हिंगोली : शेतकऱ्यांच्या मीराई !

0
83

हिंगोली येथील मीरा कदम या शिक्षिका स्वत: पायांनी अधू आहेत. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. त्यांना चालताना कशाना कशाचा आधार घ्यावा लागतो; पण त्यांची वृत्ती मात्र आधार देण्याची आहे ! त्यांनी मुख्यतआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये म्हणून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची सुरुवात एकोणीस वर्षांपूर्वी झाली. मीरा कदम यांचे वडील वारले, तेव्हा त्यांना वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण होणारी पोकळी जाणवली. त्यांनी पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. त्यांच्या कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला, तेव्हा त्यांनी चाळीसपर्यंत मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे सुरू केले.

दुसरीकडे त्यांच्या मनाला आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील लहान मुलांना किती त्रास होत असेल हे डाचत होते. शेतकरी आत्महत्यांचे प्रकारही कानी येत होते. मीरा यांनी मनाच्या तशा अधू अवस्थेतही शेतीप्रश्न जाणून घेतला. त्या आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी गेल्या. त्या शिक्षिका असल्याने त्यांना बोलण्याची सवय होती, समजावून सांगण्याची हातोटीही होती. मीरा यांनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होतेतेव्हा आत्महत्या करू नका हे हृदयद्रावक वर्णन करून सांगू लागल्या.

मीरा तो संदेश गावोगावी जाऊन देत तेव्हा गावकरी म्हण, ‘थोड्या आधी आल्या असता तर ! आणि ते गावकरी आत्महत्येचे नवे एकादे प्रकरण त्यांच्या कानावर घालत ! लोकजागृती करूनही तिचा पुरेसा उपयोग होत नाही– आत्महत्येचा आवेग काही रोकला जात नाही हे मीरा यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी पती आणि स्वत:ची मुले यांना विश्वासात घेतलेकाही सहकाऱ्यांना सांगितले आणि ठरवले, की शेतकऱ्याघच्या पंचवीस गरजू विद्यार्थ्यांना मदत करायची. त्यांनी कोणाला शैक्षिणक साहित्य दिले. कोणाचे परीक्षा शुल्क भरले. मीरा यांच्याकडे गावागावांतील लोक हे समस्याग्रस्त मुले व त्यांच्या अडचणी घेऊन येऊ लागले. मीरा यांनी त्या अडचणी सोडवणे सुरू केले. पण त्या कामातून त्या मुलांना पुरेसा आधार मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी 2019 मध्ये हिंगोली येथे शहरातील चौदा खोल्यांचे एक घर दर महिना पंचवीस हजार रुपये (आता सत्तावीस हजार) भाड्याने घेतले व तेथे मुलांना आणून ठेवलेअशा प्रकारे सेवासदन’ हे वसतिगृह स्थापन झाले. ते वसतिगृह आदर्श महाविद्यालयाजवळ आहे. सेवासदनचा आश्रय एकाहत्तर मुलांना मिळतो. पैकी पन्नास मुले त्याच वसतिगृहात राहतात. एकवीस मुले बारावीपुढील शिक्षण वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या संस्थांमध्ये घेत आहेत. त्यांना मुख्यतफीचा व त्यांच्या रहिवासाचा आधार सेवासदनकडून मिळतो. धनराज-मीरा ही दोघे, त्यांची आई कांताबाई आणि आदित्य (बारावी) व प्रज्ञा (नववी) या मुलांसमवेत कदम कुटुंब सेवासदनमध्येच राहते. स्वयंपाक करण्यास एक बाई येतात. बाकी स्वच्छता, वाढप वगैरे सर्व कामे मुले करतात.

मीरा कदम या डीएड-बीए शिकून जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांची शाळा अंतुलेनगरमध्ये आहे. शाळा सकाळी साडेनऊ ते दुपारी चारपर्यंत असते. पहिली ते सातवीपर्यंतच्या त्या शाळेत मीरा यांना सर्व विषय शिकवावे लागतात. मीरा बाकी वेळ मात्र वसतिगृहासाठी देतात. धनराज पूर्णवेळ संस्थेच्या कामात असतात. ते एकूण कामाचे नियोजन व देखरेख पाहतात. धनराज हे बी कॉम शिकलेले आहेत. धनराज पदवीशिक्षणानंतर शेती करू लागले होते. सेवासदनचा व्याप वाढल्यावर त्यांनी त्याच कामी सर्व लक्ष देऊ केले आहे. तेही म्हणाले, की आम्हा दोघांनाही वडील नसल्याने ते असण्याचे महत्त्व कळते व म्हणून आम्ही या कामात पूर्णवेळ लक्ष घातले. धनराज यांनी त्यांची शेती कसण्यास कराराने दिलेली आहे.

मीरा म्हणाल्या, की पाच मुले दत्तक घेऊन माझे हे कार्य सुरू झाले. कोरोना काळात तीनचार बालसदने बंद पडलेली पाहिली. त्या निराधार मुलांनी कोठे जावे, म्हणून मी ती मुले दत्तक घेतली. त्यातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील मुलांची अवस्था लक्षात आली आणि ‘सेवासदन’ प्रकल्प कायम स्वरूपी उभा राहिला.

धनराज व मीरा ही दोघेही लातूर जिल्ह्यातील तांदुळजा या एकाच गावाची. त्यांचे लग्न तेथेच जमले. तांदुळजा हिंगोलीहून दोनशे किलोमीटर दूर आहे. तांदुळजाला त्यांची साडेतीन एकर बागायती शेती आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न, तसेच शिक्षिका म्हणून मीरा यांना मिळणारा पगार असे सारे काही त्या ‘सेवासदन’च्या कामात लावतात. त्यांच्या कामाची गरज समाजानेही ओळखली आहे. दानशूरांच्या देणग्या मिळू लागल्या आहेत. विशेषत: अन्नधान्याची मदत समाजातील विविध घटकांकडून होते असे धनराज म्हणाले. मीरा गावोगावी जाऊन व्याख्याने देतात; त्यातून मिळणारे मानधन त्या याच कामात खर्ची घालतात.

मीरा सांगतात, की कोरोनाच्या काळात कसोटीचे प्रसंग आले. वसतिगृहात पन्नास मुले होती. जवळचे नातेवाईक कोणाला घरात घेण्यास तयार नव्हते. मुलांना सांभाळावे कसे असा प्रश्न आला. मीरा कदम यांनी नोकरीच्या हमीवर सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले- कर्जाचे हप्ते अजूनही फेडले जात आहेत. कसोटीचे प्रसंग मुलांसाठी एरव्हीही असतातच. काही मुले त्यांचे प्रवेश शुल्क न भरल्याने रखडतात- काही वेळा संस्थाचालकांशी संवाद साधून शुल्क माफ होते किंवा कमी होते. पण तोपर्यंत शुल्क भरण्यासाठी अनेकांना विनंती करावी लागते. दर वेळी वेळेवर मदत मिळतेच असे नाही. तेव्हा हिरमोड होतो. पण एखादी संस्थाएखादी व्यक्ती मदतीसाठी हात पुढे करते आणि वेळ निभावून नेली जाते.

सेवासदन वसतिगृहातून काही मुले ‘नीट’ परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. काही अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. काही स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली आहेत. त्या मुलांच्या वडिलांनी शेतीतील समस्यांतून आत्महत्या केली आहे तर कोणी आजारपणाला कंटाळून आयुष्याचा शेवट केला आहे. करण संतोष नावाच्या मुलाला प्रवेश इस्लामपूरच्या प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये एका निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळाला. शुल्क वार्षिक अकरा लाख रुपयांहून अधिक होते. पहिल्या वर्षी, ती रक्कम जमवण्यासाठी अनेकांना विनंती केली. दरम्यान, संस्थाचालकांना मुलाची पार्श्वभूमी कळली आणि संस्थेने शुल्क माफ केले ! अशी मदत नेहमीच उपकारक ठरते – मीरा म्हणाल्या.

आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या मुलांना वेळीच आधार दिला नाही तर ती मुले फक्त अंगमेहेनतीचे हमाली काम करत राहतील किंवा कोणाच्या शेतात मजूर म्हणून राबतील. पुढील पिढी वाचवण्यासाठी शक्य आहे तेवढे काम करावे असे कदम दांपत्याने ठरवले आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे मुलांना आयुष्य घडवता येणे शक्य होत आहे. ज्यांच्या घरातील कर्ता जातो त्या घरातून एक तरी मुलगा शिकून पुढे जावा अशी त्यांच्या प्रयत्नांमागील भावना आहे. वसतिगृहातील मुले मीरा यांना मीराई म्हणतात. मीरा कदम ‘अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी’ अशी, देवीच्या आरतीतील ओळ सार्थ करत आहेत !

मीरा यांच्या बोलण्यातून सरकारी सहाय्यातील भेदक विसंगती लक्षात येते. त्या म्हणाल्या, की सरकारची मदत निराधार बालकांच्या वसतिगृहासाठी मिळू शकते, पण ती जातिनिहाय असते. आमचे ‘सेवासदन’मधील काम जातिनिरपेक्ष आहे. त्यात आदिवासी, दलित, ओबीसी अशी सर्व जातिधर्माची मुले आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारच्या समाजकल्याण विभागाचे अशाच कामासाठी मंजूर असलेले सहाय्य मिळू शकत नाही !

संस्थेचे नाव – साथ फाउंडेशन (तांदुळजा) द्वारा संचालित सेवासदन – मुलांचे वसतिगृह
पत्ता – आदर्श कॉलेजच्या पाठीमागे, जिजामाता नगर, हिंगोली
संपर्क क्रमांक – 7038002458, 7774820664 meerakadam16@gmail.com

– सुहास सरदेशमुख 9422073033 suhas.sardeshmukh@expressindia.com
(‘लोकसत्ता’वरून उद्धृत संस्कारित, अधिक माहितीसह विस्तारित)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here