्य विनोबा भावे यांचे शिक्षणविचार, वा.ना. देशपांडे यांचे स्फूट लेखन, कवी गु.ह. देशपांडे यांची कविता’ हे होत.

वाङ्मय-संस्कृती-शिक्षण क्षेत्रातील रसिक, मर्मज्ञ आणि ज्येष्ठ असे व्यक्तिमत्त्व वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षी, 3 मे 2009 रोजी अनंतात विलीन झाले. रसिक श्रोते-वाचकांचा ‘राम’च जणू अंतर्धान पावला !

प्राचार्य राम शेवाळकर (जन्म 2 मार्च 1931, मृत्यू 3 मे 2009)

साहित्य

काव्य 1. असोशी, 2. रेघा, 3. अंगारा

लेखसंग्रह 1. त्रिदल, 2. अग्निमित्र, 3. रूचिभेद, 4. सारस्वताचे झाड, 5. आकाशाचा कोंब, 6. द्वादशी, 7. अमृताचा घनु

ललित लेखन –  1. अमृतझारा, 2. पूर्वेची प्रभा, 3. देवाचे दिवे, 4. तारकांचे गाणे,

  1. प्रसन्नतेचा मूक कटाक्ष

आत्मचरित्र 1. पाणियावरी मकरी

संस्कृतनाट्य आस्वाद – 1. कालिदासाचे शाकुंतल, 2. भासाचे स्वप्न,

  1. मालविकाग्निमित्र

संपादने 1. अक्षरमाधव : खंड – 1, 2 (लोकनायक अणे वाङ्मयीन लेख 1969 ते 80),

  1. शिक्षणविचार (विनोबांचे शिक्षणविषयक विचार 1955), 3. यशोधन (डॉ. य.खु. देशपांडे – संशोधन लेख), 3. त्रिविक्रम (वा.ना. देशपांडे यांचे स्फुट लेख – खंड 1, 2, 3),
  2. घटप्रभा (कवी गु.ह. देशपांडे यांची कविता), 5. श्रीवत्स (वार्षिकांक-प्रकाशन, संपादन 1988-1993)

अरविंद ब्रह्मे

6/12, परिमल अपार्टमेंट्स, स.न. 28, दामोदर इस्टेट, कर्वे नगर, पुणे- 411 052

———————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. प्रा. राम शेवाळकर यांची सखोल ओळख या लेखात कमीत कमी शब्दात लेखकाने करून दिल्याने खूप वाचनीय झाला आहे. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here