विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)

0
340

गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत केला जातो. राजस्थानी दाल बाटीमधील बाटीचाच एक प्रकार म्हणजे विदर्भातील पानगे/रोडगे…

विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीच्या वेगळेपणातील पदार्थ म्हणजे पानगे/रोडगे. तो पदार्थ मराठवाड्यातही आहे. तेथे त्यास ‘बट्टी’ असे संबोधतात. पानगे/रोडगे हा पूर्व विदर्भातील भातप्रधान पट्टा वगळला तर सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय.

दिवाळी संपली, मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात देवाजवळ, कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत केला जातो. गावात पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी कोणाच्या ना कोणाच्या शेतात पानग्याचा बेत असतो. त्या दिवशी कोणाच्या शेतात पानगे/रोडगे आहेत, कोणाकडे आमंत्रण आहे याची वाट पाहिली जाते! चैत्र, हनुमान जयंतीशिवरात्र याप्रसंगी पानगे आवर्जून केले जातात. हनुमान जयंतीला तर काही ठिकाणी प्रत्येकाच्या घरी पानगे असतात.

पानगे/रोडगे याकरता गव्हाचे पीठ थोडे जाडसर दळून आणतात. त्यात मीठ टाकून ते भिजवतात व त्या गव्हाच्या पीठाचे आतून तेल लावून गोळे केले जातात. गोळे करताना तेल वरून लागू नये याची काळजी घेतली जाते. कारण वरून तेल लावल्यास ते जळतात. गोवऱ्या पेटवून त्याचे निखारे फुलवतात. त्या गोवऱ्यांच्या निखाऱ्यास ‘जग्र’ असे म्हणतात. गोवऱ्या पेटवून त्यांचे चांगले निखारे झाल्यानंतर कणकेचा गोळा त्या निखाऱ्यावर ठेवला जातो. गोवऱ्या जळत्या व धुपट निघत असताना कणकेचे गोळे ठेवले जात नाहीत. गोळे निखाऱ्यावर ठेवल्यानंतर त्यांना सतत परतावे लागते. परतावले नाही तर ते जळण्याची शक्यता असते. पानगे/रोडगे शेकण्याची कला काहींना अवगत असते. कारण धगधगत्या निखाऱ्याची प्रचंड आच व धुपटाने डोळ्यांची आग होत असते. गोळे वरून शिजल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना त्याच गोवर्‍यांच्या गरम राखाडीत दाबतात. पानगे व वरून त्यावर गरम राख टाकून वीस-पंचवीस मिनिटे ठेवतात, त्यांना नंतर बाहेर काढतात. त्यांना चांगले पुसून काढले जाते. पानगे/रोडगे तयार झाल्यानंतर बटाटे-वांग्याची रस्सेदार तर्रीची भाजी, कढी आणि तुरीच्या डाळीचे वरण व त्यावर कच्चे तेल असा मस्तपैकी बेत असतो. अगदी लहानथोर त्यावर यथेच्छ ताव मारतात. जेवणानंतर सारखी तहान लागते. जसे पाणी प्याल, तसे पानगे/रोडगे त्याची करामत दाखवत असतात. म्हणजे आमच्या भाषेत ‘जीव पाणी पाणी करते व पानगे सुरावते.’

पानगे व रोडगे यांतील भेद म्हणजे वर्धायवतमाळनागपूर या जिल्ह्यांतील काही भागांत त्या पदार्थाला पानगे असे म्हणतात. तर ऊर्वरित यवतमाळअमरावतीअकोला, बुलढाणा जिल्ह्यांत त्यास रोडगे असे म्हणतात. पानगे आणि रोडगे यांच्या बनवण्याच्या पद्धतींत सूक्ष्म बदल आहे. तो म्हणजे पानग्यांमध्ये एकच जाड चपाती करून आतमध्ये तेल लावून त्याचा गोळा केला जातो किंवा जाड चपातीच्या आत छोटासा गोळा करून टाकला जातो. त्यास ‘डोलाचा पानगा’ असे म्हणतात. असा पानगा म्हाताऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना चावण्याचा त्रास होतो, दात नाहीत यांच्याकरता केला जातो. गव्हाच्या पिठात फक्त मीठ टाकले जाते. मात्र तेच रोडगे करताना गव्हाच्या पिठात पीठ भिजवताना ओवा-तेल टाकले जाते. तसेच, चारपाच जाडसर चपात्या एकावर एक ठेवून, त्यावर तेल लावून मग त्यांचा एक गोळा केला जातो. त्यात रोडगा शिजल्यानंतर वेगवेगळे पापुद्रे निघतात. तसेच, ओव्यामुळे एक वेगळा ‘फ्लेवर’ येतो. पानगे हे मुख्यतः महिला शिजवतात. मात्र अमरावती, अकोला या दोन जिल्ह्यांत रोडगे शिजवताना पुरुष मंडळी दिसतात. गावात रोडगे शेकणारी ठरलेली माणसे असतात. तेच रोडगे शेकण्याचे काम करतात. एखाद्या घरगुती कार्यक्रमातही रोडगे हे असे पुरुषच शेकण्याचे काम करत असतात. एवढाच त्या दोन्हीमध्ये जाणवणारा भेद आहे. बाकी सोबतीला बटाटे-वांग्याची भाजी, कढी, तुरीचे वरण हे सर्वत्र आहे. त्याची लोकप्रियता ही सार्वत्रिक आहे.

– श्रीकांत धोटे  95117 83236 shrikantdhote29@gmail.com

—————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here