मधुराने लिहिल्या आहेत त्या सर्व गोष्टी सत्यच आहेत. मधुरा दहा वर्षांपूर्वी ‘जे.एन.यु.’त होती. मी तिच्या कितीतरी आधी पास आऊट झाले. मी ‘जे.एन.यु.’मध्ये राहत होते, तेव्हा जग भारतासाठी नुकते खुले होऊ लागले होते. आम्हाला घरी एस.टी.डी. फोन करायचा तर बसने जावे लागे. तो प्रवास किमान अर्ध्या तासाचा होता. मी ‘जे.एन.यु.’त प्रवेश घेण्यासाठी डॅडींबरोबर गेले. तेथे आम्ही प्रा. तलगिरी यांना भेटलो. ते त्यावेळी जर्मन भाषा केंद्राचे प्रमुख होते. डॅडी त्यांना ओळखत होते. डॅडींनी त्यांची ओळख माझ्याशी करून दिली. प्रा. तलगिरी म्हणाले, की तू तिकडे जाऊन प्रवेश घे, तोपर्यंत डॅडी मजजवळ बसतील.
मला तर ‘जे.एन.यु.’चे आवार अजिबात माहीत नव्हते. तलगिरींना माझ्या चेहर्याचवरील शंका जाणवली असावी. ते म्हणाले, ‘घाबरू नकोस. तुला सर्व प्रकारची मदत मिळेल.’ खरोखरीच, पुढे येऊन पाहते तर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते, टेबले मांडून प्रवेश घेण्यासाठी नव्याने येणार्याु मुलामुलींना मदत करत होते. तेवढेच नव्हे, तर एखादा मुलगा/मुलगी घाबरट वाटली तर कार्यकर्ता त्याच्या/तिच्याबरोबर प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोबत राही. वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांत त्यासाठी स्पर्धा नसे. संघटनांचा हेतू नविनांना मदत करणे एवढाच असे.
‘जे.एन.यु.’मध्ये रॅगिंग नव्हते. उलट, प्रत्येक विषयकेंद्र आणि प्रत्येक वसतिगृह नवीन आलेल्या मुलामुलींच्या स्वागतासाठी तत्पर असे. वरच्या वर्गातील विद्यार्थी आणि वसतिगृहातील जुनी मुले यांच्याशी नविनांची अशा स्वागतातून घट्ट ओळख होऊन जाई.
सोव्हिएत रशियाचे विभाजन झाले, बर्लिनची भिंत कोसळली, चीनमधील विद्यार्थ्यांनी बंड पुकारले आणि मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारला गेला… या चार महत्त्वाच्या घटना मी ‘जे.एन.यु.’मध्ये राहत असताना घडल्या. आम्हाला त्या वेळी राहण्यास एअर कंडिशण्ड खोल्या नव्हत्या, की ‘वाय-फाय’ सुविधा नव्हती. पण ग्रंथालय आता आहे तेथेच आणि तितकेच सुसज्ज होते. ते रात्री बारापर्यंत उघडे असे. परंतु तेथे बसायला जागा मिळणे मुश्किल. त्यावेळी ‘जे.एन.यु.’चे आवारही लहान होते. मी कोठच्याच राजकीय पक्षाला बांधली गेलेली नव्हते. पण ‘जे.एन.यु.’मधील सांस्कृतिक घडामोडींत माझा सहभाग मोठा असे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परस्पर परिचयही दांडगा असे. आम्ही सगळे संध्याकाळी सहानंतर ‘जागे’ होत असू. ‘झेलम’ हिरवळीवर रोज सायंकाळी काही ना काही कार्यक्रम असे. कधी पथनाट्य, तर कधी लोकसंगीत, कधी कोणा प्रमुख व्यक्तीचे व्याख्यान किंवा कधी ‘स्मिक मॅके प्रोग्राम’. कार्यक्रम संपला, की सगळी मुले वेगवेगळ्या गटांत विभागली जात. ते सगळे गट पुन्हा ‘गंगा धाब्या’वर जाऊन एकत्र होत आणि मग जोरजोरात चर्चा चालत. मंडल आयोग अहवालाच्या वेळी चर्चा विकोपाला गेली. बहुतेकांचा अहवालाला पाठिंबाच होता. पण काही गटांचा विरोधही दिसून येई. सर्वांना मोकळेपणी बोलायची मुभा होती. प्रत्येकजण त्याच्या जागी ठाम भासे.
माझी एक मैत्रीण मुंबईत ‘आय.ए.एस.’ परीक्षेसाठी तयारी करत होती. तिला आम्हाला विद्यापीठात दिली जाणारी सगळी पॅम्प्लेट्स हवी असत. पॅम्प्लेट्स आम्हाला जेवणाच्या वेळी वाटली जात. मधुराने त्यांचाच उल्लेख केला आहे. मुंबईच्या मैत्रिणीला पॅम्प्लेट्समधील मते, विद्यापीठातील भाषणे, त्यावरील चर्चा असे सारे हवे होते. त्यासाठी पैसे देण्याचीदेखील तिची तयारी होती. ती आता ‘रेव्हेन्यू’सेवेमध्ये उच्च अधिकारी आहे.
‘मुलगी झाली हो’ या मराठी नाटकाचा प्रयोग शशी मिश्रा यांच्या सहकार्याने मसुरीला होई. तेथे आय.पी.एस. आणि आय.ए.एस. अधिकार्यांयसाठी प्रशिक्षण संस्था होती. एका वर्षी ‘मुलगी झाली हो’च्या कार्यकर्त्या नाटकात काम करण्यासाठी मला घेऊन गेल्या. प्रयोग संपल्यावर प्रशिक्षणार्थींनी माझ्याभोवती गराडा घातला. कारण माहीत आहे? कारण मी ‘जे.एन.यु.’तून आले होते! त्यांना ‘जे.एन.यु.’मधील काही खबर हवी होती. त्यांना तेथील निवडणुकांचे राजकारण जाणून घ्यायचे होते. फक्त ‘जे.एन.यु.’वाल्यांना तेथील अशा घटनांची महती कळणे शक्य आहे!
मी प्रशिक्षणार्थी म्हणून ‘हिंदू’ वृत्तपत्रात काम केले. माझ्याकडे गुन्हेगारी बातम्या जमा करण्याचे काम होते. मला पोलिसांच्या मुख्य कार्यालयात आणि वेगवेगळ्या पोलिस स्टेशनांमध्ये जावे लागे. माझा अनुभव असा, की मी ‘जे.एन.यु.’मध्ये शिकलेली आहे असे कळताच मला तेथे चांगली, आस्थेची वागणूक मिळे.
आमचे विचार, आमच्या चर्चा; एवढेच काय, विद्यार्थ्यांचे राजकीय गट यांमध्ये शिक्षक उत्साहाने सहभागी होत. ते आमच्याबरोबर धाब्यावर चहा घेत. आम्हा वसतिगृहात राहणाऱ्या मुलामुलींना कधी त्यांच्या घरचा फराळ मिळे. मात्र परीक्षेतील श्रेणी अभ्यासाच्या गुणवत्तेवरच अवलंबून असे. आमची परीक्षा पद्धत वेगळी होती. आमचे वर्ग वेगळ्या तऱ्हेने भरत. असे वेगवेगळे वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी चालू असले, तरी त्यांचा त्रास एकमेकांना नसे.
आमचे चिनी भाषेचे शिक्षक प्रा. तांचूम यांनी आमची परीक्षा अभिनव पद्धतीनेच घेतली. आम्ही वर्गात शिरलो, तर तेथे एका बशीत शेंगदाणे ठेवलेले होते आणि त्याच्या बाजूला ते खाण्यासाठी चिनी पद्धतीच्या चॉपस्टिक. आमची परीक्षा काय, तर एका मिनिटात त्या चॉपस्टिकच्या साहाय्याने दाणे उचलून किती खातो ते बघायचे! ते म्हणाले, ‘तुम्ही चिनी भाषा शिकत असाल तर खाण्याची ती पद्धतही कळली पाहिजे.’ दुसरी परीक्षा लेखी होती. त्यांनी सांगितले, की तुम्ही तुमच्या वह्या, पुस्तके, टाचणे, काहीही वापरून उत्तरपत्रिका लिहिली तरी चालेल. पण त्यांनी काढलेले प्रश्नच असे होते, की तेथे त्या साहित्याचा काही उपयोग झाला नाही. त्याकरता आम्ही केलेला अभ्यास आणि त्यामधून आमच्या विचारांची झालेली घडण कामी येणार होती. मला शंका आहे, की इतरत्र कोठेही अशा परीक्षा होत असतील का? प्रा. तांचूम यांना ‘भारत सरकार’ने तीन वर्षांपूर्वी ‘पद्मभूषण’ किताबाने गौरवले.
आम्हाला केव्हाही कोणत्याही लेक्चरला बसण्याची परवानगी होती. ‘थ्री इडियट’ सिनेमाची आठवण व्हावी असाच तो प्रकार. इतिहास हा काही माझा विषय नव्हता. पण मी रोमिला थापर यांची कितीतरी लेक्चर्स विद्यापीठात ऐकलेली आहेत. तसेच, फिलॉसॉफी हाही माझा विषय नव्हे. पण मी गोरखपांडे यांच्या लेक्चर्सना नि:शंक जाऊन बसे.
मला ‘जे.एन.यु.’ला जाऊ दिले म्हणून मी आई-डॅडी यांचे किती आभार मानू? ‘जे.एन.यु.’ने मला आयुष्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. ‘जे.एन.यु.’ने मला केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे तर इतर अनेक तऱ्हांनी शहाणे केले. ‘जे.एन.यु.’ने मला विचार करण्यास शिकवले, ते अंगी बाणण्यास ताकद दिली. ‘जे.एन.यु.’मुळे मी चर्चा करण्यास, वादविवाद घालण्यास शिकले. मी स्वत:चे मत दुसऱ्याला पटवण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्याशी संघर्ष करायचा नाही हे‘जे.एन.यु.’त शिकले. स्वत: बोलण्याइतकेच श्रवण महत्त्वाचे असते हे मला ‘जे.एन.यु.’मध्ये कळले. त्यातून माझी घडण झाली.
माझी मुलगी तन्वी आता बारावीनंतर खूप दूर शिकायला गेली आहे. काही वेळा मनात येते, की तिला तेथे काही अडचण आली तर? अडचण कशाचीही – पैशांची, आजारपणाची… ती काय करेल? पण प्रश्न लगेच मिटतो. वॉशिंग्टन डीसीमधील तिच्या विद्यापीठाच्या आसपास, न्यू यॉर्कमध्ये, न्यू जर्सीमध्ये, हॉर्वर्ड-बोस्टन-एमआयटी… सर्व ठिकाणी ‘जे.एन.यु.’मध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी आहेत. तन्वीचा एक फोन गेला तरी सगळे धावत येतील. ‘जे.एन.यु.’ ही चीजच वेगळी आहे. ‘जे.एन.यु.’ काय आहे हे कळण्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ‘जे.एन.यु.’चा भाग बनले पाहिजे. मला अनेक विद्यार्थी असे माहीत आहेत, की जे ‘जे.एन.यु.’मध्ये शिकायला नव्हते. पण ते तेथेच राहिले आणि त्यांनी आय.ए.एस.च्या परीक्षेची तयारी केली. ते सारे ‘जे.एन.यु.’ला त्यांचे विद्यापीठ मानतात!
काही विघातक घटक दिसून आले म्हणून पूर्ण विद्यापीठाला बदनाम करणे सोडून द्या. ‘जे.एन.यु.’चा एक महिन्यासाठी तरी भाग बना आणि मग बघा. तुमच्या श्वासात ‘जे.एन.यु.’ जाणवेल!
– सुवर्णा साधू बॅनर्जी
Ek kid suddha sara samaj…
Ek kid suddha sara samaj nasvu shkte. JNU madhlya kidi thechlya pahjet…
Comments are closed.