“… आपल्याकडे पराभूत उमेदवारानं संमेलनाकडे फिरकायचं नसतं, अशी रीत आहे. त्या दृष्टीनं गोखले बंडखोर, पुरोगामी प्रवृत्तीचे; रीतीभातींना ते जुमानत नाहीत ! खिलाडूपणा रोमरोमी भिनलेला…
“ह. रा. महाजनी यांच्या तालमीत तयार झालेल्या विद्याधर गोखल्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी आहे. संस्कृत आणि उर्दू या भाषांवर सारखंच प्रभुत्व. बोलण्यात वैदर्भीय गोष्टीवेल्हाळपणा… मुखरस सांभाळत खासगी बैठका तासन् तास रंगवण्याची हातोटी. बोलायचं काम त्यांनी करायचं, इतरांकडे श्रोत्यांची भूमिका. अतिसभ्य लोकांना खटकतील अशा ‘आक्षेपार्ह’ शब्दांची पेरणी. परिणामी गप्पा अधिकच रंगतदार !…
… त्यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे संगीत नाटकांचं त्यांनी केलेलं पुनरुज्जीवन…
“आपल्याकडे साहित्य संमेलनं वादाच्या भोवऱ्यात न सापडता क्वचितच पार पाडतात ! अर्ध्या हळकुंडानं पि वळ्या झालेल्या मंडळींना गोखल्यांचा हिंदुत्ववाद खटकला. त्यांनी गोखल्यांचा व्यासंग, उर्दू भाषेवरील प्रभुत्व, सर्वधर्मसमभावाचा कट्टर पुरस्कर्ता, औरंगजेबाचा भाऊ दाराशुकोह याच्यावरील त्यांची भक्ती यांकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना उमेदवाराचं वाङ्मयीन कर्तृत्व ध्यानात घ्यायचं असतं, या महत्त्वाच्या मुद्दयाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं !….”
– सुभाष भेंडे
(ललित, फेब्रुवारी 1993 वरून उद्धृत)