शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची प्रेरणा स्वतंत्र आहे, हे खरे. शाहिरांनी त्यांची रचना पूर्वीच्या संस्कृत-मराठी कवींची रचना डोळ्यांसमोर ठेवून केलेली नाही. त्यांचे काव्य लोकजीवनातून निर्माण झाले. त्यामुळे त्यांचा अविष्कार नाविन्यपूर्ण व ताजातवाना आहे. शाहीर हे खऱ्या अर्थाने लोककवी होत. शाहिरी काव्य शिवकाळापासून सुरू झाले, पेशवाईबरोबर वाढले आणि तेथेच विराम पावले. त्यानंतर त्याची पुनरावृत्ती व रूढ अनुकरण होऊ लागले. त्यापूर्वी यादवकालीन वाङ्मयात मधूनमधून शाहीर, गोंधळी, भाट इत्यादींचे उल्लेख आढळतात. शिवपूर्वकाळात एकनाथांचे गोंधळ, भारुडे, पाईक, गौळणी इत्यादीचे उल्लेख आढळले होते. तत्पूर्वीही ते असावेत, त्यातून कालानुरूप असा वाङ्मयप्रकार जन्माला आला असावा.
‘शाहीर’ हा शब्द उर्दू भाषेतील शायर या शब्दापासून आला आहे. ‘शायर’ म्हणजे कवी आणि शायरी म्हणजे कविता. परंतु शाहिरांच्या परंपरेशी शायरीचा काही संबंध नाही. उर्दूचा प्रभाव मराठीवर मुसलमान राजवटीमध्ये पडला. त्यातून शाहीर म्हणजे कवी हा अपभ्रंश जन्मला असावा. मराठीतील शाहीर म्हणजे विशिष्ट प्रकारचे (लावण्या व पोवाडे) काव्य लिहिणारा, गाणारा असा अर्थ आहे. शाहिरी कविता म्हणजे वीरांच्या विलासाची आणि पराक्रमाची कविता असा अर्थ रूढ झाला आहे. शाहिरी वाङ्मयातील भाषा अस्सल मराठी आहे. राम जोशी यांचा अपवाद वगळता कोणत्याही शाहिराने संस्कृत शब्दांचा हव्यास धरलेला दिसत नाही. कारण शाहीर समाजाच्या विविध स्तरांतून आले होते. त्यांच्यात ब्राह्मणापासून अठरापगड जातीचे लोक आहेत. शाहीर संस्कृतपेक्षा फारसीच्या अधिक जवळ गेले. शाहीर तत्कालीन मराठी माणसांच्या लौकिक भावभावनांशी तादात्म्य पावले होते. लोकांच्या भावभावना शाहिरांनी काव्यातून व्यक्त केल्या. जननायक हे शाहिरांच्या कवनांचे नायक बनले. जननायकांच्या पराक्रमाची पूजा शाहिरांना करायची होती. जननायकांचा पराक्रम ही शाहिरांच्या काव्याची प्रेरणा होती. म्हणूनच सारस्वतकार म्हणतात, ‘शाहीर देशाबरोबर हसले व देशाबरोबर रडले!’
लावणी आणि पोवाडा
लावणी या काव्य व नृत्यप्रकाराची रचना मुख्यतः रंजनासाठी झाली. मनोरंजन ही प्रमुख प्रेरणा असली तरी मनोरंजनातून पैसे हा हेतू त्यात आला आणि पैशांसाठी राजाश्रय व लोकाश्रय हे महत्त्वाचे साधन बनले. लावणी पेशवाईत विशेष लोकप्रिय झाली होती. कारण मराठी माणूस त्याकाळी सुखोपभोगात मग्न झाला होता. त्यातून अश्लील व बीभत्स लावण्याही रचनाकारांकडून आश्रयदात्यांच्या इच्छेखातर लिहिल्या गेल्या. त्यातून लावणी या रचनाप्रकारावर अश्लील हा ठप्पा बसला. मग लावणीही त्या दिशेने अधिकाधिक वळत गेली.
शाहिरी काव्याचे पोवाडे व लावणी असे दोन प्रकार पडतात. पोवाड्यात वीररसाची निष्पत्ती होते तर लावणीत शृंगाररसप्रधान असतो. लावणी हे स्फूट स्वरूपाचे काव्य आहे, तर पोवाडा दीर्घ काव्यात मोडतो. लावणी ही आत्मनिष्ठ तर पोवाडा हा वस्तुनिष्ठ असतो. पोवाड्याचा जन्म लावणीच्या अगोदर मराठीत झाला. पोवाड्याचा सर्वात जुना उल्लेख बारा-तेराव्या शतकातील महिकावतीच्या बखरीत सापडतो. मराठीत पहिला उपलब्ध पोवाडा शिवकाळातील आहे. उपलब्ध सर्वात जुना पोवाडा म्हणजे अगिनदास यांचा ‘अफजलखानाच्या वधाचा’. तो जिजाबार्इंच्या सांगण्यावरून लिहिला गेला होता. दुसरा पोवाडा तानाजीचा. तो तुळशीदास यांनी लिहिला. पोवाड्यात आदर्शाची पूजा त्याच्या विरत्वाला व राष्ट्रीय भावनेला आवाहन करून केलेली असते. पोवाड्यांना शिवकाळ व पेशवेकाळ यांतील राष्ट्रीय कविता असे म्हटले जाते. शाहिरांनी कविता जशी देशभक्तीने लिहिली तशीच अर्थार्जनासाठीही लिहिली. मराठीत तीनशे पोवाडे उपलब्ध आहेत. मराठेशाहीच्या अत्यंत पराक्रमाच्या प्रसंगांचे वर्णन पोवाड्यातून आलेले नाही. पोवाडे दुसरा बाजीराव व सवाई माधवराव यांच्याच काळातील उपलब्ध आहेत. शाहिरांचे लक्ष पहिला बाजीराव, छत्रपती संभाजी, राजाराम यांच्याकडे गेलेले नाही.
पोवाडा या शब्दाची व्युत्पत्ती प्रस्तुती, प्रशस्ती करणे म्हणजेच स्तुती करणे अशी आहे. पोवाडा म्हणजे पराक्रमाचे वर्णन किंवा स्तुती असा त्याचा अर्थ आहे. पोवाडा हे गाणे पराक्रमाचे असल्यामुळे तो काव्यप्रकार मुसलमानी राजवटीत मागे पडला असावा. परंतु, त्या प्रकाराला शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना करताच पुनरुज्जीवन लाभले. पोवाडा हे कथाकाव्य आहे. त्याचप्रमाणे ते कीर्तिकाव्यही आहे. पोवाडा शाहिरांकडून म्हटला जातो. त्याची चाल धावती व खटकेबाज असते. त्यामध्ये नाट्यपूर्णता असते.
लावणीचा उगम मराठी साहित्यात पेशवाईत म्हणजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झाला. लावणी लोकगीतातून जन्माला आली असावी. लावणीचे मूळ प्रथम कृषिकर्मविषयक लोकगीतांमध्ये; नंतर गोंधळ, जागरण, वासुदेव, भराडी, भांड इत्यादी लोकगीते व लोकसाहित्य यांमध्ये असल्याचे मानतात. लावणी ही नाजूक, अटकर बांध्याची असते. शृंगार हा लावणीचा रसराज आहे. लावणीत शृंगाराचा अतिरेक असतो अशा प्रकारचा आक्षेप घेतला जातो, पण शृंगाराशिवाय लावणीला मजा नाही. शाहिरांनीच लावणीरचना मुलूखगिरीत गुंतलेल्या, संसारात शिणलेल्या, विलासात आंबलेल्या मनाला ताजेतवाने बनवून, जीवनात नवा रंग भरण्याकरता केली. लावणी सामाजिक जीवनातून लोकरंजनासाठी पसरली. त्यामुळे ती म्हणण्याच्या ढंगाला व तालबद्धतेला महत्त्व आले. मात्र शाहिरांनी लावण्या केवळ शृंगारिक लिहिल्या नाहीत; तर, गणाच्या, उपदेशपर, वैराग्यपर, देवस्तुतीपर, कथनपर, स्थानमहात्म्यपर, व्यक्तिवर्णनपर, विनोदी, अनेक भाषात्मक, मुजऱ्याच्या लावण्या अशा विविध विषयांवर विविध प्रकारे रचल्या आहेत. अनंत फंदी, परशुराम, प्रभाकर, रामजोशी, होनाजी, सगनभाऊ असे काही प्रसिद्ध शाहीर होऊन गेले.
प्रभाकर
प्रभाकर दातार हे पुण्याच्या रास्ते सरदारांचा कारकून. ते तमाशात नव्हते, परंतु कवने तमाशासाठी लिहित असत. ते बाजीरावाच्या खास मर्जीतील होते. त्यांच्या काव्यातून खर्ड्याच्या लढाईपासून पेशवाईच्या अंतापर्यंतच्या घटनांवर प्रकाश पडतो. त्यांच्या तीस ते पन्नास लावण्या आहेत. परंतु त्यांचे काव्यकौशल्य लावणीपेक्षा पोवाड्यात अधिक दिसून येते. प्रभाकरांचे इतर शाहिरांपेक्षा पोवाडे जास्त उपलब्ध आहेत. त्यांच्या तेरा प्रसिद्ध पोवाड्यांपैकी तीन माधवरावांवर, दोन रावबाजींवर, दोन पेशवे वंशवर्णनपर, दोन दुसऱ्या सयाजीराव गायकवाड यांच्यावर, एक अहिल्याबाई होळकर यांच्यावर, एक मुंबईचे नाना शंकरशेठ यांच्यावर आहे. त्या सर्व पोवाड्यांत रंगाचा (पोवाड्याचे नाव आहे.) पोवाडा प्रथम ठरतो. प्रभाकर यांचा राजाश्रय पेशवाईबरोबर संपला. त्यांना हलाखीची स्थिती प्राप्त झाली. पेशवाईचे वैभव पाहिलेल्या त्या शाहिरांना पोटासाठी मुंबईतील धनिक व सरकारी अधिकारी यांच्या स्तुतीची कवने करावी लागली. त्यांच्या लावण्या शृंगारिक असल्या, त्यात कामवासनेचे भडक चित्रण आले असले तरी रा.श्री. जोग त्याला ‘मुक्तेश्वराच्या वर्गातील कवी’ म्हणतात.
रामजोशी
शाहीर रामजोशी हे सोलापूरचे. जातीने ब्राम्हण. ते पंडित घराण्यात जन्माला आले होते. त्यांना संस्कृत काव्याचा चांगला परिचय होता. ते तमासगीर होते. प्रथम ते धोंडिबा महाराच्या फडात होते. त्यांनी नंतर स्वतःचा फड सुरू केला. त्यांच्या लावण्या विद्वत्ता, व्यासंग व बुद्धिकौशल्य यांमुळे काव्यगुणसंपन्न होत्या. त्यामुळे ते सर्व शाहिरांमध्ये शाहिरांचा तुरा ठरले. ते स्वतःला ‘कविराय’ असे म्हणवून घेत. तरीही त्यांना त्या काळच्या तथाकथित श्रेष्ठ समाजात प्रतिष्ठा मिळाली नाही. मात्र शाहीर म्हणून त्यांचे इतिहासातील श्रेष्ठत्व चिरकाल नोंदले गेले आहे.
सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली,
हवेलीत शिरली, मोत्यांचा भांग
शृंगारपर लावण्या लिहिणाऱ्या रामजोशी यांनी देवतापर, तीर्थक्षेत्रवर्णनपर आणि वैराग्य उपदेशपर लावण्याही लिहिल्या आहेत. रामजोशी यांच्या लावणीची अर्थचमत्कृती, खटकेबाजपणा, प्रासादिकता, ललितसुंदर भाषा, यमकानुप्रास यांचे बाहुल्य ही वैशिष्ट्ये आहेत. रामजोशी यांचे फक्त तीन पोवाडे उपलब्ध आहेत. पुण्याचा पोवाडा व शनिवारवाड्याचा पोवाडा यांत पारंपरिक वर्णन आहे. १८०२ मध्ये पडलेल्या दुष्काळावर रचलेल्या पोवाड्यात आशयापेक्षा अभिव्यक्तीकडे अधिक लक्ष दिलेले दिसते. रामजोशी यांच्या लावण्यांत संस्कृत काव्याच्या अध्ययनामुळे संस्कृतप्रचुरता आढळते.
– नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com
आधार – म.वा. धोंड (मऱ्हाटी लावणी), म.ना. सहस्त्रबुद्धे (मराठी शाहिरी वाड्मय), स.गं. मालशे, शं.गो. तुळपुळे (मराठी वाड्मयाचा इतिहास खंड –एक व दोन)
उत्तम व माहितीपूर्ण लेख…
उत्तम व माहितीपूर्ण लेख आवडला. असेच लिहित जा. शुभेच्छा.
मराठी गौळणी आणि शाहिरी काव्य…
मराठी गौळणी आणि शाहिरी काव्य याबद्दल माहिती द्यावी
Comments are closed.