Home कला राहुल पगारे – चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान

राहुल पगारे – चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान

carasole

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठानगाव येथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’तील राहुल पगारे हा तरुण शिक्षक प्रयोगशील आहे. ठाणगाव सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे. ठाणगाव हे चार-पाच हजार लोकवस्तीचे गाव. तेथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’ची स्थापना १९६६ साली गावकऱ्यांच्या व ‘रयत शिक्षण संस्थे’च्या (सातारा) पुढाकाराने झाली.

राहुल तिसरीत असतानाच त्याने चित्रकलेची सुरुवात केली. तेव्हा त्याच्या चित्राला पहिले बक्षीस मिळाले होते. त्यातून त्याची चित्रकलेची आवड वाढत गेली. राहुलने ‘नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालया’तून शिक्षण घेतले. त्यांचे गुरू प्रफुल्ल सावंतसर. राहुल त्‍याची चित्रे ऑईल पेंट, पोस्टर व वॉटर कलर यांमध्ये रंगवतो. त्याने पोर्ट्रेट एक हजारांच्या पुढे बनवली आहेत. रेखाचित्रे काढण्‍यातही त्‍याचा हातखंडा आहे. प्रसिद्ध लेखक-अभिनेते-दिग्‍दर्शक गिरीश कर्नाड सिन्‍नर शहरातील गोंदेश्वराच्या मंदिरात शूटिंगसाठी आले होते. तेव्हा राहुलने कर्नाड यांचे पोर्टेट फक्त दोन तासांत काढून त्यांना भेट दिले. कर्नाड म्हणाले, “हे पोस्टर मी माझ्या घरात लावीन.” राहुल त्या एका वाक्याने भारावून गेला.

राहुलच्या घरी आई, भाऊ व बहीण एवढेच त्याचे कुटुंब. बहिणीचे लग्न झाले आहे. राहुल त्याच्या विद्यार्थ्यांविषयी कौतुकाने बोलत असतो. (राहुलची विद्यार्थिनी गायत्री मोरे सुंदर चित्रे काढते.) राहुलने त्‍याच्‍या विद्यार्थ्‍यांनी काढलेल्‍या चित्रांचे प्रदर्शन नाशिक शहरात आयोजित केले होते. त्‍याचे यश म्‍हणजे तेथे सव्वीस हजार रुपयांची चित्रे विकली गेली.

राहुल त्‍याच्या विद्यार्थ्यांवर सामाजिक जाणिवेचे भान लहान वयापासून बिंबवण्‍याचा प्रयत्‍न करतो. त्‍याचा परिणाम स्‍पष्‍ट करताना राहुल एक घटना कथन करतो. एक धनगर कुटुंब ठाणगावच्‍या शाळेच्या शेजारी मोकळ्या मैदानात वास्तव्यास आले होते. त्यांना दोन लहान मुले होती. त्‍यांच्‍या घराशेजाच्‍या वाटेवरून शाळेत येणाऱ्या दोन विद्यार्थिनींच्या लक्षात आले, की त्या कुटुंबाला रोज जेवणास उशीर होतो व त्यांच्या मुली बराच वेळ भुकेल्या राहतात. त्‍या विद्यार्थिनींनी त्यांच्या टिफिनमध्ये जास्त भाजीभाकरी आणण्यास सुरूवात केली व त्या मुलींना ती खाण्याला देण्यास दिली. विद्यार्थिनींनी त्यांना पाटी-पेन्सिलही घेऊन दिली. त्यांना लिहिण्यास शिकवले. पाचवी-सहावीच्या मुलींची ही समज!

एकदा राहुल पगारे याच्या लक्षात आले, की माधुरी पानसरे नावाची एका वर्गातील मुलगी गतीमंद आहे आणि ती अव्यवस्थित राहते. त्याने माधुरीच्या शेजारी बसणाऱ्या मुलीस सांगितले, “तू माधुरीला कसे राहायचे, ते शिकव. तिच्यात स्वच्छतेची आवड निर्माण कर. तिच्यात सुधारणा कर, मी तुला बक्षीस दईन.” त्‍याचा तो प्रयोग यशस्‍वी झाला. माधुरीमध्‍ये चांगली सुधारणा दिसू लागली. राहुलने माधुरीला पुढील वर्षी दत्तक घेतले व तिच्या शाळेचा आणि कपड्यांचा सर्व खर्च उचलला. राहुल म्हणतो. “आता सर्व विद्यार्थी माधुरीशी चांगले वागतात. कारण मी तिच्याशी चांगला वागतो, म्हणून!”

राहुल पगारे त्याच्या गुणी विद्यार्थिनी गायत्री मोरे, शीतल काकड, चंचल काकड, सिद्धी यांचे कौतुक करताना अजिबात थकत नाहीत. त्याच्‍या बोलण्‍यात केवळ शाळा आणि तेथील गुणवान विद्यार्थी एवढ्याच गोष्‍टी येतात. तो  स्‍वतःबद्दल अवाक्षरही बोलत नाही. तो म्‍हणतो, ”तुम्‍हाला लिहायचेच असेल तर माझ्या विद्यार्थ्‍यांबद्दल लिहा. माझ्याबद्दल नको.” ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍याच्‍या ठाणगाव येथील शाळेस भेट दिली तेव्‍हा तो अगदी हरखून गायत्रीने काढलेली चित्रे दाखवू लागला. वॉटर कलर हे माध्‍यम चित्रकलेतील अवघड माध्‍यमांपकी एक समजले जाते. मात्र गायत्री वॉटर कलरने लिलया चित्रे चितारते. तो सर्व राहुलच्‍या मेहनतीचा परिणाम!

राहुल पगारेचा स्‍वभाव मनमिळावू आहे. त्‍याचे बोलणे प्रेमळ आणि आग्रही असते. तो त्याची शाळा आणि विद्यार्थी यांबद्दल बोलू लागला की त्‍याचे डोळे आनंद आणि उत्‍साहाने चमकत असतात. ते ऐकताना समोरचा आपोआप भावूक होतो आणि राहुलच्‍या मागणीस आनंदाने बळी पडतो. राहुल त्याचे बोलण्‍याचे ते सर्व कसब केवळ शाळा आणि विद्यार्थी यांच्‍याकरता वापरतो. ठाणगावची शाळा आणि राहुलचे प्रयत्‍न यांबाबत आदर असलेल्‍या एका व्‍यक्‍तीने त्‍याबाबतचा किस्‍सा सांगितला. एकदा नाशकात पुस्‍तक प्रदर्शन भरले होते. राहुल त्या व्‍यक्‍तीस तेथे घेऊन गेला. तेथे साने गुरूजींचे ‘श्‍यामची आई’ हे पुस्‍तक मांडलेले होते. राहुलने त्‍या व्‍यक्‍तीस त्‍या पुस्‍तकाची महती सांगत आपण ते पुस्‍तक विद्यार्थ्‍यांना देऊया का? असा प्रश्‍न केला. त्या व्‍यक्‍तीने लगेच पाच पुस्‍तके विकत घेतली. तेव्‍हा राहुलने त्‍यास तत्‍काळ एक योजना सांगितली. ”आपण अशी पाचेक पुस्‍तके विद्यार्थ्‍यांना देण्‍यापेक्षा थेट पन्‍नास पुस्‍तके विकत घेऊ. ती एका वर्गास देऊ. त्‍यांची वाचून झाली की आपण ती पुढच्‍या वर्गास वाटू. त्‍यानंतर पुढचा वर्ग. असे करत संपूर्ण शाळेतील मुले ती पुस्‍तके वाचू शकतील.” त्‍या व्‍यक्‍तीने राहुलच्‍या बोलण्‍याने भारावून जात पन्‍नास पुस्‍तके विकत घेतली.

राहुल पगारेने व्यसनमुक्ती चळवळीतही सहभाग घेतला आहे!

– उज्ज्वला क्षीरसागर

About Post Author

15 COMMENTS

  1. अतिशय सुंदर …

    अतिशय सुंदर. राहुलजी यांचे अभिनंदन आणि आभार. अशीच सामाजिक संवेदनशीलता प्रत्येक भारतीयाच्या मनात अवतरली तर कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. उज्वलाताईंनी राहुलजींंचे कार्य शब्दात उतरवले त्याबद्दल त्यांचेही आभार.

  2. धन्यवाद थिंक महाराष्ट्र मी
    धन्यवाद ‘थिंक महाराष्ट्र’. मी आपला खूप आभारी आहे.

  3. आज साने गुरुजी असते तर कसे
    आज साने गुरुजी असते तर कसे असते ? या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे राहुल पगारे!
    सुंदर लेख!

  4. Sir….chup..cha…chan. …
    Sir….chup..cha…chan. ….we ..all. ..are……….proud. …….of……….you…..sir

  5. खूपच छान राहूल
    खूपच छान राहूल

  6. हे खूपच थोडे आहे…
    हे खूपच थोडे आहे सांगण्यासाठी.,. तुझे सामाजिक कार्य खूप मनापासुन आहे दिखावा नाही.

Comments are closed.

Exit mobile version