स्वातंत्र्यलढ्यातील अग्निकुंड – अकोल्याची राष्ट्रीय शाळा

0
72
-carsole

अकोल्याच्या ‘राष्ट्रीय शाळे’च्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील योगदानाला मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यात असलेल्या भारतातील तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून करावे या हेतूने पश्चिम महाराष्ट्र सातारा परिसरातील पाच मुले एकत्र आली. त्यात कै. पुरुषोत्तम धोंडो कुलकर्णी, कै. अण्णासाहेब शिवनामे, कै. रघुनाथ गणेश पंडित (दादासाहेब पंडित), बापुसाहेब सहस्रबुद्धे, कै. कृष्णा मास्तर सबनीस होते. त्यांनी तो उद्योग लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेऊन, १९१७ मधील मे महिन्यात अकोल्यात येऊन केला.

कृष्णा नदीतीरी क्षेत्र माहुली आहे, तेथे श्री कृष्ण दास (गोगटे) महाराज हे रामदासी पंथाचे गुरू अन्नछत्र रविवारी किंवा सुटीत चालवत. ते परिसरातील मुलांकरवी अन्नपदार्थ गोळा करून वा भिक्षा मागून आणत; त्यांना जेवू घालत व शिक्षणही देत. त्यांच्याकडे हे, उल्लेखित पाचजण आकर्षित झाले. त्यांनी गुरुदेवांबरोबर सेवाकार्य काही दिवस केले. पुढे गुरुजींचे निधन झाले. त्यांच्या समाधीच्या पूजाअर्चेसाठी श्री कृष्णामास्तर सबनीस तेथेच थांबले. बाकी चारजण शिक्षणासाठी पुण्याला आले. त्यांच्या मनात काहीतरी कार्य करावे अशी इच्छा होती. त्यावेळी टिळक सिंहगडावर विश्रांतीला आलेले होते. ते चार जण लोकमान्य टिळक यांना भेटण्यास गेले. लोकमान्य टिळक यांनी त्यांना त्यांच्या भेटीत देशाची गरज लक्षात घेऊन तेजस्वी शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा काढा असा विचार दिला.

पैकी बापुसाहेब सहस्रबुद्धे अकोल्याला आले. त्यांनी अकोल्याला चार-पाच मुले गोळा करून 13 जुलै 1919 मध्ये गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री राजेश्वर मंदिरात ‘श्री सरस्वती मंदिर अनाथ विद्यार्थी गृह’ या नावाने, भिक्षा मागून सेवाकार्य सुरू केले. उर्वरित तिघे जण पुढे, 1921 मध्ये ‘असहकार आंदोलना’च्या वेळी आले. त्यांनी चौघांनी मिळून ‘टिळक राष्ट्रीय शाळा’ स्थापन केली. ‘सरस्वती मंदिर’ छात्रालय व ‘राष्ट्रीय शाळा’ हे विद्यालय या दोन्ही संस्थांत काम करणारे शिक्षक एकच होते. पुढे दोन्ही संस्था एकत्र आल्या व नवी संस्था ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ या नावाने कार्य करू लागली. शाळेचे कार्य, शिक्षणपद्धत पाहून लोक तिकडे आकर्षित झाले. त्यावेळी संस्थेला अकोला शहरातील सर्वसामान्यांबरोबर सावतराम मिलचे मालक, ऑइल मिलचे भागवत, बाजोरिया, गोएंका, सोमाणी यांच्यासारखे धनिक लोक, डाबकी रोडवरील फडकेवकील, ओक, दुर्गाताई जोशी ही आश्रयस्थाने तर मश्रुवालांचे घर हक्काचे वाटे. आजही ते तसेच आहे. गोडबोले गुरुजी, बोराळे, पाटील, देशपांडे, खपली अशी स्थानिक मंडळी कार्यकर्ते म्हणून येऊन मिळाली.

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1921 च्या ‘असहकार आंदोलना’नंतर वाढली. शाळा राष्ट्रभावना जागृत करणारी व स्वतःची शिक्षणपद्धत अवलंबणारी आहे अशी भावना जनमानसात निर्माण झाली. म्हणून पालकांनी मुलांना सरकारी शाळेतून काढून राष्ट्रीय शाळेत भरती केले. राष्ट्रीय शाळेचा कारभार पुढे, 1922 मध्ये उमरी येथील ‘गोरक्षण’चे शेत विकत घेऊन सुरू झाला. हायस्कूल छात्रालययुक्त असल्यामुळे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण सुरू झाले. भारताचा इतिहास, चालू घडामोडी इत्यादी विषय शालेय अभ्यासक्रमात होते.

राष्ट्रीय शाळेची स्थापना करणारी शिक्षक मंडळी ही पदवी किंवा पदव्युत्तर (एलएल बी, इंटर इत्यादी) शिक्षण घेणारी तरुण मंडळी होती. राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेत ज्यांचा मुख्य वाटा होता ते पुरुषोत्तम धोंडे (जन्म 1 मे 1896) व त्यांचे इतर चार सहकारी तेवीस-चोवीस वर्षांचे होते. एकूण विद्यार्थी सव्वीस व शिक्षक आठ, एवढ्यांना 1942 च्या आंदोलनात शिक्षा झाली. त्यांना कमीत कमी चार महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यात कुमार लक्ष्मण गोडबोले हा संस्थेने काढलेले गुप्त बुलेटिन वाटताना सापडला व पुढे पोलिसांच्या अमानुष मारहाणीत शहीद झाला. त्याचे शहीद स्मारक अकोल्यात उभे आहे.

संस्थेने 1930-32 पासून 1940-42 व पुढेही स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक चळवळींत मोलाची कामगिरी केली. कुमार वयापासून प्रौढ शिक्षक कार्यकर्ते यांनी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह, स्वदेशी वस्त्र, विदेशी वस्तू यांवर बहिष्कार, असहकार, टपाल-रेल्वे सेवा खंडित करणे या कार्यामध्ये सहभाग दिला. राष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांनी 1942 च्या क्रांतीचे संदेश व मार्गदर्शक पत्रके वाटण्याचे काम पोलिसांचा गराडा असताना व राष्ट्रीय शाळेवर पोलिसांची करडी नजर असताना केले. लक्ष्मण गोडबोले या विद्यार्थ्याचे वय पंधरा वर्षांचे होते. तो पत्रके वाटण्याचे काम बेमालूमपणे करत असे. पत्रके दुधाच्या बाटलीतून वाटली जात. पोलिसांनी त्यांची झडती एक-दोनदा घेतली, पण त्यांना आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही. दुधाच्या बरण्या या गुप्त पत्रके वाहतुकीच्या दृष्टीने खास बनवण्यात आल्या होत्या. बरण्या त्यात वरील भागात दूध पण खाली पत्रकांचे गठ्ठे राहतील अशा पद्धतीने बनवण्यात आल्या होत्या. गुप्त पत्रके जठारपेठमधील आचार्य गुरुजी, मश्रुवाला व शहरातील ओक यांच्या घरून दररोज सकाळी घ्यायची व वाटायची ही कामगिरी लक्ष्मणवर सोपवण्यात आली होती. लक्ष्मणला एके दिवशी तेच काम करत असताना अटक झाली. त्याला सहा महिन्यांची शिक्षाही ठोठावली गेली. त्याचे शरीर पोलिसांच्या मारामुळे खिळखिळे झाले होते. त्याला तुरुंगातील दवाखान्यातच ठेवण्यात आले. पण अखेर, त्याने तुरुंगातच शेवटचा श्वास घेतला व तो स्वातंत्र्य चळवळीतील अकोल्याचा पहिला हुतात्मा ठरला.

राष्ट्रीय शाळेचा आदरयुक्त दबदबा अकोल्याच्या घराघरात आजही आहे. वडीलधारी मंडळी अगदी काल-परवापर्यंत घरातील बंड मुलांना त्याची खोडी न थांबल्यास ‘थांब, तुला राष्ट्रीय शाळेत घालतो’ असा दम देत होती. शाळेने स्वातंत्र्यपूर्व अठ्ठावीस वर्षें इंग्रजी शासनाला सळो की पळो करून सोडले होते. इंग्रज काळामध्ये वऱ्हाड प्रांतातील ती शाळा क्रांतिकारक, भूमिगत सेनानी व स्वातंत्र्यवीर यांच्यासाठी आश्रयस्थळ होते. शाळा म्हणजे पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी पेटलेला धगधगता अग्निकुंड होती. काही स्वातंत्र्यसैनिक नाव बदलून त्या शाळेत राहिले. परस्पर निघून गेले. अशा अनेक अनामिक वीरांनीदेखील अकोल्याच्या मातीला संघर्षभूमी बनवले.

विलास बोराळे 9881215697
(दैनिक लोकमत अकोला आवृत्ती, 15 ऑगस्ट 2007 वरून उद्धृत, संपादित – संस्कारित ,विस्तारित)

About Post Author