लातूरची येळवस… अन् वलग्या वलग्या सालम पलग्या

0
168

येळवस म्हणजेच वेळा अमावस्या. तो सण हिरवाईचा अपूर्व सोहळा मानला जातो. तो पुराणात किंवा इतिहासात नाही, मात्र त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तो सण 2024 साली 11 जानेवारी रोजी आला तेव्हा लातूर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती ! त्यामुळे ती वेळा आमावस्या धुमधडाक्यात साजरी झाली. शेताशेतांत माणसांची भरती आली !

वेळा आमावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. घरात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग असा सगळा रानमेवा जमा झालेला असतो. बेसनपिठात चिंच कालवून आणि आंबवलेल्या ताकाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगा, चवळी, भुईमूग अशा पदार्थांसह शिजवलेली भाजी म्हणजे भज्जी. ती भज्जी अफलातून अशी असते. त्या ‘डिश’ची तुलना पंचतारांकित हॉटेलातील कोणत्याही ‘डिश’शी होऊ शकणार नाही ! त्याबरोबर दिले जाणारे अंबील असे, की राजदरबारी असलेली सगळी पेये त्यापुढे फिकी पडतील ! ते पेय चार दिवसांचे ताक ज्वारीच्या पिठात आंबवून जिरा फोडणी दिलेले असते. भल्याथोरल्या भाकरी… गव्हाची खीर. एका शेतात वीस ते पंचवीस लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजतगाजत घरातून डोक्यावरून शेतावर नेला जातो. शेतात ज्वारीच्या-कडब्याच्या पेंड्यांची शंकू आकाराची कोप रचलेली असते. प्रत्येक कोपेच्या पुढे झोका बांधलेला असतो !

हा उत्सव रब्बी पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला साजरा केला जातो.

भारतीय द्विपकल्पात नदीचे जलपूजन करण्याची परंपरा सिंधु संस्कृतीपासून चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सात नद्या (सप्तसिंधु) पवित्र समजल्या जातात. त्याच सप्तसिंधू मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरू झाली. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातील जल हे त्या सप्तसिंधूंचे प्रतीक म्हणून पुजले जाऊ लागले. विहिरीच्या जवळ त्यासाठी प्रतीकात्मक सात दगड पुजले जातात. ती पूजा लातूर जिल्ह्यात ‘आसरा’ म्हणून ओळखली जाते. आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. आसराची ती पूजा वेळा अमावस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या-कडब्याच्या पेंड्यांची शंकू आकाराच्या रचलेल्या कोपेची पूजा करून, लक्ष्मीला खणानारळाने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. कोपेत मातृकापुजन केले जाते. त्याला वेळा अमावास्या दिवशीचे खास पदार्थ, जसे भज्जी, अंबील, खीर, भाकरी यांचा प्रसाद दाखवून रान महोत्सव सुरू होतो. परंपरा म्हणून कोपेला पाच फेऱ्या मारतात आणि ‘वलग्या वलग्या सालम पलग्या’ असे म्हटले जाते. ते वाक्य कन्नड भाषेतील आहे. तो उच्चार ‘वलगे वलगे सालम पलगे’ असा होऊन गेला आहे. त्याचा अर्थ ‘वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला (लक्ष्मीला) अर्पण करतो, तुम्ही आमच्यावर अनुग्रह करा’ असा आहे.

वेळा अमावस्येला सकाळी पूजा करून, सुग्रास भोजनाचा सगळा भोज चढवून मोठी पंगत बसते. प्रत्येकाच्या कोपीला जाऊन भज्जीचा आस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो कोणाला टाळता येत नाही. पोटाला तडस लागते. जेवणाच्या पात्रावरून उठून, झोक्यावर जाऊन झोका खेळावे, खाल्लेले अन्न पचवावे आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवावे असे चालत असते. बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने जेवण्यास बोलावून हे सगळे खाऊ घातले जात असे. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून, रब्बीच्या गहू-हरभरा यांच्या वावरात तो पेटवून रान ओवाळून काढायचे आणि तोच टेंबा मिरवत नेऊन गावातील मंदिरासमोर मोठी आग करून टाकायचा. ती शमली की तिच्या राखेत विस्तव असतानाच ती ठोकरून घरी जायचे. असा हा हिरवाईच्या अपूर्व सोहळ्याचा- वेळा अमावस्येचा म्हणजेच ‘येळवस’चा मनमोहक सण आहे.

– युवराज पाटील  8888164834/7743872769 pallavingl29@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here