माझ्या जीवनातली ‘श्यामची आई’

1
47
गीता हरवंदे
गीता हरवंदे

गीता हरवंदे     मी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने मला बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. इतरही खेळातील वगैरे मिळून आणखी चार-पाच पुस्तके त्यावेळी मला बक्षीस म्हणून मिळाली होती. पण, ती आता मला काही आठवत नाहीत. मला अप्रूप फक्त ‘श्यामची आई’ पुस्तकाचं होतं. साने गुरुजींचे पुस्तक मिळाल्याने मला खूप आनंद झाला. तोपर्यंत पुस्तकरूपातून साने गुरुजींचा आणि माझा परिचय झालेला नव्हता आजही पन्नास वर्षांनंतर ते पुस्तक माझ्याजवळ आहे. शिळ्या भाकरीसारखी त्याची पाने तुटू पाहताहेत पण मी ते जपून ठेवले आहे.

‘श्यामची आई’ पुस्तक      ‘श्यामची आई’ आणि श्याम मला अक्षररूपाने अगदी प्रौढपणी आकलन झाला. माझ्या आईपासूनची माझी सारी रक्ताची नाती मला गुरुजींमध्ये प्रतिबिंबित होत. माझी अवस्था ‘जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित’ अशी होती. मला अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. भावंडांमध्ये मी सर्वांत मोठी. त्यात मुलगी म्हणून जन्माला आलेली हा ही माझा गुन्हा होता. त्यामुळे घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटन-हातशिलाई करायची. शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. बालपणीच्या अशा चित्रात अक्षरांशी खेळायचे राहूनच गेले. अक्षरांच्या दालनात प्रवेश करायला प्रौढपण आले.

       प्रेमाचे अथांग सागर असलेल्या गुरुजींच्या त्या कारुण्यमूर्तीच्या चित्राने आणि ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या गाण्याने ज्या वात्सल्यपूर्ण प्रेमाला मी अगदी लहानपणापासून सतत आसुसलेली होते. ते प्रेम मला गुरुजींनी विद्यार्थिदशेत दिले. त्यावेळी मला तेवढेच पुरेसे वाटले. माझी गरज आणि बुद्धीचा आवाका खूप लहान होता. तोपर्यंत मी गुरुजींना पुस्तकातल्या मोरपिसासारखे जपले होते.

     पुढे संसाराचा पसारा बर्‍यापैकी आवरल्यावर माझे बक्षीस- ‘श्यामची आई’चे शब्दरूप उलघडण्यास मला उसंत मिळाली. गुरुजींचं जे काही थोडफार लेखन वाचले होते त्यांनी मी फार कासावीस होत होते. म्हणजे असे, की लहाणपणी आई प्रेमाचा लोण्याचा गोळा वाटते. सतत हवीशी वाटते. पण, समजायला लागल्यावर तिचे कष्ट पाहून दु:ख होऊ लागते. तसे काहीसे माझे झाले.

साने गुरुजी      गुरुजींनी मातृप्रेम आणि राष्ट्रप्रेमाची महती गायली; कारण ते स्वत:च अतिव कोमल हृदयी होते. म्हणून स्वमाता आणि भारतमातेबद्दल त्यांच्या हृदयात अभिन्नता होती. या अभिन्नतेमुळे आंतरिक उत्स्फूर्ततेने ते इतके संपन्न लिखाण करू शकले. आपल्या घरचे संपन्नतेचे जीवन संपून एकाएकी आईला करावे लागणारे कष्ट आणि पारतंत्र्यातील भारतमातेची अवस्था या दोन्ही घटना गुरुजींच्या हृदयी सारख्याच तीव्रतेने सलत होत्या.

      सलणारी परिस्थिती प्रचंड कष्टानंतर बदलली. पण, ज्या अपेक्षेने परिस्थिती बदलण्यास कष्ट घेतले त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर येणारी निराशा कोमलहृदयी गुरुजी कसे काय सहन करणार? स्वतंत्र भारतमाता आनंदाने हसताना गुरुजींना दिसलीच नाही. गुरुजींच्या आईला-यशोदेला परत संपन्नतेचे दिवस दिसलेच नाहीत. पण, त्या मानी स्त्रीने गवत शाकारलेल्या झोपडीवजा पण स्वत:च्या घरात प्राण सोडले. मी लोणेरेचे गुरुजींचे स्मारक पाहताना कासावीस झाले. गुरुजींनी मूकपणे किती यातना सहन केल्या असतील? त्यांच्या जीवाची कशी घालमेल झाली असेल? सार्‍या जगाला प्रेमाची महती सांगणार्‍या गुरुजींना आपल्या जीवाची घालमेल सांगायला एकही प्रेमाचा माणूस नसावा?

       भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांची येथे आठवण येते. – ‘या पृथ्वीवर जन्म घेणार्‍या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामध्ये देवाचा विशेष हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथे अवतरतो.’

        साने गुरुजी नाजूक जुईचं फूल होते. जे सुगंध देऊन मिटून गेलं.

साने गुरूजी यांचेश्‍यामची आईहे पुस्‍तक वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

गीता आदिनाथ हरवंदे
दूरध्वनी- ०२२-२५८८३३०५
इमेलadharwande@gmail.com

About Post Author

Previous articleसाने गुरुजी- मी पाहिलेले!
Next articleआंगणेवाडीची जत्रा
आदिनाथ हरवंदे हे रत्‍नागिरीच्‍या जांभारी गावचे. ते 'औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात' एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख पदावरून 2002 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्‍ये 1975 पासून सातत्‍याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्‍यांच्‍या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्‍यांनी धावपटू, विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी, चौसष्‍ट घरांचा बादशहा - विश्‍वनाथ आनंद अशी क्रीडासंदर्भात पुस्‍तक लिहिलेली. त्‍यात 'लालबाग' आणि 'जिगीषा' या दोन कादंब-याही आहेत. त्‍यांच्‍या लेखनास अनेक पुरस्‍कार प्राप्‍त असून त्‍यांना सचिन तेंडुलकर याच्‍या हस्‍ते 'ज्‍येष्‍ठ क्रीडा पत्रकार' हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. लेखकाचा दूरध्वनी 9619845460

1 COMMENT

Comments are closed.