Home लक्षणीय सांकेतिक बोली-गूढतेची गंमत

सांकेतिक बोली-गूढतेची गंमत

2
-sankeitkboli

प्रमाण भाषेला समांतर अशी वेगळी भाषाव्यवस्था लोकांकडून दैनंदिन व्यवहारात उपयोजली जाते. ती सांकेतिक भाषा म्हणूनही संबोधली जाते. ती निरक्षरांकडूनही उपयोजली जाते. त्यांच्यासाठी ते निव्वळ संवादाचे साधन असते. विशेषत: व्यापारी, शेतकरी, मजूर हा वर्ग. त्याला भाषिक सिद्धांतांशी देणेघेणे असत नाही. त्यामुळे भाषेच्या काटेकोर वापराकडे लक्ष द्यावे हे त्याच्या गावीही नसते. मात्र त्यांच्याकडून सांकेतिक भाषा जाणीवपूर्वक योजली जाते. उदाहरणार्थ, बैल विकणारे व्यापारी व बैल घेणारे -ग्राहक हे खरेदी व विक्री-प्रसंगी भाव करताना सांकेतिक शब्द वापरतात. त्यामागे देवाणघेवाणीचे आकडे, नफातोटा गुप्त राहवा ही व्यापारसुलभ भावना असते. तो सांकेतिक भाषा काटेकोरपणे योजतो.

 

बैलखेरदी विक्री प्रसंगी योजल्या जाणाऱ्या भाषेचे, विशेषत: आकडेवारीच्या भाषेचे स्वरूप असे आहे –

 

गणिती आकडा सांकेतिक शब्द             गणिती आकडा             सांकेतिक शब्द
1 सऱ्या   10 असर
2 याज   15 कप असर
3 ढला 20 सुती
4 रबा  25 कपसुती
5 कप 30 सरनिम
6 ठिस 50 निमा
7 रात्या 100 शिकारा
8 बळल 500 कपशिकारा
9 उना 1000 खिला

 

त्यांच्या मते ‘याज खिला कपशिकारा’चा अर्थ होतो दोन हजार पाचशे रुपये. अशा सांकेतिक भाषेतून त्यांची खरेदी विक्री चालते. व्यापाराशी संबंधित सर्वांना त्या भाषेतील शब्दांकांमागील संकेत जाणून घ्यावे लागतात. ती भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते.

तीच गोष्ट मटका व्यवसायाशी संबंधित लोकांच्या भाषेची आहे. फार मोठा वर्ग मटका आणि त्याच्याशी निगडित व्यवसायनिष्ठ भाषेचे उपयोजन करत असतो. मटका-व्यवसायात उपयोजित शब्दांक मजेशीर आहेत –

 

    गणिती आकडा                           

सांकेतिक शब्द
1 एकनाथ
2 दुर्गामाय    
3 तिरुपती
4 खाटलं
5 इंदिरा गांधी
6 छगन
7 लंगडा
8 बठड
9 न्हाई

 

गुजराथी भाषेत शून्यास ‘मिंढी’ म्हणतात. उपरोक्त कोष्टकात शून्यास ‘मेंढी’ म्हटले आहे. ‘1’ या आकड्यास एकनाथ, ‘2’ या आकड्यास दुर्गामाय, ‘3′ या आकड्यास तिरुपती/तिर्री हे शब्द काहीसे नैसर्गिक, तार्किक वाटतात. त्यांच्या उच्चारांवरून ते बनवले गेलेले वाटतात. मात्र 4, 5, 6, 7, 8 या शब्दांसाठीचे शब्द पूर्णपणे वेगळे आहेत. त्यातही काँग्रेस पक्षाचे चिन्ह (पंजा) म्हणून ‘5’ या आकड्यास इंदिरा गांधी म्हटले जाते. ‘4’ या आकड्यास ‘खाटलं’ म्हणण्याचे एक कारण असे, की ‘खाटलं’ म्हणजे बाज. बाजेला चार पाय असतात. ‘6’ या आकड्यास ‘छगन’ म्हणण्याचे कारण असे दिसते, की वेडसर, विक्षिप्त व्यक्तीस छगन म्हटले जाते. ‘सात’ आकड्यास ‘लंगडा’ म्हणण्याचे कारण असे, की ‘७’ हा अंक इंग्रजीत 7 असा लिहितात. त्याचा आकार लंगड्याच्या काठीसारखा असतो. अशा काठीसदृश्य अंकास ‘लंगडा’ म्हणत असावेत. भाषेत नव्या शब्दांची भर घालणाऱ्या या लोकांना भाषाभान नाही. त्यांची ही भाषेतील भर निश्चितच लक्षणीय आहे.

(‘भाषा आणि जीवन’ वरून उदृत, संपादित-संस्कारित)  

फुला बागूल 9420605208
dr.fulabagul@gmail.com

हे ही लेख वाचा – व्यवसायनिष्ठ बोली – मराठीवर आघात?
                        शब्दनिधी

About Post Author

2 COMMENTS

  1. अभ्यासपूर्ण संकलन आहे. बरेच…
    अभ्यासपूर्ण संकलन आहे. बरेच शब्द नव्याने माहीत झाले.

  2. लेख उत्तम लिहिला आहे,…
    लेख उत्तम लिहिला आहे, मटक्याचे सांकेतिक आकडे आम्ही कॉलेजात होतो तेव्हापासून म्हणजे 1970 पासून ऐकले आहेत. पन्नास वर्षानंतर ही त्यांत बदल नाही, आश्चचर्य आहे.

Comments are closed.

Exit mobile version