पाश्चात्य अभिजात संगीतात बिथोवन, बाख आणि मोझार्ट यांचं संगीत ऐकलेले अनेक आहेत. इतकंच काय त्यांच्या सुरावटी पाठ असणारेही आहेत. जुने संगीतकार सलील चौधरी यांच्यावर मोझार्टचा प्रभाव होता. तो त्यांच्या तर्जमधे ऐकायला मिळायचा. तसं अॅमस्टरडॅमला गेल्यावर व्हॅन गॉग आणि व्हॅन रेम्ब्रांट या दोन जगविख्यात चित्रकारांची चित्रं पाहिल्याखेरीज कोणी गाव सोडत नाही. व्हॅन गॉगच्या चित्रांसाठी वेगळं म्युझियम बनवलं गेलं आहे तर रेम्ब्रांटच्या राहत्या घराचंच म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आलं आहे.
रेम्ब्रांटचा जन्म १६०६ मधला तर व्हॅन गॉगचा त्यानंतर जवळ जवळ अडीचशे वर्षांचा. पण रेम्ब्रांटपेक्षा व्हॅन गॉग त्याच्या नाट्यमय जीवनामुळे, स्वयंभू शिक्षणामुळे, प्रेमामुळे, त्याने केलेल्या आत्महत्येमुळे; तसंच त्याच्या विलक्षण शैलीमुळे गाजला. त्याची शैली अनुसरणारे किंवा त्याला गुरूस्थानी मानणारे चित्रकार जगभर झाले. त्याच्या उचित स्मारकासाठी गेरिट रिटविल्ड या विख्यात आर्किटेक्टकडून म्युझियम डिझाईन करून घेतले गेले. त्याच्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. दिवसभर माणसांची रीघ लागलेली असते.
नेदरलँण्डचा आणखी एक चित्रकार म्हणजे रेम्ब्रांट. त्याने १६३९ साली घेतलेले घर तेव्हा होते तशाच स्वरुपात आज जसेच्या तसे बनवले गेले आहे. त्यामुळे त्याचा चित्रसंग्रह पाहताना आपण त्याच्या पावणेतीनशे वर्षापूर्वीच्या त्या घराचे स्वरूप पाहू शकतो. येथे प्रकाशझोत न टाकता छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे त्यामुळे फ्लॅश बंद करून प्रत्येकजण जे दिसेल त्याचं छायाचित्रण करत होता. आम्हीही तेच केलं. मी त्याच्या प्रत्येक चित्राची नक्कल माझ्या कॅमे-यात बंदिस्त केली आहे.
अॅम्स्टरडॅम हे व्हेनिससारखं कालव्यांचं नगर आहे. रेम्ब्रांटचं घर जुन्या गावातल्या एका कालव्यापासून जवळच आहे. नेदरलॅण्डमध्ये किंवा युरोपातल्या अनेक देशांमध्ये शहरांतील मोठया रस्त्यांच्या कडेला असलेल्या जागी खुर्च्यांवर बसून गप्पा मारण्याची सोय असते. ती त्यांची कौटुंबिक आणि सांस्कृतिक केंद्रे असतात. पण शिळोप्याच्या गप्पा जास्त होताना दिसतात. हा नगरा -नगरातला रम्य प्रकार असतो. निवांतपणे बसून बीअर किंवा अन्य पेय पिणं त्यांना जमतं. असा अनुभव आम्ही पतिपत्नीनं बुलढाण्याला स्वतः गोळा केला होता.
वीट आणि लाकूड या दोन साहित्याचा अॅमस्टरडॅममध्ये उपयोग बांधकाम साहित्य म्हणून केला जातो. फुटपाथ, सायकलींचे रस्ते यांसाठी लाल विटा वापरल्या जातात. त्यामुळे शहरांचा विटकरी रंग ठळकपणे डोळ्यांत भरतो. घरांना गिलावा करत नसल्यानं सगळी घरं विटांची असतात. भिंती विटांच्या असल्या तर बाकी जमीन, जिने, खिडक्या-दरवाजे यांसाठी लाकडाचा सढळ वापर दिसतो. अॅम्स्टरडॅम गावात शंभर वर्षे वयाच्या सात हजार इमारती जशाच्या तशा ठेवल्या आहेत. तेच रेम्ब्रांटच्या घराबाबत! घरातली कमीत कमी जागा वरच्या मजल्यावर जाण्यास करण्यासाठी त्या काळात गोल जिने प्रचलित होते. त्यामुळे तीन गोल जिने चढून जावं लागतं. तिथं थंडी खूप असल्यानं फरशांच्या ऐवजी लाकडाचा वापर होतो. प्रत्येक घरात हीटर किंवा फायर प्लेस असते. शहर समुद्रापासून जवळ असल्यानं थंडीसह बोचरा वारा वेगानं वाहत असतो. त्या दृष्टीनं तेथील घरांची रचना पाहायला मिळते.
रेम्ब्रांट त्याच्या इचिंग या कलेसाठी प्रसिध्द आहे. तसंच त्या काळात तयार रंग मिळत नसल्यानं प्रत्येक कलाकाराला स्वतः रंग बनवावे लागत. ते रंगीत दगडाची वस्त्रगाळ पूड करून तेलात कालवून बनवावे लागत. तेसुध्दा एक शास्त्र बनलेलं होतं. रेम्ब्रांट अनेक तंत्रांत निष्णात होता. त्याला दुर्मीळ गोष्टी जमवायचाही छंद होता. तेव्हा रंग कसा बनवत व इचिंग कसं करत याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं जातं. एक चित्रकार रंग खलून दाखवत असतो व श्रीमती एडित बल्ट ही चित्रकार दर सोमवारी तिथं येऊन ते काम करते. ते रेम्ब्रांटने धातूच्या पत्र्यावर काढलेल्या चित्रांचा छाप कसा बनवत असत हे दाखवत असतात. मी ‘जेजे’चा असल्याने त्या विषयाशी थोडा परिचित होतो. शिवाय आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना तो ऐच्छिक विषय शिकवला जातो. आम्ही तिचं प्रात्यक्षिक निरखून पाहात होतो व चौकशी करत होतो. तिनं प्रिंट काढण्यासाठी बराच वेळ घेतला. किती काळजीपूर्वक काम करावं लागतं ते तिनं नीट समजावून सांगितलं. तिच्याशी भरपूर गप्पाही मारल्या. अनेकांनी तिथला प्रिंट मिळेल का असं विचारता तिनं नम्रपणे नकार दिला. आम्ही तिला मागितलं नाही, पण आम्ही निघू लागल्यावर तिनं स्वतः रेम्ब्रांटनं धातूच्या पत्र्यावर रेखाटलेल्या चित्राची प्रिंट माझ्या पत्नीच्या हाती दिली!
चित्रावर रेम्ब्रांटची स्वाक्षरी व १६३९ हे साल लिहिलेलं आहे. ते चित्र आता आमच्या माजघरात आमच्या नजरेसमोर जाऊन बसेल.
प्रकाश पेठे
०९४२७७८६८२३, दूरध्वनी: (०२६५) २६४ १५७३
prakashpethe@gmail.com