कालिंदी सरवटे यांचा मृत्यू 7 एप्रिल 2025 च्या रात्री झाला. त्या विनोबांच्या मानसकन्या. त्यांचे निधन वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी झाले. त्या विनोबा भावे यांच्या अनुयायी, भूदान चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या, लेखिका होत्या. त्या त्यांचे आयुष्य विनोबामय जगल्या.
त्या विनोबांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्याशी वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षी जोडल्या गेल्या. त्यांना सारा विनोबा परिवार ‘कालिंदीताई’ म्हणत असे. विनोबांचा विचारवसा तब्बल सात दशके कालिंदीताई जोपासत होत्या. विनोबांचाही जन्मदात्या मातापित्यांप्रमाणे कालिंदीताईंवर विश्वास होता. कालिंदीताईंनी त्या विश्वासाला अंतिम श्वासापर्यंत प्रामाणिकपणे व समर्थतेने सांभाळले. त्यांच्या सर्व आठवणी देशभरातील सर्वोदय कार्यकर्त्यांशी व सर्वोदय कार्याशी निगडित असत. विनोबांची ‘ब्रह्मविद्या मंदिर आश्रमा’च्या भगिनी आणि देश-दुनियेतील भगिनी यांच्याकडून अपेक्षा असे, की “या भगिनींमधून आद्य शंकराचार्यांप्रमाणे भगिनी निघावी आणि तिने शास्त्रांची निर्मिती करावी !” विनोबा स्वत: ऋषी होते. त्यांची अपेक्षा पुरी झाली नाही असे कधी घडले नाही. कालिंदीताई यांनी विनोबांच्या अपेक्षा शतप्रतिशत पूर्ण केल्या आहेत. तेच कालिंदीताईंच्या समग्र जीवनाचे सार आहे.
कालिंदीताईंचा जन्म इंदूरचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि नंतर गाधीजींच्या विचाराने प्रभावित झालेले ज्येष्ठ गांधीवादी, घटना समितीचे सदस्य ‘पद्मभूषण’ विनायक सीताराम उपाख्य तात्यासाहेब सरवटे यांच्या त्या कन्या होत. त्या विनोबांकडे उच्च शिक्षणानंतर आल्या. वडील तात्यासाहेबांनी कालिंदीताईंना विनोबांकडे सोपवले. त्या क्षणी विनोबांनी कालिंदीताईंचे पालकत्व घेतले. गांधी-विनोबांचे जसे नाते होते, त्याप्रमाणे विनोबा-कालिंदीताईंचे जिव्हाळ्याचे नाते होते. ते नाते सर्वोदयी भारताच्या उभारणीसाठी राबवले गेले. त्या नात्यातून दुनियेला वैचारिक समृद्धीचा महामार्ग लाभला.
कालिंदीताई गागोद्यासाठी एक स्वप्न घेऊन गागोद्यात एक वर्षभरासाठी, 1986-87 मध्ये राहण्यास आल्या. मी विनोबा यांच्या महानिर्वाणानंतर 1983 पासून विनोबांचा जन्मजिल्हा म्हणून रायगडमध्ये कर्जतच्या आदिवासी भागात कुष्ठरुग्णसेवेचे व इतरही सामाजिक काम करत होतो. मला कालिंदीताईंनी ‘घाटकोपर गोरक्षा सत्याग्रहा’त अच्युतभाई देशपांडे यांच्याकडे बोलावून घेतले. अच्युतभाई हे विनोबांचे सहकारी. ते आश्रमात, सर्वोदय परिवारात ‘अच्युतकाका’ म्हणून परिचित होते. त्यांनी विनोबांना लेखनात मदत केली. विनोबांनी देवनारच्या कत्तलखान्यासमोर गोवंश हत्या रक्षा सत्याग्रह करण्यास सर्वोदय कार्यकर्त्यांना सांगितले. तेव्हा त्या सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबांनी अच्युतकाकांकडे सोपवले होते. मी त्यांच्याकडे गेल्यावर कालिंदीताई म्हणाल्या, “मी एक वर्ष गागोद्यास द्यायचे ठरवले आहे. तुझ्या बहिणीला-महानंदाला माझ्यासोबत ठेव.” अच्युतकाकांचीही तीच इच्छा होती. तेव्हा मी ती सुवर्णसंधी समजून महानंदाला वर्षभर कालिंदीताईंच्या सान्निध्यात ठेवले. आमच्यासाठी ते साक्षात विनोबा सानिध्यच होते ! त्यावेळी मीही मनात येईल तेव्हा गागोद्यास जात होतो.
कालिंदीताईंच्या व्याख्यानांचे आयोजन पुणे नगरीत, ज्ञानदेवांच्या आळंदीत केले होते. कालिंदीताईंच्या वाणीत व लेखणीत विनोबांच्या कृपेचा आणि वाणीचा स्पर्श जाणवे. कालिंदीताईंनी विनोबांच्या सान्निध्यात संपूर्ण जीवन समर्पित केले होते ना ! त्यांचा विनोबा साहित्याचा अभ्यास सूक्ष्म होता. विनोबांच्या सर्व साहित्याचे प्रकाशन/ संपादन; तसेच, ‘मैत्री’ पत्रिकेचे संपादन यांवर त्यांचे मार्गदर्शन बहुमोलाचे होते. त्यांनी ‘मैत्री’ या विनोबा आश्रमाच्या पत्रिकेचे संपादन चाळीस वर्षे केले. कालिंदीताईने लेखन-संपादन केलेल्या प्रसिद्ध, साहित्याची यादी – प्रेमपंथ अंहिसेचा, अभंग जीवन-व्रत, स्नेह-सान्निधि, गीतेतील परिसाच्या संगतीत, ज्ञानेश्वरी ओव्यांच्या सहवासात, सर्वशक्तिदायीनी पदयात्रा, विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान-पदयात्रा, इस्लामचा संदेश, ज्ञानोबा माऊली, तुका आकाशाएवढा, महामानव विनोबा, ऐसी जीवनाची कळा. त्यांतील पुस्तकांचे इंग्रजी-हिंदी व इतरही भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांतील ‘प्रेमपंथ अहिंसेचा’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादित ‘मुव्हड् बाय लव्ह’ या पुस्तकाच्या नावाने चाहत्यांनी एक ‘व्हॉटस अॅप ग्रूप’ही केला आहे.
विनोबांनी पवनार येथे ब्रह्मविद्या मंदिराची स्थापना मार्च 1959 मध्ये केली. कालिंदीताई तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत पवनार येथेच वास्तव्यास होत्या. त्या भूदान चळवळीत सहभागी झाल्या; विनोबांसोबत देशभर फिरल्या. ते फिरणे म्हणजे विनोबांचा ध्यास होता. कालिंदीताईंनी त्या ध्यासाचे झपाटलेपण अनुभवले होते. त्यांची आसामच्या महापुरातही भूदान पदयात्रा झाली होती. त्यात कालिंदीताईही सहभागी होत्या. त्या तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानपर्यंत विनोबांसोबत होत्या. त्यांनी बांगलादेशातील भूदान पदयात्रेतील अनुभवांच्या नोंदींवर आधारित पुस्तक लिहिले. कालिंदीताईंनी त्या काळात पवनार या गावाला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले.
मी पवनार आश्रम, आश्रमाच्या भगिनी व विनोबा परंधाम आश्रमीय कार्यकर्ते इत्यादी विषयांवर लिहिलेले काही साहित्य दरवर्षी ‘मित्रमिलन’साठी आश्रमात गेल्यावर कालिंदीताईंना वाचून दाखवत असे. त्याही त्यासाठी खास वेळ देऊन-ऐकून त्यांचे मत सांगत. त्यांचा अभिप्राय मला आश्वस्त करणारा असे. त्यांचे समस्त जीवनच सामान्य कार्यकर्त्यापासून ते विद्वान अभ्यासकांपर्यंत प्रत्येकाचे समाधान करणारे असे होते ! पवनारला गेल्या वर्षी त्यांचे ‘ज्ञानेश्वरी : ओव्यांच्या सहवासात’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यांच्या देहावसानाने विनोबांचे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे.
– सुभाष वि पाटील 9850624765 patil.subhash9850624765@gmail.com
104-5 हरता अपार्टमेंट कर्जत जि. रायगड 410201