रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख यांचे वारीनृत्य

0
114

वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण राजुबाबा शेख यांनी वारीनृत्य महाराष्ट्रात लोकप्रिय केले. वारीनृत्याची कल्पनाच त्यांची. राजुबाबा कीर्तन, अभंगगायन लहानपणापासून करत, पण त्यांना वारीनृत्याची कल्पना गुजरातचे कलावंत शेखावत यांच्याकडून मिळाली. शेखावत त्यांच्या भवनीभवई प्रयोगात पितळी परातीत नृत्य करत गात; कधी तलवारीच्या पात्यावर त्यांचे नृत्य असे. राजुबाबा यांनी ताटलीत नाचत अभंग गाण्याचा प्रयोग सुरू केला. नंतर ते डोक्यावर कळशा/हंडे यांचे तीनचार थर घेऊन नृत्यगायन करत आणि भक्तिरसात डुंबून जात. त्यांचा तो खेळ लोकप्रिय झाला.

राजुबाबांचे मूळ नाव रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 17 एप्रिल 1942 रोजी झाला. मराठवाड्यातील जनता निजामशाहीमध्ये अत्याचाराला सामोरी जात होती. रझाकारी शासन तेथील शेतकऱ्यांकडून शेतसारा बळजबरीने वसूल करून घेत असे. त्याचा विरोध म्हणून स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांविरुद्ध बंड पुकारले आणि ‘वंदे मातरम्’चा नारा दिला. त्यांत माणिकचंद पहाडे, गोविंदराव पानसरे, गोविंदभाई श्रॉफ, बाळाराम काबरा, दगडाबाई शेळके अशा स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग होता. राजुबाबा शेख यांच्या वडिलांनी त्यांच्या प्राणाची आहुती त्या आंदोलनात दिली.

त्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत झाली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्या कुटुंबाला पोटाची खळगी भरणे कठिण झाले. राजुबाबांच्या आईने स्वतःच्या हाती सर्व सूत्रे घेतली. घरात राजुबाबांसह चार भाऊ व बहिणी. त्यांना घेऊन आई केजला मामाच्या गावी, किसनराव पाटील यांच्याकडे आली. आई लोकांची धुणीभांडी करत असे. मुले दुसऱ्याच्या शेतात राबत. राजुबाबा सात वर्षांचे होते.

राजुबाबादेखील शेतीतील कावळे हाकलणे, गायी-म्हशी सांभाळणे, गुरांना चारा-वैरण घालणे, शेत कुळपणे, पेरणी करणे, पानाड्याचे काम करणे ही आणि अशी अन्य कामे करत. तशा परिस्थितीत राजुबाबा शाळेत जाणे शक्यच नव्हते. परंतु राजुबाबांची वृत्ती ही शिकण्यासाठीची असे. ते शंकरराव पाटलांच्या शेतामधील शेंगा फोडत, शेंगदाणे खिशात भरून वाण्याला विकत. त्यांनी त्या पैशांतून बाराखडीचे पुस्तक घेतले आणि बाराखडी पाठ केली; पुढे हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अभंग मुखोद्गत केले. त्यातून राजुबाबांना हरिनामाचा छंद लागला. परंतु त्यांची देवभक्ती समाजाच्या पचनी पडेना. ते जातीने मुसलमान असल्यामुळे हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मीयांनी त्यांना समाजातून बहिष्कृत केले. मुसलमान समाजात कोणी मुलगी देईना तर हिंदू समाज देवळाची पायरीसुद्धा चढू देईना. राजुबाबांनी तशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा देवधर्माचा ध्यास पूर्ण केला व म्हणून ते संतपदी पोचले.

इस्लाम धर्मात ‘जमात’ नावाचा एक प्रकार आहे. मुल्लामौलवी इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार गावोगावी व्हावा म्हणून गावातील तरुण मुलांना घेऊन सर्वत्र हिंडत. त्यामुळे मुलांनाही वळण लागे. राजुबाबांना विठ्ठलभक्तीपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना ‘जमात’मध्ये पाठवले. राजुबाबा मनाच्या विरुद्ध त्यात सामील झाले. योगायोगाने, त्यांचा पहिला मुक्काम पंढरपूरला झाला. राजुबाबांनी चोरून विठुरायाचे दर्शन घेतले. ‘जमाती’बरोबर महिनाभर फिरून झाल्यानंतर सगळे सांगलीला आले. तेथील मुक्कामी राजुबाबा रात्री झोपेत असताना त्यांच्या कानावर टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा जागर आला आणि त्यांचे पाय भजनाकडे आपसुक वळले. मौलवी राजुबाबांना शोधत आले आणि त्यांनी राजुबाबांना ओढत ओढत पुन्हा मशिदीत नेले. राजुबाबादेखील हट्टाला पेटले. त्यांनी मशिदीतच मोठमोठ्याने भजन सुरू केले ! ते ऐकताच बाकीच्यांनी त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, तर कोणी त्यांना लाथाबुक्क्यांचा मार देऊ लागले. राजुबाबांना खूप त्रास सहन करावा लागला. पण राजुबाबांनी हरिनामाची कास सोडली नाही. जातीने मुसलमान असल्याने त्यांना राम मंदिर, बालाजी मंदिर या ठिकाणी प्रवेश नसेच. पण मग ते मंदिरासभोवतालाची साफसफाई करत. पुढे, राजुबाबांची निष्ठा पाहून त्यांना देवळात प्रवेश मिळाला. ते देवळात/देवळाबाहेर, संधी मिळेल त्याप्रमाणे रात्र रात्र खांद्यावर वीणा घेऊन जागर करू लागले.

मुस्लिम समाजातही वारकरी संत, कीर्तनकार यांची परंपरा आहेच. जैतुनबी, मेहबूब महाराज, नगर जिल्ह्यातील वाहिऱ्याचे शेख महंमद, औरंगाबादचे ताजुद्दीनबाबा ही त्यांतील मोठी नावे. हमीद सय्यद हे भारुडे करतात. राजुबाबा शेख त्याच परंपरेतील. राजुबाबांनी अभंगाची पुस्तके आणून ती पाठ केली. पण नुसतेच अभंग पाठ करून चालणार नव्हते. मंदिराबाहेर बसून अभंग कानावर येत, ते लक्षात ठेवायचे. रामकथा, गीता कानावर पडे, ती मुखोद्गत करायची. मुखाने कीर्तन म्हणायला हवे हे लक्षात येताच त्यांनी त्या अनुषंगाने सराव सुरू केला. परातीवर नाचून, समई डोक्यावर घेऊन समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यांचे त्यातील कौशल्य एवढे वाढले, की लोकांनी वाळीत टाकलेल्या त्या अवलिया कलाकाराला ‘कार्यक्रम करून दाखवा’ असे आग्रह करकरून सांगितले. राजुबाबांना गावातील लोकांनी ठिकठिकाणच्या मंदिरांत कीर्तन करण्याचीही शिफारस केली.

विजय तेंडुलकर यांनी सह्याद्री वाहिनीवरील ‘दिंडी’ या मालिकेत राजुबाबांना कीर्तन सादर करण्यासाठी सन्मानाने बोलावले- संधी दिली. त्यावेळी राजुबाबांच्या घरी टीव्ही नव्हता. त्यांनी तो कार्यक्रम औरंगाबादला जाऊन पाहिला.

राजुबाबांनी वारीनृत्याचा कार्यक्रम परळी वैजनाथ येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 1998 साली केला होता. तसेच, त्यांनी नांदेड येथे आयोजित झालेल्या लोकोत्सवामध्ये वारीनृत्य 2004 मध्ये सादर केले. राजुबाबांना राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे नवी दिल्लीत 2000 मध्ये आयोजित झालेल्या भारतरंग महोत्सवात कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांना त्यांच्या कलेचा, कार्याचा सन्मान म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. त्यात बालगंधर्व स्मृती (1988), महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक (2000) असे पुरस्कार आहेत. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते 2013 मध्ये त्यांना मिळाला. राजुबाबांची वारीनृत्याची परंपरा तेथेच, त्यांच्याबरोबर खंडित झाली. किंबहुना ती परंपरा बनलीच नाही. राजुबाबांच्या कुटुंबातील वा अन्य कोणी वारीनृत्य केले नाही.

राजुबाबा शेख यांच्या पत्नीचे नाव शेख सायराबानू बेगम असे असून त्यांना दोन मुलगे आणि चार मुली आहेत. राजुबाबा यांचे निधन 9 फेब्रुवारी 2018 रोजी झाले.

–  गणेश चंदनशिवे 9820451716 ganesh.chandan20@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here