शेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी आहे, की त्या गावात शेरड्या राखणारी व्यक्ती राहत होती. त्यावरून ‘शेर्डे’ असे नाव पडले. कालांतराने ‘शेर्डे’चे ‘शेर्ले’ आणि ‘शेर्ले’चे ‘शेर्पे’ नाव झाले. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे. गावात काळेश्वरी देवी, ब्राम्हण देव, रामेश्वर, गांगादेव यांची मंदिरे आहेत. ग्रामदैवत काळेश्वरी म्हणजे काळंबादेवी आहे. काळेश्वरी देवीचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
गावाच्या सीमेवरून नाधवडे येथे उगम पावलेली शुकनदी वाहत नापणेमार्गे शेर्पे गावात येते. बारमाही वाहणाऱ्या शुकनदीमुळे गाव सुजलाम् सुफलाम् बनले आहे. नदीमुळे शेर्पे-नापणे धबधबा तयार होतो. शेर्पे धबधबा नयनमनोहर आहे, तो बारमाही वाहतो. तेथील निसर्गही हिरवाईने नटलेला आहे. ते अरण्य पशू, पक्षी आणि जंगली प्राणी यांसाठी प्रसिद्ध आहे. गावात अनेक देवराया आहेत.
गावातील बहुसंख्य तरुण नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत व अन्य ठिकाणी वसलेले आहेत. चाकरमानी त्यांच्या मूळ गावी गौरी गणपती, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्र, शिमगा, उरुस, बुद्ध जयंती आदी धार्मिक उत्सव, सण; तसेच, मे महिन्याची सुटी आणि वार्षिक जत्रोत्सव यावेळी येत असतात. यात्रेत वेगवेगळ्या पद्धतीने ढोल-ताशे वाजवले जातात व तेथील लोक त्यामध्ये बेभान नाचतात. देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेऊन न्यायनिवाडे व अन्य अडचणी यांतून सुटका करून घेणे; तसेच, विषार झालेल्या व्यक्तीच्या अंगात भिनलेले विष देवीच्या पाण्याने उतरवण्याची प्रथा गावात आहे. ती कमी होत आहे. गावामध्ये भातपिकाबरोबरच कुळीथ, चवळी, नाचणी, भुईमूग आदी पिके घेतली जातात. गावातील सर्व शेतकरी ऊसशेती मोठ्या प्रमाणात करतात. तेथील शेतकरी काजू-आंब्याची लागवडही अलिकडेच मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. गाव उन्हाळी शेतीमुळे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे.
गावाच्या मध्यभागातून कोकण रेल्वे धावते. गावात दोन शाळा, दोन अंगणवाड्या आहेत. मुले पुढील शिक्षणासाठी खारेपाटण या गावी जातात. गावाची ग्रामपंचायत विकासकामात आघाडीवर आहे. गावातील बौद्धवाडीमध्ये बुद्धविहार आहे. तसेच, मलिक रेहमबाबांचा दर्गा आहे. त्याच्या उरूसासाठी सर्व समाजातील लोक एकत्र येतात. गावात बाजार भरत नाही, परंतु खारेपाटण या गावी शनिवारी बाजार भरतो. एसटी गावात दिवसातून तीन वेळा येते. गावापासून पाच किलोमीटरवर मुंबई-गोवा हायवे आहे. तेथून आठ किलोमीटरवर वैभववाडी हे रेल्वे स्टेशन आहे. गावात मालवणी आणि कोकणी भाषा बोलल्या जातात. गावातील महिला मंडळांनी एकत्र येऊन गावात विकल्या जाणाऱ्या दारूवर बंदी आणली आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्यां अनुया कुलकर्णी यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनुया कुलकर्णी यांचे काम मुख्यत: स्त्रियांमध्ये अल्पबचत गट, कौटुंबिक हिंसाचार, समुदेशन केंद्र या स्वरूपाचे आहे. त्या स्त्रियांच्या आंदोलनामधून पाच गावांतील दारुधंदे बंद पाडण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी कुरंगावणे धरणाची जागादेखील शेतकऱ्यांची चळवळ उभारून बदलून घेतली. त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांचे वडील पंढरीनाथ बागाव यांच्याकडून मिळाली. ते राजापूरचे सामाजिक कार्यकर्ते. अनुया कुलकर्णी यांचे पती मर्चंट नेव्हीत होते. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत.
गावाच्या आसपास नडगिळी, कुरंगवणे, वेळणे, दिक्षी, नापणे ही गावे आहेत.
– नितेश शिंदे
niteshshinde4u@gmail.com
माहिती स्रोत : अनुया कुलकर्णी – 9421794856
खूप छान
खूप छान