मानवी वस्तीत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहान-मोठ्या विहिरींची निर्मिती होणे स्वाभाविक होते. त्यांतील काही विहिरींना त्यांच्या कलापूर्ण वास्तुरचनेने सर्वत्र मान्यता प्राप्त झाली. काही विहिरी तर भव्य आहेत. गुजरातमधील पाटण नगरी नजीकची ‘रानी की बाव’ या विहिरीवर जागतिक वारसा-वास्तूची मोहोर उमटली आहे!
मुंबईसारख्या प्रगत शहरातदेखील काही विहिरी त्यांच्यातील जलसाठ्याबरोबर पूर्वापारचा इतिहास, संस्कृती यांचे मोल जपून आहेत. त्यांनाही स्थानिक वारसा-वास्तूंचे मोल आहेच. त्यापैकी एक म्हणजे मुंबईतील हुतात्मा चौक ते चर्चगेट मार्गावरील ‘पारशी बावडी’. ती विहीर तीन शतकांची उमर पार करून अजूनही लोकांच्या भावना जपत आहे. बावडी म्हणजे विहीर. भिकाजी बेहरामजी नावाच्या धार्मिक श्रद्धावान पारशी माणसाचे नाव जरी त्या बावडीला अधिकृतपणे दिले गेले असले तरी ‘पारशी बावडी’ या नावाने ती विहीर सर्वत्र ओळखली जाते.
हुतात्मा चौक ते चर्चगेट या वीर नरिमन मार्गावर मध्यवर्ती टेलिग्राफ कार्यालयाच्या समोर; तसेच, फॅशन स्ट्रीटच्या वळणावर प्रथमत: दिसते ते एक लोखंडी फाटक. त्याच्यावर भिकाजी बेहरामजी यांच्या नावाचा फलक आहे. त्या बंदिस्त बावडीच्या प्रांगणात ‘पारशी समाजाव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश निषिद्ध’ अशा आशयाची सूचना त्यावर आहे. वास्तविक पारशी समाज मुळात परोपकारी, दानशूर आणि पुरोगामी आहे, तरी ही सूचना आली आहे; ती देवस्वरूप बावडीचे पावित्र्य जपण्यासाठी. जिज्ञासू, पर्यटक, प्रवासी फाटकाआत डोकावून विहिरीचे लांबून दर्शन घेतात.
बावडीच्या सभोवताली संरक्षणासाठी भिंत उभारली आहे. तेथे दर्शनी कमान आहे. त्यावर पारशी धर्मीयांच्या तत्त्वप्रणालीनुसार काही बोधचिन्हे आढळतात. सतत वाहत्या, गजबजलेल्या रस्त्यालगत असूनही बावडीभोवतालचा परिसर स्वच्छ आणि दुर्मीळ शांततेचा आहे. त्यातून पारशीधर्मीय शांतताप्रिय कसे आहेत त्याचेही दर्शन घडते. बावडीसभोवतालच्या बाकांवर बसून चित्ताची एकाग्रता साधत हातातील जपमाळ ओढत बसलेले सर्व वयोगटांतील पारशी बांधव प्रार्थनेत रममाण झालेले दिसतात.
अठराव्या शतकाच्या आरंभी भिकाजी बेहरामजी नावाचा एक पारशी गृहस्थ पोटापाण्यासाठी गुजरातच्या भरूच नगरीतून मजल-दरमजल करत मुंबईकडे येत होता. तो काळ म्हणजे मराठे विरुद्ध गुजरातचा सुलतान यांच्यामधील युद्धधुमश्चक्रीचा होता. पापभिरू, बाळबोध स्वभावाच्या भिकाजी बेहरामजी यांना मुसलमान समजून तुरुंगात ठेवले गेले. बेहरामजी यांनी त्यांच्या प्रामाणिक वागणुकीने प्रशासनाला वस्तुस्थिती समजावून दिल्यावर त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
पारशी बावडीला श्रद्धास्थानाचे महत्त्व प्राप्त होण्यास कारणही तसेच घडले. अठराव्या शतकाच्या आरंभी, अरबी समुद्राचे पाणी चर्चगेट रेल्वेस्थानकापर्यंत (स्थानक त्यावेळी नव्हतेच) येत असे, त्याच्या नजीकच्या या विहिरीत गोड्या पाण्याचा साठा कसा? या चमत्काराने ते श्रद्धास्थान म्हणून सर्वश्रुत झाले. समाजऋण मानणाऱ्या पारशी समाजाने अनेक बावड्या बांधल्या असल्या, तरी श्रद्धेचे स्थान मात्र या पारशी बावडीला आहे.
पारशी धर्मात अग्नीप्रमाणेच जलपूजेलाही अग्रस्थान आहे. ‘आवान याझद’ ही जलदेवता श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाते. ‘आवा’ नावाचा पवित्र महिना आहे. ‘आवा’ महिन्यात पारशी बांधव प्रार्थनेसाठी बावडीला हजेरी लावतात. प्रत्येक शुक्रवारी जो कोणी या बावडीजवळ दिवा प्रज्वलित करून प्रार्थना करेल त्याची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा पारशी समाजाबरोबर इतर धर्मीयांतही आहे.
पारशी बावडीला ‘अ’ श्रेणीचा वारसावास्तू दर्जा प्राप्त झाला आहे.
या बावडीचे जतन-संवर्धन करताना, तिच्यावर दगडी सुशोभीकरणाचा साज असून, जोडीला स्टेनग्लासयुक्त आवरणाने त्याचे सौंदर्य खुलवले गेले आहे. बावडीच्या बांधकामातून पारशी समाजाच्या ‘झोरास्ट्रियन’ धर्मतत्त्वप्रणालीचे दर्शन घडते.
– अरुण मळेकर ८३६९८१०५९४, arun.malekar10@gmail.com
(लोकसत्ता, 11 ऑगस्ट 2018 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)