कॉम्रेड मनोहर टाकसाळ हे मराठवाड्याच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी वर्तुळात आदराने घेतले जाणारे नाव. स्वातंत्र्यलढा लढलेले आणि स्वातंत्र्यानंतर देशसेवेचे, समाजसेवेचे व्रत घेतलेले ते पहिल्या पिढीचे निष्ठावंत त्यागी आणि अविचल मनाचे मराठवाड्यातील कार्यकर्ते नेते होते…
कॉम्रेड मनोहर टाकसाळ हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा सक्रिय सहभाग मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये होता. ते प्रामाणिक, निष्ठावान, गरजूंना मदत करणारे, हळव्या मनाचे, भावनाप्रधान असे कार्यकर्ते होते. त्यांनी साम्यवाद स्वीकारला आणि तो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठापूर्वक जपला.
त्यांचे निधन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अल्पशा आजाराने 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाले. त्यावेळी कोरोनाचे संकट संपलेले नव्हते, एसटीचा संप चालू होता तरी त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो स्त्री-पुरुष सामील झाले होते.
त्यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन 1 मे 2022 ह्या कामगार व महाराष्ट्र दिनी कॉम्रेड अतुलकुमार अंजान (महासचिव, अखिल भारतीय किसान सभा, राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य- भारतीय कम्युनिस्ट पक्ष- दिल्ली) यांच्या हस्ते औरंगाबाद येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र कांगो हे होते. तीस लेख ग्रंथात आहेत.
टाकसाळ हे त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला श्री शिवाजी हायस्कूलमध्ये काही काळ शिक्षक होते. त्यांनी नोकरी करता करता कायद्याची परीक्षा पास केली व ते वकील झाले. अनेक गोरगरिबांना व विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वकिलीचा विनामूल्य फायदा झाला. टाकसाळ यांनी भूमिहीन शेतमजूर, दलित, भिल्ल आदिवासी यांना जमीन मिळवून देण्याचा लढा, गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा लढा, जमीन, दुष्काळ, पाणीप्रश्न इत्यादी प्रश्नांवरील लढे, मराठवाडा विकास आंदोलन, विद्यापीठ नामांतर चळवळ, दलित अत्याचारविरोधी चळवळ, कामगार, कर्मचारी यांच्या प्रश्नांवरील लढे अशा विविध चळवळींत भाग घेतला, मदत केली, चळवळीचे मार्गदर्शन केले, लढाऊपणे नेतृत्व केले, तुरुंगवासही भोगला. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा आणि मार्क्सवाद तत्त्वज्ञानावर अचल निष्ठा ठेवून, शोषणरहित समाज निर्मितीचे ध्येय मनाशी बाळगून त्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला.
त्यांनी आंतरजातीय विवाह केला आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांच्या पत्नीला पूर्णपणे निर्णयस्वातंत्र्य दिले. त्यामध्ये त्यांचा कोठेही अहंकार दुखावला नाही. खरी स्त्रीपुरुष समानता त्यांच्या जीवनात दिसून आली. ती बाब त्यांनी त्यांच्या व्यवहारातून सिद्ध केली आहे. ते त्यांच्या पत्नीशी नेहमी सन्मानाने बोलत. ते त्यांच्या पत्नीच्या निर्णयात सहभागी होत, त्यांच्या मताचा आदर करत. त्यांच्या पत्नी लीलाताई टाकसाळ यांची मुलाखत संपादक मंडळाच्या सदस्य वैशाली डोळस यांनी घेतली आहे. ती मुलाखत टाकसाळ दांपत्याला समजून घेण्यासाठी उपयुक्त झाली आहे. त्यांचे चिरंजीव अभय टाकसाळ, नातू प्रकाश, नात उर्मी यांचेही लेख ग्रंथात आहेत. कॉम्रेड टाकसाळ यांचे कौटुंबिक जीवन दर्शवणारे व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याबद्दल असणारा आदर व्यक्त करणाऱ्या बाबी त्या लेखांतून आलेल्या आहेत.
टाकसाळ म्हणत, “स्त्रियांनी चळवळीत भाग घेतला पाहिजे व त्यांनी नेतृत्वही केले पाहिजे” या त्यांच्या उक्तीनुसार त्यांनी ‘लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’मध्ये स्त्रियांना पुढाकार घेण्यास लावला व त्या असोसिएशनचे नेतृत्वही करण्यास लावले याबद्दलचा उद्बोधक असा लेख लता बामणे यांनी लिहिला आहे. तो त्यांच्या अनुभवावर आधारलेला आहे. त्या लेखातून टाकसाळ उक्तीप्रमाणे कृती करत या विधानाची प्रचीती येते.
टाकसाळ यांनी पक्षात जिल्हा सचिव, राज्य कौन्सिल सदस्य, राज्य कार्यकारिणी सदस्य, राज्य सचिव मंडळ सदस्य, राज्याचे असिस्टंट सेक्रेटरी, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. त्याचप्रमाणे ते भारतीय खेतमजदूर युनियनचेही राष्ट्रीय पदाधिकारी व राज्याचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी पाच वर्षांपर्यंत विद्यापीठाच्या कौन्सिलवर काम पाहिले.
टाकसाळ यांना त्यांच्या पक्षाचे व इतरही कम्युनिस्ट विचारांचे साहित्य विकण्याचा खूपच छंद होता. ते त्यांच्या जीवन ध्येयाशी संबंधित काम होते. त्यांच्या स्वत:च्या विचारांचा प्रसार करण्याचे ते एक माध्यम आहे असे ते मानत. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचे साप्ताहिक ‘युगांतर’ वा हिंदी पाक्षिक ‘मुक्ती संघर्ष’ असो, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक असो किंवा मग ‘अजून न स्वीकारलेला मंडल आयोग’ अथवा ‘मुस्लिमांचे लाड?’ असो किंवा मग ‘सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नव्हे’ ही त्यांची छोटीखानी पुस्तिका असो किंवा पी.बी. सावंत यांची प्रस्तावना असलेले ‘मराठा आरक्षण’ पुस्तक असो अशी किती तरी पाक्षिके, मासिके हातोहात विकली आहेत.
टाकसाळ यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने समाजवादी सोविएत युनियनमध्ये सहा महिन्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जे प्रतिनिधी भारतातून गेले होते त्यांच्यातही समावेश होता व तेच भाकपच्या प्रतिनिधीचे नेतृत्व करत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉ. डी. राजा यांचाही त्यात अंतर्भाव होता. त्या वेळी कॉ. मनोहर टाकसाळ सहा महिने मास्को शहरात राहिले.
टाकसाळ हे मराठवाड्याच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी वर्तुळात आदराने घेतले जाणारे नाव. स्वातंत्र्यलढा लढलेले आणि स्वातंत्र्यानंतर देशसेवेचे, समाजसेवेचे व्रत घेतलेले जे पहिल्या पिढीचे निष्ठावंत त्यागी आणि अविचल मनाचे मराठवाड्यातील कार्यकर्ते नेते होते, त्यांतील महत्त्वाचे आणि अग्रभागी असलेले कॉम्रेड मनोहर टाकसाळ हे एक होत. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी स्वीकारलेला विचार, पक्ष आणि झेंडा थोडीथोडकी नव्हे तर पाऊणशे वर्षे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत न बदललेला असा अफलातून माणूस !कॉम्रेड टाकसाळ हे केवळ कम्युनिस्ट पक्षाचे नव्हते तर ते औरंगाबाद शहरातील डाव्या व परिवर्तनवादी, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक व आधारस्तंभ होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सरकारी इतमामात गृह खात्याकडून सलामी देण्यात आली.
स्मृतिग्रंथाचे नाव – कॉम्रेड मनोहर टाकसाळ – लढवैय्या समाज योद्धा
संपादक – वासुदेव मुलाटे व संपादक मंडळ
स्वरूप प्रकाशन, किंमत 350 रुपये
– रत्नकला बनसोड 9503877175 bhimraobansod@gmail.com
——————————