साताऱ्याचा नांदगिरी किल्ला आणि दुर्मीळ जैन मंदिर

3
355

साताऱ्यातील कल्याणगड तथा नांदगिरी हा किल्ला अपरिचित आणि दुर्गम असा आहे. तो सह्याद्रीमधील महादेव रांगेच्या एका शृंगामध्ये उभा आहे. किल्ला सातारा शहर आणि पुणे-सातारा महामार्ग यांच्या पूर्वेला येतो. तो साताऱ्यापासून चोवीस किलोमीटर आणि कोरेगाव तालुक्याच्या गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर; तर सातारा रोड स्थानकापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या जवळ जरंडेश्वराचा डोंगर आहे. तेथे रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आहे. यमाई मातेचे मंदिरही जवळ, किन्हई डोंगरावर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ही पस्तीसशे फूट आहे. बालेकिल्ल्यावर सपाट भागात मधोमध वडाचे मोठे झाड आहे. त्यामुळे किल्ला दुरूनही ओळखता येतो.

नांदगिरी किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज याने (इसवी सन1175 ते 1212) बांधला असे मानले जाते. महाराष्ट्रात कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजांचे राज्य इसवी सन 940 ते 1212 ह्या काळात होते. दुसरा भोज हा शिलाहार वंशातील शेवटचा पराक्रमी राजा. तो वैदिक धर्माचे आचरण करत असला तरी त्याच्यावर जैन साधू आणि धर्मप्रसारक आचार्य माघनंदी सिद्धांतदेव ह्यांचा प्रभाव होता. त्याने जैन धर्मीयांना राजाश्रय देऊन, हिंदूंप्रमाणेच जैनांनादेखील देणग्या दिल्या. तसे ताम्रपट आढळले आहेत. भोज राजाच्या देणगीतूनच नांदगिरीच्या गुहेतील जैन मंदिराची स्थापना झाली असे मानतात. त्याच भोज राजाने कोल्हापूर येथे विशाळगड, सामानगड, साताऱ्यातील अजिंक्यतारा, नांदगिरीचा कल्याणगड, कोकणातील जलदुर्ग-विजयदुर्ग आणि इतर असे एकूण पंधरा किल्ले बांधले.

शिलाहार राजांच्या कालखंडात सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या भागांत जैन धर्माचा विशेष प्रभाव निर्माण झाला, त्याचे श्रेय प्रामुख्याने आचार्य माघनंदी सिद्धांतदेव ह्यांना जाते. कोल्हापुरातील शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, सर्वपरिचित कर्मवीर भाऊराव पाटील हेदेखील जैन कुटुंबातीलच होते. आचार्य माघनंदी सिद्धांतदेव यांनी जैन तत्त्वज्ञान, जैन सिद्धांत यांचा अभ्यास करून शेकडो जैन मुनी तयार केले, त्यांनी त्यांचे आयुष्य जैन धर्मप्रसारासाठी वेचले.

नांदगिरी किल्ला शिलाहार राजांच्या काळानंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. शिवरायांनी सातारा परिसरातील अनेक किल्ले स्वराज्यात 1673 च्या आसपास समाविष्ट केले, त्यात नांदगिरी किल्ल्याचादेखील समावेश होता. गडाचा कारभार शिवकालानंतर प्रतिनिधींकडे सोपवला गेला. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशवे व प्रतिनिधी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले, तेव्हा तो किल्ला पेशव्यांकडे आला. इंग्रजांनी पेशवाईचा अंत 1818 मध्ये केला, तेव्हा जनरल प्रिझलरने तो किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला.

नांदगिरी किल्ल्यावर लढाईचे-पराक्रमाचे झालेले मोठे प्रसंग किंवा तशा घटना ह्यांचा उल्लेख फार कोठे आढळत नाही, मात्र किल्ला दुर्गम असल्या कारणाने त्याचा उपयोग शिवकाळात व पेशवे काळात खजिनदारीसाठी झाल्याचे ध्यानी आले आहे. त्यावेळी ते तालुक्याचे ठिकाण होते. नांदगिरी किल्ल्याच्या आसपास म्हसोबा डोंगर रांगेत शिवरायांनी बांधलेले वारुगड, वर्धनगड हे किल्ले आहेत. जवळच संतोषगड आणि महिमानगड हे किल्लेदेखील आहेत. वर्धनगड नांदगिरीपासून वीसेक किलोमीटर अंतरावर आहे. तेथे लढाई तथा ऐतिहासिक घडामोडी झाल्याचा उल्लेख आढळतो. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर, 1701 मध्ये, ताराराणी यांच्या काळात मुघल सरदार फतेउल्लाखान याने वर्धनगडावर आक्रमण केले आणि तो जिंकून घेतला. वर्धनगड पुन्हा, तीन वर्षांनी ताराराणी यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी जिंकून घेतला.

नांदगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या किल्यावरील लांबलचक पसरलेली गुहा होय. किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यातून आत शिरताच समोर कातळकडा आहे. कातळकड्याच्या डावीकडे, काही पायऱ्या खाली उतरल्यावर गुहा लागते. गुहेतील मिट्ट काळोखात, गुहेच्या टोकापर्यंत जाता येते. तेथे भगवान पार्श्वनाथ, श्रीदत्त आणि अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्ती आहेत. अंधाऱ्या गुहेतून त्या मूर्तींपर्यंत बॅटरीच्या प्रकाशझोताशिवाय जाणे अशक्य आहे. पार्श्वनाथांच्या मूर्तीवर सर्प आच्छादन आहे. गुहेची रुंदी साधारणत: तीन ते चार मीटर आहे. मात्र उंची कमी आहे. गुहेत वरून पाण्याचा थेंब थेंब पाझर सतत चालू असतो. ते पाणी अत्यंत थंड असल्यामुळे तेथे प्रचंड थंडावा जाणवतो.

गुहेच्या उजवीकडून थोडे वर गेले की अजून एक दरवाजा आहे. तेथून आत गेले की सर्वप्रथम हनुमानाचे मंदिर लागते. पुढे रामदासशिष्य कल्याण स्वामी यांची समाधी लागते. त्यामुळे किल्ल्याला कल्याणगड असे नाव शिवकाळात दिले गेले असावे. मात्र कल्याण स्वामींच्या समाधीबाबत सबळ पुरावा नाही. बालेकिल्ल्यावर वडाच्या झाडाशेजारी अब्दुल करीम नामक पीराचे थडगे होते. त्या पीर स्थानाचे बांधकाम पाडण्यात आले आहे. तो विषय वादग्रस्त आहे. डावीकडे भक्तनिवास आहे आणि उजवीकडे छोटे टाके व गणपती मंदिर आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडे मोठे पठार आहे, पावसाळ्यात तेथे घनदाट गवत असते, त्यातून वाट काढून पुढे गेल्यास विस्तीर्ण प्रदेश आणि दूरवरचे डोंगर व त्यावरील पवनचक्क्या छान दिसतात.

जैन धर्मपरंपरेनुसार नांदगिरी हे ‘अतिशय क्षेत्र’ म्हणजे सात्त्विक भाव प्रकट करणारे तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्मीय मंडळींचे प्रमाण प्रत्यक्ष नांदगिरी किल्ल्याच्या परिसरात नगण्य आहे. मात्र, मुख्यत्वे दिगंबर पंथीय जैन धर्मीय भगवान पार्श्वनाथ यांच्या जयंतीला (13 डिसेंबर) आणि मुकुट सप्तमीला (साधारण ऑगस्ट महिन्यात) तेथे मोठ्या संख्येने एकत्रित येतात. जैन भक्तांचे येणेजाणे त्या ठिकाणी इतरही दिवशी सुरू असते. भाविकांच्या सोयीसाठी चार किलोमीटर कच्चा रस्ता डोंगरावर तयार केला आहे. चार चाकी वाहने तेथपर्यंत जातात. तेथून पुढे दीड किलोमीटर अंतर पायी जाऊन थोडे चढून वर गेले, की पार्श्वनाथांच्या गुहेजवळ पोचता येते. जैनधर्मीय भगवानांच्या ह्या मंदिराचे निर्माण कार्य अकराशे वर्षांपूर्वी झाले. त्या मूर्तीशेजारी हिंदू आचारपद्धतीतील दैवत अशी दत्त मूर्ती कशी काय विराजमान आहे ह्याचे कोडे उलगडत नाही. गुहेच्या वरील दुसरा दरवाजा कुलूपबंद असतो. बुरुजाच्या डावीकडील बाजूने चढून आत गेल्यावर बालेकिल्ल्यावर पोचता येते. पीराच्या अस्तित्वाचा इतिहास कळणे उचित राहील. जैन धर्मीयांचे मंदिर तेथे आधीपासून असावे. इतिहास जसा पुढे सरकला तसे जैन धर्मीयांचे तेथील अस्तित्व कमी होत गेले. त्यानंतर इतर पंथीयांनी त्यांची श्रद्धेची ठिकाणे त्या भागात विकसित केली. जैन धर्मीयांकडून नांदगिरीच्या भगवान पार्श्वनाथांच्या जलमंदिराचे संरक्षण आणि संवर्धन असे प्रयत्न चालू आहेत. जैन समुदायाने किल्ल्याच्या पायथ्याला तीन एकर जमिनीवर प्रवचन सभागृह, भोजनालय, वसतिगृह बनवण्याचे कार्य सुरू केले आहे. जैन भक्तांसाठी लहानशी धर्मशाळादेखील नांदगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. चाळीस वर्षांपूर्वी ‘श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन गुंफा मंदिर ट्रस्ट’ची स्थापना झाली आणि मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यास गती मिळाली. मूळ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती सुरक्षित राहवी म्हणून गुहेतील मूर्तीच्या कठड्या सभोवताली लोखंडी जाळीचे लहानसे भक्कम कुंपण केलेले आहे, रस्ता निम्म्याहून जास्त डोंगरावर झाला आहे.

– संदीप चव्हाण 9890123787, drsandeep85@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here