Home वैभव स्वप्नसोपान बारोंडागड

स्वप्नसोपान बारोंडागड

बारोंडागड’ हे नाव खडबडीत आहे. ते ठिकाण पालघर जिल्ह्यातील विरारपासून हाकेच्या अंतरावर असूनही लोकांच्या नजरांपासून मात्र दूर राहिले आहे. ते झाकले माणिक आहे असेही म्हणता येईल. सूर्योदय, सूर्यास्तपावसाळाहिवाळा या सगळ्याची उत्कंठा अनुभवावी ती  निसर्गरम्य बारोंडागडावर !

 ‘बारोंडागड’ हे नाव खडबडीत आहे. ते ठिकाण विरारपासून हाकेच्या अंतरावर असूनही लोकांच्या नजरांपासून मात्र दूर राहिले आहे. ते झाकले माणिक आहे असेही म्हणता येईल. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाच्या पूर्वेकडून फुलपाडा स्टॉपसाठी बसेस व रिक्षा नियमित असतात, तो स्टॉप महापालिकेच्या तरण तलावापाशी आहे. तेथपर्यंत जाऊन गडाच्या दिशेने पदभ्रमण करता येते किंवा खाजगी रिक्षाने गडाच्या थेट पायथ्यापर्यंत जाता येते.

तरणतलाव येईपर्यंत खूप गजबजलेली आणि काहीशी बकाल वस्ती आहे. आजूबाजूला फिरती शौचालये दिसतात. त्यामुळे त्या भागाच्या जवळच निसर्गसौंदर्याचा ठेवा आहे याची पुसटशी चाहूलही लागत नाहीमात्र सिमेंटच्या तीसपस्तीस पायऱ्या चढून गेल्यावर, फाटक्यातुटक्या झोपडीतून एकदम सिंड्रेला बाहेर यावी तसे वाटते बिलोरी आईन्यात जणू चंद्राचे प्रतिबिंब दिसावे तसा नितळ पाण्याचा विस्तृत संचय दिसतो. तिन्ही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांच्या कोंदणात बसवलेला हिराच जणू तो ती आहे पापडखिंड. गमतीशीर नाव आहे ना तलावाच्या कडेने केलेल्या फूटपाथसारख्या मार्गावरून रमतगमत चालत जाता येते वा काठावर बसूनच राहता येते. तलावाच्या पूर्ण सभोवती जाणारी वाट आहे. जीवदानी मातेचे प्रसिद्ध मंदिर डाव्या हाताला आहे. त्यावर केलेल्या फिरत्या रंगीत रोषणाईचे सुंदर प्रतिबिंब पाण्यात दिसते. उजव्या दिशेला सुबाभूळसाग या झाडांची दाटी जंगलात आली आहे असा जणू भास होतो.

दुसऱ्या टप्प्यातील वर वर जाणारा कच्चा रस्ता खडकाळ आहे. आजूबाजूलाआदिवासींची घरे आणि शेती तुरळक आहे. ताडाची झाडे, बोरीची काटेरी झुडपे आणि सागवानाचे उंचच उंच वृक्ष त्या वाटेच्या कडेने उभे आहेत. हिरव्या झाडाझुडपांचा गंध मरवा किंवा दवणा या सुगंधी वनस्पतींसारखा नाकाला जाणवतो. ती सुखद जाणीव जंगलाच्या गाभ्यात आहे. बारोंडागडाच्या पायऱ्या साडेतीनशे आहेत. लाल चिरे आणि सिमेंटच्या पायऱ्या. तेथील रात्रीचे दुर्मीळ सौंदर्य..अनुभवावी अशी गोष्ट आहे ती दूर खाली पापडखिंड तलावाचे पाणी चंद्रप्रकाशात चमकते. त्याही पलीकडे विरार शहराचे झगमगते दिवे दिवाळीतील पणत्यांसारखे शांत आनंद देतात. पायऱ्यांच्या कडेकडेने मोठमोठ्या दगडी शिळा आहेत. पावसाळ्यात त्यावरून धबधबे वाहतात. गडाच्या अर्ध्या रस्तावर चिमुकले बारमाही पाण्याचे कुंड आहे. तेथे संगमरवरी सुबक घुमटीत गणेश, शिव, हनुमान अशा मूर्ती आहेत. तेथील दृश्य पाहताना बाकीच्या जगाचा, दैनंदिन तणावचिंतांनी करपलेल्या आयुष्याचा साफ विसर पडू शकतो जीवदानी डोंगराला लागून पापडखिंड धरणाच्या पूर्वेला बारोंडा डोंगरावर जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे पुरातन स्थान आहे. जीवदानीमाता, बारोंडामाता यांच्या सुरेख मूर्ती मन प्रसन्न करतात. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आणि शितळादेवी यांचे तांदळा स्वरूपात दर्शन तेथे होते. देवीची पूजा डोंगराच्या कडेकपारीत शिळा स्वरूपात गुराखी करत असत. आता न्यासाद्वारे तेथील बारोंडा देवीच्या पूजाअर्चेची व्यवस्था केली जाते. काही भक्तांनी पापडखिंड धरणाच्या बाजूने बारोंडा डोंगरापर्यंत कच्ची पायवाटही तयार केली आहे. तेथे नियमित येणारे मोजके भाविक सोडले तर फारशी गजबज आढळत नाही.

अजून उंच पायऱ्या चढून वर गेले, की तेथे कालभैरव आणि कालीचे स्थान आहे. तेवढ्या उंचीवरून जीवदानीच्या मंदिराचे दर्शन मनोहर होते. सूर्योदय, सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा या सर्वांत त्याचे सान्निध्य अनुभवण्याची उत्कंठा लागावी असे ठिकाण बारोंडागडाचे !

– स्नेहा सांगेकर 9326468385 snehavihang@gmail.com

—————————————————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version