‘मनोरंजन’ आपल्या जन्मानंतर पाच-दहा वर्षांतच खरोखर सर्वांगसुंदर बनले. मासिक ‘मनोरंजन’चे संकल्पित नाव ‘मासिक मौज’ असे होते. त्या नावाच्या हस्तपत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या; परंतु गुजरातीमध्ये त्याच वेळी ‘मासिक मजाह’ नावाचे मासिक पुस्तक निघत असे. त्याच्या संपादकांनी मित्रांना आपल्या मासिकाचे नाव बदलण्याचा आग्रह केला व त्या आग्रहाला अनुसरून मित्रांनी संकल्पित नाव बदलून ‘मासिक ‘मनोरंजन’ असे नामकरण केले. ‘मासिक ‘मनोरंजन’च्या पहिल्या अंकावर ‘मराठीतील पहिल्या प्रथमचे सचित्र, मनोरंजक आणि स्वस्त मासिक पुस्तक’ असे मराठीत आणि ‘Masik Manoranjan or monthly amusement, the only illustrated and popular monthly in Marathi’ असे इंग्रजीत त्याचे वर्णन केलेले आढळते. ‘विविधज्ञानविस्तार’, ‘करमणूक’, ‘मनोरंजन’ व ‘निबंधचंद्रिका’ ही नियतकालिके ‘मनोरंजन’च्या अगोदर निघालेली. ती आणि इतर मराठी नियतकालिके आपापल्या परीने इंग्रजी शिक्षणाच्या आगमनानंतर हळुहळू वाढीस लागलेल्या हजारो वाचकांच्या मागण्या पुरवत होती. परंतु मागण्या एकसारख्या वाढत होत्या. त्यांत विविधता येत होती, चोखंदळपणा डोकावत होता. वाङ्मयाच्या वाढत्या वाचकवर्गात पुरूषांबरोबर स्त्रियांचाही अधिकाधिक भरणा होऊ लागलेला होता. स्त्री-वाचकांच्या स्वत:च्या अशा काही गरजा होत्या. मित्रांनी ते ओळखले आणि नवीन संमिश्र वाचकवर्गाचे मनोरंजन करण्याचे अवघड काम आपल्या अंगावर घेतले व पार पाडले. दुर्दैवाने, १९२० साली कॅन्सरच्या विकाराने मित्र निधन पावले; आणि १९२५ पासून ‘मनोरंजन’ची पुढील दहा वर्षे मोठी हलाखीची गेली. ‘मनोरंजन’ प्रत्यक्ष १९३५ साली कालवश झाले हे जरी खरी असले, तरी काशिनाथ रघुनाथ मित्रांच्या निधनानंतर ते जवळजवळ निस्तेज झाले; त्याच्या कर्तृत्त्वाचे दिवस तेव्हाच संपले. परंतु विसाव्या शतकातील पहिली पंचवीस वर्षे ‘मनोरंजन’ने महाराष्ट्र-विदर्भ-मराठवाड्यातील हजारो वाचकांची मने स्वत:कडे पूर्णपणे आकर्षून घेतली होती. (त्याच काळातील ‘मनोरंजन’च्या कर्तृत्त्वाचा मी येथे धावता आढावा घेत आहे. १९२५ नंतरचा ‘मनोरंजन’चा काळ मी येथे फारसा लक्षात घेतलेला नाही.) महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा ह्यांतील अगदी छोट्या छोट्या तालुक्यांच्या गावीदेखील ‘मनोरंजन’ची उत्सुकतेने वाट पाहणारे शेकडो वाचक त्या काळात होते. ‘मनोरंजन’च्या वर्गणीदारांची संख्या १९१४ च्या सुमारास दहा हजारांवर गेली होती. ती संख्या कमीत कमी पाव लाखांवर नेण्याची ‘मनोरंजन’ची मनीषा होती आणि बंगालमधील ‘प्रवासी’सारख्या प्रतिष्ठित मासिकाने ‘मनोरंजन’ने केलेल्या कार्याची जाहीर प्रशंसा केली होती, ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे.
‘मनोरंजन’ने अंकाच्या मांडणीच्या बाबतीत १९१४/१५ साली जवळजवळ आदर्श गाठलेला होता, असे हे अंक चाळल्यास लक्षात येईल. ‘मनोरंजन’च्या सुबक मांडणीचा परिणाम तत्कालिन नियतकालिकांवर किती इष्ट होत होता, हे पाहण्यासाठी त्याच काळातील ‘नवयुग’ मासिकाचे अंकही त्या दृष्टीने चाळण्यासारखे आहेत. परंतु त्याहीपेक्षा ह्या ‘खास’ अंकांच्या क्षेत्रातील ‘मनोरंजन’ची वाङ्मयाच्या व समाजेतिहासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्याने प्रसिद्ध केलेले व्यक्तिविशेषांक : १९१६ साली काढलेला आगरकर खास अंक, १९१८ साली काढलेला महर्षी कर्वे ज्युबिली खास अंक व १९१९ साली काढलेला हरिभाऊ आपटे खास अंक. हे खास अंक पुढे ‘रत्नाकर’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘ज्योत्स्ना’ यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या तशा प्रकारच्या अनेक अभ्यसनीय खास अंकांचे अग्रदूत ठरले. त्यातील लेखन मोठ्या आस्थेने जमवलेले व संपादित केलेले आहे. त्यातील बहुमोल लेखांबरोबर त्यातील दुर्मीळ छायाचित्रे व त्यात आलेले आगरकर व हरीभाऊ आपटे ह्यांच्या हस्ताक्षराचे नमुने मराठी वाचक विसरणार नाहीत. ‘मनोरंजन’ने व्यक्तिविशेषांकाप्रमाणेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण, वाङ्मय ह्यांपैकी कोणत्याही क्षेत्रातील एखादी व्यक्ती दिवंगत होताच त्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता एका अंकात देऊन त्याच्या पुढील अंकात तिच्या कार्याची यथार्थ कल्पना देणारा सचित्र लेख देण्यात कधीच कसूर केली नाही. न्या. रानडे, नामदार गोखले, दाजी आबाजी खरे ह्यांच्यापासून ते थेट केशवसुत, गडकरी, बालकवी, रे. टिळक ह्या वाङ्मयसेवकांपर्यंत सर्वांवर ‘मनोरंजन’मध्ये मृत्युलेख लिहिले गेले आहेत व ते सगळे मृत्युलेख वाचनीय आहेत.
परंतु ‘मनोरंजन’ने अत्यंत स्पृहणीय कामगिरी बजावली असेल तर ती कथेच्या क्षेत्रात. ‘मनोरंजन’च्या जन्मकाळी मराठी कथा नुकतीच रांगू लागली होती. ‘मनोरंजन’ने तिला स्वत:च्या पायावर उभे केले. तिला डोळ्यांत पाहण्याजोगे रंगरूप व स्वत:चे देखणे व्यक्तिमत्त्व प्राप्त करून दिले. कादंबरीच्या अनुषंगाने होणारा तिचा उल्लेख टळला व एक वाङ्मयप्रकार या दृष्टीने तिला स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त झाली. ‘मनोरंजन’च्या बरोबर सहाव्या अंकात ‘किस्मतबहाद्दर’ ही पहिली संपूर्ण गोष्ट प्रसिद्ध झाली व एप्रिल १८९६च्या अंकात मी जिला उद्देशून आधुनिक मराठी लघुकथेची अग्रदूत असेच म्हणतो ती ‘माझ्या मामाची एक वाईट खोड’ ही प्रसिद्ध कथा प्रकाशित झाली. ‘मनोरंजन’च्या छत्राखाली कथालेखक हळुहळू जमा होऊ लागले. ‘संपूर्ण सचित्र गोष्ट’ हे ‘मनोरंजन’चे एक प्रमुख आकर्षण ठरले. आपल्या एका अंकात काही वेळा ‘मनोरंजन’ चार- पाच संपूर्ण सचित्र गोष्टी देऊ लागले. साधारण १९१३-१४च्या सुमारास खास ‘मनोरंजन’च्या अशा कथालेखकांची संख्या खूपच वाढली. ह्या कथालेखकांच्या नावामध्ये वि.सी. गुर्जर, कृ.के. गोखले, श्रीपाद कृष्ण, वा.रा. जोशी, वामनसुता, वा.गो. आपटे, ना.गो. पांढरीपांडे, स. कुलकर्णी, गं.ना. सहस्रबुध्दे, वि.ना. देव, सुवासिनी, पु.वि. गोगटे, प्रभाकर माळवे, गो.गं. लिमये, शारदाश्रमवासी, आनंदीबाई शिर्के, बाजीराव गुंजीकर, हणमंत बापूराव अत्रे, सहकारी कृष्ण ह्यांची नावे वरचेवर येऊ लागली. परंतु ‘मनोरंजन’मधून झालेल्या मराठी कथेच्या विस्ताराला जर कोणी विशेष हातभार लावला असेल तर ‘मनोरंजन’चे साहाय्यक वि.सी. गुर्जर व संपादक का.र. मित्र यांनी. ‘मनोरंजन’च्या काळात कथा ही मुख्यत्वेकरून गोष्ट होती. ही गोष्ट श्रवणीय बनवली ती मुख्यत: गुर्जरांनी. ‘मनोरंजन’चे अंक चाळताना अगदी १९२० पर्यंत अनेक कथांवर पुष्कळदा लेखकाचे नाव आढळत नाही. ह्यातील अनेक कथा खुद्द गुर्जर, मित्र, रेंदाळकर यांच्याच आहेत. १९२२-२३च्या सुमारास ‘मनोरंजन’च्याच अंकातून दिवाकर कृष्णांच्या कथेचा उदय झाला. (‘संकष्टी चतुर्थी’, ‘हातरहाट’ ह्या दिवाकर कृष्णांच्या ‘मनोरंजन’मधून अवतरलेल्या पहिल्या कथा) गोष्ट म्हणून ‘मनोरंजन’च्या पहिल्या अंकातून बुजरेपणाने व नंतर थोड्याफार धिटाईने अवतरणारी मराठी कथा ‘मनोरंजन’च्या अंतकालाच्या अगोदरच ‘मनोरंजन’ने लघुकथा’ म्हणून ‘रत्नाकर’च्या स्वाधीन ‘केली. ‘मनोरंजन’च्या हयातीत मराठी गोष्टीची आजची ‘मराठी लघुकथा’ झाली, ही ‘मनोरंजन’ची सर्वांत उल्लेखनीय कामगिरी.
कथा आणि कविता यांच्याइतकेच इतर लेखनप्रकारांच्या विकासाकडे ‘मनोरंजन’ने आपले लक्ष पुरवले. १९०१ पासूनच ‘मनोरंजन’च्या जवळजवळ प्रत्येक अंकातून सचित्र प्रवासवर्णने व स्थलवर्णने ह्यांना स्थान मिळू लागले. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक इतिहासप्रसिद्ध व निसर्गसौंदर्याकरता प्रसिद्ध असलेल्या स्थळांची वर्णने ‘मनोरंजन’मधून येऊ लागली. ह्या स्थलवर्णनांबरोबरच विलायतेच्या व उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानच्या प्रवासांची वर्णने हे ‘मनोरंजन’चे जवळजवळ एक ठराविक सदर झाले. प्रो.चिं.गो. भाटे, अवंतिकाबाई गोखले, प्रो.आण्णा आबाजी लठ्ठे ही आणि इतर अनेक नावे आपणाला ह्या संदर्भात आढळतील. प्रवासवर्णनांच्या खालोखाल ‘मनोरंजन’मधील जे लेखन आपल्या डोळ्यांत विशेष भरते ते शास्त्रीय स्वरूपाचे. त्या काळातील इतर अनेक नियतकालिकांप्रमाणे ‘मनोरंजन’नेही ज्ञानदान हे आपले ध्येय मानले होते. फक्त हे शास्त्रीय ज्ञान मनोरंजक झाले पाहिजे ह्याची सतत काळजी ‘मनोरंजन’ घेत होते. आणि म्हणूनच ‘मनोरंजन’ने शास्त्रीय ज्ञान लोकप्रिय करण्याबाबत जे महनीय कार्य केले त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करावेसे वाटते. मी आपणास ‘मनोरंजन’मधील अशा प्रकारच्या लेखांचे काही मथळे तेवढे संगतो. त्यावरून ज्याला आपण ‘पॉप्युलर सायन्स’ म्हणतो त्याबाबत ‘मनोरंजन’ने १९१०/१५ मध्ये किती प्रगती केली होती ह्याची आपणास सहज कल्पना येईल. प्रो. के.रा. कानिटकर ह्यांनी एकट्याने ‘मनोरंजन’साठी लिहिलेल्या लेखांचे पुढील मथळे पाहा: ‘पाणी स्वच्छ का असावे?’, ‘भोपळ्याच्या वेलावरचे मुंगळे’, ‘वाहत्या पाण्याचे संस्कार’, ‘दही कसे विरजावे?’, ‘वनस्पतींना इंद्रिये असतात का?’, ‘भाजीवर झाकण का ठेवतात?’, ‘थंडीच्या दिवसांत दही का विरजत नाही?’, ‘पर्वताची उंची कशी मोजतात?’ – मला वाटते एवढे मथळे पुरे आहेत. कृष्णाजी विनायक वझे यांनी लिहिलेली ‘जलबिंदूचा प्रवास’ ही लेखमाला ह्या संदर्भात आठवेल. ‘मनोरंजन’ने विज्ञानाप्रमाणेच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी शास्त्रांतील प्रश्नांकडेही दुर्लक्ष केले नाही. ह्या सर्व शास्त्रांतील माहिती मनोरंजक स्वरूपात वाचकांना देण्यासाठी ‘मनोरंजन’ने एक मोठा लेखकवर्ग निर्माण केला. त्यात प्रो.वा.म. जोशी, प्रो.ह.रा. दिवेकर, प्रो. कानेटकर, प्रो. सत्याश्रय पाणंदीकर, डॉ.पां.दा. गुणे, कृ.वि. वझे, प्रो. लिमये, प्रो. आर.एन. भागवत, सहस्रबुध्दे, चिपळूणकर इत्यादी नावे फार महत्त्वाची ठरतात.
१९१२ साली गडक-यांनी आपल्या प्रसिद्ध बाळकरामाला ‘मनोरंजन’च्या पानांतच जन्म दिला आणि मग श्रीपाद कृष्ण व गडकरी ह्यांच्या अवतीभवती सावित्रीतनया, वि.सी. गुर्जर, वा.गो. आपटे, कॅ.गो.गं. लिमये, दादोबांचा मानसपुत्र, श्यामसुंदर, रणसिंग, बगाराम, चि.वि. जोशी, वा.रा. टिपणीस, वा.वि. जोशी इत्यादी अनेक लेखक हळुहळू जमा झाले. ‘जांभळीची शाळातपासणी’ ही वि.स. खांडेकरांची प्रसिद्ध विनोदी गोष्ट प्रथमत: ‘मनोरंजन’च्या पानातच आढळते.
‘मनोरंजन’ने केलेल्या अनेकविध कार्याबद्दल एवढ्या लहानशा लेखात संपूर्ण कल्पना देणे अशक्य आहे. साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात ‘मनोरंजन’ने ‘पुस्तकपरीक्षा’ हे सदर सुरू करून लक्षणीय कार्य केले. ह्या क्षेत्रातील ‘मनोरंजन’ने केलेल्या कार्याचे स्वरूप थोडे फार लक्षात यावे म्हणून फक्त एकाच लेखमालेचा उल्लेख करतो. ती लेखमाला म्हणजे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी तात्यासाहेब केळकर यांच्या ‘तोतयाचे बंड’ या नाटकावर लिहिलेली प्रसिद्ध लेखमाला. ह्या सदरासाठी प्रो. ह.रा. दिवेकर, डॉ. गुणे, गो.म. ठेंगे, वा.म. जोशी, वै.का. राजवाडे, बेहेरे, सावित्रीतनया इत्यादी लेखकांची ‘मनोरंजन’ला एकसारखी मदत असे. साहित्यसमीक्षेप्रमाणेच जुन्या व नव्या साहित्याची गोडी समाजामध्ये निर्माण करण्यासाठी ‘मनोरंजन’ने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ह्या कामी ‘मनोरंजन’ला वरील लेखकांबरोबर ना.म. भिडे, श्री.म. वर्दे, वा.ना. देशपांडे, मा.दा. आळतेकर, म.म. जोशी, व.ना. नाईक, न.शं. रहाळकर इत्यादी लेखकांची बरीच मदत झाली आहे. नव्या मराठी कवितेच्या संदर्भात त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख वर आलाच आहे. प्राचीन मराठी कवींच्या कवितेचा ‘मनोरंजन’च्या वाचकांना परिचय करून देण्यासाठी गोपाळ गणेश टिपणीस ह्यांनी लिहिलेली ‘संतांचा परिचय’ ही लेखमाला, वा.गो. आपटे ह्यांचा ‘तुलसीदासाच्या काव्यामृताचे घुटके’, भि.अ. जागीरदार ह्यांचा ‘तुकारामाचा विनोद’, प्रो. पानसे ह्यांचा ‘कविवर्य कालिदासांच्या काव्यापासून होणारा नीतिबोध’, प्रो.श्री.रा. पारसनीस ह्यांनी प्रि.वा.ब. पटवर्धन यांच्या काही विल्सन फायलॉजिकल लेक्चर्सचा ‘भागवतधर्मीय संत व मराठी वाङ्मय’ ह्या लेखमालेतून केलेला अनुवाद हे आणि इतर अनेक लेख ह्या संदर्भात लक्षात येतात. ना.सी.फडके, श्री.के. क्षीरसागर, वा.ना. देशपांडे, श्री.ना. बनहट्टी, वि.भि. कोलते, वि.स. खांडेकर इत्यादी आपल्या परिचयाच्या लेखकांचे पहिले कितीतरी टीकात्मक लेख प्रथम ‘मनोरंजन’मध्येच वाचायला मिळतात. प्रा. ना.सी.फडके यांचे ‘चित्रपटाची चांडाळ चैन’, ‘श्री समर्थ संदेश’ इत्यादी वाचनीय लेख ‘मनोरंजन’मध्ये १९२०-२१ सालाच्या आसपास प्रसिद्ध झाले.
‘सत्य संकल्पाचा दाता भगवान’ हे ब्रीदवाक्य शिरोभागी धारण करून ‘मनोरंजन’ प्रथम अवतरले. परंतु १९०९ पासून ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ हेच ब्रीदवाक्य ‘मनोरंजन’च्या मुखपृष्ठावर झळकू लागले. ‘मनोरंजन’चे हे ब्रीदवाक्य त्याने अंगीकारलेल्या ध्येयाला सर्वस्वी साजेसे होते. ‘मनोरंजन’मधील व्यंगचित्रांचा रोखही बहुदा स्त्रियांवर होणा-या अन्यायाविरुद्ध असे. (‘मनोरंजन’ अधुनमधून बोलक्या सुधारकांचा, आंधळ्या सुधारकांचा निषेध करत असे; परंतु सुधारणांना निषेध करू पाहणा-या सनातन्यांविरुद्ध याचा मुख्य रोख असे.) स्त्री सुधारणाविषयक चळवळींना शक्यतोवर पाठिंबा देणे हा ‘मनोरंजन’चा हेतू त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टींमधूनही दिसत असे.
‘स्वयंपाकघरातील गोष्टी’ हे सदर प्रथम ‘मनोरंजन’नेच सुरू केले व ते अत्यंत लोकप्रिय झाले. स्त्रियांच्या गरजा लक्षात घेऊन कशिदा, भरतकाम, गृहशोभा, बालसंगोपन इत्यादी अनेक विषयांवर ‘मनोरंजन’ने उपयुक्त लेखन वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे. ‘मनोरंजन’ने स्त्री-लेखिकांना खूप उत्तेजन दिले. ‘मनोरंजन’च्या स्त्री-लेखिकांमध्ये वामनसुता, सरस्वतीतनया, कृष्णाबाई ठाकूर, काशीबाई नवरंगे, अवंतिकाबाई गोखले, काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई दाणी, हेरलेकर, सुवासिनी, एक भगिनी, भद्राबाई, माडगावकर, राधाबाई गोखले इत्यादींच्या कथा नि:संशय वाचनीय आहेत. पुढे स्त्रियांसाठी निघालेल्या ‘गृहलक्ष्मी’, ‘स्त्री’ ह्यांसारख्या खास स्त्री-मासिकांसाठी अनुकूल वातावरण ‘मनोरंजन’नेच निर्माण केले, असे म्हणणे सर्वथैव उचित ठरेल.
‘मनोरंजन’मधून प्रसिद्ध झालेल्या कादंब-यांमध्ये वामन मल्हारांच्या ‘रागिणी’चा उल्लेख पुरेसा आहे. वा.म. जोशी यांच्याप्रमाणेच ज्यांच्या कादंब-या ‘मनोरंजन’मधून क्रमश: प्रसिद्ध झालेल्या आढळतात, त्यात वि.सी. गुर्जर, मा.दा. आळतेकर, बा.सं. गडकरी, भालचंद्र इत्यादी नावे विशेष लक्षात राहतात. हा काळ कथात्मक वाङ्मयाबद्दलच्या विलक्षण उत्साहाचा होता. हा उत्साह वाढवण्याचे कार्य ह्या काळातील इतर संस्थांप्रमाणेच ‘मनोरंजन’ने स्वत: व आपल्या प्रकाशन संस्थेमार्फत केले. ‘मनोरंजन’ने कित्येक कादंब-या प्रकाशित केल्या व ग्राहकवर्ग अनेकपटींनी वाढवला. चालू कादंबरीप्रमाणेच पुढे पुढे ‘मनोरंजन’ने आपल्या जवळजवळ प्रत्येक अंकात एखादे प्रहसन, एखादी एकांकिका मुद्रित करण्याचे धोरण ठेवले होते; त्यामुळे मराठी एकांकिकेच्या आगमनाला व विकासालाही ‘मनोरंजन’ची मदत झाली. किरात, कान्हेरे, नाट्यछटाकार दिवाकर, र.धों. कर्वे, एक सारस्वत भगिनी, वि.सी. गुर्जर, ल.वा. परळकर, भालचंद्र ह्या लेखकांचे प्रयत्न ह्या संदर्भात लक्षात घेण्याजोगे आहेत. नाट्यछटाकार ‘दिवाकर’ ह्यांची ‘कारकून’ ही नाटिका १९१४-१५ साली ‘मनोरंजन’मधूनच प्रसिद्ध झाली.
‘मनोरंजन’ने केलेल्या वाङ्मयीन व सामाजिक कार्याविषयी मी कितीही लिहिले तरी ते थोडेच होणार आहे. ह्या कार्याचे स्वरूपच तसे आहे. ते बहुविध आहे. वाङ्मयाची अशी एकही शाखा नाही, की ज्यामध्ये ‘मनोरंजन’ने आपल्या शक्तीनुसार भर घातलेली नाही. सर्वसामान्य परंतु सुसंस्कृत व आस्थेवाईक वाचकांचे ‘मनोरंजन’ करणे, हेच ‘मनोरंजन’चे ध्येय होते. हे ध्येय ‘मनोरंजन’ने नि:संशय गाठले. अशाप्रकारचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवू पाहणाऱ्या नियतकालिकांसाठी त्याने उत्तम आदर्श निर्माण केला. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात ‘मनोरंजनचा काळ’ ह्या शब्दप्रयोगाला म्हणूनच विलक्षण अर्थ आला आहे. मराठीला अभिमान वाटावा असेच कार्य ‘मनोरंजन’च्या हातून घडले व म्हणूनच ‘मनोरंजन’च्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला.
– वा.ल. कुलकर्णी
(‘श्री दीपलक्ष्मी’ दिवाळी १९६५ अंकातून)
(छायाचित्रे ‘मायबोली’ संकेतस्थळावरून साभार)
माहिती पूर्ण लेख.
माहिती पूर्ण लेख. पत्रकारितेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमात थोडंफार दिवाळी अंकाविषयी वाचन केलं होतं.
marathi niyatkalik masik…
marathi niyatkalik masik manoranjan jari 18 vya shatkat suru zale tari aaj tayche mahatva kami nahi bhavi pidhila masik kay aste, tyache hetu kiti changle astat he kalel aajchya bajaru jagal khup kami changal vachayla milta aapla upkram changla aahe thanks
मासिक मनोरंजन यावर काही…
मासिक मनोरंजन यावर काही संशोधन झाले असल्यास माहिती हवी आहे
Please I want Masik…
Please I want Masik manoranjan all ank. For historical research. Can you send me this ank by post my local address. I send you money.
Comments are closed.