Home छंद निरीक्षण वैशाली करमरकर यांचे आगळे ‘संस्कृतिरंग’

वैशाली करमरकर यांचे आगळे ‘संस्कृतिरंग’

0

भिन्न संस्कृतींत वाढलेल्या दोन कुटुंबांनी एकत्र येण्याने किंवा दोन समाजांनी एकत्र येण्याने संघर्षाची ठिणगी पडण्यास निमित्त होऊ शकते. नकळत घडणाऱ्या त्या गोष्टींचा विचार यापूर्वी क्वचितच कोणी केलेला असेल; परंतु आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्नांचे वाढते प्रमाण, नोकरीनिमित्त बाहेरील प्रांतांत वा परदेशांत जाणाऱ्या युवकांचे वाढते प्रमाण, यामुळे मात्र अशा भिन्न संस्कृतींचा आणि त्यांच्यात सुसंवाद साधण्याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे.

ती गरज ओळखून वैशाली करमरकर यांनी ‘संस्कृतिरंग’ नावाने पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा मूळ भर इंटरकल्चरल कम्युनिकेशन, म्हणजेच आंतरसंस्कृती सुसंवाद आहे. लेखिकेने आंतरसंस्कृती संबंधी लिहिताना समाजशास्त्रीय मानसशास्त्रीय दृष्ट्या सखोल विचार केलेला आहे. वैशाली करमरकर मुळच्या वसईच्या. श्रीकांत व रोहिणी वर्तक यांची ती कन्या. त्यांच्या पतीची नोकरी सीमेन्समध्ये. त्यांची बदली जर्मनीला झाल्यामुळे वैशालीही त्यांच्यासमवेत जर्मनीला गेल्या. त्यांनी तेथे मिळालेल्या फावल्या वेळेत जर्मन भाषा शिकून घेतली. त्यांची जर्मन संस्कृतीबरोबर 1977 पासून परिक्रमा सुरू झालेली आहे. आधी पतीसमवेत जर्मनीमध्ये निवास, मग शिक्षण आणि त्यानंतर जर्मन परराष्ट्र कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्योथे इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये नोकरी… अशा प्रकारे, त्यांच्या व्यक्तिगत भारतीय संस्कृतीचादेखील जर्मनी संस्कृतीशी जवळून व बराच संबंध आला. त्या दोन संस्कृतींमधील साम्य व फरक हेही त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या लक्षात उभय संस्कृतींत वाढणाऱ्या नागरिकांच्या मनात परस्परांबाबत असलेले समज व गैरसमजही आले व त्यातून त्यांच्या मनात आंतरसंस्कृती सुसंवादाची कल्पना रूजली. त्या जर्मन लोकांना भारतीय संस्कृती समजावून देण्याचे आणि भारतीयांना जर्मन संस्कृती समजावून देण्याचे काम करत असतात.

जागतिकीकरणाच्या काळात, वैशाली यांच्याच शब्दांत सांगायचे तर जागतिक भटक्या जमातीचे (ग्लोबल नोमॅड्स) प्रमाण वाढलेले आहे. नोकरी, व्यवसाय, पर्यटन, विवाह इत्यादी निमित्तांनी एका देशातून दुसऱ्या देशात वा प्रांतात जाऊन स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातूनच उपरे आणि स्थानिक असे वाद निर्माण होऊन संघर्षाची ठिणगी पडू लागली आहे. त्यास मुख्य कारण म्हणजे उपरे लोक स्थानिकांची संस्कृती समजून घेत नाहीत हे आहे. ते त्यांची उपरी संस्कृती स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न करतात. परिणामी स्थानिक लोक त्या सांस्कृतिक आक्रमणाने बिथरले जातात व त्यातून संघर्षास निमित्त मिळते. लेखिकेने ते सर्व कसे घडते ते अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की जगभरातील अनेक संस्कृती कामानिमित्ताने जसजशा जवळ येऊ लागल्या, तसतसे अनेक संघर्षात्मक प्रसंग नोंदले जाऊ लागले. त्यांची निरीक्षणे होऊ लागली. विविध संस्कृती त्यांच्या काही कृतींमधून शब्दांविना संदेश देत असतात असे ध्यानात येऊ लागले. ते संदेशग्रहण आणि संदेशवहन वेगवेगळ्या संस्कृतींत कशा प्रकारे होते? त्याचे काय अर्थ काढले जातात? त्यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात? त्या प्रतिक्रिया एवढ्या दोन टोकांच्या का असू शकतात? असे अनेक प्रश्न सांस्कृतिक वंशशास्त्रज्ञांना खुणावू लागले. मूल्य म्हणजे काय? ती का बनतात? कशी बनतात? सर्व मूल्यांना चांगले, वाईट अशा वर्गवारीत बांधणे योग्य आहे का, त्यांच्याकडे त्या लेबल्सच्या पलीकडे जाऊन बघता येईल का,अशा विचारांमधून 1950-60 च्या दशकात ‘इंटरकल्चरल कम्युनिकेशन’ या विद्याशाखेचा जन्म झाला.

दोन संस्कृतींत फरक कसा असतो, त्याची अनेक उदाहरणे वैशाली करमरकर यांच्या पुस्तकात आहेत. त्यांपैकी एक उदाहरण येथे घेऊ या. सुदीप हेगडे जर्मनीत फँकफर्टला प्रकल्पाच्या निमित्ताने मुक्कामाला होता. एके दिवशी, त्याने ग्रंथालयाचा जिना चढण्यास सुरुवात केली. त्याच्या पुढे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांच्या वृद्ध जर्मन आजीबाई जिना संपवून ग्रंथालयाच्या जडशीळ काचेच्या दरवाज्याकडे जाताना दिसल्या. सुदीप त्या वृद्ध बाई त्यांच्या हातातील पुस्तकांचा गठ्ठा आणि अनेक पिशव्या सांभाळून दार कसे उघडणार या विचाराने झटकन चार पावले त्यांच्यापुढे गेला आणि त्याने ते जडशीळ दार त्यांच्यासाठी उघडून धरले…. त्याच्या त्या ‘समाजकार्या’चा आजीबाई कौतुकाने स्वीकार करतील, अशा गोड भ्रमात उभा होता. परंतु घडले उलटेच. आजीबाई एकदम मांजरीसारख्या फिस्कारल्या, इतकी काय म्हातारी नाही झाले मी अजून. सुदीप त्यांचा तो आविर्भाव बघून एकदम चक्रावला. त्याचा हेतू चांगला होता. तो धडा मिळाल्यावर सुदीप म्हणतो, वृद्ध लोक ट्रॅममध्ये, बसमध्ये उभ्याने प्रवास करताना बघितले, की माझे भारतीय संस्कार उठून त्यांना जागा देण्यासाठी चुळबुळ करत असत… पण मी अंतर्मनाला दाबून मख्खपणे खिडकीबाहेर बघण्यास सुरुवात करी. लेखिका हे उदाहरण देऊन म्हणतात, हाच तो शब्दांविना संवाद! जर्मन आजीबार्इंनी सुदीपच्या कृतीचा अर्थ वेगळाच लावला. सुदीपने त्यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ पुन्हा वेगळाच लावला. ही निःस्तब्ध संवादातील पहिली ठिणगी असते. अशी ठिणगी पडेल अशी कल्पना प्रथम नसल्यामुळे तसे प्रसंग एकदम स्तंभित करतात. मग एकदम त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात. अपेक्षाभंग झाल्यामुळे ते दुर्दैवाने नकारात्मक दिशेने जाऊ पाहतात. जर्मन हे असे, भारतीय ते तसे असे सार्वत्रिकीकरण सुरू होते…

असे संघर्ष दोन देशांतच होतात असे नाही तर एकाच राज्यातील दोन प्रांत, दोन शहरे; इतकेच नव्हे, तर जातींत, धर्मांत होतात; तसेच, एकाच देशातील दोन राज्यांतही होत असलेले दिसून येतात. आयटी व बायोटेक्नॉलॉजी, ऑटो या क्षेत्रांतील नोकऱ्यांमुळे     परराज्यांतील मुले पुण्यात येतात, मुंबई-महाराष्ट्रातील तरुण बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई इत्यादी ठिकाणी सहजपणे जाऊ-येऊ लागले आहेत. त्यांनाही या सांस्कृतिक संघर्षास तोंड देण्याची पाळी येत असते. तरीही माणसे जात-येत असतात व कळपाने राहत असतात. लेखिकेने त्यामागील कारण स्पष्ट करताना साळिंदरचे उदाहरण दिले आहे. माणूस कळपाची ऊब त्याच्या अंतर्मनात भयाण एकाकीपणा आणि रिक्तता असली की शोधत राहतो. त्याला कळपामधील इतर माणसांच्या चित्रविचित्र स्वभावांचे काटे टोचू लागतात, म्हणून मग दूर जावेसे वाटते. अशा तऱ्हेने दोन वेदनाबिंदूंमध्ये सततचे हेलपाटणे चालू राहते. दोन वेदनाबिंदूंमधील सुवर्णमध्य साधणे हे एक कसब आहे. स्वतः घायाळ न होता आणि दुसऱ्याला घायाळ न करता कळपातील सहनिवासाचे कसब ज्याला जमले त्याने सांस्कृतिक साक्षरता साधली. योग्य अंतर ठेवण्याची किमया एकदा का साधली, की ‘कीप युअर डिस्टन्स’ असे ऐकून घेण्याची वेळ येत नाही.

अनेक जण विविध कारणांस्तव देशात-परदेशात जात-येत असतात, परंतु लेखिका वैशाली यांच्यासारखे सांस्कृतिक संघर्षाचे बारकाईने निरीक्षण करणारे थोडेच असतील. विषय साधा वाटत असला तरी तो किती गहन व जटिल आहे आणि लेखिकेचे निरीक्षण किती सूक्ष्म आहे ते जाणवते. लेखिकेने वाचकांना पुस्तक वाचताना विषयाचा जटिलपणा जाणवू द्यायचा नाही, ही किमया उत्तम रीत्या साधली आहे. युवकांनी संस्कृतीचे विविध रंग ओळखण्यासाठी आणि त्यात समन्वय, सुसंवाद कसा साधावा हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचण्यास हवे.

जॉन कोलासो 9869282190

saptahik.janpariwar@gmail.com

संस्कृतिरंग

लेखिका – वैशाली करमरकर
प्रकाशक – राजहंस प्रकाशन,
पाने – 308, किंमत – 280 रु.

 

 

About Post Author

Exit mobile version