कार्तिकेय देवतेचा उल्लेख वेदवाङ्मयात अपवादाने आढळतो. मात्र तो अनेक पुराणांतून दिसतो. त्याची मंदिरे महाराष्ट्रात तुरळक आहेत, मात्र ती देशाच्या दक्षिण भागात सर्वत्र दिसतात. कार्तिकेय स्वामींचे मंदिर कोकणच्या देवगड तालुक्यात हिंदळे येथे आहे. कार्तिकेयाचा उल्लेख मुरूगन, सुब्रह्मण्य म्हणून होतो.
हिंदळे हे टुमदार गाव देवगडपासून अठ्ठावीस किलोमीटरवर आहे. नदीच्या काठी वसलेल्या त्या गावाला निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेला आहे. नारळी-पोफळीच्या उंच उंच बागा, हिरवीगार राने मन मोहून घेतल्याशिवाय राहत नाहीत. कार्तिकस्वामींचे मंदिर देवगड-आचरा रस्त्याच्या कडेला, हिंदळे गावाच्या थोडे बाहेर उभे आहे. कार्तिकस्वामींचे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव मंदिर. तेथील मूर्तीला सहा मुखे आहेत. तीन मुखे दर्शनी भागाकडे, तर तीन मागील बाजूस आहेत. मूर्तीला सहा हात असून, त्या प्रत्येक हातात आयुध आहे. आयुधे म्हणजे केवळ शस्त्रे नव्हेत तर कोणतीही वस्तू असाही अर्थ मूर्तिशास्त्रात मानलेला आहे. मूर्ती पुरातन असून, ती संगमरवरी दगडात आहे. मूर्ती तीन फूट उंचीची आहे. तिचे वाहन मोर तेथे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, ते तीन भागांत विभागलेले दिसते. सभागृह साधारणपणे 20 x 25 फूट असून ते तीन बाजूंनी उघडे आहे. सभागृह एकूण बारा खांबांवर उभे आहे. मंदिरावर कळस आहे. दोन पायऱ्या चढल्यावर आत जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. त्या साधारण 28 x 28 फूटांच्या चौकोनी वास्तूत, मंदिर सभागृह कौलारू आहे. मंदिर आवार प्रशस्त असून स्वच्छ असते. आवारात मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताला बांधीव पायऱ्या असलेली विहीर दिसते. उजव्या हाताला विठ्ठल-रखुमाईचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. रस्त्यापासून मंदिर शंभर-दोनशे पावलांवर आहे. मोठे जुने पिंपळाचे झाड रस्त्याच्या कडेला डाव्या हाताला आहे. पिंपळाचा पार मोठा असून, त्या पारावर लहान हनुमानाचे मंदिर आहे. तेथे त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रियांना मंदिरात कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येते. स्त्रियांना मंदिर प्रवेशाचे औपचारिक बंधन नाही, तरी स्त्रिया स्वतः मंदिर प्रवेश निषिद्ध पुराणकथा, अंधश्रद्धा यांमुळे मानत असाव्यात.
कार्तिकेय हा भगवान शिव-पार्वतीचा पुत्र आणि श्रीगणेशाचा छोटा भाऊ. ऋग्वेदाचा कालखंड इसवी सनपूर्व 1500 ते इसवी सनपूर्व 1000 असा मानतात. याचा अर्थ त्यापूर्वीही मानवी जीवन अस्तित्वात होते. कार्तिकेयाची वर्णने स्कंदपुराण, अग्निपुराण, रूपावतार, बृहत्संहिता, मत्स्यपुराण यांसारख्या ग्रंथांतून आढळून येतात. या देवतेची स्थापना वन, एकांत, गाव, खेडे अशा ठिकाणी करावी. ती मूर्ती चार, सहा, आठ, बारा हातांची असावी असे संकेत सांगितलेले आहेत. कलावंतांनी देवदेवतांच्या मूर्ती तयार केल्या, तेव्हा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना, मूर्तींच्या प्रायोजकांनी आर्थिक सहाय्य केले त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या घटकांचा परिणाम मूर्ती घडवताना झाला असणार. कार्तिकेयाची मूर्ती एकमुखी कुशाण राजवटीच्या काळात दिसते. उत्खननात मथुरा येथे सापडलेली मूर्ती योद्ध्याच्या रूपात आहे. कार्तिकेय रूपवान असल्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे त्याची प्रतिमा बऱ्याच प्रमाणात तारूण्यावस्थेतील पाहण्यास मिळते ! त्यांच्या हातात विविध आयुधे असतात, त्याचप्रमाणे त्याची वाहने आहेत. मानवाने देवदेवतांचे चित्रण करताना निसर्गातील सर्व प्राण्यांचा, वृक्षवेलींचा आणि इतर घटकांचा उपयोग करून घेऊन निसर्गाप्रतीची आदराची भावना व्यक्त केलेली आहे. मूषक, सर्प या सामान्य प्राण्यांपासून ते हत्ती, वाघ, सिंह यांच्यापर्यंतच्या प्राण्यांचा, वड-पिंपळ या वृक्षांपासून छोट्यातील छोटे फूल आणि तुळस-बेल येथपर्यंतच्या पानांचा वापर केलेला आहे.
‘कुमारतंत्रा’त कार्तिकेयाची नावे सोळा दिलेली आहेत. त्यांतील काही अशी आहेत- स्कंद, सेनापती, सुब्रह्मण्य, जगजवाहन, शाकीधर. गायत्री मंत्रात त्याचा कुमारा, स्कंद या नावांनी उल्लेख आहे. त्याला सूर्यपुत्र असेही पुराणात म्हटले आहे. तो काही ठिकाणी अग्नी आणि स्वाही यांचा पुत्र असल्याचा उल्लेख आहे. त्याला षडानन असेही म्हणतात. त्याचा अर्थ त्याला सहा मुखे होती. त्याने माणसातील षड्रिपूंवर विजय मिळवला हा त्याचा खरा अर्थ. कार्तिकेयाबद्दल समज, गैरसमज बरेच आहेत. असे सांगतात, की त्याने स्त्रियांना शाप दिलेला आहे, ज्या स्त्रिया कार्तिक पौर्णिमा सोडून इतर दिवशी त्याचे दर्शन घेण्यास मंदिरात येतील त्या स्त्रिया बालविधवा होतील. कोणतीही देवता माणसाला शाप देत असेल यावर विश्वास बसत नाही, परंतु माणसानेच ती गोष्ट देवतेचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने केली असावी.
कार्तिकेयाच्या वाहनांत आणि आयुधांत कोंबडा, शक्ती, फासा, तलवार, धनुष्यबाण, भाला, ढाल, मयुर, कमळ अशा गोष्टींचा अंतर्भाव दिसून येतो. त्या प्रत्येक घटकाला वेगळा अर्थ आहे. उदाहरणार्थ कोंबडा. कशाचीही अडचण न मानता, तो पहाटे ठरावीक वेळी आरवतो. तो त्याच्या कर्तव्याप्रती जागरूक असतो. तो कर्तव्य आणि सजगता यांचे प्रतीक बनतो. कोंबडा कार्तिकेयाजवळील एका हातात असलेल्या ध्वजावर आढळतो. त्याने तारकासुराचा पराभव केला त्याचे प्रतीकात्मक पद्धतीने विश्लेषण करताना त्याने गर्व, घमेंड या दुर्गुणांचा नाश केला याचे विश्लेषण आहे. इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती यांचा सुरेख संगम कार्तिकेयाच्या मूर्तीत पाहण्यास मिळतो. कार्तिकेय बुद्धिमान होता. त्यामुळेच त्याने शिवदेवाला ‘ओम’चा अर्थ विषद करून सांगितला.
– प्रल्हाद अ.कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
—————————————————————————————————————————————– ———–
छान लेख. माझ्या आजोळातील या मंदिराची मला छान माहिती मिळाली. धन्यवाद