पूर्व आशियातील हिंदू राज्ये व हिंदू संस्कृती (How Hindu empires got spread in Far East Asia)

0
117

भारतीयांचा आग्नेय आशियाशी संबंध प्राचीन काळापासून होता; इसवी सनापूर्वीच्या काही शतकांपासून तर तऱ्हतऱ्हेचा व्यापार चालत होता. त्या सगळ्या प्रदेशाला सुवर्णभूमी असे संबोधले जाई. अरब व्यापाऱ्यांना भारताची ओढ असायची; तसेच, आकर्षण भारतीय व्यापाऱ्यांना आणि दर्यावर्दी खलाशांना त्या भागाचे होते. रोमन साम्राज्यापासून ते चीनपर्यंत जो जागतिक व्यापार त्या काळात चालत होता, त्यामध्ये आग्नेय आशियाला स्थान महत्त्वाचे होते. त्या व्यापाराचे मुख्य मार्ग दोन होते. एक म्हणजे तिबेटच्या पठारावरून जाणारा ‘सिल्क रूट’ आणि दुसरा म्हणजे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांतून जाणारा जलमार्ग. भारताच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील व्यापाऱ्यांना ‘सिल्क रूट’च्या व्यवहारात सहभागी होणे दुरापास्त होते. शिवाय, ‘सिल्क रूट’ रानटी टोळ्यांमुळे सुरक्षित राहिला नव्हता. त्या तुलनेत सागरी मार्ग भरवशाचा होता. मान्सून वाऱ्यांच्या ज्ञानामध्ये, जहाज बांधणीच्या कौशल्यात आणि नौकानयन शास्त्रात जसजशी प्रगती होत गेली, तसतसा आग्नेय आशियाचा सागरी व्यापार भरभराटीला आला. तर ही जहाजे बंगालमधील ताम्रलिप्ती, ओदिशामधील पालुरा (गोपाळपूर) आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील मच्छलीपट्टनम्‌ ह्या बंदरांतून निघत; शिवाय, गुजरातमधील भडोच किंवा कोकणातील चौल वा शूर्पारक (आजचे नाला सोपारा) या बंदरांतून निघून, सिलोनला वळसा घालूनही जात असत. त्यामुळे दोन्ही किनार्‍यांवरील व्यापारी त्या व्यापारात हिरिरीने सहभागी होत.

त्या व्यापारी संपर्काचा पहिला पडाव मलाय द्वीपसमूहातील सुमात्रा हा होता (इंडोनेशियाचा पूर्व भाग). नकाशावर पाहिले तर कळेल, की बंगालच्या उपसागरातून निघाल्यावर सर्वात जवळची बंदरे ही सुमात्रामधील आहेत. त्यामुळे पहिला व्यापारी संपर्क हा सुमात्राशी झाला. सुमात्रालाच सुवर्णद्वीप असेही म्हणत. तेथे आल्यानंतर एक तर मलाय सामुद्रधुनीतून वळसा घेऊन चीनच्या दिशेने जाता येत होते किंवा थायलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरून खुश्कीच्या मार्गाने थायलंडच्या आखातात जाता येत होते. तेथे पोचल्यानंतर दक्षिण चीनच्या समुद्रातून फुनान प्रांतात (कंबोडिया-व्हिएतनाम) जाण्याचा मार्ग खुला होत होता.

तो व्यापार भरभराटीला येण्यास सुरुवात इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापासून झाली होती. त्या वेळी भारतात आग्नेय दिशेच्या किनार्‍यावर पल्लव राजांचे, तर पश्चिम किनार्‍यावर सातवाहनांचे आधिपत्य होते. त्या राजांनी त्या व्यापाराला आश्रय दिला होता. भारतीय लोक भारताच्या आग्नेय दिशेच्या किनाऱ्यांवरून फार मोठ्या संख्येने ब्रह्मदेश, थायलंड, फुनान, कंबोज आणि इंडोनेशिया या भागांत स्थलांतरित होत होते. त्या स्थलांतराची पद्धत विशिष्ट होती. सुरुवातीला, व्यापारी मुख्यत्वेकरून जात. त्यांना आकर्षण त्या भागांतील केवळ सोन्याचे नाही, तर सोन्यासारखा भाव देणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांचे होते. त्यांचा संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर नशीब काढण्याकरता उद्युक्त झालेले साहसवीर जात. त्यांच्या पाठोपाठ बौद्ध भिक्षू आणि ब्राह्मण पंडित जात. ज्यांना काही ना काही कारणाने हा देश सोडणे भाग पडले आहे, असे परागंदा लोक किंवा बंडखोर राजपुत्र यांनी त्या भूमीचा आश्रय केला. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथेच राहत, तेथील स्त्रियांशी लग्ने करत आणि त्यांची वसाहत तेथे निर्माण होई.

भारतीयांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, की त्यांच्याजवळ प्रभावशाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामध्ये अध्यात्म, धार्मिक तत्त्वज्ञान, यज्ञयागादी पूजाविधी यांच्यासोबत साहित्यभाषा, व्याकरण, खगोलशास्त्र,  स्थापत्यशास्त्र,  नौकानयनशास्त्र,  आयुर्वेद, युद्धशास्त्र, मूर्तिकलाशिल्पकलानृत्यकलासंगीत अशा विविध गोष्टींचा संगम झालेला होता. त्यांच्या तुलनेत त्या भागातील लोक हे फारच साधे होते. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई.

भारतीय लोकांच्या अनेक वसाहती ह्या केवळ ब्रह्मदेश आणि थायलंड नाही; तर इंडोनेशियाच्या जावा, सुमात्रा, बाली; दक्षिण व्हिएतनाम आणि कंबोडिया या भागांमध्ये अशा तऱ्हेने इसवी सनाच्या पहिल्या पाच शतकांपर्यंत निर्माण झाल्या होत्या. हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली ! प्रख्यात इतिहासकार रमेशचंद्र मजुमदार यांनी त्याविषयी विस्ताराने लिहिलेले आहे. त्यांनी त्यांच्या ‘हिंदू कॉलनीज इन द फार ईस्ट’ या पुस्तकात एका जावानीज अभिलेखाचा पुरावा देऊन म्हटले आहे, की कलिंग (ओदिशा) देशाच्या राजपुत्राने सुमारे वीस हजार कुटुंबे जावा बेटावर पाठवली होती आणि इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात राजा देववर्मन ह्याच्या आधिपत्याखाली तेथे हिंदू राज्य निर्माण झाले होते. (इंटरनेट प्रत/1944;21-22). ही प्रक्रिया अन्यत्रही होत होती आणि त्यातूनच दक्षिण मध्य व्हिएतनाममध्ये चॅम-पा (चँपा) राज्ये दुसऱ्या शतकात, सुमात्रामध्ये श्रीविजय साम्राज्य चौथ्या शतकात, नंतर त्यामधूनच शैलेंद्र साम्राज्य इंडोनेशियात आठव्या शतकात, प्यु ब्रह्मदेशात सहाव्या शतकात, नंतर पेगू नवव्या शतकात आणि पगान अकराव्या शतकात; तर द्वारावती थायलंडमध्ये सहाव्या-सातव्या शतकापासून, नंतर सुखोथाई तेराव्या शतकात, तर आयुथ्या साम्राज्ये चौदाव्या शतकात उदयास आली.

– मिलिंद बोकील

(दीपावली, अंक 2018 वरून उद्धृत, संस्कारित)

—————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here