व्यंकटेश स्तोत्र आहे अवघ्या एकशेआठ ओव्यांचे. ते देविदासाने रचले. देविदास स्वतः त्या रचनेला ‘प्रार्थनाशतक’ असे म्हणतो. त्यांतील पहिल्या पाच ओव्या या नमनाच्या आहेत. नमन आहे गणपती, सरस्वती, देविदासाचे गुरू, संत व मुनिजन आणि साक्षात श्रोते यांना. तसेच, अखेरच्या सात ओव्या या स्तोत्राची महत्ता सांगणाऱ्या आहेत. देविदासाने उरलेल्या शहाण्णव ओव्यांमधून व्यंकटेशाची सर्वांगसुंदर अशी प्रतिमा साकारली आहे. तेथे फक्त देवतेची प्रतिमा नाही, तर त्या देवतेशी मनमोकळा संवाद आहे. तो संवाद दुतर्फी आहे हे त्याचे वैशिष्ट्य. देविदास व्यंकटेशाशी जो संवाद साधत आहे तो एकामागोमाग एक येणाऱ्या विधानांच्या ‘आर्ग्युमेंटस’मधून. त्यात व्यंकटेशाला जाब विचारलेला आहे. देविदास जी ‘आर्ग्युमेंटस’ करत आहे त्यांना प्रत्यक्ष मानवी संबंध-वास्तव यांचा भक्कम असा आधार आहे. देविदास याने मांडलेले राजकीय, सामाजिक, आर्थिक, लैंगिक वास्तव जगाच्या पाठीवरील कोणत्याही काळातील कोणत्याही समाजात प्रतिबिंबित असलेले दिसून येईल. भारतीय समाज-वास्तवाची अंतरीची खूण तर त्यात तंतोतंत पटेल ! सत्ता हा त्या ‘आर्ग्युमेंटस’मध्ये गाभा आहे. देविदास श्रीविष्णूची करुणा भाकण्यास सवालांना सुरुवात करताना विसरत नाही.
व्यंकटेश म्हणजेच विष्णू. विष्णू या शब्दाची उकल वेगवेगळ्या अभ्यासकांनी केली आहे. विष् = सतत क्रियाशील असणे, विश् = व्यापणे अशा व्युत्पत्तीबरोबरच विष्णू म्हणजे व्यापनशील, विष्णू म्हणजे उडणारा पक्षी, विष्णू म्हणजे ‘चराचर भूतांच्या ठिकाणी असणारा’ असेही त्याचे अर्थ लावण्यात आले आहेत. विष्णू हा उडणारा पक्षी असण्याची दाट शक्यता अतिप्राचीन काळात होती. विष्णू या देवतेचे मूळ प्रतीक पक्षी हेच असावे. अखिल विश्वात वेगवान संचार असणारी देवता म्हणजे विष्णू. विष्णू म्हणजेच सूर्यदेवता. विष्णूची त्रिविक्रम, विस्तीर्ण गती असणारा उरुगाय आणि विस्तीर्ण पावले टाकणारा तो उरुक्रम ही नावे सूर्याचीही आहेत. विष्णूचे एक नाव सुपर्ण असे आहे आणि गरुत्नाम (गरुड) हेही नाव त्याचेच आहे.
देविदास हा रामदासी संप्रदायातील होता. त्याचा जीवनकाल अंदाजे 1658 ते 1698 (म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ) हा मानला जातो. त्याने फक्त चाळीस वर्षांच्या आयुष्यात दोन-तीन अजरामर स्तोत्रे रचली.
देविदास त्याची निष्ठा ‘जयजयाजी व्यंकटरमणा | दयासागरा परिपूर्णा | परंज्योती प्रकाशगहना | करितो प्रार्थना श्रवण कीजे || या शब्दांत व्यक्त करून विष्णूला म्हणतो, “तू आईप्रमाणे मला जन्माला घातलंस, तू पित्याप्रमाणे माझा सांभाळ केलास, माझं रक्षण सर्व संकटांपासून केलंस आणि मला पामराला प्रेमसुखसुद्धा दिलंस… ही गोष्ट अलौकिक कशी मानावी? कारण ही सारी सृष्टीच जर तू निर्माण केली आहेस आणि तिचं पालकत्व जर स्वीकारलं आहेस, तर साहजिकच, तुझ्या ठायी आईपणा तर येणारच. भक्तांना प्रेम देणारा तू आणि त्यांना तुझ्या भजनासाठी स्फूर्ती देणाराही तूच…तूच जर सारं काही आहेस तर माझी विनवणी ऐकून घे.” मूल दुखलेखुपलेले, मनाला पीळ पाडणारे आईलाच नाही का अपार विश्वासाने सांगत? देविदास त्याच भूमिकेतून विष्णूशी बोलत आहे. तो पुढे म्हणतो, आतां परिसावी विज्ञापना | कृपाळूबा लक्ष्मीरमणा | मज घालोनी गर्भधाना | अलौकिक रचना दाखविली || तुज न जाणता झालों कष्टीं | आता दृढ तुझे पायी घातली मिठी | कृपाळूबा जगजेठी | अपराध पोटी घाली माझे || तशी विनवणी करत असताना देविदास म्हणतो, की ‘बाबारे, मी गगनाला भेदून जातील इतके अपराध केले आहेत… मला त्याची खंतही आहे…पण मला सांग, मुलानं कितीही अपराध केले असले तरी आई खरंच का त्याचा खेद वा शोक करत बसेल? ती त्याचे अनंत अपराध पोटात घालते ना? तूच माझा मायबाप असल्याने मला क्षमा कर, मला पोटाशी धर…तू दीनांचा नाथ आहेस आणि तेच तुझं ब्रीद आहे ना….मग तू तुझ्या ब्रीदाला जाग !’
तो एवढे बोलून थांबत नाही. तो पुढे अफलातून लॉजिक मांडतो… तो स्वतःच्या अपराधी व्यक्तिमत्त्वाबद्दल म्हणतो, “आता बघ, एखाद्याला उडदात काळं-गोरं निवडण्यास सांगितलं तर तो काय निवडेल? तसं निवडणं कसं शक्य होईल? माझ्या अनंतकोटी अपराधांत कोण कसली निवड करत बसेल?…अरे, विषारी झाडाला मधुर फळे कशी बरे लागतील आणि काटेरी गोष्ट मऊ, मुलायम कशी असू शकेल? पाषाणाला अंकुर फुटल्याचे कधी दिसेल का? देवा, मी तसाच आहे… मी तुझ्या पायी आलो आहे, तुझ्या पदरात पडलो आहे…..तेव्हा माझे रक्षण नाना उपायांनी करणे हेच तुझे उचित कार्य नाही का? अरे, लोक समर्थाघरच्या कुत्र्यालासुद्धा मान देतात…आणि इथे, आम्ही तुझे भक्त ‘दीन दीन’ म्हणून हेटाळले जातो. हा आमचा अपमान आहे की नाही? ते सोड, पण तो तुझा अपमान नाही का? लक्ष्मी तुझ्या पायाशी बसली आहे आणि आम्ही झोळी पसरून भीक मागत फिरत राहिलो तर तुझ्या ब्रीदावळीला अर्थ काय आहे, सांग? कुबेर तुझे सगळे भांडार सांभाळतो आणि आम्ही दारोदारी फिरतो, यात तुझा पुरुषार्थ तो काय राहिला? तू द्रौपदीची लाज राखण्यासाठी अनंत वस्त्रांचा ढीग पाडलास. अरे, मग तू आमच्याच बाबतीत असा कृपण कसा झालास? द्रौपदीच्या हाकेला तात्काळ धावून गेलास आणि अगदी मध्यरात्रीही तिची पातेली अन्नाने भरून टाकलीस, हजारो ऋषींच्या पंगती उठवल्यास… आम्हाला मात्र घासभर अन्नासाठी दशदिशा वणवण करण्यास लावतोस? स्वतःला ‘करुणाकर’ म्हणवून घेणाऱ्या तुला आमची दया कशी रे येत नाही? व्यंकटेशा ! बघ, तुला चांगल्या मधुर भाषेत विनवत आहे, की माझा अंगीकार कर…मला पोटाशी घे…आणि एकदा का माझा स्वीकार केलास, की मला क्षणभरही दूर लोटू नकोस…अरे बाबा,
समुद्रे अंगिकारिला वडवानळ | तेणें अंतरीं होतसे विव्हळ | ऐसे असोनि सर्वकाळ | अंतरी सांठविला तयाने ||
कुर्मे पृथ्वीचा घेतला भार | तेणे सोडिला नाही बडिवार | एवढा ब्रह्मांडगोळ थोर | त्याचा अंगिकार पै केला ||
शंकरें धरिलें हळाहळा | तेणें नीळवर्ण झालां गळा | परी त्यागिलें नाही गोपाळां | भक्तवत्सला गोविंदा ||
ही सगळी उदाहरणं तुला माहीत आहेत. म्यां पामराने तुला काय सांगावं? आता माझ्याबद्दल तुला काय सांगू? तू सगळं काही जाणतोस…माझ्या अपराधांची यादी नुसती उगाळण्याची झाली तरी माझ्या वाणीला शीण येईल. मी अधमाहून अधम आहे, विषयासक्त आहे, मंदमती-आळशी-कृपण-व्यसनांनी मलिन झालेला आहे. सज्जनांशी तर माझा कायमचाच द्रोह आहे. तुला सांगतो,
वचनोक्ती नाही मधुर | अत्यंत जनासी निष्ठुर | सकळ पामरांमाजी पामर | व्यर्थ बडिवार जगीं वाजे ||
काम क्रोध मद मत्सर | हे शरीर त्यांचे बिढार | कामकल्पनेसी थोर | दृढ येथे केला असे ||
अठरा भार वनस्पतींची लेखणी | समुद्र भरला मषी करुनी | माझें अवगुण लिहिंतां धरणीं | तरी लिहिले न जाती ||
देविदास स्व-दोषांची अशी कबुली दिल्यावर बिनतोड ‘आर्ग्युमेंट्स’ करतो. ‘मी पतित आहे, नीच आहे हे खरं, पण तू तर पतिताला पावन करून घेणारा आहेस ना? तू एकदा का माझा स्वीकार केलास, की माझ्या गुणदोषांची उठाठेव कोण करत बसेल सांग?’ येथून पुढे येणाऱ्या चार ओव्या वैश्विक सत्य सांगणाऱ्या आहेत. देविदासाने कठोर असे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सत्य येथे मांडले आहे. त्या सत्याचा स्वीकार करावाच लागतो. त्या सत्यापुढे जगातील सगळी विद्वत्ता, सगळे तत्त्वज्ञान शरण गेल्यावाचून राहत नाहीत. देविदास स्वतःचा मुद्दा अधिक ठाशीव करण्यासाठी एकामागोमाग एक दाखले देत आहे.
नीच रतली रायासीं | तिसी कोण म्हणेल दासी | लोह लागतां परिसासी | पूर्वस्थिती मग कैंचीं ||
गावींचे होते लेंडवोहळ | गंगेसी मिळता गंगाजळ | काकविष्ठेचे झाले पिंपळ || तयांसी निंद्य कोण म्हणे ||
तैसा कुजाति मी अमंगळ | परी तुझा म्हणवितों केवळ | कन्या देऊनिया कुळ | मग काय विचारावें ||
या ओव्या वाचल्या आणि मला एकदम आठवले ते नामदेवाचे शब्द. नामदेव हा एकेकाळचा चोर आणि शिंपी. तो जेव्हा विठ्ठलाला शरण गेला आणि भक्तिमार्गाला लागला तेव्हा लोक त्याची खिल्ली उडवू लागले. ते असह्य होऊन नामदेव त्यांना उद्देशून म्हणाला,
लोखंडाचा विळा | परिसासी लागला | मागलीया मोला |मागू नये ||
वेश्या होती तेचि | पतिव्रता झाली | मागील ते बोली | बोलूं नये ||
दासीचिया पुत्रा | राजपद आलें | उपमा मागील | देऊं नये ||
गांवरस होता | गंगेसी मिळाला | वांचुनी गंगाजळा | मानुं नये ||
नामदेवाने ही विनवणी लोकांना केलेली आहे, त्यामुळे त्याची भाषा बरीचशी मृदू आहे. उलट, देविदासाच्या भाषेचा उच्चार धारदार वाटतो. मात्र दोघांनीही दिलेला स्त्री, गंगाजळ आणि परिस यांचा दाखला, त्यांतील साम्य लक्ष वेधून घेणारे आहे. देविदास रामदासांच्या संगतीत राहिल्याने त्याच्या शब्दांना अशी धार आली असावी.
देविदासाने वरील तीन ओव्यांमध्ये एक बिनतोड युक्तिवाद केला आहे. मात्र तेवढे लॉजिक मांडून देविदास गप्प बसत नाही. तो पुढे म्हणतो, ‘ हे बघ, करू नये त्याचा स्वीकार केला, अपराधी आहे हे जाणूनही एखाद्याला जवळ केले तर मग काय उरते? तुझ्यासारख्या समर्थांनी तर जवळ केलेल्याला अव्हेरताच कामा नये ! तू असशील तसा धावून ये आणि तुझ्या हाती असलेल्या गदेने माझ्या साऱ्या पापकर्मांचा चेंदामेंदा कर…भगवंता, तुझ्या नावाची जी अपरिमित शक्ती आहे ती इतकी अनंत कोटी आहे, की त्यासमोर माझी पापे म्हणजे काहीच नाहीत ! मी म्हणतोय त्याचा मनोमनी नेटका विचार कर आणि तुझे ‘पतितपावना’ हे नाव सार्थ कर ! माझे मागणे झाले तरी इतकेच आहे, की आता प्रार्थना ऐका कमळापती | तुझे नामी राहो माझी मती | हेचि मागतो पुढतपुढती | परंज्योती व्यंकटेशा ||
देविदासाने श्रीविष्णूची जी नामावळी देवाला साकडे घालताना उच्चारली आहे ती साधारणपणे एकशेआठ नावे आहेत. त्या नामावळीतील काही नावांचा अंतर्भाव श्रीविष्णू सहस्रनामात असला तरी त्यांतील काही नावे ही देविदासाची स्वतंत्र निर्मिती म्हणून मानावी लागेल. देविदासाने श्रीविष्णूच्या त्या नावांचा उच्चार करत त्याची कृपा अपेक्षली आहे. ‘शेषशयना सार्वभौम | वैकुंठवासिया निरुपमा | भक्तकैवारिया गुणधामा | पाव आम्हां ये समयी ||’ असे म्हणून देविदासाने श्री व्यंकटेशाचे मनोमन, अनन्यभावाने स्मरण केले आणि सगुण सरूप असा व्यंकटेश त्याच्या हृदयात प्रकट झाला. देविदासाचे हे स्तोत्र मराठी स्तोत्र-साहित्यात अजोड ठरते, कारण त्याला प्रत्यक्ष व्यंकटेशच त्याच्यासमोर येऊन साक्षात उभा राहिला असे येथे दाखवता आले असते, पण तसे येथे घडत नाही. देवता प्रत्यक्ष समोर येऊन अनेक पोथ्यांमध्ये उभी राहते आणि चमत्कार घडवते असे दिसते. कवींची कल्पनाशक्ती तशा प्रसंगात मनमानी मुक्त संचार करू लागते, पण देविदास त्या वाटेने जात नाही.
देविदासाच्या हृदयगाभाऱ्यात देव प्रकट होतो. श्री व्यंकटेश त्याच्या हृदयात प्रकट झाले आहेत आणि देविदास त्याच्या समस्त मन:शक्ती एकवटून त्या अलौकिक रूपाचे जे वर्णन करत आहे, जी मानसपूजा मांडत आहे ती सर्वांगसुंदर तर आहेच, पण ते वर्णन म्हणजे आपादमस्तक अशा नयनरम्य कलाकृतीचे निकटभावाने केलेले मूर्तिवर्णन आहे. त्या वर्णनात भावकाव्याची गूढता, तरलता, मृदुता, आर्द्र संवेदना आणि वर्ण्य विषयाशी साधलेली भावपूर्ण एकरूपता आहे. समोर जे दिसत आहे ते एक अपूर्व, अलौकिक असे रूपलाघव तर आहेच, पण सर्व मन:शक्तींनी ते लाघव अनुभवणारा जो मर्त्य जीव आहे तोच जणू उन्नत झाला आहे ! तो एका समाधी अवस्थेत पोचून त्या सौंदर्याचे दर्शन घेत आहे. देविदासाचे प्राण त्या दर्शनात असे काही गुंतले आहेत, की त्याच्या मुखावाटे शब्दच उमटेनासे झाले आहेत. त्याची ती अवस्था करुणासागर श्री व्यंकटेश जाणतात आणि तो जे पाहत आहे ते, व्यंकटेश ‘आपुले आपण’ देविदासाच्या मुखावाटे वदवू लागतात.
श्री व्यंकटेशाची उभी मूर्ती नेहमी दिसण्यात येते. तो सर्व लोकांहून उंच आहे. मानवी दृष्टीला त्या उत्तुंग देवाकडे पाहताना त्याची अतीव सुकुमार पावले प्रथम दिसतात. देविदास त्या पावलांच्या दर्शन-वर्णनापासून आरंभ करतो आणि दृष्टी वर नेत नेत अखेरीस देवाच्या मुखमंडलापर्यंत पोचतो. देविदासाचा हा दृष्टी-प्रवास वाचक/श्रोत्यालाही होतो. खरे वाचक/श्रोते देविदासाच्या डोळ्यांनीच श्री व्यंकटेशाला नजरेत सामावून घेऊ लागतात. हे श्री व्यंकटेश मूर्तिरहस्य कसे गोचर होत जाते, ते वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या विविध संवेदना कसे जागवते, ते त्याच्या सौंदर्यकल्पनेला कसे आवाहन करत जाते हे अनुभवण्यासारखे आहे. देविदासाने केलेले ते वर्णन म्हणजे एक सौंदर्याविष्कार तर आहेच, पण तो रूप, रंग, गंध, नाद या साऱ्या संवेदनांचा उत्कट आनंदयोग आहे. अचानक समोर एक संजीवक, सतेज, सानंदरूप आणि जिवंत शिल्प उभे राहवे तसा तो अनुभव आहे.
देविदासाची दृष्टी सर्वप्रथम पावलांवर जाते. ती पावले विलक्षण सुंदर असतात. त्या पावलांवर कुंकुम रेखलेले आहे…बोटे सरळ तर आहेतच, पण त्यांची नखे जणू चंद्रतेज मिरवत आहेत. पायाची रचना, बोटे, घोटे अनन्यसुंदर तर आहेतच, पण इंद्रनिळाचे तेज त्यांच्या ठायी एकवटले आहे…मग कॅमेरा एका विलक्षण संथ गतीने वर वर सरकू लागतो…
चरणी वाळे घागरिया | वाकी वरत्या गुजरिया | सरळ सुंदर पोटरिया | कर्दळीस्तंभाचियेपरि ||
गुडघे मांडीया जानुस्थळ | कटिंतटी किंकिणी विशाळ | खालतें विश्वउत्पत्तीस्थळ | वरी झळाळी सोनसळा ||
कटीवरतें नाभिस्थान | जेथोनि ब्रह्मा झाला उत्पन्न | उदरीं त्रिवळी शोभे गहन | त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी ||
वक्षस्थळी शोभे पदक | पाहोनि चंद्रमा अधोमुख | वैजयंती करी लखलख | विद्युल्लतेचियेपरि ||
हृदयीं श्रीवत्सलांछन | भूषण मिरवी श्रीभगवान | तयावरते कंठस्थान | जयांसी मुनिजन अवलोकिती ||
उभय बाहु दंड सरळ | नखे चंद्रापरीस तेजाळ | शोभती दोन्ही करकमळ | रातोत्पलाचियेपरी ||
मनगटीं विराजती कंकणे | बाहुवटीं बाहुभूषणे | कंठी लेइली आभरणें | सूर्यकिरणे उगवली||
श्री व्यंकटेशाच्या शरीराचे असे अलौकिक सौंदर्य टिपत टिपत देविदासाचे सारे पंचप्राण त्याच्या डोळ्यांत एकजीव, एकाग्र झाले आहेत. कॅमेरा कंठाच्या वर जे श्रीमुख आहे त्याचा वेध घेत आहे. नजर घोटीव हनुवटीवरून मुखावर जाते. दैवी सुंदरतेचा तो प्रत्यक्ष साक्षात्कारी अनुभवच ! आंतरिक निर्मळता, भक्तांबद्दलची स्नेहमयता, एक गूढ प्रसन्नता (आणि कदाचित तेवढेच गूढ मंदस्मित) त्या मुखावर विराजमान आहे. व्यंकटेशाची दंतपंक्ती म्हणजे जणू लावण्याच्या ज्योती. देविदासाची मिश्किलता जागी होते आणि तो म्हणतो, ‘ त्याच्या अधरांवर सत्ता गाजवण्यात आणि त्या ओठांची गती जाणण्यात जे सुख आहे ते कसे जाणणार…याचा अनुभव फक्त लक्ष्मी घेऊ शकते.’ कवीच्या कल्पनाशक्तीला सलाम करावा अशी ओवी त्यानंतर येते. तो वर्णन करत आहे ते देवाच्या नासिकेचे… नाक असे आहे, की त्यातून ये-जा करताना पवनाला अपरंपार सुख होत असेल… देविदासाचा नजररूपी कॅमेरा पुढे सरकतो…
त्रिभुवनीचे तेज एकवटले | बरवेपण सिगेसी आले | दोहीं पातयांनी धरिलें | तेच नेत्र श्रीहरीचे ||
व्यंकटा भृकुटीया सुनीळा | कर्णद्वयाची अभिनव लीळा | कुंडलांच्या फांकती कळा | तो सुखसोहळा अलोकिक ||
भाळविशाळ सुरेख | वरती शोभे कस्तुरीटिळक | केश कुरळ अलौकिक| मस्तकावरी शोभती||
मस्तकी मुकुट आणि किरीटी | सभोवती झिळमिळ्यांची दाटी |त्यावरी मयुरपिच्छांची वेटी| ऐसा जगजेठी देखिला ||
असा हा साक्षात श्री व्यंकटेश मनाच्या गाभाऱ्यात प्रकट झाला आहे. देविदास म्हणतो, “देवा, तू माझ्यासाठी असा सगुण साकार होऊन प्रकट झाला आहेस…मला तुझी मानसपूजा करू दे…हा पाहा, माझा प्राणभाव, आर्तभाव अर्पण करून मी तुझ्या पूजेला आरंभ करत आहे… मी तुला पुरुषसुक्ताचा उच्चार करता करता पंचामृताने स्नान घालत आहे, मग शुद्धोदकाने स्नान घालत आहे… मी तुला वस्त्र आणि यज्ञोपवित परिधान केले आहे… मी तुझी पूजा गंध, अक्षता, अवीट सुगंधी फुले, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा यांच्यासहित संपन्न केली आहे. मी तुला नाना वस्त्रांचा साज चढवताना तुला प्रिय असलेले गोमेद हे रत्न आणि इतर अलंकार अर्पण केले आहेत. मी ही षोडशोपचार पूजा करून अनन्यभावे तुला शरण आलो आहे. देविदासाने पूजा केली ती मनातल्या मनात. सर्व मानसिक शक्तींसह. पूजेनंतरची प्रदक्षिणासुद्धा झाली…आणि आता वेळ आली आहे ती परम व्यंकटेशाकडे वर किंवा आशीर्वाद मागण्याची. पण देविदास तो वर मागण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याच्या दैवताची करुणा भाकत आहे. तो व्यंकटेशाच्या असंख्य नामांचा उच्चार करत देवाला आळवत आहे. देविदास स्वतःसाठी काहीच मागत नाही. तो म्हणतो, ‘मजलागी देई ऐसा वर | जेणे घडेल परोपकार | हेंचि मागणे साचार | वारंवार प्रार्थीतसें || हा ग्रंथ जो पठण करी | त्यांसी दु:ख नसावे संसारी | पठणमात्रे चराचरी | विजयी करीं जगाते ||’ लग्नाची इच्छा करणाऱ्यांची लग्ने व्हावीत, धनाची अपेक्षा करणाऱ्यांना धन प्राप्त व्हावे, पुत्राची अभिलाषा असणाऱ्यांना पुत्रप्राप्ती व्हावी.
देविदास वेगळा असला, तरी इतरांपेक्षा फारसा वेगळा नव्हता. त्याची स्त्रीबद्दलची भूमिका ही इतरांसारखीच होती. तीच झापडबंद दृष्टी आणि तोच दुजाभाव ! खरे तर, त्याचा काळ हा जिजाबार्इंनी घडवलेल्या शिवरायांचा काळ. देविदास ज्या रामदासी संप्रदायात वाढला त्या संप्रदायात समर्थांनी बुद्धिमान असणाऱ्या वेणाबाईला एका मठाची अधिपती म्हणून नियुक्त केलेले होते… मात्र असे असूनही देविदासाची मानसिकता पुरुषप्रधान होती. देविदासाच्या पोटचा मुलगा ज्ञानी, शतायुषी, पितृसेवेत रत असणारा (मातृसेवेचा येथील अनुल्लेख अगदी बोलका आहे) उदार आणि सर्वज्ञ असावा असे म्हणतो. तो श्री व्यंकटेशाला साकडे घालतो, की क्षय, फेफरे, कुष्ठरोग यांनी पीडित असणाऱ्यांपैकी जे या स्तोत्राचे पठण करतील त्यांना तू रोगमुक्त कर. देविदासाची विनवणी जगात युद्धे होऊ नयेत, विद्यार्थी ज्ञानवंत व्हावेत, शत्रूंचा नि:पात व्हावा, दरिद्री माणूस श्रीमंत व्हावा आणि मुख्य म्हणजे सर्वाना मोक्षाची प्राप्ती व्हावी अशी आहे. त्याची ही स्वार्थनिरपेक्ष विनवणी ऐकून श्री व्यंकटेश प्रसन्न होतो आणि त्याच्या सर्व मागण्या मान्य करतो. देविदासाने रचलेल्या या स्तोत्राच्या पठणाचे प्रमाणही व्यंकटेश स्पष्ट करतो. त्यातही गंमत बघा, ज्याला पुत्र हवा आहे त्यांनी तीन महिने हे स्तोत्र वाचावे आणि ज्यांना कन्या हवी आहे त्यांनी सहा महिने स्तोत्रपठण करावे असे प्रत्यक्ष देव सांगत आहे!
व्यंकटेशाने वर दिल्यावर देविदास आनंदाने भरून पावला आहे. तो पुन्हा पुन्हा श्री व्यंकटेशाची स्तुती करतो आणि भाविकांना स्तोत्रातील प्रत्येक शब्दावर असीम विश्वास ठेवण्याची विनंती करतो.
देविदासाच्या या प्रार्थनाशतकाची विशेषता अजून एक ही आहे, की तो ज्यांना काही कामना आहेत आणि त्यांची पूर्ती हवी आहे त्यांनी मध्यरात्रीच्या प्रहरात या पाठाचे अनुष्ठान करावे असे सुचवतो. ही वेळ अन्य सर्व स्तोत्रांच्या पठणाच्या वेळेपेक्षा सर्वस्वी भिन्न आहे. देविदास त्या प्रहरात स्तोत्रपठण केल्यास श्री व्यंकटेश साक्षात प्रकट होतो आणि त्याचे चतुर्भुज दर्शन भक्ताला घडवतो असे म्हणतो. देविदास असे जेव्हा घडते तेव्हा देहभाव लोप पावून भक्त आणि देव यांच्यातील अंतर नाहीसे होत असल्याची ग्वाही देऊन प्रार्थनाशतक पूर्ण करतो.
देविदास फक्त चाळीस वर्षे जगला. त्याने ‘श्री व्यंकटेशस्तोत्र’ या चिरंजीव स्तोत्राची निर्मिती तो साधारण वीस वर्षांचा असताना (इसवी सन 1678 च्या आसपास) केली असे मानले तरी त्या स्तोत्राला तीनशेचाळीस वर्षे झाली आहेत. महाराष्ट्र साडेतीनशे वर्षांच्या या दीर्घ कालखंडात कल्पनातीत बदलला आहे. कित्येक राजकीय सत्ता आल्या-गेल्या. राजे-महाराजे मातीला मिळाले. नवे शिक्षण, नवे विज्ञान, नवीन तंत्रज्ञान आणि जीवनाच्या नानाविध शैली यांत हजार टक्के बदल घडला आहे. माणसाला माणसानेच निर्माण केलेल्या हजारो भीती, क्लेश, यातना यांना सामोरे जावे लागत आहे. माणूस हजार पटींनी अधिक भयभीत झाला आहे. अशा या काळातही अजून ‘श्री व्यंकटेशस्तोत्र’ घरोघरी वाचले जात आहे. हे स्तोत्र एका ‘स्ट्रेसबस्टर’चे काम करत भयाकुल वाचकाला ताणमुक्त, भयमुक्त करत आहे असे मानावे का? की, ‘श्री व्यंकटेशस्तोत्र’ ही एक निरर्थक अडगळ जीवनातील इतर असंख्य निरर्थक गोष्टींसारखी आहे? या स्तोत्राच्या दीर्घजीवीपणाचे रहस्य उलगडून पाहणे हे आव्हानच नव्हे का?
– विजय तापस vijaytapas@gmail.com
———————————————————————————————-